थोडा है थोडे की जरुरत है @ 04.05.21

आऊट ऑफ सिलॅबस

शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे एक प्राध्यापक एका चर्चेमधे सध्याच्या शिक्षणाच्या खेळखंडोब्याबद्दल फारच चिडले होते. गेल्या एक वर्षापासून देशात सुरु असलेल्या अनेक चर्चांमधे शिक्षणाची झालेली अस्ताव्यस्त स्थिती यासंदर्भात बोलले जातेय. अगदी टेलीव्हीजनवरील चर्चांपासून ते व्हॉट्स ॲपवरील जोक्स पर्यंत याबाबत बोलले जातेय. पण त्या दिवशी त्या चर्चेमधे आमचे प्राध्यापक बंधू फारच चिडले होते. कोरोना संक्रमण सुरु झाल्यापासून सर्वात जास्त हानी कोणत्या क्षेत्राची झाली तर ती शिक्षण क्षेत्राची असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात त्यांच्या बोलण्याला ते संदर्भासहीत स्पष्ट देखील करीत होते. शाळांपासून ते विद्यापीठापर्यंत परीक्षांचे बदललेले स्वरुप, बऱ्याच विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रमोशन, नुकतीच रद्द झालेली दहावीची परीक्षा, अधांतरी असलेली बारावीची परीक्षा, तंत्रज्ञानाचा वापर करुन घेण्यात येणाऱ्या विद्यापीठीय बहुपर्यायी परीक्षा, त्या परीक्षांचा स्तर, त्यामधे विद्यार्थी मिळवित असलेले भरघोस गुण, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले ऑनलाईन शिक्षण, त्या प्रकारच्या शिक्षण प्रणालीत तुटलेला मानवी बंध, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती किंवा केवळ दिखाव्यापुरती उपस्थिती, तंत्रज्ञान वापरण्याकरीता उपलब्ध नसलेल्या व्यवस्था, ग्रामामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा होणारा त्रास या सर्वच बाबतीत ते फारच चिडून बोलत होते. गेल्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमधे अश्या प्रकारचे वैफल्य कधीच अनुभवले नाही असेही ते चिडून बोलून गेले. प्राध्यापक महोदयांचे अगदीच काही चूक नव्हते. कोरोनापूर्वी आपण चालवित आलेली शिक्षण पद्धती कोरोना संक्रमण काळात त्यात करावे लागलेले बदल यात फारच मोठी तफावत निर्माण झालीय. शासनाकडून आलेल्या निर्देशानंतर त्याचा अर्थ समजून घेता, आज कळले की शिक्षण हे जीवनावश्यक नाही अश्या जोक्स चा देखील त्यांनी उल्लेख केला. प्राध्यापक बंधुंचा राग समजण्यासारखा होता कारण तेच काय तर आमच्या सारख्या अनेकांना शिक्षण क्षेत्रात कार्य करताना सिलॅबस डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची सवय जडलेली आहे. कारण शिक्षण हे पायरी पायरीने पुढे जात असते. या सर्व पायऱ्या म्हणजे वेगवेगळ्या इयत्ता ज्या पहिल्या वर्गापासून ते पदव्युत्तर पर्यंत त्याच्याही पुढे असतात. प्रत्येक पायरीचा आराखडा ठरवून दिलेला आहे. त्या आराखड्यानुसार अध्यापन अध्ययन प्रक्रीया पार पाडली जाते. या ठरवून देलेल्या सिलॅबसच्या आधारेच सारे काही सुरु असते. त्या सिलॅबसच्या पलीकडे जर काही शिकविल्या गेले किंवा परीक्षेत आले तर तो भाग आऊट ऑफ सिलॅबस समजला जातो ज्याच्याबद्दल विद्यार्थी देखील गदारोळ करतात प्राध्यापक किंवा शिक्षकांनाही तसे काही करता येत नाही. त्यामुळे या कोरोना काळात या आखीव आणि साचेबद्ध सिलॅबसची पार धुळधाण झाली ज्यामुळे शिक्षणाचा सर्वच स्तरावर खेळखंडोबा झाला असे त्या आमच्या प्राध्यापक बंधुंना वाटत होते. चर्चेमधील बहुतांश मंडळींना त्यांचे म्हणणे अगदी बरोबर वाटत होते. आखीव चौकटीच्या पलीकडे ज्यांना जराही सरकण्याची परवानगी दिली जात नाही अश्या शिक्षकांना या संदर्भातील वेगळ्या विचाराबाबत सुचविणे जरा जिकरीचे काम होते. परंतू कंपनीमधे काम करणाऱ्या आमच्या एका मित्राने एक फारच वेगळा विषय मांडला. तो म्हणाला, तुम्ही तर खुष व्हायला हवे की तुम्हाला यावेळी देवानेच आऊट ऑफ सिलॅबस पेपर सेट करुन दिला. या पेपर बद्दल तक्रार करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना या पेपरचे वेगळेपण समजावून सांगा तुम्ही देखील त्यांच्यासोबत याचे वेगळेपण अनुभवा. आतापर्यंत प्राध्यापक बंधुंच्या मताशी मनापासून सहमत असलेले आम्ही सर्व त्याच्या या बोलण्यामुळे जरा सरसावून बसलो. हा तर काहीतरी वेगळेच सांगत होता. त्याचे संपुर्ण बोलणे ऐकल्यावर मात्र या आऊट ऑफ सिलॅबस पेपरचे महत्व पटले.

