थोडा है थोडे की जरुरत है @ 01.06.21
संध्याकाळ
सध्या या सोशल मिडीयाच्या देवाणघेवाणीमधे काही नको असलेल्या, तर काही फारच आवश्यक अश्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. प्रत्येकाचे सध्या व्हॉट्स ॲप, फेसबुक आणि इतर माध्यमांवर वेगवेगळे ग्रुप असतात. त्यामुळे कधी कधी या देवाण घेवाणीचा एवढा मारा होतो की सर्व संदेशांना न्याय देणे म्हणजे किमानपक्षी अंगठा तरी दाखविणे हे देखील शक्य होत नाही. खूप साऱ्या संदेशांमुळे मोबाईलची मेमरी संपते. मग स्वच्छ मोबाईल अभियान करावे लागते आणि मग सर्वच काही जे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे ते विसर्जीत करुन पुन्हा आपला मोबाईल ताजातवाना करुन घ्यावा लागतो. परंतू अश्यात कधी कधी एखादा खूप चांगला विचार आपल्याकडून सुटून जातो. अशीच एक फार सुंदर कविता माझ्याकडून सुटून गेली. मला ती माझ्यावर फार प्रेम करणारे दादा, ज्येष्ठ विधिज्ञ विजयराव केवले यांनी पाठविली होती. त्यांनीच फोन करुन ती वाचायला नि ऐकायला सांगितली. एक अत्यंत साधी रचना परंतू त्यामधील भाव थेट मनाला भिडला. खरे तर फार मोठे शब्द नाहीत, फार मोठे व्याकरण नाही, फार शास्त्र देखील नाही परंतू त्या गीतामधील सोपे सोपे शब्द फारच सात्विक आणि सध्याच्या काळातील गरज असेच भासले. सध्या आपल्याला अश्याच एखाद्या संध्याकाळची गरज आहे ज्याचे वर्णन यात केले आहे.
मला असे वाटते की सध्या आपण आपल्या जीवनातील सर्वात कठीण अश्या मानसिक परीक्षेमधून जात आहोत. गेल्या दीड वर्षांपासून ज्या प्रकारचे संकट आपल्या या सबंध विश्र्वावर आले आहे त्याचा सामना करताना आपली शारीरिक क्षमता तर तपासली जात आहेच परंतू या सोबतच आपली मानसिक स्थिती देखील आव्हानात्मक स्थितीमधे आहे. या दिड वर्षांच्या काळात या एका विषाणूने आपल्याला जगाची, समाजाची आणि अंतिमतः माणसांचीही सर्वच प्रकारची रुपे दाखविली. अश्या परिस्थितीत कधी आपल्याला देवतांचे मानवी स्वरुपही दिसले तर कधी दानवांचीही बिभत्सत्ता माणसांच्याच ठायी दिसली. अश्यावेळी निराशा देखील निर्माण झाली, भय देखील मनात बसले आणि सोबतच विश्वास देखील डळमळीत झाला. हे सारे होत असताना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करून करून थकलेला जीव एखादी शांत संध्याकाळ शोधतो जेथे त्याची थेट स्वतःशी भेट होऊ शकते. संदर्भ वेगवेगळे असले तरी देखील अशी एखादी संध्याकाळ जेथे शांतता असेल, चित्त स्थिर असेल आणि कसलीही आस मनात न ठेवता समर्पणाच्या भावनेतून जगाचे नियंत्रण करणाऱ्या त्या अनादि अनंत शक्तीच्या स्वाधीन होण्याची कामना असेल तर आनंदाची अनुभूती मिळू शकते. साधे जीवन जगण्याच्या साध्या अपेक्षा आपोआप आपल्या मुखातून बाहेर पडतात. कारण ऐहिक पुंजीची देखील असमर्थता आपल्याला गेल्या काही महिन्यांमधे चांगलीच लक्षात आलेली आहे. म्हणूनच या सर्व विचारांच्या पार्श्वभूमीवर ही साधी सोपी कविता आपल्याला थेट त्या संध्याकाळी घेऊन जाते.
गळ्यामधे माळ दे हातामधे टाळ दे..
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे...
गळ्यातली माळ आणि हातामधले टाळ ही वारकरी संप्रदायाची प्रतिके असली तरी त्यांच्या संगतीने वारकऱ्याची जशी लागते तशी ब्रम्हानंदी टाळी लागावी जेणे करुन माझ्या सभोवतालची ताणग्रस्त परिस्थिती मला विसरता यावी अशी एक तरी संध्याकाळ मिळावी हे कवितेतील आर्जव फारच बोलके आहे. या काळात हाताला काम नसणे किंवा नाईलाजाने आपल्या चौकटीत बंद राहीणे ही देखील अपरीहार्यता बनलेली आहे. त्यामुळे त्यामधून जास्त निराशा निर्माण होत असताना कवितेमधील पुढील विनंती फार मार्मिक आहे. दिवसभराचे काम आणि पोटापुरता दाम मिळावा ही मागणी अल्प वाटत असली तरी देखील संयुक्तिकच वाटते. हाताचे कामच बंद झाल्यानंतर काय करायचे असा प्रश्न ज्यांच्यासमोर आहे त्यांच्या वेदना समजून घ्यायला देखील याचा उपयोग होतो. आणि पोटापुरता दाम मिळावा ही साधी मागणी आसक्तीविरहीत जीवनाचे द्योतचकच ठरते. जीवनाच्या या साऱ्या चिंता दूर करायला अश्या संध्याकाळच्या वेळी परमेश्वराचे नामःस्मरण ही संजीवनी ठरते.
