My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

पंपल्सड्रॉप
जगभरात सगळीकडे सध्या मंदीचे भयानक सावट आहे. अमेरीका किंवा चीन सारख्या प्रगत देशांना देखील या मंदीच्या काळात चटके सहन करावे लागत आहेत. या मंदीमुळे बाजार कोलमडायला लागलेत. त्याचा थेट परीणाम नोकऱ्यांची कमी होणारी संख्या व त्यामधून वाढणारी बेरोजगारी व पुढे त्याच्या वैफल्यातून दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी या स्वरुपात दिसू लागला आहे. आपल्या देशातही या आर्थिक मंदीचे सावट आता गडद व्हायला लागले आहे. अश्यावेळी काही वेडेपणाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त असते. हे निर्णय वेड्यासारखे, अतार्किक किंवा अव्यवहारिक जरी वाटले तरीदेखील आर्थिक मंदीने खीळ बसत चाललेल्या व्यापाराला गतीमान करण्यासाठी ते कामाचे असतात. आपल्या देशात असे निर्णय आपल्याला लवकरच करावे लागणार आहेत. अर्थात हे निर्णय सरकारच्या वतीने केले जातील असेही नाही. यातील काही निर्णय तर सामाजिक स्वरुपाचे राहणार आहेत ज्यामधे उत्सफुर्त लोकसहभाग अपेक्षित राहणार आहे. तसे बधितल्यास जगातील कोणत्याही भव्यदिव्य कामाकडे सुरुवातीला वेडेपणाचे लक्षण म्हणूनच बघितले गेले आहे. पुरातन काळातील तीच पद्धत आजही लागू पडते. अगदी आमटे दांपत्याने हेमलकसा येथे सुरु केलेले सामाजिक कार्य देखील व्यावहारिक जगाच्या चौकटीत वेडेपणाच ठरणारे होते. परंतू आज त्या वेडेपणातून निर्माण झालेला समृद्ध प्रकल्प बघताना देवाने असे वेडेपण प्रत्येकाला द्यावे असेच वाटते. असा वेडेपणा कधी कधी शिथील मनोभुमिकेला व समाजालाही अचानक गतीमानता प्राप्त करुन देऊ शकतो. आर्थिक मंदीमधे होरपळणाऱ्या पंपल्सड्रॉप नावाच्या शहराला देखील अशीच अचानक गतीमानता मिळाली.
जुन्याकाळी शाळेमधे ही एक विशेष कथा अभ्यासक्रमामधे असायची. कथेचे नाव होते - द मॅन हू सेव्हड पंपल्सड्रॉप- पंपल्सड्रॉप हे शहर अतिशय भयावह आर्थिक मंदीतून प्रवास करीत होते. या मंदीचे चटके प्रत्येकाला व्यक्तीशः देखील बसत होते. लोकांनी सारे सण साजरे करणे बंद केले होते. गेली दोन वर्षे सर्वांचा आवडता नाताळाचा सण देखील साजरा होऊ शकला नव्हता. इतकेच काय पण लोकांनी अगदी खाजगी कार्यक्रम जसे वाढदिवस देखील साजरे करणे बंद केले होते. अतिशय हताश स्थिती निर्माण झाली होती. तिसऱ्या वर्षी परत नाताळ जवळ येऊ लागला होता. गेली दोन वर्षे नाताळाला काहीही करता आले नसल्याने लोक दुःखी होते व त्यामुळेच तिसऱ्या वर्षी तर अजिबात उत्साह उरला नव्हता. सर्वजण केवळ देवाची आराधना करीत होते. अश्या वातावरणात एके दिवशी एका रोल्स राईस कंपनीच्या डीलरडे एक व्यक्ती आली आणि तिने एकदम दोन रोल्स राईस गाड्यांची ऑर्डर दिली. एक गाडी त्याच्या मुलीसाठी व दुसरी त्याच्या पत्नीसाठी हवीय असे त्याने त्या डीलरला सांगीतले. या दोन्ही गाड्या त्याला नाताळाच्या संध्याकाळी हव्यात असे त्याने सांगितले. त्याचवेळी तो गाड्यांच्या किंमतही अदा करेल असेही त्याने सांगितले. गाड्यांची ऑर्डर निश्चित करुन तो निघून गेला. गेल्या दोन वर्षांमधे पहिल्यांदा ग्राहक या गाड्यांच्या डीलरकडे आला होता. आपल्या दोन रोल्स राईस गाड्या एकदम विकल्या जाणार म्हणल्यावर तो अतिशय खुष झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने या नफ्यातील काही भागातून आपल्या पत्नीसाठी एक छानसा नेकलेस सराफाकडून विकत घेतला व त्याचे पैसे नाताळाच्या संध्याकाळी देईन असे सांगितले. त्या दागिन्याच्या दुकानातही खूप दिवसांनी ग्राहक आलेला असल्याने व नाताळाच्या दिवशी पैसे मिळणार या आनंदात त्या सराफाने त्याच्या घरासाठी फर्नीचरची मोठी ऑर्डर दिली. फर्नीचर वाल्याला ऑर्डर मिळाली म्हणून त्याने त्याच्या घराला रंगकाम करण्यासाठी पेंटरला ऑर्डर दिली. अश्याप्रकारे एकातून एक