थोडा है थोडे की जरुरत है @ 25.05.21
नाम ते क्रियापद
प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी लिहीलेले एक पुस्तक मी सध्या वाचतोय. द बेस्ट थिंग अबाऊट यू इज यू. या पुस्तकात अनुपम खेर यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी व्यक्तिमत्व विकसनाचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कला क्षेत्रात वावरत असताना त्यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी या पुस्तकात विचार मांडलेत. अनेक वेगवेगळ्या विचारांसोबत त्यांनी मांडलेला एक विचार फार ठळकपणे जाणवला. माणसाच्या जीवनाचा प्रवास हा नाम ते क्रियापद असायला हवा. समज आल्यापासून प्रत्येकजण आपल्या जीवनाचा विचार करु लागतो. स्वतःच्या जीवनाबद्दल प्रत्येकाचे काही ना काही आराखडे असतात. त्याचा परीवार, सभोवतालची परीस्थिती आणि त्याच्यावर झालेले संस्कार हे त्याला जगण्याची दिशा प्रदान करतात. म्हणूनच प्रत्येकाची जगण्याची दिशा आणि पद्धती वेगवेगळी असते. परंतू अनुपम खेर म्हणतात त्या प्रमाणे प्रत्येकाचा प्रवास हा नाम ते क्रियापद व्हायला हवा.
जगात जगत असताना प्रत्येकच जण आपल्या अस्तित्वाकरीता झगडत असतो. अस्तित्वाचे हे वर्तूळ समाजापासून सुरु होऊन आपल्या स्वतः पर्यंत येऊन थांबते. कारण तो सारा नामाचा महिमा असतो. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात स्वतःला प्रस्थापित करायचे असते. त्यामुळे प्रत्येकजण संघर्ष करीत असतो. मार्ग वेगवेगळे असतात. परंतू धारणा मात्र स्वतःला प्रस्थापित करण्याची असते. अनुपम खेर त्यांच्या पुस्तकात लिहीतात त्याप्रमाणे काही जण शांतपणे कार्य करीत या मार्गावरुन चालतात, काही आपले कार्य लोकांना जाणवलेच पाहिजे या पद्धतीने कार्य करतात तर काही कार्याचा देखावा देखील करतात. या तीनही प्रकारांमधे स्वतःला प्रस्थापित करण्याची भावना समान असते. यामधील कोणता मार्ग योग्य नि कोणता अयोग्य हे पुढील काळ ठरवत असतो. परंतू आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मात्र प्रत्येकाचा प्रयत्न हाच असतो की नाम मोठे व्हावे. सध्याच्या या काळात तर नाम मोठे करण्याचा संघर्ष टीपेला पोहोचला आहे कारण चांगले देखील मोठ्याने सांगण्याचा काळ आहे. चांगुलपणाचे देखील आज आपल्याला मार्केटींग करावे लागते. मार्केटींग हा शब्द जरा बोचरा असला तरी देखील समाजमाध्यमांच्या गर्दीमधे चांगल्या बाबी या ठळकपणे समाजापुढे आणण्याकरीता बरेच प्रयत्न करावे लागतात. जवळपास ८० टक्के नकारात्मक समाचारांमधे २० टक्के चांगल्या गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. त्यामुळेच आपल्याला नामाचा संघर्ष सध्याच्या काळात वाढलेला दिसतो. ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. त्यामधे वाईट काहीच नाही. परंतू हा जीवनप्रवास काही काळानंतर मात्र नामाकडून क्रियापदाकडे वळायला हवा. अनुपम खेर म्हणतात, नामाकडून क्रियापदाकडे प्रवास कधी वळवायचा हे ज्या व्यक्तीला कळले ती व्यक्ती आयुष्यात यशस्वी आणि समाधानी झाल्याखेरीज रहात नाही. नेमकी हीच गल्लत अनेकांच्या आयुष्यात होते व त्यांचा नामाचा प्रवास हा एवढा जास्त वाढत जातो की त्याला क्रियापदाच्या दिशेने त्यांना वळविताच येत नाही व त्यामुळे ही मंडळी केवळ नामामधे गुरफटलेली आपल्याला दिसतात. याउलट ज्यांनी योग्य वेळी नामाचा प्रवास क्रियापदाकडे वळविला त्यांच्या कार्यांना समाजमान्यता मिळालेली आपल्याला दिसते. परंतू प्रवास हा सुरुवातीला समाजापासून तर स्वतः पर्यंतचाच असतो. सध्याच्या काळात तर ते फार ठळकपणे प्रत्येकाला जाणवते. सर्वप्रथम स्वतःचा नि स्वतःच्या परीवाराचा विचार करायला या परिस्थितीने आपल्याला भाग पाडले. अश्या विचित्र स्थितीमधेही काही लोकांनी मात्र केवळ आपल्या कार्याने त्यांचा क्रियापदाचाच प्रवास असल्याचे सिद्ध केले.
