थोडा है थोडे की जरुरत है @ 31.03.2020
३१ मार्च
३१ मार्च २०१९, या दिवशी दोन मित्रांचे दोन वेगवेगळ्या कामाकरीता आलेले फोन मला आज सहजच आठवले. पहिला फोन आला होता रात्री १०.३० च्या सुमारास. एका आर्थिक क्षेत्रातील कंपनीमधे काम करणारा माझा मित्र माझ्याशी बोलत होता. त्याने लिहीलेल्या काही गोष्टी त्याला इंग्रजीमधे भाषांतरीत करुन हव्या होत्या. त्याचे काम मी करुन दिले. पण न राहवून विचारले, इतक्या रात्री तुझे काय सुरु आहे? तो म्हणाला, तुला काय सांगू माझे काय सुरु आहे ते? आम्ही सर्वजण ऑफीसमधे बसलेलो आहोत. आज इयर एंडींगची कामे सुरु आहेत. आमचेच काय पण आमच्याशी संबंधित सारी कार्यालये सुरुच आहेत. आज आम्ही सर्वांकरीता जेवणाची व्यवस्था येथेच केलीय. आज रात्री कितीही वाजले तरी काम पूर्ण झालेच पाहिजे असे आदेश आहेत. पैसे का काम है यार. लोकांचा पैश्याचा व्यवस्थित विनीयोग झाला पाहिजे ना! नाहीतर कसे व्हावे? लोकांना पैसा कसा सांभाळायचा, कसा गुंतवायचा आणि नफा कसा मिळवायचा याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो आणि या आर्थिक वर्षाचा सारा मेळ बसविणे सुरु आहे. लोकांचा फायदा झाला तर आमचाही फायदा होईल. गंमत सांगू, आज माझ्या बाॅसने घोषणा केली की, जर आज आम्ही सर्वांनी मिळून जर आमच्या सर्व क्लायंट्सचे काम पूर्ण केले तर कंपनी आम्हा सर्वांना एक फॅमीली टूर पॅकेज देणार आहे, थेट इटली आणि जर्मनीचे. सगळा खर्च कंपनी करणार. म्हणून आम्ही लागलोय कामाला. अरे गेल्या एक महिन्यापासून मी रोज रात्री १२ नंतरच घरी जातोय आणि सकाळी ८ वाजता कामावर हजर. घरात कुणाशाही बोलणे देखील होत नाहीये. परंतू काही इलाज नाही. प्रेशर खूप आहे यार. डेड लाईन जवळ येतेय आणि काम शिल्लक आहे. सर्वांना तो टुर दिसतोय डोळ्यासमोर. परीवारासाठी सर्वात मोठे काम तर आपल्यालाच करावे लागते ना! मी तर बायकोला सांगून टाकले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात मी घरीच नाही असे समजायचे. उन्हाळ्यात मात्र हे घरी नसणे भरुन काढतो रे. या वर्षीपण तसेच होईल बघ. मला तो एक रीपोर्ट बनवून मुंबईला पाठवायचा होता म्हणून तुला फोन केला. धन्यवाद मित्रा, तू माझे काम करुन दिले. खरे म्हणजे आपलेही किती दिवस झाले बोलणे झाले नाहीये. असे समजू नको की, काम पडले की मी फोन करतो. आठवण येते यार पण हा ३१ मार्च चा ताण मोठा भयानक असतो. धड जेवण नाही, झोप नाही काही विचारु नको. जाऊ दे. मी लागतो कामाला. नाहीतर माझा बाॅस माझे इटली चे तिकीट कॅन्सल करायचा. बाय दोस्त, असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला होता.
त्यानंतर पुढचा फोन त्याच दिवशी म्हणजे ३१ मार्च २०१९ वेळ : रात्री ११.१५ दुसऱ्या एका मित्राचा फोन आला. एका औषधी कंपनीमधे काम करणारा आणि एरीया मॅनेजर या पदावर कार्यरत असणारा माझा तो मित्र मला रात्री इतक्या उशीरा फोन करीत होता म्हणजे काहीतरी महत्वाचे काम असणार याची मला जाणीव झाली. तो मला म्हणाला, अवि, अचानक माझ्या काॅम्प्युटरचा काहीतरी प्राॅब्लेम झालाय, तू नेहेमी वापरतोस म्हणून तुला फोन केला. सर्व दुकाने बंद आहेत त्यामुळे तुला त्रास देतोय. पण मला मदत कर. नेमके काय झाले हे मी समजून घेतले. त्याला काही वर्ड फाईल्स पीडीएफ करायच्या होत्या आणि काही पीडीएफ या वर्ड मधे कन्व्हर्ट करायच्या होत्या. हे सारे करणारे त्याच्या जवळचे साॅफ्टवेअर क्रॅक झाले त्यामुळे अडचण निर्माण झाली होती. मला आणखी एक साॅफ्टवेअर ठाऊक होते. ते मी त्याला सांगितले. ते साॅफ्टवेअर डाऊनलोड करणे त्याने सुरु केले. त्यानंतर मला त्याला पुढच्या सूचना द्यायच्या होत्या. मधे वेळ होता. म्हणून मी त्याच्याकडेही सहजच चौकशी केली. इतक्या रात्री तुझे काय सुरु आहे? मी प्रश्न विचारल्यावर उसळून तो म्हणाला, अवि, आज तारीख कोणती ते विसरलाय का? महिन्याचा आणि आर्थिक