तो म्हणाला, कोरोना ही आपदा सबंध जगामधे आली आहे या आपदेमधे जीवंत माणसांचे जीव वाचविणे हे सर्वात मोठे होते. या प्राधान्याची जबाबदारी सरकारांवर व्यवस्था उभी करण्याच्या माध्यमातून होती स्वतःची काळजी घेण्याच्या माध्यमांतून सर्वच नागरिकांवर. संपर्कामुळे होणारा हा आजार असल्याने सर्वात जास्त संपर्काच्या व्यवस्था सर्वात पहिल्यांदा बंद कराव्या लागल्या ज्यामधे शाळा महाविद्यालये अग्रणी होते. आता ही एक संपुर्णपणे वेगळी जगात कधीही अनुभवल्या गेली नाही अशी परीस्थिती होती. कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांनी या काळात आपापल्या व्यवस्थांमधे बदल केले. शिक्षण क्षेत्रात हे बदल सर्वात जास्त भासले कारण येथे मानवी संपर्क हाच महत्वाचा ठरला आहे. परंतू तो नसेल तर शिक्षण बंद झाले का हा मुलभूत प्रश्न आहे. साऱ्या शाळा, महाविद्यालये बंद झालीत, अध्यापन कसे बसे सुरु राहीले म्हणून शिक्षण बंद झाले का? तुम्हा सर्वांच्या तुमच्यासोबत विद्यार्थी पालक या सर्वांच्याच डोळ्यावर आखीव सिलॅबसचा चष्मा घट्ट बसल्याने तुमच्याकडून या प्रश्नाचे उत्तर होय असेच येईल. परंतू जरा काळजीपूर्वक या प्रश्नाला समजून घेतल्यास असे लक्षात येईल की शाळा, महाविद्यालये बंद झाल्या तरी देखील शिक्षण बंद झाले नाही. मग लगेच तुमच्या मनात पुढचा प्रश्न, शिक्षकाविना शिक्षण कसे? तेच तर मी सांगतोय. शिक्षकाविना शिक्षण नाही परंतू शिक्षक हा केवळ सिलॅबस मधील गोष्टीच शिकविणारा शिक्षक नसतो. तो विद्यार्थ्याचा केवळ ट्युटर नसून मेंटर असतो. त्याला जर आऊट ऑफ सिलॅबस विचार करता आला तर सध्याची परीस्थीती ही वाईट असली तरी त्याला अध्यापनाला प्रचंड वाव देणारी आहे असेच म्हणता येईल. जेव्हा शिक्षक हा वाव समजेल तेव्हा त्याच्या कडे सोपविल्या गेलेले विद्यार्थी संपुर्णपणे नकारात्मकतेने ग्रासलेल्या वैफल्य स्थितीत जाणार नाहीत तर जीवनाला समजून घेण्याचा खरा खुरा प्रयत्न करु लागतील

