My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है
वाटणी
परंपरागत मिठाईचा व्यवसाय करणारे दोन गृहस्थ होते. दोघांचीही शहराच्या दोन बाजूला स्वतंत्र दुकाने होती. एकाच व्यवसायात असल्याने ते दोघेही एकमेकांना ओळखित होते. साधर्म्य हे की दोघांनाही तीन मुलेच होती. व्यवसाय बरा सुरु होता. हे दोघेही जेव्हा एकमेकांना भेटत असत तेव्हा आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत. घरचा व्यवसाय मुलांनी सांभाळावा ही त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी आपापल्या मुलांना प्रशिक्षण देणे सुरु केले. अनेक बाबतीत साधर्म्य असले तरी प्रशिक्षणाच्या बाबत व त्या प्रशिक्षणातून दिल्या जाणाऱ्या विचारांमधे तफावत होती. यामुळेच या दोघांच्या जीवनाच्या गोष्टी विरुद्ध दिशेला गेल्या. केवळ वैचारिक तफावतीमुळे आयुष्याच्या संपुर्ण दिशा बदल वर्णन करणाऱ्या या दोन गोष्टी आहेत.
मुले मोठे झाल्यावर एका वडीलांनी मुलांना व्यवसायाबाबतच्या सर्व महत्वाच्या बाबी सांगणे सुरु केले. लहापणापासूनच आपल्याला व्यवसाय सांभाळायचा आहे अशी मनःस्थिती असल्याने तीनही मुलांची शिक्षणातील प्रगती जेमतेमच होती. परंतू व्यवसायात मात्र ती तरबेज झाली. मिठाईच्या दुकानातील तीन महत्वाचे विभाग जसे माल विकत आणणे, त्यानंतर मिठाई तयार करणे व शेवटी त्याची विक्री करणे तीन्ही पोरांनी हाताळणे सुरु केले. थोड्याच दिवसात या मिठाईवाल्याच्या तीन्ही पोरांनी संपुर्णपणे दुकान सांभाळणे सुरु केले. पोरे व्यवसाय नीट सांभाळायला लागल्यानंतर या मिठाईवाल्याने मुलांची लग्ने लावून दिली. परंतू त्यानंतर मात्र तिघेही सांभाळत असलेल्या या दुकानात काही प्रमाणात गडबड व्हायला लागली. मुलांची वरचेवर भांडणे होऊ लागली. माणूस मोठा झाला की त्याच्या वयासोबत त्याचा इगो देखील मोठा होतो व त्यामधून मतभेद होतात. अर्थात हा विचार या मिठाईवाल्याच्या डोक्यात आला होताच. काही दिवसांनी या व्यवसायात वाटणी करावी लागेल असे त्याला वाटले होतेच. म्हणूनच जेव्हा मुलांचे वरचेवर वाद व्हायला लागले तेव्हा त्याने आपल्या तिनही मुलांना एकत्रीत बसविले व व्यवसायाची वाटणी करायची आहे असा निर्णय सांगितला. सर्वांनी मिळून या निर्णयाबाबत चर्चा केली व अंतीमतः काही गोष्टी ठरविण्यात आल्या. दुकान साधारण तीन हजार स्क्वेअर फुटाचे होते. त्यांनी त्या दुकानाचे तीन भाग करण्याचे ठरविले. एका दुकानाची तीन दुकाने झाली. त्यापैकी दोन मुलांनी तोच व्यवसाय कायम ठेवला व तिसऱ्या मुलाने हार्डवेयरचे दुकान लावण्याचा निर्णय घेतला. अनिच्छेने का होईना पण या मिठाईवाल्याने या वाटणीस परवानगी दिली. त्यालाही असे वाटत होते की तो जिवंत असेपर्यंत वाटण्या वगैरे झाल्या की व्यवहार पूर्ण होतो आणि मुले सुखाने राहू शकतील. दुकानाचे तुकडे झाले. दोन भावांची मिठाईचीच दुकाने आजुबाजुला असल्याने त्यांच्यातच स्पर्धा सुरु झाली. दोघांमधील भांडणांमुळे एकमेकांच्या दुकानात माल कसा चांगला मिळत नाही हे सांगण्यात त्यांचे कष्ट वाया गेले व त्यामुळे ग्राहक वर्ग तुटला. काहीच दिवसात या आपापसातील