थोडा है थोडे की जरुरत है @ 11.05.21
एक असाही दिवस
पहाटे पक्षांच्या चिवचिवाटासोबत मस्त जाग आली. कॉलनीमधे व घराच्या अंगणात खूप दिवसांआधी लावलेल्या झाडांचा खरा फायदा अश्या पद्धतीने जाणवला. पहाटे वेगवेगळे पक्षी गुंजारव करीत होते आणि त्या आवाजासोबत एक सुंदर दिवस परमेश्वराने ओंजळीत टाकला. मस्त गरमागरम चहा घेतल्यावर बागेत पहाटे मारलेली फेरी कसला आनंद देऊन गेली. झाडांना आलेली नवी फुले, त्यांचे सुरेख रंग, टवटवीत फुललेला मोगरा नि त्याचा सबंध बागेत पसरलेला सुगंध, लिंबाच्या झाडांना आलेली लिंबे, त्यातील आता काही पिकत आलेली, एखादी पिवळा रंग धारण करु बघणारी पपई, एखादे खूप सुंदर फुल ज्याचा पटकन फोटो काढून मित्र मंडळींना पाठवणे हे सारे करत अर्धा पाऊण तास प्रसन्नतेत गेला. त्यानंतर व्यायामाच्या निमीत्ताने घरासमोर फेऱ्या मारल्या व फेऱ्या मारत असताना ऑडीबल ॲपवर गौर गोपाल दास यांचे लाईफ्स अमेंझींग सिक्रेट्स हे पुस्तक ऐकले. यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी किती छोट्या छोट्या गोष्टींमधे बदल करावे याबद्दलचे ते विवेचन फारच अप्रतिम होते. मग मधेच अचानक एका बालपणीच्या मित्राचा फोन आला, जुन्या आठवणी, शाळेतल्या गमती जमती या बाबत बोलणे झाले. खूप हसणे झाले.
तयारी करुन आणि मस्त जेवण करुन कामावर निघालो. कारमधे मस्त मेहंदी हसनची गजल सुरु होती. काय गातो मेहंदी हसन. दोन गजल संपेपर्यंत कार्यालय आले. काम सुरु झाले. दोन तीन सभा, त्यामधे काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा, काही महत्वाचे निर्णय. वेळ कसा गेला कळलेच नाही. दुपारची डब्याची वेळ झाली. डबा खाऊन झाल्यावर गर्द सावलीने झाकलेल्या एका सुरेख रस्त्यावरुन एक मस्त फेरी मारुन आलो. खूप छान वाटले. परत आल्यावर पुढच्या टप्प्यातील कामे सुरु झाली. एक छान डॉक्युमेंट तयार केले. बढीया झाले. त्यामधेच बराच वेळ गेला. त्यानंतर सायंकाळी वरीष्ठांसोबत रोजची अनौपचारिक भेट झाली. तेथेही दिवसभराचा अहवाल आणि हसत खेळत मस्त गरमागरम चहा. दिवसभराच्या कामाचा थकवा पार निघून गेला. परत घराकडे निघालो तर काय बघतो, सूर्य अस्तांचलाला जात होता आणि फार सुंदर विलोभनीय चित्र रेखाटलेले दिसले परमेश्वराने. लगेच त्याचा फोटो काढला. फोटो काढतानाच लताबाईंचे, मावळत्या दिनकरा गाणे आठवले. सायंकाळची कातर वेळ जराशी हुरहुर लावणारी असली तरी तिचेही एक वेगळे सौंदर्य आहे, होय ना? सायंकाळी घरी परतल्यावर मस्त निवांत गप्पा टप्पा झाल्या. आधीच ठरविल्याप्रमाणे मुलांनी ॲलेक्सा गेम खेळायला घेतला. ॲलेक्साला मधे ठेवून तिला प्रत्येकाने आपापल्या आवडीचे गाणे ऐकवायला सांगायचे. ते सर्वांनी ऐकायचे. सर्वांच्या आवडीची मस्त मसात गाणी ऐकणे झाले. त्यात आईच्या आवडीचे कुहु कुहु बोले कोयलीया पासून ते मुलाच्या आवडीच्या मनी हाईस्ट या वेब सिरीज मधील बेला चाओ या स्पॅनीश गाण्यापर्यंत वेगवेगळ्या गाण्यांची मेजवानी घडली. त्यानंतर गमतीदार कॉमेंट करत सर्वांसोबत एक सीरीयल बघितली. क्वचितच बघत असल्याने काहीच कळत नव्हते तरी मजा आली. थोड्या वेळाने गरमागरम खिचडीचा बेत, सोबत पापड, तळलेली मिरची, बेसन... वा वा काय