जीवनानुभव माणसाला येत राहतात परंतू त्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघणे एक मेंटर शिकवू शकतो सध्याच्या परीस्थितीत प्रत्येक शिक्षक ही जबाबदारी पार पाडू शकतो. किती अफाट कधीही अनुभवलेले प्रसंग बघायला मिळताहेत. आप्तांपासून निर्माण झालेला दुरावा, कुणी घरी येतो म्हणल्यानंतर मनात शंका उत्पन्न होणे, मृत्यूपश्चात कुणीही सोबत नसणे, काही क्षणी तर फक्त स्वतःचाच विचार मनात येणे, अन्य गावांच्या तुलनेत आपल्या गावात संक्रमण कमी आहे याचा मनात विचित्र आनंद निर्माण होणे, समाजमाध्यमांवर अत्यंत विखारी भयावह बाबी समोर येणे, घरामधे बंद राहणे, जवळच्या मित्र मैत्रीणींनाही भेटता येणे, वाढदिवसाच्या पार्टी बंद होणे, मोबाईल फोनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढणे, लग्न समारंभांमधे जवळचे लोक शोधताना तारांबळ उडणे, कोरोनाच्या भितीने घरात दडून बसणे, नियमांचे उल्लंघन करुन मास्क वापरण्याचा उर्मटपणा करणे अश्या अनेकानेक भावनांचा कल्लोळ विद्यार्थ्यांच्याही मनात सुरु आहे. परंतू या सोबतच आपल्या जीवाची पर्वा करता रुग्णसेवा देणारे आरोग्यकर्मी, शासनाच्या व्यवस्था, जाती पातीच्या पलीकडे माणुसकीच्या नात्यातून केले जाणारे रक्तदान, आम्हाला रुग्णांना वाचविता येत नाहीये म्हणून गहीवरुन जाणारे डॉक्टर्स, रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यासाठी गावागवांमधे प्रचंड कार्य करणारे वेगवेगळे समुह, सर्वांनी आता एक होऊन लढा द्यायला हवा अशी प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली भावना, माझ्या परीवारासोबत मला समाजाचाही विचार केला पाहीजे हा उदात्त विचार करणारे मंडळी या गोष्टी देखील विद्यार्थ्यांसमोर येत आहेत. हे सारे आऊट ऑफ सिलॅबस असले तरीही फार महत्वाचे आहे. सध्याच्या या काळाला अतिशय तीव्रतेने जीवनशिक्षण देणारा काळ असे समजायला हवे आणि या सर्व स्थितीमुळे सर्वच वयाच्या गोंधळून गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी या सर्व आऊट ऑफ सिलॅबस गोष्टी समजावून सांगायला हव्या. चर्चेच्या शेवटी तो मित्र एवढेच म्हणाला,

तुम्ही ठरविलेला सिलॅबस पूर्ण झाला नाही म्हणून काही प्रमाणात तुमचे विद्यार्थी मागे राहतील परंतू या आऊट ऑफ सिलॅबस भागाला जर पूर्ण केलात तर भविष्यात जीवनाच्या परीक्षेत तुमचे विद्यार्थी कधीच मागे राहणार नाहीत. निर्णय तुमचा आहे. सिलॅबस झाला नाही म्हणून तक्रार करायची की आऊट ऑफ सिलॅबस कोर्स शिकवायचा?





