My artilce published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

परफेक्शन
"मला कोणत्याही कामात परफेक्शन लागते. माझी ती सवयच आहे. काम कसेही करणे मला सहनच होत नाही. एकतर काम करायला घेऊच नये परंतू जर एकदा जबाबदारी स्विकारली तर मग मात्र ती निटनेटक्या पद्धतीनेच पार पाडली जावी असा माझा आग्रह असतो. काम परफेक्ट झाले की मनाला समाधान लाभते. ठरलेल्या वेळात व साचेबद्ध पद्धतीने कामे जर झाली ना, तर या जगात कोणत्याच प्रकारच्या समस्या राहणार नाहीत. आपल्या देशात कामांमधे परफेक्शन नसल्यानेच सर्व समस्या आहेत. प्रत्येकाला सोपविलेले काम त्याने त्याने परफेक्शनने केले तर कोणतीच अडचण येणार नाही. पण दुर्दैवाने असे होत नाही. लोक माझ्या भावना समजूनच घेत नाहीत. आज मी दीडशेहून अधिक लोकांच्या कार्यलयाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. परंतू मला अपेक्षित रिझल्टस् मिळतच नाहीत. लोक वेळा पाळत नाहीत. वेगवेगळे बहाणे बनवितात, त्यांना मुळात काहीही करायची इच्छा नाही. माझा परफेक्शनचा आग्रह त्यांना दुराग्रह वाटतो. मी चिडतो, रागावतो म्हणून ते कामे करतात परंतू मनातून त्यांना मी जे काही सांगतो ते जाचक वाटत असते. मला काय करावे कळत नाही. या मंडळींच्या या असल्या कॅज्युअल वागण्यामुळे मी खिन्न होतो. तूच सांग यार मी काय करु?" - अत्यंत तावातावात सुनिल बोलत होता. मी शांतपणे त्याचे ऐकून घेत होतो. एका मोठ्या सरकारी कार्यालयाचा तो प्रमुख आहे. महाविद्यालयामधे सोबत शिकणारा माझा मित्र सुनिल लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन एका मोठ्या सरकारी कार्यलयाचा बॉस झाला त्याच दिवशी परफेक्शन विषयी कधीतरी तो मला हे सगळे ऐकविणार याची खात्री होतीच. अर्थात ही त्याची स्थिती साधारण दहा वर्षांनी होईल असे वाटत होते. परंतू केवळ पाचच वर्षात ही वेळ आली. प्राध्यापकाची नोकरी सोडून तो जेव्हा त्याच्या सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी जाणार होता तेव्हाच त्याला मी त्याच्या निर्णयावर फेरविचार करावयास सांगितले होते. परंतू लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची त्याला फारच इच्छा होती. परंतू सुनिल त्या पदांवर कार्य करु शकणार नाही ही मला खात्री होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्याला मी बरेच वर्षांपासून ओळखत होतो. महाविद्यालयातही सोबत शिक्षण घेताना त्याचे त्याच्या कामातील परफेक्शन व त्याबाबतचा त्याचा दुराग्रह माझ्या मनात धडकी भरवायचा.
महाविद्यालयात सुनिल आम्हा सर्वांपेक्षा अतिशय वेगळा होता. त्याच्या लेखी आम्ही सगळे गबाळे, अव्यवस्थित वगैरे होतो. त्याचे काम नेहमी अगदी टापटीप. शाळेतल्या मुलांसारखे पुस्तकांना कव्हर्स वगैरे लावणे, महाविद्यालयात वेळेच्या आत पोहोचणे, वह्यांच्या मागील पानांवर काहीही न लिहीणे, रुमालाची घडी अगदी चौकोनी करणे, रोज सायकल पुसूनच महाविद्यालयात आणणे अशी त्या वयाला न शोभणारी कामे तो करायचा. अगदी साधे पत्र लिहायचे असेल तरी देखील कोरा कागद घ्यायचा, त्यावर पेन्सीलने सरळ रेषा मारायच्या, मग सुंदर अक्षरात मजकूर लिहायचा, त्यानंतर खोडरबराने त्या सर्व पेन्सीलच्या रेषा मिटवायच्या व नंतर पत्र पाठवायचे. अभ्यासाचे वेळापत्रक ठरलेले. सायंकाळी सहा ते दहा अभ्यास म्हणजे अभ्यासच. मित्रांसोबत चकाट्या पीटत बसणे किंवा उगाचच भटकणे असल्या गोष्टींना त्याच्या आखीव जीवनात थाराच नव्हता. मला खरे तर त्याचे असे परफेक्शनने जगणे आवडायचे परंतू त्यासोबत त्या परफेक्शनची त्याच्यामधे निर्माण झालेली सुपेरीऑरीटी मात्र त्याला पुढे त्रासदायक ठरणार असे सारखे वाटायचे. याचे कारण आपले काम परफेक्शनने करताना इतरांना ते परफेक्ट नसल्याबद्दल तो जी दुषणे द्यायचा त्याचे मला वाईट वाटायचे. त्याच्या अती परफेक्शनच्या नादापायी त्याने स्वतःभोवती एक मोठी अदृष्य भिंत उभी केली