थोडा है थोडे की जरुरत है @ 18.05.21

एक नवे वादळ

हा लेख वाचकांपर्यंत पोहोचेस्तोवर आणखी एक वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या सागरी किनाऱ्यावर पोहोचलेले असेल आणि त्याच्या भिषण अस्तित्वाची जाणीव या किनारपट्टीनजीक राहणाऱ्या लोकांना जाणविलेली असेल. आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचे प्रमुख श्रीमान प्रधान यांनी या वादळाचा सामना करण्याची तयारी काल देशाला सांगितली. परंतू बोलताना ते म्हणाले की कितीही तयारी केली तरी या वादळाची तीव्रता एवढी जास्त आहे की त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामधे सर्वात मोठी प्राथमिकता लोकांचे प्राण वाचविण्याची राहणार आहे. किनारपट्टीनजीकच्या, कच्च्या वाटणाऱ्या इमारतीमधल्या लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. परंतू त्यांच्या स्थावर मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहेच. परंतू हे वादळ यावेळी दुहेरी संकट आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दोन पातळ्यांवर कार्य करावे लागत आहे. एक तर हे वादळ अतिशय तीव्र होऊन किनारपट्टीवर कोसळणार आहे. त्याचा वेग २०० किमी प्रती तास एवढा भयंकर राहणार आहे असे वर्तविले आहे. त्यामुळे इमारती कोसळणे, झाडे पडणे, हवेतून वस्तू उडून अन्यत्र कोसळणे यासारख्या आपदा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू याच वेळी किनारपट्टी असलेला हा सर्व भाग सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे देखील होरपळून निघतो आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही कोरोना बाधीतांची फार मोठी संख्या असलेली राज्ये आहेत. प्रधान सरांच्या बोलण्यात एक वेगळीच चिंता होती. समस्येचे स्वरुप जरा समजून घेऊयात. सध्या ज्या प्रांतामधे हे वादळ येऊन धडकणार आहे तेथेच सर्वात जास्त रुग्ण रुग्णालयात भरती आहे. यापैकी अनेक व्हेंटीलेटरवर आहेत, अनेकांना ऑक्सीजन लावलेला आहे. आता अश्या सर्व रुग्णांच्या जीविताकरीता रुग्णालयांचा विद्युत पुरवठा कायम राखणे हे एक आव्हान आहे. २०० किमी प्रती तासाच्या प्रचंड वेगाने हे वादळ जेव्हा घोंघावत लोकवस्त्यांमधे घुसेल तेव्हा ते काय काय तोडत किंवा कोसळून टाकत पुढे सरकेल हे सांगताच येत नाही. त्याच विद्युततारा, इमारती, झाडे काहीही राहू शकते. विद्युत खंबेच जर उखडून पडले तर पुरवठा कसा केला जाणार? त्यासाठी मोठाले जनरेटर्स तयार ठेवावे लागणार. त्याची उपलब्धता किती ठिकाणी आहे ते बघावे लागणार, विद्युत खंबेच उखडून पडल्यावर पुन्हा विद्युत पुरवठा किती वेगाने पूर्ववत करता येणार, किती रस्त्यांवर झाडे कोसळणार, या रस्त्यांनी रुग्णालयांना ऑक्सीजन पुरवठा करणारे टँकर्स जाणार, ते पोहोचू शकतील का? त्यांच्या आवागमनामधे अडचण निर्माण होणार नाही यासाठी किती लवकर रस्ते मोकळे करता येतील? रुग्णालयांमधे जर ऑक्सीजन प्लॅन्टस् असतील तर त्यासाठी लागणारा विद्यूत पुरवठा जनरेटर्स करु शकतील का? जनरेटर्सना लागणारे डीझेल नेणाऱ्या गाड्या रस्त्यांवर अडल्या तर काय करावे लागेल? आणि या सर्व गोष्टी करणाऱ्या व्यवस्थांमधील लोकांना कोरोनाच्या काळात रस्त्यांवर आणून त्यांचाही जीव पुन्हा धोक्यात टाकला जाणार नाही का? वादळाची स्थिती असताना डॉक्टर्स, नर्सेस, मदतनीस हे सारे रुग्णालयांमधे कसे पोहोचणार? त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना सोडून रुग्णांच्या सेवेकरीता जाताना अडचणी आल्या तर त्याचे निराकरण कसे होणार? औषधांचा पुरवठा कसा केला जाणार, यावेळी या सर्व गोष्टींसोबत कोरोनाचा प्रसार कसा कमी करता येईल याचा विचार कसा करणार? डोके भण्ण झाले ना केवळ वाचून? श्रीमान प्रधान सर मात्र या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी सध्या सज्ज आहेत. त्यांची टीम त्यांच्यासोबत मजबुतीने पाय रोवून उभी आहे. ज्या समस्या वाचूनच कदाचित आपल्याला ताण आला असेल त्या सर्व समस्यांवर प्रधान सर आणि त्यांच्या सोबत हिंमतीने राबणारी व्यवस्था मार्ग काढणार, अहोरात्र मेहनत करणार, जेथे जेथे दुर्व्यवस्था निर्माण झाली तेथे तेथे वेगाने धडकणार, यावेळी वादळातील लोकांसोबतच रुग्णालयामधे दाखल असलेल्या कोरोना बाधीतांचेही जीव वाचविण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करणार, प्रचंड ताणामधे काम करणार आणि अनेकांचे प्राण वाचवून आपली कर्तव्यपूर्ती करणार. परंतू हे सारे केल्यानंतर प्रधान सरांना आणि त्यांच्या टीमला समाजमाध्यमांवर काय वाचायला मिळणार याची कल्पनाही करवत नाही.