जेवण झाले. जेवण झाल्यावर बागेतल्या पाळण्यावर बसल्याबरोबर निशीगंधाच्या सुगंधाने तर पार सुखावून टाकले. रात्री मित्र मैत्रीणींसोबत एक ऑनलाईन मिटींग होती. धमाल ग्रुप आमचा. एक तास केवळ हसणे, एकमेकांना चिडविणे, मधेच कुणाला गाण्याची फर्माईश, मग कुणाचे कविता सादरीकरण, मग त्या कवितेवरच्या भन्नाट कॉमेंट्स, एक तास हसून हसून जबडा दुखायला लागला. शेवटी रात्री ११ वाजता सर्वांनी गुडबाय केले. नेहेमीच्या सवयीनुसार एक बढीया किशोरी अमोणकरांची बंदीश ऐकली आणि झोपी गेलो. दिवस एवढा सुंदर गेला होता की दोन मिनीटात झोप लागली...आणि अचानक मला जाग आली. आतापर्यंत जे काही मी वर्णन केले ते एक सुंदर स्वप्न होते. प्रत्यक्षात सध्या जगत असताना दिवसात अनेक गोष्टी सामील होतात ज्यामुळे आनंद मिळण्याऐवजी भय आणि चिंता वाटू लागते.
पहाटेच्या पक्षांच्या गुंजारवासोबत वर्तमानपत्रात लॉकडाऊन ची माहिती मिळते. काय बंद राहणार काय सुरु राहणार त्यामुळे काय काय आणून ठेवायचे याची चिंता मनाला लागते. व्यायामाच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर मस्त मोठ्या ग्राऊंडवर अनेकांना गुड मॉर्निंग करत बढीया ट्रॅकवर फेऱ्या मारण्याच्या ऐवजी घरासमोरच्या रस्त्यावर मास्क लावून फेऱ्या माराव्या लागतात. गौर गोपाल दास यांचे पुस्तक वाचतानाच बालपणीच्या मित्राचा फोन येतो ज्यामुळे कुणीतरी जवळचा एखादा मित्र किंवा एखादी परीचित व्यक्ती सोडून गेल्याचा दुःखद समाचार मिळतो. त्यानंतर गौर गोपालदास यांचे ऐकवतच नाही. जेवण करुन कारमधे जाताना रस्त्यावर पोलीस अडवतात व कुठे जाताय, कशाकरीता जाताय ही चौकशी करतात. त्यांना आपल्या पदाची व कामाची माहिती देता देता मेहंदी हसनची गजल बंद पडते. कामाच्या ठिकाणी देखील भेटायला येणाऱ्याकडे संशयाने बघून त्याला दूरच उभे केले जाते. त्याने आणलेली फाईल बघून झाल्यावर त्याच्या समोरच सॅनीटायझरने हात स्वच्छ केले जातात. अनेकांना भेटण्याची इच्छा असूनही प्रत्यक्ष भेटूच नका असे सांगावे लागते. सायंकाळी वरीष्ठांसोबत बसल्यावरही कुणीतरी सहजच बोलून जाते, गावात आज किती पेशंट निघाले. ती संख्या कशी वाढती आहे. ठरविलेल्या गोष्टी पुढे ढकलाव्या लागणार अश्याच पद्धतीच्या गोष्टी साधारणपणे केल्या जातात. घरी परतल्यावर सिरीयलच्या सोबत बातम्या दिसतात ज्यात देशात आजाराचे थैमान, अनेक गोष्टींचा तुटवडा, वेगवेगळ्या चॅनल्स वर सुरु असलेल्या घमासान चर्चा, त्यामधील एकमेकांवर केली जाणारी आगपाखड, मधेच अगदी थेट स्मशानभूमीतून लाईव्ह म्हणून दाखविलेला रीपोर्ट, बिघडत चाललेली परीस्थिती, रस्त्यावर ऑक्सीजन सिलेंडरचा मास्क लावून बसलेले लोक हे सारे बघून मन खिन्न व भयग्रस्त होऊन जाते. जेवण झाल्यावर निवांत बसताना जर सोशल मिडीया बघितला तर तेथेही विनम्र श्रद्धांजलीचे संदेश, अनेक स्वयंघोषीत डॉक्टरांनी बनविलेले व्हीडीयो, वेगवेगळे काढे, आजारापासून घरच्या घरी मुक्त होणाऱ्या वेगवेगळ्या युक्त्या, लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी रस्त्यावर केलेली मारहाण किंवा दारु पिऊन रस्त्यावर एखाद्या महिलेने घातलेला गोंधळ असे व्हिडीयो दिसतात. निदान मित्रांसोबत ऑनलाईन