दै. तरुण भारत नागपूर मधे आज प्रकाशित झालेला माझा लेख

एक नवी कल्पक गुंतवणूक

पहाटे वॉकला जाताना मी फ्लाय ओव्हरवरुन जात होतो. नेहेमीचा रस्ता असल्याने परीचित मंडळींच्या भेटी झाल्या. पण त्या दिवशी एक वेगळा प्रकार मला बघायला मिळाला. माझ्या बाजूने दोन वीशीतले तरुण गाडी चालवित जरा पुढे गेले. त्यांनी काही अंतरावर गाडी लावली. पुलावर अशी गाडी थांबविल्याने माझ्या मनात जरा कुतुहल निर्माण झाले. त्या दोघांनीही आपापल्या बॅग्जमधून कॅमेरे बाहेर काढले व ते दोघेही उगवत्या सूर्याची छायाचित्रे घेऊ लागले. वेगवेगळ्या अँगलचा, पोझीशन्सचा वापर करुन त्यांनी उगवत्या सूर्याची, आसपास उडणाऱ्या कबुतरांची वेगवेगळी छायाचित्रे काढली. ते दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी होते व आजच्या युवापिढीला शोभणारेच कपडे त्यांनी परीधान केलेले होते. पण दोघांचाही फोटोग्राफीचा सेन्स मात्र खूप चांगला होता हे त्यांच्या चर्चेवरुन जाणवित होते. मी मुद्दाम त्यांच्याजवळ घुटमळलो तेव्हा त्यांनी मला ती सर्व छायाचित्रे दाखविली. मलाही फोटोग्राफीची खूप आवड असल्याने मी त्या सर्व छायाचित्रांचे अवलोकन केले. अप्रतिम छायाचित्रे होती ती. महत्वाचे म्हणजे त्या छायाचित्रांमधील बारीक बारीक गोष्टी ते सांगत होते. ॲपरचर किती वापरले, व्हाईट बॅलन्स कसा होता, शॉट घेताना कसा अँगल ठेवला, कोणत्या गोष्टी आऊट ऑफ फोकस ठेवल्या वगैरे तांत्रीक बाबी देखील ते दोघे मला सांगत होते. त्यांच्या बोलण्यावरुन ते दोघेही फोटोग्राफी शिकलेले आहेत हे जाणविले. सहज कुतुहल म्हणून मी त्यांना त्यांच्या या अतिशय कल्पक छंदाबद्दल विचारले. त्यांनी त्याबद्दल मला जे काही सांगितले त्यावरुन तरुण मुला मुलींना या माध्यमातून एक कलात्मक गुंतणूक प्राप्त झाली आहे असे लक्षात आले.
अभियांत्रीकी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला असणारे ते विद्यार्थी होते. साधारण दीड वर्षापूर्वी सायंकाळच्यावेळी टोळके जमवून चकाट्या पिटणे हा त्यांचा आवडीचा उद्योग होता. गावातील वेगवेगळ्या चौकात जमायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांवर कॉमेंट करायच्या, स्पीड बाईकींग करायचे, कर्कश हॉर्न वाजवित गाड्या चालवायच्या असले सारे उद्योग त्यांच्या संपुर्ण समुहाचे चालायचे. या समुहात मुली देखील होत्या व त्या देखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून या सर्व प्रकारात सामील होत्या. या मुलांच्या असल्या गोंधळामुळे बरेच लोक हैराण झाले होते. त्यांच्या या प्रकाराबद्दल त्यांच्या महाविद्यालयांमधे देखील तक्रार झाली होती. परंतू त्या तक्रारीचा त्यांच्यावर काहीच फरक पडला नव्हता. पण एकदा त्यांच्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका वर्कशॉपमुळे त्यांचे जगच बदलून गेले. खरे तर त्या वर्कशॉपला जाण्याची त्यांच्यापैकी एकाचीही इच्छा नव्हती. परंतू वर्कशॉपमधे मार्गदर्शन करणारे लोक त्यांच्या प्रॉडक्शन विषय शिकविणाऱ्या सरांचे परीचित होते व त्यांनी यांना हजर रहायला सांगितले होते. प्रॉडक्शनच्या सरांच्या हातात प्रॅक्टीकलचे मार्कस् असल्याने या सगळ्यांनी 'प्रॅक्टीकल' विचार केला व वर्कशॉपला जाऊन बसले. त्या पाच सहा तासांच्या वर्कशॉपमधे त्यांना त्या