थोडा है थोडे की जरुरत है @ 24.03.2020
योद्धे
तो सैन्यदलामधे अधिकारी म्हणून रुजू झाला याचा काकांच्या चेहेऱ्यावर केवढा आनंद होता! त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे त्यांना वाटत होते. आयुष्यात अनेकवेळा क्षमता असूनही संधी न मिळाल्यामुळे मागे रहावे लागलेल्या आणि क्षमता नसणाऱ्यांना पुढे जाताना बघून स्वतःला कायम समजावत राहिलेल्या काकांकरीता तो एक अपूर्व क्षण होता. मुलाच्या पासींग आऊट परेडच्या दिवशीचा, त्याच्या खांद्यावरचे बॅज उघड करतानाचा फोटो मला दाखविताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले होते. बारकाईने बघताना त्या फोटोतही काकांच्या व काकुंच्या डोळ्यात ते स्पष्ट दिसत होते. आपली स्वप्ने, आपले संस्कार, आपली मते, आपले सामाजिक स्थान, आपली शिकवण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला स्वाभिमान या सर्व गोष्टींचा आदर राखीत आपल्या मुलाने त्यामधे इतकी मोठी भर टाकली की त्या क्षणी काका नि काकू आयुष्यातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण अनुभवत होते. त्यांच्या समवेत अनुभवलेल्या आनंदाच्या क्षणांनंतर साधारण एखाद्या महिन्याने मी पुन्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा मात्र ते दोघे जरा चिंतेत बसले होते. एका महिन्यापूर्वी त्यांच्या चेहेऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद काळजीमधे परावर्तित झालेला दिसत होता. त्यातल्या त्यात काका जरा रिलॅक्स होते परंतू काकू मात्र जास्त चिंतेत होत्या. माऊलीच ती, चिंता वाटणारच. चौकशी केल्यावर मला कळले की काकांच्या मुलाला पहिली पोस्टींग मिळाली व ती थेट जम्मू काश्मिरमधे. त्यातही तेथे दहशतवाद्यांचा हैदोस सुरु असताना. त्याची पोस्टींग नेमकी कुठे आहे हे विचारल्यावर काकांनी सांगितले की सामान्य नागरिकांना जेथपर्यंत जाऊ दिले जाते तेथून पुढे जवळपास ३०० किमी अंतरावर त्याची पोस्ट आहे. याचाच अर्थ थेट पाकिस्तानच्या बाॅर्डरवर. काका काकुंच्या चिंतेचे कारण मला कळले व ती चिंता रास्त होती. सैन्यामधे भरती होणाऱ्या प्रत्येकच सैनिकाच्या परीवारामधे अशी चिंता कालांतराने तयार होतेच कारण दोन तीन वर्षात एकदा या सैनिकांना सिमेवर रुजू केलेच जाते व तेथे काम करणे म्हणजे परीवाराला चिंता राहणारच. काकांच्या मुलाची सुरुवातच सिमेवर रुजू होऊन झाली त्यामुळे त्यांना चिंता जरा जास्त वाटत होती. काका काकूंना समजावित होते की आपला मुलगा सैन्यात अधिकारी आहे याचा अर्थ तो टेबल खुर्चीवर बसून काम कसा करेल? तो योद्धा आहे व त्याने योद्ध्याचे काम केले पाहिजे. अर्थात हे काकुंना कळत असूनही त्याचे मन देखील जरासे धास्तावलेले होते कारण रोजच्या सिमेवरुन येणाऱ्या बातम्या त्यांना जास्तच काळजीत टाकीत होत्या. सिमेवर रोज शेलींग सुरु होते. मधेच एक दिवस मुलाचा फोन आला परंतू तोफांच्या व बंदुकींच्या आवाजामुळे काहीच ऐकू आले नाही. त्याने फोन लावला आणि शेलींग सुरु झाले. काकूंच्या छातीत धस्स झाले. त्याने मागे एकदा सांगितले होते की शेंलींग फार भयानक प्रकार असतो. बाँब पडला की त्याचे तापलेले हजारो पोलादी तुकडे ज्यांचे तापमान एक हजार डीग्रीपेक्षा जास्त असते ते सारे वेगात फिरत इतस्ततः पसरतात आणि रस्त्यात येणारी प्रत्येक गोष्ट कापत जातात, घरांचे दरवाजे, भिंती, झाडे किंवा सैनिकांचे पाय, हात किंवा कधीकधी गळा देखील. त्याने शेलींग म्हणल्यावर काकुंना ते सारे आठवायचे. नोकरीची सुरुवातच सिमेवर पोस्टींग ने कशी काय? त्या काळजीपोटी काकांना विचारायच्या. थोडे थोडके नाही तर तीन वर्षे त्याला रहायचेय तिकडे आणि नेमकी यावेळी परिस्थिती देखील बघा कशी. आई म्हणून काकुंना वाटणारी काळजी अगदी बरोबर होती. एकदा आईच्या बोलण्यात फारच काळजी जाणविली व ती सहजच म्हणाली की तुला सुटी मिळत नाही का? आईचा प्रश्न ऐकून उसळून तो मुलगा युद्धभुमीवरुन काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, आई मला असे पळून यायचे असते तर मी सैन्यदलात सामीलच कशाला झालो असतो. आई तुझा विश्वास बसणार नाही परंतू आम्ही वाट बघत असतो अश्या पोस्टींगची जेथे खऱ्या अर्थाने आम्ही सैनिक असल्याचा अभिमान क्षणाक्षणाला दुणावत राहतो. या तोफांच्या आणि शेलींगच्या आवाजाने आम्ही घाबरत नाही. उलट आम्हाला परिस्थितीचा सामना करण्याची उर्मी मिळते. तू काळजी करु नको याउलट अभिमान बाळग की देशावर असे संकट आले असताना मी आपल्या परीवाराच्या वतीने देशसेवा करतोय. ते शब्द ऐकून माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. खरोखरीच अभिमानास्पदच होता तो क्षण.
