थोडा है थोडे की जरुरत है @ 03.03.2020
अनोखा बाँड
ती निघाली. उणीपुरी एकवीस वर्षांची ती पोर. तिची आई काळजीतच होती परंतू तिच्या बाबांनी मोकळेपणाने दिलेल्या परवानगीमुळे ती निघाली. पाठीवर एक छोटी सॅक लावून त्यात थोडेफार कपडे, काही पुस्तके व जुजबी सामान घेऊन तिच्या गावापासून जवळपास तेराशे किलोमीटर दूर असलेल्या एका गावी जाण्यासाठी ती निघाली, एकटी! आईच्या मनामधे स्वाभाविकपणे धाकधूक होती. एवढा लांब प्रवास, त्यात काही प्रवास विमानाने, काही बसने तर काही खाजगी टॅक्सीने. राहणार कुठे, काही समस्या निर्माण झाली तर वगैरे सर्व बाबींनी आईचा चेहरा चिंताक्रांत होता. परंतू त्या चिमुरडीचे बाबा मात्र तयार होते. माझी पोरगी निश्चित जाऊ शकते आणि तिला करुन बघू दे, हेच अनुभव महत्वाचे असतात आयुष्यात आणि आजकाल मोबाईल फोन आहे त्यामुळे आपल्याला तिच्या संपर्कात राहता येईल असे तिचे बाबा तिच्या आईला समजावित होते. परंतू आईच्या डोक्यात मात्र नको नको ते विचार येत होते. केवळ एकविस वर्षांची पोर आणि एवढ्या लांब कशी जाईल? हा विचार तिला त्रास देत होता आणि सोबतच कशासाठी तर तिच्या एका हिरोला भेटायला. आईच ती! त्यामुळे तिचे काळजी करणे स्वाभाविक होते. परंतू मग त्या पोरीच्या बाबांनी निर्णायक घोषणा केली, तिने तिच्या लहानपणापासून हे स्वप्न बघितले आहे व आता ते स्वप्न तिला मनापासून पूर्ण करायचे आहे त्यामुळे आता तिच्या आड यायचे नाही. अश्या पद्धतीची स्वप्ने फार कमी लोक बघतात आणि त्याची पूर्तता जर तिला करुन बघायची आहे तर मग आपण तिला मदत करायची. बाबांच्या निर्णयाने प्रचंड खूश झालेली ती पोरगी आईच्या गळ्यात पडून, काळजी करु नको, मी पटकन येते माझ्या हिरोला भेटून, असे म्हणून नागपूरच्या विमानतळावरून तिच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेपावली. अगदी लहानपणापासून जोपासलेले एक स्वप्न तिला पूर्ण करायचे होते. लहानपणापासून ज्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा तिच्या मनामधे होती त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तिला परवानगी मिळाली होती व त्यामुळे ती जाम खूश होती. तिला कुण्या सिनेमामधे काम करणाऱ्या हिरोला वगैरे भेटायचे नव्हते. The Blue Umbrella, The Room On The Roof, A Flight of Pigeons, Angry River, Roads to Mussoorie या सारख्या अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे व अनेक सुंदर सुंदर कथांचे लेखक रस्किन बाँड यांना तिला भेटायचे होते. पुस्तकांसाठी वेडी असलेली काही मोजकी मुले मला ठाऊक आहेत परंतू आजच्या या तंत्रज्ञानाच्या काळात केवळ पुस्तकासाठी वेडी असलेली नाही तर तिच्या आवडत्या लेखकाला भेटण्याचे स्वप्न लहानपणापासून बघणारी व त्याच्या पूर्ततेसाठी जवळपास १३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मसूरी या गावी जाण्यासाठी ही पोर मला अफलातूनच वाटली.