ज्येष्ठ फोटोग्राफरने जे काही सांगितले त्याचा परीणाम अविश्वसनीय होता. त्या सहा तासांच्या चर्चेमधे त्याने फोटोग्राफी म्हणजे केवळ फोटो काढणे नसून जीवनाकडे बघण्याचा सुंदर दृष्टीकोन निर्माण करणारी एक अप्रतीम कला आहे असे सांगितले. फोटोग्राफी माणसाला स्वतःपेक्षा कॅमेराच्या समोर असलेल्या व्यक्ती किंवा वस्तूंचा विचार करायला लावते. ऐरवी आपण फारच आत्मकेंद्री असतो पण कॅमेरा चालविणारा व्यक्ती मात्र लोकांच्या सुंदरतेचा विचार करीत असतो. आपल्या व्यतिरीक्त इतरांच्या सुंदरतेचा विचार करणे ही या नव्या जगातील केव्हडी मोठी उपलब्धी आहे. यासोबतच फोटोग्राफी एकाच गोष्टीची विविध रुपे अभ्यासण्यास मदत देखील करते. विचारांचे विविध पैलू त्याने तयार होतात. निसर्गाबद्दल प्रचंड आत्मियता फोटोग्राफीची कला निर्माण करते. गोजीरवाण्या सश्यांना बागडताना बघून किंवा उंच भरारी घेणाऱ्या एखाद्या पक्षाला बघून त्याला कॅमेराबंद करणारा संवेदनशील फोटोग्राफर त्या सश्याला किंवा त्या पक्षाला मारुन खाण्याचा विचारही करु शकत नाही. माणसाचे माणूसपण जपण्याची सवय ही फोटोग्राफीची कलाच लावते. फोटोग्राफीसंदर्भातील इतक्या विविध बाबी ऐकल्यावर या संपुर्ण ग्रुपच्या मनात त्याबद्दल प्रचंड आवड निर्माण झाली. त्या वर्कशॉपमधे आयोजकांनी सर्वांना वेगवेगळे कॅमेरे हाताळायला दिले. त्याचा वापर शिकविला व त्याद्वारे सुंदर फोटोग्राफी कशी करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक देखील करुन दाखविले. इच्छा नसतानाही ज्या वर्कशॉपला ही मुले गेली होती ते वर्कशॉप त्यांचे जीवन व जीवनदृष्टीकोन पार बदलवून टाकेल असे वाटलेच नव्हते. त्यानंतर जे घडले ते अक्षरशः चकित करणारे व आनंद देणारे होते.
या सर्वांनी फोटोग्राफीचा हा कल्पक छंद जोपासायचे ठरविले. ज्यांची परिस्थिती जरा बरी होती त्यांनी ताबडतोब आपल्या आईवडीलांच्या मागे लागून छान छान कॅमेरे विकत घेतले. त्यांच्या त्या ग्रुपचे कॅमेरानुसार दोन चार वेगवेगळे ग्रुप तयार झाले. फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या विषयांनुसार त्यांनी सकाळ संध्याकाळ फोटोग्राफी सुरु केली. कुणी निसर्ग छायाचित्रे काढण्यासाठी गावाच्या बाहेर छान लँडस्केप शोधायला लागले. कुणी पक्षांची व प्राण्यांची छायाचित्रे काढण्यासाठी जंगलांमधे भटकायला लागले किंवा काही मंडळी वेगवेगळ्या इव्हेंटस् ची फोटोग्राफी करण्यासाठी गावांमधे जाऊ लागली. गणपतीच्या मिरवणुकीत फोटोग्राफी, लग्नसमारंभांमधे फोटोग्राफी, ग्रामीण जीवनाचे छायाचित्रण अश्या विविध गोष्टींमधे हा संपुर्ण ग्रुप व्यस्त झाला. यासोबतच फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमधे ही मंडळी भाग घेऊ लागली. वेगवेगळ्या थीमवर फोटोग्राफी, त्याबद्दल चर्चा अश्या सकारात्मक व कल्पक विषयांमधे ही पोरे गुंग झाली. फोटोग्राफीमधील तंत्र आणखी विकसित करण्यासाठी ही सर्व पोरे वेगवेगळ्या फोटोग्राफर मंडळींनी आयोजित केलेल्या कार्यशाळांना उपस्थित राहू लागली. एकंदरीत त्यांचे विश्वच बदलले. त्यांचा नेहेमीचा अभ्यास सुरु राहीला परंतू त्यासोबत फोटोग्राफी या कलेने त्यांना अक्षरशः झपाटून टाकले. यासोबत त्या दोन पोरांनी स्वतः कबूल केलेल्या काही बाबी तर मला मनाला फार मोठा दिलासा देऊन गेल्या. 