स्पर्धेची परीणीती अशी झाली की दोन पैकी एका भावाने आपले दुकान चक्क विकून टाकले व दुसऱ्याने ते कसेबसे सुरु ठेवले. तिसऱ्याचाही व्यवसाय फार व्यवस्थित चालेनासा झाला कारण त्यात त्याला कोणताही अनुभवतच नव्हता. सहा सात वर्षे मिठाई विकण्याच्या क्षेत्रातील अनुभव असताना केवळ वेगळे होण्याच्या नादात त्याने वेगळाच व्यवसाय सुरु केला जो त्याला जमलाच नाही. अश्या प्रकारे वाटण्या झाल्याने गावात अत्यंत नावारुपाला आलेले एक दुकान तीन दुकानांमधे तुकडे होऊन अक्षरशः डबघाईस आले. त्या तीनही मुलांना चरीतार्थासाठी अजून काहीतरी करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली. पैसाच नसल्याने एकाच घरात सर्वांना रहावे लागते परंतू सतत होणाऱ्या भांडणांच्या समवेत. त्या वाटणीचा इतका भयंकर परीणाम झाला. परंतू याचा अर्थ वाटणी करणे वाईट आहे असे अजिबात नाही. योगायोगाने त्या दुसऱ्या मिठाईवाल्याने देखील वाटण्या केल्या परंतू दृष्टीकोन योग्य ठेऊन विचारपूर्वक निर्णय घेतला तर वाटणी देखील सुखकारक ठरु शकते हे त्याने दाखवून दिले.
त्याचीही तीन्ही मुले मोठी झाली व व्यवसायात तरबेज झाली म्हणून प्रत्येकाला स्वतंत्रपणे व्यवसाय करता यावा यासाठी त्याने मुलांना एकत्रीत बोलावून त्याचा मनोदय सांगितला. वाटण्या करण्याचे ठरले. त्याचे दुकान साधारण दोन हजार स्क्वेअर फुटाचे होते. परंतू त्या दुकानाची त्याने जी वाटणी केली ती फारच अफलातून होती. व्यावहारीकतेला भावनांची तसेच सुज्ञपणाची जोड दिल्याबरोबर जीवनात आमुलाग्र बदल होतात हेच त्या वाटणीमधून दिसून आले. वडीलांचे विचार ऐकून मुलांना देखील आनंद झाला. त्यांनी भरपूर मेहनत घेण्याची तयारी दाखविली. यासोबतच एकत्र काम करताना त्यांच्यामधेही होणाऱ्या कुरबुरी बंदच झाल्या व चमत्कार घडला. केवळ आठवा वर्ग शिकलेल्या त्या मिठाईवाल्याने जीवनात मिळालेल्या खऱ्याखुऱ्या व महत्वाच्या जीवनानुभवामुळे अशी अप्रतीम वाटणी केली.
मुलांना एकत्र बसवून त्याने वाटणीचा विचार मांडला, परंतू ती वाटणी तो सांगेल त्या पद्धतीने तिघांनाही स्विकारावी लागेल हे आश्वासन त्याने मुलांकडून घेतले व त्यानंतरच त्याने तो वाटणीचा अनोखा आराखडा मांडला. त्या मिठाईवाल्याने मुलांना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला दुकानाचे तुकडे करायचे नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्र व्यवसायी व्हायचे आहे. परंतू असे करीत असताना आहे त्या व्यवस्थेचे तुकडे न करता त्याच व्यवस्थेचा वापर करुन तीन नव्या व्यवस्था उभारल्या जाव्यात अशी माझी इच्छा आहे. त्याने मुलांना योजना सांगितली. उद्यापासून आपल्या व्यवसायामधून दर महिन्याला जवळपास २० टक्के रक्कम प्रत्येकाच्या नावे वेगळी टाकण्यात येतील. पुढील तीन वर्षात तिघांसाठीही एक मोठी रक्कम जमा होईल. तिघांनी आपापल्या इच्छेनुसार शहरातील वेगवेगळ्या भागात दुकाने बघायची व मिठाईच्या क्षेत्रातील आपला अनुभव असल्याने मिठाईचीच दुकाने उघडायची. साधारण तीन वर्षांनंतर प्रत्येकाचे स्वतंत्र दुकान व स्वतंत्र मिठाईची व्यवस्था तयार झालेली असेल. सध्या