दिवसभर काम दे, पोटापूरता दाम दे
चिंता दूर करावया, ओठी तुझे नाम दे
वारकरी संप्रदायातील भावीक जेव्हा या कवितेच्या पुढील ओळी वाचून पुलकित होतो कारण या ओळींमधे वर्णन केलेला भार हे ओझे नसून आनंदचा ठेवा असतो हे त्याला ठाऊक असते. आपणही त्याचा अर्थ समजावून घेतला तर कोणत्या गोष्टींचे आपल्याला ओझे होते आहे नि कोणत्या गोष्टी खांद्यावर वाहून नेल्याने आपण पवित्रतेचा नि सुखाचा अनुभव घेतो हे आपल्याला कळू शकेल. या ओळींमधील पालखी म्हणजे वारकऱ्यासाठी वारीतील खरीखुरी पालखी असेल परंतू आपल्यासाठी मात्र प्रामाणिकपणे निर्वहन करणारी जबाबदारी आहे. आपले जीवनकार्य पुढे नेत असताना कधीकधी आपल्याकडून अनावधानाने काही चूकत देखील असते. परंतू त्या चुकांमधे जर व्यक्तिगत स्वार्थ किंवा भ्रष्ट मनोवृत्ती नसेल तर ती जबाबदारी पालखीसारखी पेलायला आपण तयार होऊ शकतो.
कष्ट आणि चारा दे, सोसायला जोर दे
खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे
परंतू हे साधे मागणे केल्यावर देखील याच्याही पलीकडे जाऊन एक विचार या कवितेमधे येतो. एखाद्या अश्या संध्याकाळी निवांतपणे परमेश्वरासमोर बसून साधेच मागणे केल्यावर, हे तरी का मागायचे हा तो विचार. आणि मग हे साधे साधे मागणे देखील मागे पडते. शेवटी जगण्याचा प्रत्येकाचा कालावधी ठरलेला आहे. यामधे आपण जगत असताना किती लोकांना सोबत घेतले, किती लोकांना सांभाळले, किती जणांना आपल्या प्रेमळ व धीर देणाऱ्या शब्दांनी बळ दिले यावरच जीवनाची यशस्विता अवलंबून असते. परंतू हे असे चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देण्याकरीता आपल्याला फक्त एका गोष्टीची गरज असते ज्याचा उल्लेख या कवितेमधे सर्वात शेवटी केला आहे. वरच्या साध्या वाटत असल्या तरी त्या मागण्याची यादी परमेश्वराकडे सोपविण्यापेक्षा या साऱ्या सत्वशील गोष्टींना एकत्र सांधणारी आणि या पद्धतीचे जीवन जगण्यास प्रेरक असलेल्या एकाच गोष्टीची मागणी करून ही कविता संपते.
मागू किती राहू दे, सारे एके ठायी शोभू दे
वाट दाखविण्या गुरु, जन्मो जन्मी लाभू दे
फक्त एक चांगला गुरु. वरच्या कडव्यांमधे केलेल्या सर्व मागण्या अगदी साध्या असल्या तरी देखील एखाद्या नीरव संध्याकाळी परमेश्वरचरणी लीन होताना त्या देखील गळून पडतात व केवळ एकच आधार आपल्याला मनःशांतीचा आणि समाधानाचा मार्ग दाखवू शकतो, तो म्हणजे आपला गुरु. चांगला गुरु ही आयुष्यभराची पुंजी असते. शिक्षण प्रक्रीयेत बहुतेकांना तो भेटतो. परंतू शिक्षणाच्या चौकटीच्या पलीकडे देखील त्याचे मार्गदर्शन आपल्याला लाभत राहते. असा गुरु मिळावा म्हणजे परमेश्वराकडे बाकी काहीच मागणे करावे लागत नाही.
गुरु महात्म्य समजून अश्या गुरुचे मनोभावे स्मरण करण्याची संधी देणारी व त्याच गुरुच्या मार्गदर्शनात समाधानी आयुष्य जगण्याचा संकल्प करण्याचा क्षण देणारी एखादी संध्याकाळ आपणही अनुभवायला हवी. होय ना?
खरच अशी एक संध्याकाळ लाभू दे.
ReplyDeleteखूप सुंदर बाबा।
ReplyDeleteBeautifully articulated synopsis of the poem bhai, great poem, thx for the sharing👌🏻🙏🏻😊
ReplyDeleteखूप छान, सुंदर कल्पना
ReplyDeleteSo nicely explained
ReplyDeleteKhup chhan lekh sir.
ReplyDeleteDr. Rohini Deshmukh
Nice article.👍👍
ReplyDeleteखूप सुरेख सर🙏
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteतस्मै श्री गुरुवेनमः
ReplyDeleteसंजय पाटील ,वाशीम
ReplyDelete