एकटीने एवढा लांब पल्ला गाठायला ती निघाली. अर्थात तिचे बाबा म्हणाले ते खरेच होते. अश्या प्रकारचे अफलातून स्वप्न देखील बघता यायला हवे. आपल्या जगण्याच्या शर्यतीमधे स्वप्ने देखील मर्यादित बघावी लागतात. त्यांच्या पूर्तता तर फारच लांबची गोष्ट असते. अर्थात हा सर्व परिस्थितीचा भाग देखील असतो. स्वप्नपूर्तीची सुतराम शक्यता नसताना स्वप्ने बघून उगाच त्रास का करुन घ्यायचा असा विचारही काही लोक करतात आणि त्यांच्या परिस्थितीमधे तो योग्य देखील असणार. परंतू या पोरीला मात्र स्वप्न बघता देखील आले व त्या संदर स्वप्नाच्या पूर्तीसाठी तिला एकटीला, त्या थोर लेखकाला भेटण्यासाठी जाता देखील आले. परंतू हा प्रवास काही सोपा नव्हता. नागपूरहून दिल्ली विमान प्रवास. त्यानंतर मग तेथून बस पकडून डेहराडून तिने गाठले. डेहराडूनहून टॅक्सी करुन ती पोहोचली अत्यंत सुंदर अश्या मसूरी या गावाला. तेथे गेल्यावर मात्र आपण आता आपल्या हिरोला भेटणार या उत्सुकतेने चौकशी केली तर अजून स्वप्नपूर्ती दूर आहे हे तिच्या लक्षात आले. ही पोर दोन आठवड्यांपूर्वी जेव्हा रस्किन बाँड यांना भेटायला गेली त्यावेळी म्हणजे सध्या त्यांचे वय आहे ८५ वर्षे. मसूरीला गेल्यानंतर तिला असे कळले की प्रकृती फार चांगली रहात नसल्याने ते आता मसूरीहून आणखी उंचीवर असलेल्या एका लांडोर नावाच्या गावाला राहतात. आपल्या हिरोला भेटायचे तर होतेच त्यामुळे आता या पोरीला कोणतीही अडचण थांबवू शकत नव्हती. परत मसूरीहून टॅक्सी करुन ती त्या लांडोर नावाच्या गावाला गेली. शेवटी अश्या प्रकारे मजल दरमजल करीत ती एका घरासमोर पोहोचली ज्या घरावर त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या नावाची पाटी होती, रस्किन बाँड. टॅक्सीमधून उतरुन धडघडत्या ह्रदयाने व आता आपल्याला ती व्यक्ती भेटणार जिला भेटण्याचे स्वप्न तिने दहा वर्षांपासून जास्त काळ मनात जपले होते. ज्या लेखकाच्या विचारांना कित्येकवेळा वाचून कधी चेहेऱ्यावर हसू तर कधी डोळ्यात आसू आले होते, ज्या व्यक्तीच्या कादंबऱ्यातील पर्वतशिखरांची वर्णने वाचून गिर्यारोहणाच्या प्रेमात ती पडली होती, ज्या व्यक्तीच्या लिखाणातील वर्णनांमुळे नवनविन ठिकाणी भेटी देणे, निसर्गाच्या कुशीत रमणे हे ती शिकली होती अश्या रस्किन बाँडच्या घरावरची बेल तिने वाजविली व अत्यंत उत्सूकतेने दार उघडल्या जाण्याची वाट बघू लागली. ते काही सेकंद तिला फारच मोठे वाटले. आतमधे हालचाल जाणविली. कुणीतरी दरवाजा उघडायला आल्याचे जाणविले. नागपूरपासून ते लांडोर गावापर्यंत टिकवून ठेवलेल्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर तिला ते काही सेकंदाचे वाट बघणे देखील सहन होईनासे झाले. दरवाजा उघडला गेला. एकच क्षण या मुलीने डोळे गच्च मिटून घेतले होते व जसा दरवाजा उघडला तसे तिला समोर काय दिसले? रस्किन बाँड यांच्याकडे काम करणारी एक सहकारी. तिने हिला काम विचारले. अर्थात ही पोरगी रस्किन बाँड यांना भेटायला आली आहे हे तिच्या लक्षात आले. एका क्षणात तिने सांगितले की