मिटींग करावी तर तेथेही कुणालाच जमत नाही कारण दिवसभर आणि रात्री देखील बराच वेळ वॅक्सीन चा नंबर लावण्यासाठी सारखे पोर्टल बघत रहावे लागते. नंबर लागेल का?, कधी लागेल?, कुठे लागेल?, नंबर लागला तर तेथे गर्दी असेल का?, आपला नंबर येईपर्यंत वॅक्सीन राहील का? ते मिळाले तर त्याचा त्रास होईल का? पहिला डोज झाला तर दुसरा मिळेल का? त्याचे दिवस उलटून गेले तर पुन्हा पहिला घ्यावा लागेल का? दोन डोजमधले नेमके अंतर किती हवे? अश्या नानाविविध प्रश्नांनी भंडावून गेलेले डोके बागेतला निशीगंधाचा सुगंध कसा अनुभवू शकणार? त्याच चिंतेत व भयाच्या आणि अनिश्चिततेच्या मनःस्थितीत झोपी जातो.
सध्याच्या काळात आपल्या सर्वांचे हे असे सुरु आहे. अश्या दिवसाच्या नादात तो स्वप्नात दिसलेला आनंदी दिवस हरवून गेलाय. परीस्थिती बिकट असली तरी जमेल तेवढा तो स्वप्नातला दिवस जगण्याचा प्रयत्न मात्र करायला हवा. या आजाराच्या बाबतीत सजग, सावध व सुरक्षित राहणे गरजेचेच आहे. परंतू त्याचे भय आणि दडपण वेगवेगळ्याप्रकारे आपल्याला हळूहळू मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतेय. त्याचा परीणाम शेवटी प्रकृतीवर होणारच आहे. यासाठी सारी सावधगीरी बाळगून स्वप्नातला दिवस जगण्याचा निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे? जमेल तेवढे बिकट परीस्थीतीबाबत सारखे बोलून भय वाढविणे थांबविता येऊ शकते. प्रयत्न केला तर ते शक्य आहे जसे या माझ्या या लेखात प्रयत्नपूर्वक मी त्या आजाराच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. सध्याच्या परीस्थितीत आनंदी राहण्याकरीता त्याचा वारंवार उल्लेख टाळण्यानेही बऱ्यापैकी शांतता लाभू शकते. प्रयत्न करुयात?
अगदी मनातलं बोललात sir तुम्ही. किती दिवसांचे स्वप्न मनातच साठवून राहिलेय. जाने कहा गये वो दिन....
ReplyDeleteMast
ReplyDeleteलेखात वर्णन केलेला दिवस खरंच स्वप्नातला आहे . कारण आजकाल इतका सकारात्मक दिवस जातच नाही. कुठेना कुठे, काहीना काही नकारात्मक समोर येतच.पण तरीही प्रयत्नपूर्वक ते टाळले तरच जगणे सुसह्य होऊ शकते. खूप छान लेख.
ReplyDeleteSir swapnatil divas parat yetil
ReplyDeleteAvinash bhau manatala ani tumhi Hhrudayapasun apkky bhavan vakkt karata. Sarvanna vatat ki ki assa mansik tan hae article vachluanantar nighun jatti
ReplyDeleteTumhi pahilele sawpna he practically khare utarve ass he sagllyna vatte yya kathin divssat mansik jadanghadan ani positive thinking karyala bhag padto aple khoop khoop abhar avibhau
सुंदरच....
ReplyDeleteरोज अनुभवत असलेल्या अनुभवांचे खूपच सुंदर शब्दांकन
ReplyDeleteKhupach chan lihile ahe
ReplyDeleteअप्रतिम लेखन सर. मंत्रमुग्ध करणारे आपले अनुभव अतिशय सुखद आहेत.
ReplyDeleteछानच, या काळात आपण सांगितलेल्या छोट्या छोट्या बाबींमधून सकारात्मकतेकडे जाण्याचा सहज प्रयत्न करायला काय हरकत आहे बरं !
ReplyDeleteवा. वा . सर अप्रतिम लेखन
ReplyDeleteमस्त!👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लेख sir it's today's reality dr. Rohini Deshmukh
Delete