होती. त्या भिंतीच्या अलीकडे त्याचे परफेक्शनने व्यापलेले जग होते आणि पलीकडे मात्र आमच्यासारख्या मित्र मंडळींच्या रुपाने आम जनता होती. त्याला हा परफेक्शनचा वसा त्याच्या आई कडून मिळाला होता. त्याच्या घरात देखील प्रत्येक गोष्ट जणू वर्षानुवर्षे त्याच जागी असल्यागत होती. सारे काही जागच्या जागी आणि अतिशय व्यवस्थित. ते तसेच ठेवण्यामधे सुनिल देखील अग्रेसर होता. त्यामुळे त्याच्या घरात प्रवेश करताना तो हजारो सूचना द्यायचा. चपला कुठे काढायच्या, कुठे बसायचे, कसे बसायचे, कुठे जायचे नाही, कशाला हात लावायचा नाही वगैरे. त्याच्या असल्या परफेक्शचा धसका घेऊन आम्ही त्याच्या घराच्या फाटकासमोरच उभे राहून त्याच्याशी बोलायचो. ते बोलणे देखील केवळ पाच ते दहा मिनीटे असायचे. कारण असे फाटकावर उभे राहून बोलणे त्याच्या सभ्यतेच्या परीघात मोडणारा प्रकार नव्हता. त्याच्या त्या निटनेटकेपणाचा व योजनाबद्ध जगण्याचा त्याला महाविद्यालयातील परीक्षेमधे फायदा झाला. अतिशय उत्कृष्ट गुण प्राप्त करुन त्याला उच्च शिक्षणासाठी एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला व त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधे यश मिळवून तो एका मोठ्या कार्यालयाचा प्रमुख झाल्यावरच मला भेटला. सुनिलच्या बोलण्यातून जाणविलेला त्रागा मला त्याचा भूतकाळ आठवून गेला. त्यावेळी त्याची परफेक्शनच्या बाबतीत जरा गल्लत होते आहे हे जाणवित होते परंतू त्यावेळी त्याला काहीच सांगण्याची सोय नव्हती. कारण त्यावेळी आम्ही सारे त्याच्या लेखी वाया गेलेले मंडळी होतो. परंतू आता मात्र त्याच्याशी या विषयाबाबत बोलण्याचे मी ठरविले. त्याला होणारा त्रास मी आता समजू शकत होतो. काही वर्षे प्राचार्य म्हणून काम करीत असताना ज्या काही महत्वाच्या बाबींचा बोध झाला होता त्यावरुन मी त्याला काही बाबतीत सल्ला देऊ शकत होतो.
जेवायच्या टेबलवर त्याचे परफेक्शनने जेवणे बघून मी त्याला म्हणालो, मी तुला काही बाबतीत या समस्येवर मात कशी करायची ते सांगू शकतो परंतू त्याआधी तू माझ्याकरीता एक छोटेसे काम करायचे. जेवताना आपल्या हातातील काटे व चमचे दूर ठेवायचे, शर्टच्या बाह्या दुमडून घ्यायच्या आणि मस्त देवाने दिलेल्या हाताचा वापर करुन जेवण करायचे. मी सांगीतलेले त्याच्या कल्पनेच्या पलीकडे होते. पण मी त्याच्या समस्येवर काय उपाय सांगतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या मनात निर्माण झाल्याने तो माझी अट मान्य करायला तयार झाला. अतिशय नाराजीने व कपाळावर आठ्यांचे जाळे विणून त्याने हाताने जेवण सुरु केले. जेवताना आम्ही महाविद्यालयीन जीवनाच्या रमणीय गोष्टींमधे रमलो. मी त्याला त्या काळातील ज्या गमती जमती सांगत होतो त्या ऐकून तो चकीत होत गेला. त्या सर्व गोष्टी कधी झाल्या हे त्याला माहितच नव्हते. त्या सर्व मजेदार गोष्टी ऐकून खिन्न मनाने तो म्हणाला की हे सारे होताना मी यात कुठेही नव्हतो. मी काय करीत होतो यार? साधारण एक तासभर आमचे जेवण व त्यासोबत गप्पा सुरु होत्या. जेवण आटोपल्यावर तो उत्सफुर्तपणे म्हणाला, आज खूप दिवसांनी पोटभर जेवण झाले यार.. मजा आली. त्याचे वाक्य ऐकल्यावर मी त्याला म्हणालो, पण सुनिल हे असले जेवण व ही जेवणाची पद्धत तुला चालतच जर नाही तर मग मजा कशी काय आली? मुळात हुशारच असलेल्या सुनिलच्या मुद्दा लक्षात आला. ठराविक चौकटीच्या बाहेर आल्यावर ती गंमत सुरु झाली होती.
प्रत्येकाच्या कामामधे परफेक्शन असावेच कारण ते आपल्याला योग्य ते यश प्राप्त करुन देते परंतू परफेक्शनलाही कधी कधी सुट्टीवर पाठवावे जेणे करुन आपल्याला निखळ आनंद लुटता येईल.. कशी असते ही परफेक्शनची सुट्टी? मी सुनिलला सांगू लागलो....... (परफेक्शनची सुट्टी!!......पुढील मंगळवारी!)

 

 

Comments

  1. छान लेख! मंगळवारची उत्सुकता आहे़

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18