असलेले दुकान मी स्वतः सांभाळेन. तीन वर्षांनी हे दुकान तुमच्यापैकी ज्याची इच्छा असेल तो विकत घेईल व त्या पैश्यावर माझ्या म्हातारपणाचा खर्च चालेल. तीन वर्षात जास्तीत जास्त रक्कम शिल्लक पडेल यासाठी अधिकाधिक मेहनत करावी. सदर योजना फारच यशस्वी ठरली. तिनही मुलांनी प्रचंड मेहनत घेतली. काही कामांसाठी त्यांनी आपल्या बायकांना देखील प्रक्रीयेत सामावून घेतले. परिणामतः तीन वर्षांनंतर त्या मिठाईवाल्याच्या परीवाराची एकून चार मिठाईची दुकाने शहराच्या चार कोपऱ्यांमधे दिमाखात उभी झाली. मुलांनी चारही दुकानांना परीवाराचेच नाव दिले. वडीलांच्या प्रशिक्षणातून मुले तयार झालेली असल्याने त्यांनी ग्राहक जोडून ठेवले व दर्जा देखील राखला. एका मुलाने पुढे मूळ दुकान वडीलांकडून वीस लक्ष रुपयांना विकत घेतले व त्या पैश्याची गुंतवणूक करुन त्या मिठाईवाल्याचे निवृत्त जीवन छान सुरु आहे. या सर्व दुकानांची इतकी छान भरभराट झाली आहे की त्या भरवश्यावर त्या तिघांनीही वडीलांच्या सांगण्यावरुनच तीन वेगवेगळी टोलेजंग घरे बांधली. वडीलांच्या उपकाराची जाण ठेवून तिघेही मुले आई-वडीलांची काळजी घेतात. आठवड्यातून एकदा पूर्ण परीवार एकत्र भोजन करतो. सर्वजण सणांना, सहलींसाठी तसेच वाढदिवसांना एकत्र येतात. आनंदी राहतात व पुन्हा स्वतंत्रपणे आपापल्या कामाला लागतात. या मिठाईवाल्याने केलेल्या वाटणीमुळे एकाच परीवाराची चार दुकाने व चार घरे झाली, संपत्ती वाढली, आवश्यक ते स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळाले व परीवार देखील एकरुप राहीला.
बदलत्या काळात व्यवहार व भावना यांची योग्य सांगड घालून संपत्तीचे तुकडे करण्यापेक्षा त्या संपत्तीची वाढ कशी होईल हे समजून, प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य हवे असते ही गरज ओळखता आवश्यक ती स्पेस प्रदान करुनही परीवार अगदी एकत्र नाही तर एकरुप ठेवता येऊ शकतात. वाटणी ही नुकसान न ठरता वृद्धी ठरली तरच व्यावहारिक व भावनिक पातळीवरही परीवार एकरुप राहतील अन्यथा केवळ भावनेच्या आहारी जाऊन विघटनच होणार आहे. नव्या जगातील यशस्वी परीवार एकरुपतेचा हा -वृद्धी वाटणी- एक अत्यंत उपयोगी मंत्र आहे.
Very nice
ReplyDeleteThanks Sujya
Deleteफार सुंदर लिखाण ....मी तुम्हाला असला शेरा देणं योग्य दिसत नाही ....परंतु खरच आयुष्याला सकारात्मक कसे करता येवू शकते याचं पुरेपूर प्रमाण तुमच्या लिखाणात प्रत्येक वेळेला बघायला मिळत !!!!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteफार सुंदर लिखाण ....मी तुम्हाला असला शेरा देणं योग्य दिसत नाही ....परंतु खरच आयुष्याला सकारात्मक कसे करता येवू शकते याचं पुरेपूर प्रमाण तुमच्या लिखाणात प्रत्येक वेळेला बघायला मिळत !!!!!
ReplyDeleteThanks
Deleteखूप छान लेख सर .तुमच्या लिखाणातून नेहमीच काहीती नवीन विचार आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले म्हणजे आनंद कसा घेता येते याचे सुरेख चिंतन व विश्लेषण असतं आणि तेच मला फार आवडतं!
ReplyDeleteThanks Madam, i am honoured by your comment
Delete