त्यांना त्यांच्या दिड वर्षाआधीच्या टवाळकीचे मनापासून वाईट वाटत होते. ते मला म्हणाले,   "सर, आमचे ते टवाळक्या करणे वाईट आहे हे आमच्या लक्षातच येत नव्हते. परंतू आता या कॅमेराच्या अँगलसोबत जीवन जगण्याचा खरा आणि रंजक अँगल आम्हाला शोधता आलाय. आता आम्ही कुणीच त्या पद्धतीच्या बदमाश्या व खोड्या करीत नाही. या नव्या आणि रोमांचक छंदामुळे आमच्यातील बऱ्याच जणांचे दारुचे व सिगरेटचे व्यसन देखील सुटले. कारण आता पैसे खर्च न करता आम्ही वेगवेगळ्या लेन्स साठी पैसे गोळा करतो. दारु प्यावीशी पण वाटत नाही आता. त्यापेक्षा फोटोशुटला जावे वाटते. फोटोग्राफीने आम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे आमची नवी ओळख. आम्ही काढलेले छान छान फोटो आम्ही फेसबुकवर अपलोड करतो व त्याला ज्या प्रतिक्रीया प्राप्त होतात, त्यावर जे कौतुक होते किंवा आमच्या कामाची दखल घेतली जाते तेव्हा खूप छान वाटते. फेसबुकवर मोठमोठे नामांकित व तज्ञ फोटोग्राफर्स वेगवेगळ्या विषयांवर फोटोग्राफी चॅलेंज देतात व एकेका व्यक्तीला नॉमीनेट करतात. मग आम्ही ते चॅलेंज स्विकारतो व त्या विषयावर अप्रतिम फोटो काढण्यासाठी धडपडतो. मागे एकदा भारतीय ग्रामीण जीवन या विषयावर आम्ही काढलेल्या फोटोला अमेरीकेतील एका प्रसिद्ध फोटोग्राफरने सुंदर कॉमेंट दिली होती. आम्हाला अगदी ऑस्कर अवार्ड मिळविल्यासारखे वाटले त्यावेळी. आम्ही खूप वेगवेगळे फोटोग्राफ्स काढतो...आम्ही हे करतो...ते करतो.... असे झाले... तसे झाले..... ती पोरे मला खूप काही सांगत राहीली आणि मी ऐकत राहीलो. जरा वेळानी ती पुढील शॉट घेण्यासाठी पुढे निघून गेली व मी घराकडे परतायला लागलो.. विचारांचे चक्र सुरु होते..
एखादा छंद किती मोठा व सकारात्मक परीणाम घडवू शकतो. आपल्या जवळ अनेक गोष्टी आहेत व नेहेमीच असतात परंतू त्या सर्व गोष्टींना योग्य पद्धतीने आपल्याला तरुणांपर्यंत पोहोचविता येत नाही ही खरी अडचण आहे. केवळ 'आजची तरुण पिढी वाया गेली' असे खास पठडीतील वाक्य सकाळी चहा व वर्तमानपत्रासोबत फेकले की आपण आपल्या सामाजिक जबाबदारीतून मुक्त होतो. परंतू या तरुण मंडळींना काहीतरी नवे व कल्पक सांगून त्यांचा जगण्याचा दृष्टीकोन बदलविण्याचा प्रयत्न मात्र फार होताना दिसत नाही. फोटोग्राफीच्या या कल्पक छंदाच्या निमित्ताने एक अक्षरशः वाया गेलेल्या मुला-मुलींचा समुह जीवनाकडे इतक्या सुंदरतेने बघणे शिकला व नकारात्मक बाबींमधे वाया जाणारी त्यांची क्षमता ही अतिशय सकारात्मक भूमिकेच्या माध्यमातून उजळून निघाली ही घटनाच किती उर्जा प्रदान करणारी आहे. आयुष्याला आनंदाने जगण्यासाठी या मुलांना एक अत्यंत सुरेख गुंतवणूक प्राप्त झाली. समाजपरीवर्तन यापेक्षा वेगळे ते काय असते?

- प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, अमरावती /  संवाद: ९४२३१२३९०६

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18