या दुहेरी वादळाचा धाडसाने सामना करणाऱ्या प्रधान सरांना फेसबुकवर कुणीतरी लिहून पाठवणार, आपत्ती व्यवस्थापन टीम ने आणखी सतर्कता दाखविली असती तर जास्त लोकांचे प्राण वाचले असते. सोबत हे लिहीणारा एखाद्या विचारधारेचा समर्पित कार्यकर्ता देखील असणार, त्याच्या त्या पोस्टवर खाली परत काही तज्ञ मंडळी आपापल्या घरात बसून या सर्व व्यवस्थापनाचे चिकित्सक विश्लेषण करणार, त्यासोबत या नेत्याचे काय चुकले, त्या नेत्याचे काय चुकले, ही व्यवस्था कशी वाईट, ती व्यवस्था कशी वाईट, मग त्यामधून वेगवेगळ्या विचारधारांचे मंडळी यात सहभागी होणार, विचारधारा टिकली पाहीजे यासाठी फेसबुकवर आपत्ती व्यवस्थापनाचे वेगवेगळे धडे देणार, हा विषय मग थेट देशातील कमतरतांपर्यंत पोहोचणार आणि शेवटी माझ्या हातात असते तर मी काय केले असे अश्या राणाभीमदेवी फेसबुक गर्जनांसह त्या दिवसाची घनघोर चर्चा संपणार. दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी एखाद्या व्यवस्थेला सल्ले देण्यासाठी आणि चांगले कार्य करा हे सांगण्यासाठी घरात बसून सज्ज होणार. हे सारे करत असताना एक छोटीशी गोष्ट करता येईल?