माझ्या बहिणीचा तीन महिन्यापूर्वी फोन आला, अतिशय आनंदात तिने मला सांगितले, मामासाहेब तुमचा भाचा डाॅक्टर झाला. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. आमच्या पुढच्या पिढीतला पहिला डाॅक्टर. पार्टी वगैरे करायची ठरले, भेटल्यावर धमाल करुया वगैरे बोलून झाले. मागच्या आठवड्यात बहिणीचा परत फोन आला परंतू आता मात्र आवाज चिंताक्रांत. मी कारण विचारले तर ती रडायलाच लागली. माऊली ना ती, तिला स्वाभाविक तसे होणारच. कारण देखील तसेच होते. जरा शांत झाल्यावर मला ती सांगू लागली, अरे तुझ्या भाच्याची इंटर्नशीप सुरु आहे आणि आता त्याला कंपलसरी ड्युटी सुरु झाली. कोरोना रुग्णांजवळ. बघ ना, आताच डाॅक्टर झाला तो आणि त्याला अश्या परिस्थितीत काम करावे लागते आहे. काळजीपोटी ती बोलत होती. तो किती महत्वाचे काम करतोय याची तिला देखील जाणिव होती. परंतू एकीकडे सर्वजण कोरोना रुग्णापासून दूर राहताहेत परंतू त्याला मात्र थेट भेटावे लागते. सगळी खबरदारी घेतली जातेय परंतू तरी देखील काळजी वाचतेच ना रे! शिवाय त्या मुंबईच्या रुग्णालयात रोज दोन लाखावर रुग्ण येतात. त्यांच्यावरही उपचारासाठी त्याला जावे लागते. आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळतोय, परंतू माझा मुलगा मात्र गर्दीच्या ठिकाणीच काम करतो, व त्याला करणे भाग आहे. कोरोनाच्या रुग्णांजवळ जाताना तरी त्यांना वेगळा सूट वगैरे परीधान करायला लावतात परंतू सामान्य रुग्णालयात तर हजारो रुग्णांना तो तपासतो. अरे आपण स्वतःला घरात बंद करुन ठेवतो आहे, तेथे त्याला तर या भयंकर आजाराशी थेट भिडावे लागतेय. काळजी वाटते रे! अगदी खरे होते माझ्या बहिणीचे. तिने देखील आपल्या मुलाशी फोनवर बोलून तुला सुटी मिळते का असे विचारले तर तो देखील उसळून म्हणाला, आई, हा तर माझ्यासाठी खरा परीक्षेचा काळ आहे आणि मला ही परीक्षा द्यायचीय. हा अश्या पद्धतीचा रुग्णसेवेचा अनुभव माझ्या करीयरच्या अगदी सुरुवातीलाच मला मिळणे म्हणजे मला रीवार्ड आहे. आई, जोरजोरात सायरन वाजवत जेव्हा अँब्युलन्स येते ना तेव्हा आमच्या ह्रदयात तुमच्यासारखे धस्स होत नाही उलट आम्ही त्या रुग्णला सेवा देण्यासाठी व त्याच्यावर उपचार करण्यासाठी सज्ज होतो. आई तू काळजी करु नको. अग, आपल्या परीवाराच्या वतीने मला अश्या पद्धतीने देशसेवा करण्याची संधी मिळतेय, मला करु दे. तूम्ही सगळे मात्र आपली नीट काळजी घ्या. ते शब्द ऐकून माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. खरोखरीच अभिमानास्पदच होता हा देखील क्षण.
हे दोन्हीही योद्धे आपल्या समाजाची रक्षा करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढतात. किती कौतुकास्पद आहे त्यांचे काम! नेमके यावेळी आपल्याला काय करायचेय? केवळ घरात शांत बसायचेय. परंतू या योध्यांच्या कामाचे महत्व जाणणे तर सोडाच पण त्यांचा सन्मान करण्याच्या प्रसंगी देखील उन्माद दाखविण्याची संधी आपल्यापैकी काही जण सोडत नाहीत. नेमके याचवेळी कुठल्याश्या चित्रपटातील रुग्णालयांकडून होणाऱ्या लुटीचे प्रसंग किंवा कुठल्याश्या मुलाखतीमधून डाॅक्टरांद्वारे केले जाणारे वाईट काम हे उधृत केले जाते. खरे तर असे कोणते प्रोफेशन आहे जे संपुर्णपणे स्वच्छ आहे? तृटी प्रत्येक ठिकाणी आहेत. परंतू सध्याच्या संवेदनशील परिस्थीतीमधे एखाद्या आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील तृटी समाज माध्यमांवर फाॅरवर्ड करुन नेमके आपण काय साधतोय? या असल्या पोस्ट मुळे सध्याच्या महाभयंकर आजाराशी स्वतःचा जीव धोक्यात टाकून थेट लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचे किती मानसिक खच्चिकरण होत असेल याचा अंदाजही करता येणार नाही. घरात बसून फावला वेळ मिळालाय तर निदान केवळ सकारात्मक विचारच एकमेकांशी शेअर करुयात. राजकीय उणे दुणे काढण्यापेक्षा एकमेकांना धीर देऊयात आणि काहीच जमत नसल्यास, शांत राहुयात. काळजी करण्याची गरज नाही. आपल्या कोणत्याही रिकामपणाच्या टिकेचा विचार न करता हे योद्धे लढत आहेत निरंतरपणे. त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करुयात!!
Comments
Post a Comment