वर्षाच्या शेवटचा दिवस. आज तर आम्हा सर्वांची झोप हैराण झालीय. आज तूला विश्वास बसणार नाही, पण माझ्या कंपनीच्या मालकापासून तो शेवटच्या सेल्समन पर्यंत सर्वजण आज अक्षरशः जागे आहेत आणि सगळे एकमेकांवर जोरजोरात ओरडतोय. कधी तर अगदी शिवीगाळ पण होते. अर्थात हे सारे टारगेट पूर्ण करण्यासाठीच आहे रे. मी माझ्या लोकांवर ओरडतोय आणि माझा बाॅस माझ्यावर. आज रात्री कुठल्याही परिस्थीतीत कंपनी काही कोटीने नफ्यात आहे हे आम्हाला दाखवूनच द्यायचे आहे. अगदी रात्री देखील स्टाॅकीस्ट लोकांना उठवून उठवून ऑर्डर्स द्यायला सांगतोय. त्यात नेमके हे साॅफ्टवेअर बंद पडले यार. आज हे काम व्हायलाच हवे. आज माझ्या सेल्स चे सगळे रीपोर्ट जर रात्री कितीही वाजले तरी माझ्या बाॅसकडे पोहोचले नाही ना तर उद्या तो माझा जीव घेईल. आतापर्यंत चार वेळा नोकरीवरुन काढून टाकीन अशी धमकी देऊन झालीय. तशीच धमकी माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पोरांना माझी पण देऊन झालीय. धावपळ आहे नुसती. पण तुला सांगतो आमचे टारगेट जर पूर्ण झाले ना तर कंपनीने आम्हाला प्राॅमीस केलंय की दोन महिन्याचा पगार बोनस मिळणार. मोठी रक्कम होते ती. पण त्यासाठी ही धावपळ मात्र प्रचंड आहे. जाऊ दे. हे साॅफ्टवेअर झाले डाऊनलोड. सांग आता. पुढील प्रक्रीया मी त्याला सांगितली तेव्हा घड्याळात पावणेबरा झाले होते. फोन बंद झाला. त्यानंतर माझा मित्र पुढे किती वेळ जागणार होता हे त्याचे त्यालाही ठाऊक नव्हते.
या माझ्या दोन्ही मित्रांशी ३१ मार्च २०१९ रोजी बोलल्यावर मला एकच गोष्ट प्रामुख्याने जाणवली होती आणि ती म्हणजे त्यांच्यावर असलेला प्रचंड ताण. कंपनीला आणि पर्यायाने स्वतःला देखील होणारा नफा मिळविण्यासाठी प्रचंड ताण. त्यांना मिळणाऱ्या इटलीच्या ट्रीप बद्दल किंवा दोन महिन्याच्या बोनस बद्दल मला आनंदच होता. परंतू त्याच्या बदल्यात त्यांना सहन कराव्या लागणाऱ्या ताणाची देखील मला त्यांचा मित्र म्हणून आणि मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून चिंता होती. तब्बल एक वर्षांनी आज मला ते सारे आठवले व मी परत त्या दोघांना फोन केला. मागच्या वर्षीची त्यांना आठवण करुन दिली. आज मात्र ते काहीतरी वेगळेच बोलले.
अतिशय भावनिक होऊन ते मला सांगत होते, बहुदा आयुष्यात कुणालातरी पहिल्यांदाच. अवि, मला देखील त्या मागच्या वर्षीच्या रात्रीची आठवण झाली. आज मात्र घरात आहे. कोणतेही काम करीत नाहीये. कोणतेही टारगेट नाहीये. मी आज मुलांसोबत कॅरम खेळतोय, घरी बायकोला घरकामात मदत करतोय. माझा मुलगा बढीया पेंटींग करतो आणि मुलगी छान गाते यार. बायको दिवसभर कामे करत राहते. काय सुरेख सांभाळलाय तिने हा संसार. ती घरात किती कामे करते हे पहिल्यांदा माझ्या लक्षात आलेय. माझ्या टारगेट पूर्ण करण्याच्या धावपळीपेक्षाही जास्त कामे ती हसत हसत लिलया करुन टाकते. शिवाय माझ्या आई बाबांचेही ती किती करते. माझ्या बाबांचा कधी कधी खूप हात दुखतो तर ती त्यांना खाऊ देखील घालते. मुलांचा अभ्यास, त्यांचे ताण तणाव याचे देखील नियोजन करते. खरे सांगतो, नोकरी लागल्यापासून माझ्या घराचे खरे घरपण मी आताच अनुभवतोय. मला आतापर्यंत वाटायचे की मी या घरासाठी पैसे मिळवून आणतो म्हणजे मी घरातील सर्वात मोठी जबाबदारी पार पाडतोय. पण आज माझ्या हे पुरते लक्षात आलेय की माझ्या घरातील सर्वांनी मिळून हे घरपण जपलंय म्हणून मी माझे कामाचा ताण सहन करु शकतोय अन्यथा मी केव्हाच कोलमडून गेलो असतो. हा यावर्षीचा, माझ्या कामाचे कोणतेही टारगेट नसतानाचा परंतू मला मोठी शिकवण देणारा, ३१ मार्च मला सदैव लक्षात राहील. दोघांच्याही बोलण्याचा हाच सूर होता. मी गंमत म्हणून त्यांना विचारले, पण मग या वर्षी नफा नाही आणि मग पर्यायाने ट्रीप आणि बोनस पण नाही, त्याचे कसे? उत्तर एकच आले, अविभाऊ, जान है जो जहाँ है...
Comments
Post a Comment