त्यांची प्रकृती बरी नसल्याने आम्ही त्यांना भेटण्याची परवानगी कुणालाही देत नाही. आनंदाने आपल्या हिरोला बघायला उत्सूक असलेल्या या मुलीच्या डोळ्यात हे वाक्य ऐकून खळकन अश्रू आले. जिवाच्या आकांताने तिने त्या बाईला समजावण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासूनचे सारे वेड, रस्किन बाँड यांना भेटण्याचे स्वप्न आणि साधारण १४०० किलोमीटर एकटीने केलेला प्रवास हे सारे तिने काकुळतीने तिला सांगितले. परंतू त्या सगळ्याचा काहीही परीणाम झाला नाही व दोन ते तीन मिनीटात साॅरी म्हणून त्या बाईने दार लावून घेतले. आपल्या स्वप्नपूर्तीच्या एवढे जवळ जाऊन ते असे निसटून गेले म्हणल्यावर रडतच तिने आईला फोन केला. तिच्या आईलाही वाईट वाटले. परंतू तिने तिला समजावले. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना भेटल्यामुळे त्यांना त्रासच होईल व मग तुझ्या हिरोला तुला त्रास झालेला आवडेल का? असे काहीसे तिला तिच्या आईने समजावले. त्यांच्या घराच्या पाटीसमोर सेल्फी घे व समाधान मान असे तिने तिला सांगितले. खरे तर पोरीच्या मनाची अवस्था ती समजू शकत होती पण समजावणे भाग होते. तेथील एका दुकानदाराने देखील या मुलीला समजावले. अनेक लोक भेटायला येतात व त्यामुळे त्यांना त्रास होतो, म्हणून तू वाईट वाटून घेऊ नको वगैरे. स्वप्नभंगाच्या धक्क्यातून सावरुन त्या चिमुरडीने परतीचा प्रवास सुरु केला. दोन दिवस तिने मसूरीला मुक्काम केला व नंतर टॅक्सीने डेहराडून गाठले. तेथून तिला परतीचे विमान पकडायचे होते. मसूरीला जातानाचा तिचा उत्साह पार मावळला होता. खिन्न मनाने तिने बोर्डींग पास घेतला, नंतर सिक्युरीटी चेक पूर्ण केला व चेकींग झालेली बॅग खांद्याला लावून तिने समोर बघितले आणि पुढच्या क्षणाला तिच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली, काय करावे तिला सुचेनासे झाले, पाय जड झाल्यागत थिजून ती जागच्या जागी उभी राहीली व विस्फारलेल्या नि आनंदाश्रूनी भरलेल्या नजरेने बघू लागली कारण तिच्या समोर उभे होते दस्तुरखुद्द रस्किन बाँड. त्याच विमानाने दिल्लीला ते काही कामानिमीत्त निघाले होते. पुढची पंधरा मिनीचे ती पोर अक्षरशः तरंगत होती. त्यांच्यासोबत फोटो, गप्पा सारे काही झाले. स्वप्नपूर्ती झाली नि ती देखील किती सुंदर!!
माझ्या वर्गमैत्रीणीच्या मुलीची ही सुरेख स्वप्नपूर्ती होऊ शकली ती केवळ रस्किन बाँडसोबत तिच्या असलेल्या अनोख्या बाँडमूळे!! असा किमान एखादा तरी बाँड हवा आयुष्यात आणि तो असा पूर्ण व्हावा, होय ना?
Wonderful, you made me realize that we must have a dream, we must have an aim. Just wonderful!!!
ReplyDeleteअप्रतिम स्वप्न,अप्रतिम मार्गदर्शन,अप्रतिम विश्वास आणि अविश्वसनीय स्वप्नपूर्ती
ReplyDeleteExcellent journey of curiosity for an affectionate bond.Simply great.
ReplyDeleteRajendra Tatwa de.(CMMUNICA)
Excellent story ,which tells us that dreaming is easy but fulfilling that dream needs tough efforts
Delete