Comments

  1. सर अप्रतिम व विचार करायला प्रवृत्त करणारा लेख

    ReplyDelete
  2. नमस्कार सर. आउट ऑफ सिलेबस शिकवावे हा विचार योग्य आहे, पण ते शिकवण्यासाठी माध्यम तेच आहे, 'ऑन लाइन". आणि ऑन लाइन वर्गात किती विद्यार्थी सक्रिय सहभागी होतायत? ज्यांच्याकडे आयपैड-मोबाईल नाही, त्यांच्याबद्दल नाही, ज्यांना ही साधने उपलब्ध आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी.
    पॉझिटिव्ह विचार मुलांच्या मनात पेरण्यासाठीचा तरी पुरेसा संपर्क शिक्षक-विद्यार्थी यांच्यात असायला हवा ना?
    आणि ही अवस्था प्रदीर्घ काळ टिकणार असेल तर ऑनलाइन शिक्षणासाठीचे सिलेबस, ऑनलाइन शिकवण्यासाठी वेगळी साधने, ऑनलाइन परीक्षा आणि मूल्यमापन पद्धति विकसित होतील. त्यासाठी शिक्षणतज्ञ आणि तंत्रज्ञ मेहनत घेतीलही. पण येत्या ऑक्टोबर पासून पुंन्हा जुन्याच कारखान्यात परतायचं असेल, तर ?

    ReplyDelete
    Replies
    1. कारखाना बदलणेही आपल्याच हातात आहे.. बदलावे लागेल अन्यथा शिक्षण क्षेत्राचे अस्तित्व धोक्यात येईल. ते एकंदर देशाच्या विकासाकरीता धोकादायक ठरेल

      Delete
  3. अप्रतिम..... सकारात्मक विचाराला चालना देणारा लेख ......मृत्यूलाही उत्सव समजणारे ओशो आठवले.... एखादा प्रसंग किंवा समस्या याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी जर असली तर जीवन अतिशय सहजतेने आणि आनंदाने जगता येते. खूप खूप धन्यवाद व अभिनंदन.

    ReplyDelete
  4. सुंदर संकल्पना. परंतु शिक्षणाचे नुकसान मात्र जे व्हायचे ते होतच आहे.

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर लेख

    ReplyDelete
  6. माझ्या मते - अडचणी--
    १) ग्रामीण विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन्स नसणे
    २) ज्या विद्यार्थ्यांकडे आहेत, त्यांना इतर डिस्ट्रॅक्शन्स उपलब्ध
    ३) सर्वांत महत्वाचे, वरिल परिस्थिती वर कुणाचाच ताबा नसल्याने, त्यातून मार्ग काढण्यासाठी ईच्छा असणे... ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांच्या करीता तरी शिक्षकांचे स्वतःला अपडेट करून विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना कंटाळा येणार नाही असे ऑनलाईन पद्धतींचा वापर करणे

    ReplyDelete
  7. सकारात्मक विचार आहेत....गरज आहे ती या नविन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची .एकंदरीत आजची परिस्थिती पहाता आपण शिक्षक...विद्यार्थी यांना याशी जुळावेच लागेल.थोडा वेळ लागेल .पण ही नवीन संधी म्हणून या कडे पाहले तर काहीही अशक्य नाही.

    ReplyDelete
  8. या आपाद कालीन परिस्थितीत विचार एकदम योग्य. खरेतर, outof silaybus होणारे हे सामाजिक कार्य प्रणाली in silaybus भविष्यात, समाविष्ट होऊन, विध्यार्थी घडावा, समाज परिवर्तन होणे, हीच काळाची गरज आहे, अविनाश

    ReplyDelete
  9. विचार व मांडणी फार छान आहे पण प्रत्यक्ष कृती करताना अत्यन्त अडचणीचे गेले. अडचणी वर उलेखलेल्याच.नुकत्याच प्रत्यक्षिक परीक्षा ऑनलाइन घेताना येणाऱ्या अडचणी किती वेगळ्याच असू शकतात त्याचा प्रत्यय आला. इथे नमूद करणे शक्य नाही एखादवेळी नक्की चर्चा करू, ग्रामीण आर्थिक स्तरात फार सोप आणि सहज नाही सर.