सुरुवातीचा काळ आटोपल्यानंतर मग प्रत्येकाच्या आयुष्याची ओळख त्याच्या कार्यामुळे व्हायला लागते व तो खरा क्रियापदाचा काळ असतो. कार्यामुळे व्यक्तीची ओळख ही कायमस्वरुपी होते. ती ओळख पथदर्शी आणि समाजातील प्रत्येकाला तश्याच पद्धतीने क्रियापदाकडे प्रवास करायला बाध्य करणारी असते. सुदैवाने आपल्या सध्याच्या समाजात देखील आपल्याला जगण्याची व कार्याची उर्मी देणारी काही क्रियापदे ठळकपणे आपल्या सभोवताली आहेत. कलीयुगाचा हवाला देत अनेक वेळा आधीचा काळ चांगला होता आणि आता सारे काही बिघडले आहे असे नकारात्मक विचार बरेच वेळा बोलले जातात. परंतू जीवनाला अर्थ मिळावा आणि आपण देखील आपल्या नामाचे क्रियापद व्हावे याकरीता मनापासून कार्य करावे अशी प्रेरणा देणारी काही मंडळी आपल्यासोबत आहेत जे खरे दीपस्तंभ आहेत. कधी कधी त्यांच्या पश्चात देखील त्यांच्या नामापासून क्रियापदांचा प्रवास आपल्याला बळच देत राहतो. नुकतेच आपल्याला सोडून गेलेले सुनिलजी देशपांडे त्यापैकीच एक होते. दुर्दैवाने त्यांचा नामाचा प्रवास थांबला तरी त्यांनी उभा केलेला त्याच्या क्रियापदाचा प्रवास निरंतर सुरु राहणार आहे. सुनिल देशपांडे या नामापेक्षा, संपुर्ण बांबु केंद्र आणि त्या माध्यमातून आदीवासी मुलांना मिळालेला आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग हा त्यांच्या क्रियापदाच्या प्रवासाचा भाग चिरंतन राहणार आहे. असे सक्षम क्रियापदांचे धनी आपल्याला देखील आपल्या प्रवासाची दिशा देत राहतात. मग डॉ. प्रकाश आमटे या नामापेक्षा लोक बिरादरी प्रकल्प आणि त्या माध्यमातून माडीया गोंड आदीवासी जमातीकरीता केले जाणारे अथक प्रयत्न, त्यांच्या जीवनामधे निर्माण झालेले जगण्याचे मानवीय संकेत आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामधे येण्याची मिळालेली संधी ही जास्त प्रभावीपणे जाणवते. शंकरबाबा पापळकर या नामापेक्षा १२३ दिव्यांग मुलामुलींचा होत असलेला सांभाळ, सामाजिक दृष्टीने त्यांना मिळालेला दर्जा आणि केवळ अवहेलना आणि उपेक्षांनी भरलेले ज्यांचे नशीब होते त्यांच्या जीवनात स्वाभीमानाने जगण्याची प्राप्त झालेली संधी ही खरीखुरी क्रियापदाची कमाल आहे. शिवशंकरभाऊ पाटील या नामापेक्षा सबंध भारतभरातील वेगवेगळ्या धार्मिक स्थळांपेक्षा वेगळा असा निस्सीम सेवाभाव जोपासणारे वातावरण असलेले, सत्वशील मनोभूमिका जपून कार्य करणारे आणि कसलाही धाक न दाखविता शिस्त कशी सांभाळल्या जाऊ शकते हे