असे करुन साऱ्या शहरात अचानक चैतन्य निर्माण झाले. अचानक आर्थिक व्यवहार सुरु झाले. देवघेव सुरु झाली. अनेक दिवसांचे मरगळलेले नकारात्मक वातावरण उत्साही सकारात्मक वातावरणात परावर्तीत झाले. केवळ दोन आठवड्यात नाताळाच्या पार्श्वभूमीवर पंपल्सड्रॉप अक्षरशः नव्याने जगायला लागले. दोन वर्षाच्या अवकाशानंतर त्या गावात नाताळ धुमधडाक्यात साजरा करण्याची तयारी झाली. नाताळाच्या सायंकाळी रोल्स राईसच्या डीलरने दोन्ही गाड्या सजवून तयार ठेवल्या. आता सायंकाळी तो श्रीमंत माणूस त्या गाड्या नेईल यासाठी तो आतुरतेने वाट बघू लागला. एव्हड्यात त्याच्या दुकानासमोर एक गाडी थांबली. आपला ग्राहक आला या आनंदाने तो लगबगीने बाहेर आला.. समोर बघतो ते काय?...नाताळाच्या त्या संध्याकाळी रोल्स राईस गाड्या विकणाऱ्या त्या मोठ्या शोरुम समोर एक ट्रक उभा राहीला. तो ट्रक त्या गावातील मनोरुग्णालयाचा होता. ज्यामधून उतरलेल्या माणसाने या डीलर कडे चौकशी केली की दोन रोल्स राईस विकत घेतो म्हणणाऱ्या एका वेड्या माणसाला तुम्ही बघितले आहे का? तो आमच्या मनोरुग्णालयातून पळालेला वेडा आहे. या धक्क्यावर कथा समाप्त होते. एका वेड्या माणसाच्या एका ऑर्डरमुळे संपुर्ण पंपल्सड्रॉप आर्थिक मंदीतून बाहेर पडते. पहीली ऑर्डर पूर्ण जरी झाली नाही तरी, आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडलेला असतो.
सध्या जगभरात सुरु असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ही कथा फार बोलकी ठरते. जागतिक मंदीच्या या महाभयानक संकटामधे आपलाही देश हळूहळू जखडला जात असताना काही तात्कालिक वेडे वाटणारे परंतू दूरगामी सकारात्मक प्रभाव टाकणारे निर्णय सामाजिक स्वरुपात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेही या जागतिक मंदीचा परीणाम आपल्या देशात शेवटपर्यंत जाणवायला वेळ लागणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या देशातील नागरीकांची सहनशील वृत्ती. एरवी या वृत्तीबाबात फार टिका केली जाते परंतू या जागतिक मंदीच्या काळात पडेल त्या स्थितीमधे राहण्याची व त्यामधून निर्माण होणारा ताण व त्रास सहन करण्याची आम्हा भारतीयांची क्षमता आपल्याला या प्रसंगी तारुन नेणारी ठरणार आहे. आपल्याला रोल्स राईस मिळाली तर आपण आनंदी होतोच परंतू कधी बसमधून प्रवास करावा लागला तरी आपण ती बाब सहज स्विकारतो. अमेरीकेसारख्या प्रगत देशात संसाधनांशिवाय व सुखसोयींशिवाय जगणे ही कल्पनाच तेथील बहुतांश नागरिक सहन करु शकत नाहीत व त्यामुळे मंदीच्या काळात अनेक लोक मानसिकदृष्ट्या कोलमडायला लागले आहेत. परंतू भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. जागतिक मंदीची झळ आपल्याला पोहोचू नये यासाठी आपण काही सामाजिक निर्णय घेऊ शकतो.
आपल्याला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा वापर कमीत कमी करणे शिकायला हवे. यामधे इंधन, पाणी व झाडे यांचे संवर्धन वेड्यासारखे करावे लागेल. घरातील चार लोक चार वेगवेगळ्या खोल्यांमधे टाईमपास म्हणून बसून चार पंखे, चार टीव्ही चालविण्यापेक्षा एकाच खोलीत बसून एकत्र बसून आनंद लुटण्याचा वेडेपणा करु शकतो. एकाच कार्यालयात एकाच रस्त्याने जाणे येणे असेल तर आपापसात अकारण निर्माण केलेले वाद मिटवून, चार वाहनांचे इंधन जाळण्यापेक्षा एकत्र जाण्याचा वेडेपणाही केल्या जाऊ शकतो. पाण्याचे नळ सुरु करुन वरच्या टाकीतून धोधो पाणी वाहू देण्यापेक्षा पाणी भरणे झाल्यावर नळाच्या तोट्या बंद करुन बाहेर जाण्याचाही वेडेपणा आपल्याला करता येईल. असे अनेक वेडी कामे आपण सर्वांनी मिळून केल्यास जागतीक मंदीच्या झळा आपण सहजच पचवू शकू.. शेवटी पंपल्सड्रॉपला एका वेडेपणानेच वाचविले होते. त्या वेड्याला व त्याच्या वेडेपणाला सलाम!!
 


  

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18