हा प्रश्न मी स्वतःला देखील विचारतोय. समाजमाध्यमावर प्रधान सरांच्या आपत्ती व्यवस्थापनाची चीरफाड करत असताना मी लिहीलेली वाक्ये वाचून त्या मैदानावर जीवाची शर्थ करुन लढलेल्या सैनिकाला काय वाटत असेल? केवळ एकदा तरी मी हा विचार करु शकेन? सध्या सबंध देशात आपल्या व्यवस्था या कोरोनाच्या संकटाशी झुंजून झुंजून थकून गेल्यात, त्यांना देखील जरा विश्रांतीची गरज आहे परंतू ती मिळतच नाहीये आणि अश्या वेळी आपल्या घरात सुरक्षित बसून या व्यवस्थांची चीरफाड करण्यात काय आनंद मिळू शकतो? एका केंद्रावर लस संपली म्हणून तेथील परीचारीकेला अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली आणि तिच्या पासून तर थेट व्यवस्था प्रमुखांपर्यंत सर्वांना फेसबुकवर शिव्यांची लाखोळी वाहण्यात आली ही कोणत्या प्रकारची सभ्यता आहे? सतत १५ ते १६ तास कोव्हीड रुग्णासोबत राहून त्यांचा इलाज करणारे डॉक्टर्स, परीचारीका, इतर मदतनीस हे थकले नसतील का हो? सारखे तोंडाला मास्क लावा, सोशल डीस्टंसींग ठेवा, गाड्यांवर विनाकारण फिरु नका हे सांगण्यासाठी ४३ डीग्रीच्या उन्हात उभी राहून पोलीस यंत्रणा थकली नसेल? या सर्व व्यवस्थांना कधी नव्हे ती आपल्या पाठबळाची गरज आहे. निदान तेवढे तरी आपण करुयात.

हा लेख वाचेपर्यंत या नव्या वादळाने केलेले नुकसान आणि त्यामधून निर्माण झालेली आव्हाने याचे विस्तृत वर्णन आपल्यापर्यंत पोहोचले असेल. निदान यावेळी तरी प्रधान सर आणि त्यांच्या टीमच्या आणि सोबत या दोन्हीही प्रदेशातील राजकीय व्यवस्थेच्यादेखील पाठीशी मानसिकरित्या तरी उभे राहुयात. उगाच तीव्र टीका करता आपल्या सहसंवेदना सदिच्छा त्यांच्या पर्यंत पोहोचवूयात. त्यांच्या कामावर उगाच स्वयंघोषित तज्ञ बनून टिका करण्यापेक्षा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही जे काही करताय ती अत्यंत अभिमानास्पद बाब आहे हे त्यांना सांगुयात. सध्या काळ अतिशय कठीण संकटाचा आहे. वैद्यकीय मदतीपासून ते मानसिक आधारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत अपेक्षित आहे. येणारे काही महिने तरी असे व्यवस्थावरील आक्षेप, राजकिय टिप्पणी, टिका, निंदानालस्ती किंवा स्तर सोडून केलेले शाब्दिक हल्ले हे सारे बंद करुन समाजमाध्यमांचा उपयोग फक्त एकमेकांना आधार देण्यासाठी, सांभाळण्यासाठी करुयात

या वादळात काल रात्रीपासून रुग्णालयात अडकलेली आपली एखादी डॉक्टर बहीण सतत १८ तास कोव्हीड रुग्णांसोबत त्यांची तपासणी करुन थकलीय. रात्र झालीय, तिला घरी जायचेय जरावेळ. तिचा तीन वर्षाचा मुलगा घरी ठेवून आलीय ती. विद्यूत पुरवठा बंद आहे. अंधार झालाय. रस्त्यांवर झाडे पडली आहेत. वाहने बंद आहेत. प्रचंड पाऊस सुरु आहे. रुग्णालयाच्या दरवाज्यावर कासाविस होऊन मदतीची वाट बघतेय... ती देखील व्यवस्थेचा भाग आहे. मग घरात सुरक्षित बसून अश्या बहिणीवर टिका करायची की तिच्या पाठीशी उभे रहायचे? निर्णय आपला आहे!!






Comments

  1. फुल वा फुलाची पाकळी आपले सर्वांचे योगदान या वेळी गरजेचे आहेच.

    ReplyDelete
  2. सद्यस्थितीमध्ये सहसंवेदनेची आवश्यकता आहे,ती सर्वांनी दाखवावी,ही माफक अपेक्षा.
    संजय नीलकंठ पाटील,वाशीम

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहे....

    ReplyDelete
  4. Khoopach chhan. Khoop vichar Karun lihalay.

    ReplyDelete
  5. एकदम बरोबर आहे.

    ReplyDelete
  6. Sir most appreciating and based on current situation congratulations avibhau

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18