थोडा है थोडे की जरुरत है @ 10.03.2020
धुयमाती
तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मी महाविद्यालयात पोहोचलो तेव्हा ग्रामीण भागातला एक सद्गृहस्थ मला भेटण्यासाठी माझी वाट बघत माझ्या कार्यालयाच्या बाहेर बसला होता. माझ्या सहायक कर्मचारी भगिनीने मला सांगितले की तो माणूस सकाळी ७ वाजल्यापासून माझी वाट बघत होता. मी साधारण दहाच्या सुमारास पोहोचलो होतो. तीन तासांपासून तो मला भेटण्यासाठी थांबला होता. एकंदरीत त्याच्या कपड्यांहून अतिशय कमकुवत परिस्थीतीमधील मला तो वाटला. माझ्या समोर बसल्यावर मी त्याला काम विचारले. सुरुवातीला तो माणूस काहीच बोलला नाही. माझ्या लक्षात आलेय की त्याला भरुन आले होते व त्यामुळे त्याला बोलणे जड जात होते. मी आग्रह केला नाही. काही वेळाने कसेतरी दाटून आलेल्या स्थितीतच तो एकच वाक्य बोलला, सर आमच्या आयुष्याची काल धुयमाती झाली आणि त्यानंतर तो माणूस ओक्साबोक्शी रडू लागला. तो ज्या गावातून आला होता त्या एका छोट्याश्या खेड्यात शहरांमधे साजरा केला जाणारा रंगपंचमीचा सण धुयमाती म्हणून साजरा केला जातो. आधल्या दिवशी साजरा केलेला धुयमातीचा सण त्याच्या कुटुंबाकरीता वेगळ्या अर्थाने धुयमाती ठरला. त्या खेडेगावात त्या धुयमातीला घटना साधारण कशी झाली असेल याचा मी अंदाज केला.
धुयमातीच्या आधल्या दिवशी तिने त्याला फोन केला. तो फोनही त्यानेच भेट केलेला होता. ती त्याला म्हणाली, मंग काय ठरलं तुयंवालं? मले नक्की सांग. आता मायाच्यानं नाई रायनं होत. तू मले फक्त फिरवून रायला. मले काल मायी मैत्रीन म्हने, तुयं काई खरं नाई. आता लय दिवस झाले. तुया म्हनन्यानुसार मी वागुनच रायली. पन तू तं कायीच करुन नायी रायला. मले आता असं वाटून रायलं का तुया मायातला इंटरेष्ट संपला. तू दोन महीन्याच्या आधीच म्हनला होता की तुया घरी बोलतो म्हनून पन तू तं कायी नावच नायी काढून रायला. जमत नसंन तं मले आताच सांग. आता मले असं तुयासोबत फिरनं जमनार नायी. लोकाईले समजलं तं मुश्कील होऊन जाईन. माये आई बाबा कामावर जाते म्हनून बरं हाय, त्याईले माहीत नायी. तुले भेटा लागते म्हनून मी तं काॅलेजमधे जाऊनही वर्गात बसत नायी. त्या दिवशी सरनं लय रागावलं मले अन तुयाशी बोलत होती तं मोबाईल हिसकून घेतला. ते तं बरं झालं म्या रडून पडून मोबाईल वापस घेतला. त्याईनं बाबाले फोन लोवला होता पन लागलाच नायी. बाबासाठी त्याईनं पत्र पाठवलं घरी. आई बाबा घरी नसते म्हनून म्याच घेतलं पत्र अन फाडून टाकलं. पन अश्या साऱ्या गोष्टी होऊन रायल्या तरी तूले समजत नायी. आता तू मले आज फायनल सांग. उद्या धुयमाती हाये. उद्या रंग खेळाले बाहेर पडाच लागते. तू काहीतरी जमव. आपन चाल्ले जाऊ. माया आईनं जमा करुन ठेवलेले पैशे हाये, माया लग्नासाठीच जमा करुन रायली थे. ते पैशे घेऊन येते मी. तू सांग कसं कराचं ते. उद्या रंगासाठी आम्ही साऱ्याजनी सकायी निघू. गावात आम्ही लय फिरत असतो. तोंडाले रंग लागला राईन तं कोनाले शक येनार नायी. रंग खेळनं झालं का आम्ही साऱ्याजनी तलावावर जात असतो. तलावाच्या बाजुनं मोरेश्वर काकाचं शेत हाये. तिथून बाहेर रस्ता हाये. तू त्या शेताजवळ थांबजो. मी मायी बॅग आजच तलावाजवळ निऊन ठेवते. तुले पन पैशे आना लागन. दोस्ताची गाडी घेऊन येजो. तलावावर पोहोचल्यावर मी बरोबर मैत्रीनीपासून सटकते अन काकाच्या शेतात येते. तिथून आपन चाल्ले जाऊ. पुढं कुठं