सिद्ध करणारे गजानन महाराज देवस्थान आणि तेथील पावित्र्य हे क्रियापद बनलेले कार्य अनेकांना अनोखा आधार व जीवनदृष्टी प्रदान करते. शेषराव डोंगरे या नामापेक्षा यवतमाळजवळील उमरी पठार या ठिकाणी १०० हून अधिक संख्येने घरातून घालवून दिलेल्या आणि कुणीही लक्ष न देत असलेल्या वृद्ध मायबापांना सांभाळण्यासाठी स्वतःची जमीन विकून एक वृद्धाश्रम उभा करणारी आणि या वृद्धांना आपलेच माय बाप समजून त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपणारी ही अद्वितीय क्रिया नामापेक्षा मोठी ठरते व स्मरणात देखील राहते.
आपल्या नामाचा महिमा मोठा करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील आवश्यक व स्वाभाविक बाब असली तरी देखील सामाजिक क्षेत्रातील वर उल्लेखित काही नामाला क्रियापदांमधे परावर्तीत करणाऱ्या मंडळींच्या आयुष्यापासून जर आपल्याला काही प्रमाणात प्रेरणा घेता आली तर आपलाही प्रवास हा एखाद्या सक्षम क्रियापदाच्या दिशेने होऊ शकतो. कारण शेवटी अनुपम खेर पुस्तकात्या शेवटी म्हणतात, माणसाचे नाम हे कितीही मोठे केले तरी कधी ना कधी ते विस्मरणात जाते परंतू त्या नामाचे जर क्रियापद झाले तरच त्याला चिरंतन अस्तित्व लाभते. आपल्याला देखील आपल्या प्रवासाची दिशा क्रियापदाच्या दिशेने ठेवता आली तर छानच होईल, होय ना?
"नाम ते क्रियापद " एक 'अनुपम ' कल्पना !
ReplyDelete'खैर ' आपका भी जवाब नहीं!
प्रा.डॉ.संजय पाटील
वाशीम
सुंदर विचार 👌👌🙏
ReplyDeleteVery inspiring write-up
ReplyDeleteअत्यंत प्रेरणादायी
ReplyDeleteVery nice thought sirji. This world will be more beautiful, and also tolerable if we all decide to journey from NAM to KRIYAPAD.
ReplyDeleteMotivating and learning lesson to all.
ReplyDeleteInspiring!
ReplyDeleteसत्य आणि सुंदर विचार
ReplyDeleteप्रेरणादायी लेख
ReplyDeleteअत्यंत प्रेरणादायी विचार
ReplyDeleteअत्यंत प्रेरणादायी विचार
ReplyDeleteफारच सुरेख आणि विचारांची एक नवीन दिशा या लेखातून मिळाली.
ReplyDeleteनामाकडून क्रियपदाकडे प्रवास करणाऱ्याचे नाव (नाम) त्याच्या कार्यरुपात अमरत्व प्राप्त करते.
सत्य, सुंदर व प्रेरणादायी विचार पण हे सगळं सत्य, सुंदर व प्रेरणादायी करण्याकरिता मनाचा मोठेपणा व कष्टांची तयारी हवी...कामात जून क्रियापदाकडे जाण्याचा प्रवास सोप्पा नव्हे पण अशक्य ही नव्हे.लेखाकरिता धन्यवाद सर🙏
ReplyDeleteविचार अत्यक
ReplyDelete