    ReplyDelete
  10. सर लेख खुपच सकारात्मक भावनेतून लिहिलेला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा गोंधळ तर सगळीकडेच सुरू आहे. त्याचे परिणाम वाईट किंवा चांगले पुढे दिसतीलच. विज्ञानाच्या प्रगतीमुळे का होईना आजची पिढी नशीबवान आहे. कारण ऑनलाईन पद्धतीने का होईना शिक्षणाच्या संपर्कात आहे. ही बाब दिलासा देणारी आहे. शंभर वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली असताना तंत्रज्ञाना अभावी त्या काळात किती समस्यांना लोकं सामोरे गेले असतील याची आपण कल्पना केली पाहिजे. मात्र खेड्यापाड्यांमध्ये किंवा स्मार्टफोन न परवडणारा वर्ग यात भरडला जातो आहे. कोरोनामुळे आजची पिढी अनेक धडे घेते आहे. सगळ्यात महत्वाचे की सरकार कडे कोणत्या योग्य गोष्टींची मागणी करायला हवी हे आजच्या पिढीला नक्की कळले असणार.

    ReplyDelete
  11. अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाची सकारात्मक मांडणी! विद्यार्थ्यांच्या भावी जडणघडणीच्या दृष्टीने सद्यस्थितीचे त्यांना आकलन करून देणे महत्वाचे असून त्यांच्या पंखात बळ आणण्याची ही खरी संधी आहे. लेखात तुम्ही लिहिल्याप्रमाणे त्यासाठी बराच वाव पण आहे.

    खरेतर ऑनलाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच जास्त जड गेले व जात आहे. संपूर्णतः नवीन माध्यम वापरून, नजरेचा संपर्क नसताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रथमतः शिक्षकांनाच वेगळ्या प्रशिक्षणाची गरज असते. पण तेवढा वेळच कुणाजवळ नव्हता. निदान आता यापुढे त्यादृष्टीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शिक्षकांची तयारी करून घ्यावी लागेल.

    विद्यार्थी मात्र फार जलद गतीने परिस्थितीला सामोरे गेले. त्यांना योग्यरीतीने शिक्षण या काळात मिळाले की नाही याबद्दलच्या शंका रास्त पण असू शकतात. पण स्वतःच्या प्रयत्नांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी या समस्येवर मात करू शकतील असा मला विश्वास वाटतो. नवीन पिढी याबाबतीत पुढे आहे.

    सबब "आऊट ऑफ सिल्याबस" हे तुम्ही दिलेले शीर्षक अत्यंत समर्पक आहे. पण ते कोणाकरता हेदेखील पाहावे लागेल. पहिले प्राधान्य शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याला द्यावे लागेल.

    ReplyDelete
  12. अप्रतिम लेख ..👍👍
    माझा एक विचार मांडते.
    विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी नाहीत त्यामुळे शिकविणे शक्य नाही असे बरेच शिक्षक सहज सांगून जातात पण अश्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने बरीच कमी असते तेवढ्या मुलांशी शिक्षक फोन करून सहज संवाद साधू शकतात व हा जीवनातील वास्तव शिकवणारा अभ्यासक्रम शिकवू शकतात .शेवट प्रत्येक शिक्षकाची आंतरिक इच्छा किती तीव्र आहे यावर सगळे अवलंबून आहे.
    🙏🙏

    ReplyDelete
  13. सर ,अत्यंत प्रेरणादायी लेख.तूम्ही कूठल्याही परीस्थितीत सकारात्मकता पाहता.म्हणून च तूमचे व्यक्तीत्व आमच्या सारख्या तूमचेच विद्यार्थी असणार्यांना सदैव च प्रेरणादायी ठरते.खरेच माझा ही online teaching चा अनूभव अतिशय चांगला ठरला.यात विषय स्पष्ट करुन सांगण्यास जास्त वाव आहे.दृक-श्राव्य माध्यमांचा वापर प्रभावी पणे करता येतो.आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पालक थेट शिक्षकांशी जूळल्या गेले.मध्यंतरी हा दूवा निखळला होता तो परत सांधल्या गेला online मूळे.
    सदैव तूमच्या ऋणात
    सचिन ग. वर्डीकर

    ReplyDelete
  14. सर लेख शेयर करु का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18