जाचं ते तू सांग. तुले पुढचं सारं ठरवा लागन. तुया दोन तिन दोस्ताईची मदत घेजो. पुढचं पुढं पाहू. एकदा इथून सटकल्यावर मंग पायता येईन. मायात लय हिम्मत हाये. तूयं पक्कं हायनं? आताच मले सांग. मी तशी तयारी करते. माया मैत्रीनी मले मदत करनार हायेत. पन आता उद्याच्या धुयमातीले आपन चान्स घेऊ. पुन्हा मंग चान्स भेटनार नायी. कारन माया घरी समजलं तं मायं लगन लावून देनार ते. मंग कायी खरं नायी. मले तुयाशिवाय जगाचंच नायी. तुले सांगून ठेवते. उद्याचं आपलं जानं फसलं त मंग माया घरचे मायं लगन लावून देतीन पन त्याच्या आधीच मी तलावात जीव देऊन देईन. मले राहाचं हाये तं तुयाच सोबत नायी तं मले राहाचंच नाही या जगात. तशी तू कायजी नको करु. मी पैशे लय आननार हाये. आपलं तीन चार महिने निभून जाते. आपन लग्न करुन घेऊ. एकदा लग्न झालं का मंग घरच्याईले कायी करता येत नायी. मंग पाहू हाता पाया पडून घेऊ, आपले मायबाप समजुतदार हायेत. आपल्याले माफ करतीनच. कराच लागते. म्या लयवेळा पायलं. पयले मायबाप लय कलकल करते पन मंग जमवूनच घेते. आपलंही तसंच होईन. कायी चिंता नायी. तू फक्त तयारीनं येजो. चल मंग आता ठेवते फोन. आता फोन नायी करनार. तू पन तोंडाले रंग लावून येजो. कोनाले ओळखता येनार नायी. आता मी फोन बंद करुन ठेवनार हाये. तुले काई शंका असन तं आताच सांग. कायी सांगाचं असन तं आताच बोल. नायी तं आपलं आता ठरलं तसं उद्या अकरा सव्वा अकरा वाजता काकाच्या शेतात भेटू अन् भूर होऊ. चल मंग, भेटू. आय लव यू. जवळपास अश्या पद्धतीने सारे काही ठरले आणि रंगपंचमीच्या दिवशी हे दोघेही तोंडाला रंग लावलेल्या अवस्थेमधे रवाना झाले.
त्याच मुलीचे वडील माझ्यासमोर बसून ओक्साबोक्शी रडत होते. त्यांचे रडणे आटोपल्यावर मी त्यांना शांत केले. त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली. तुमची मुलगी सज्ञान असल्याने फार जास्त काही तुम्हाला करता येणार नाही तरी देखील पोलीसांची मदत घ्यावी असा सल्ला दिला. अर्थात मी जे काही त्यांना सांगत होतो त्याचा फार काही उपयोग नव्हता हे माझ्या लक्षात येत होते. थोड्यावेळाने मन मोकळे करुन ते सद्गृहस्थ निघून गेले. नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला व त्याला लागूनच रंगपंचमीचा सण आला त्यामुळे या घटनेची आठवण झाली. आपण सारेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असलो तरीदेखील महिलांच्या संदर्भात आणि त्यांच्या सबलीकरणाच्या संदर्भात अद्याप किती काम केल्या जाऊ शकते याची जाणीव मला होऊन गेली. या निमित्ताने तरुण मुला मुलींचे किती मोठ्या प्रामणात समुपदेशन करण्याची गरज आहे याची देखील तीव्रतेने जाणिव निर्माण झाली. शैक्षणिक, सामाजिक किंवा कौंटुबिक पातळीवर किती मोठ्या प्रमाणात विचारांच्या सक्षमतेची गरज आहे. एका बाजूने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गटातील तरुण मुले मुली या साॅफ्ट टारगेट बनत आहेत, तर दुसऱ्या बाजूने लाखो रुपयांचे क्रेडीट असलेले क्रेडीट कार्ड हातात घेऊन आर्थिकदृष्ट्या सबल गटातील तरुण मुले मुली स्वतःहूच टारगेट बनत आहेत. भौतिकदृष्ट्या चकचकित झालेले जग सर्वांनाच खेचते आहे व ही मुले मुली खेचली जात आहेत. क्षणिक आनंदाच्या भरीस पडून आयुष्याची धुयमाती करायला निघालेल्या अश्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याचे काम आता मोठ्या प्रमाणात करायचे आहे.
रविवारी जागतिक महिला दिन आपण साजरा केला, त्याच दिवशी एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा मनात ठेवून आता मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे, सर्व शिक्षक, सामाजिक संस्था, डाॅक्टर्स, तसेच सर्व पालक यांनी एकत्रितपणे या समुपदेशनाच्या कामात सहकार्य करायला हवे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर अश्या अनेक मित्र मैत्रिणींच्या जिवनाची धुयमाती झाल्यापासून त्यांना वाचविता येईल. वेगवेगळ्या विचारधारांच्या आधारावर समाजमाध्यमांवर एकमेकांबद्दल लिखाण करण्यापेक्षा किंवा तेढ निर्माण करण्यापेक्षा वर उल्लेखित समस्या दूर सारण्यासाठी खरेच थोडा नही तो बहोत ज्यादा प्रयासोंकी जरुरत है!!
Very true dr
ReplyDeleteसमुपदेशनाची गरज आहे.त्याच बरोबर मुलांसोबत सतत संवाद चच्या करणे तेवढंच महत्वाचं आहे
ReplyDeleteया सर्व घटनाक्रमामागे (केवळ वरील प्रसंगबद्दल नाही तर सर्वसामान्य अशा घटनांमध्ये) खालील कारणे संभवतात
ReplyDelete१.पालक आणि पाल्य यामध्ये संवादाचा अभाव.
२.शिक्षक आणि विद्यार्थी यामधील कमजोर/बहुतेक नाहीसा होत चाललेला दुवा.
३.तरुण तरुणींची जमिनीवरील वास्तवापासून दूर होत गेलेली दृष्टी.
४.अवास्तव स्वप्नरंजन करणारी तरुण पिढी आणि त्याला खतपाणी घालणारे काही अजाण पालक,मित्रमंडळी,इतर काही जेष्ठ.
४.व्यावहारिक ज्ञाना साठी आवश्यक वाचनाचा अभाव,अगदी साधं रोजचं वर्तमानपत्र देखील वाचले जात नाही.
५.योग्य आदर्शांची वानवा.
६.बेदरकारपणा,स्वतःच्या अधिकाराबद्दलची गरजेपेक्षा जास्त जाणीव .
७.व्यक्ती स्वातंत्र्य,अभिव्ययक्ती स्वातंत्र्य याचं फाजील स्तोम.
८.निखळ मैत्री,प्रेम इ. बद्दलच्या भ्रामक कल्पना.
९.भविष्यात काही मिळवण्यासाठी कुठल्याही स्तराला जाण्याची (चांगलं-वाईट,नियम,नीती-अनीती इ.चा विचार न करता) तयारी आणि मानसिकता.
१०.आईबापांना काही कळत नाही (त्यातून ते अझीक्षित असतील बोलायलाच नको) ही ठाम समजूत.
११.आई बापामधील बेबनाव.
इ इ इ......
सर एक सामाजिक समस्या आपण लेखणीतून मांडली, सहज एखादा विषय कसा मांडावा याचे उत्तम उदाहरण आहे. धुयमाती मात्र नक्की कुणाची बापाची की मुलीची हा प्रश्न लेख वाचल्यावर पडतो?
ReplyDelete