थोडा है थोडे की जरुरत है @ 17.01.23

पेन्सीलचा वापर

कधी कधी आपण ज्या गोष्टीचा वापर दुसऱ्याला करायला सांगतो त्याचा वापर आपल्यालाही करण्याची संधी मिळते. एकंदरीत एखादा चांगला विचार हा जेवढा ऐकणाऱ्यासाठी असतो तेवढाच तो सांगणाऱ्याकरीता देखील असतो असा अनुभव मला नुकताच आला.

  दर रविवारी मी माझ्या होप कौन्सेलींग सेंटरच्या माध्यमातून बनविलेला एक व्हीडीयो समाजमाध्यमांवर शेअर करत असतो. मागील रविवारी मी एक छोटीशी पेन्सील कश्या पद्धतीने नाते संबंध टिकविण्याकरीता आपल्याला मार्गदर्शक ठरु शकते हे सांगितले होते. त्यामधे पेन्सील प्रमाणे मृदू, अहंभाव नसणारे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सारख्याच पद्धतीने सोबत करणारे नाते शाश्वत असते असे मी सांगितले होते. यातला महत्वाचा भाग म्हणजे अहंभाव ठेवता जसे पेन्सीलने काही लिहीलेले चुकले तरी ते पुसून पुन्हा लिहीता येते. नात्यांमधेही असेच असले तर मग त्यात सहजभाव राहतो. यात आणखी एक भाग येतो की पुसून पुन्हा लिहीण्यात पुढाकार कुणी घ्यायचा? कारण शक्यतोवर परंपरागत पद्धतीने जो वरचढ आहे त्याने तो घ्यायचाच नाही असा एक सार्वत्रिक नियम पाळला जातो. म्हणजे नवरा बायको मधे नवरा, भावाभावांमधे मोठा भाऊ, सासू सुनेमधे सासू किंवा वडील मुलीमधे वडील या मंडळींनी पुढाकार घ्यायचा नाही. कारण ते वयाने मानाने मोठे आहेत. परंतू नात्यांची गुंफण अशी असते की हे परंपरागत नियम वापरून ती घट्ट होत नाही. ज्या पेन्सील बद्दल मी लिहीले त्याचाच वापर करावा लागला त्याचा मनापासून आनंद मिळाला कारण घडलेल्या त्या प्रकारानंतर शेवट फार गोड झाला.

त्या दिवशी सर्वांनी मिळून एक सिनेमा बघण्याचे ठरले घरीच पॉपकॉर्न वगैरे बनवून सिनेमा फील आणून आम्ही सर्व उँचाई नावाचा एक नवा सिनेमा बघायला सोबत बसलो. माझी मुलगी माझ्या बाजूने बसली होती. सिनेमा छान पुढे सरकत होता. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इरानी निना गुप्ता या कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची रंगत चढत होती. एका दृष्यामधे बोमन इरानी निना गुप्ता हे कथेतील वृद्ध पतीपत्नी आपल्या उर्वरीत मित्रांसह लखनौला मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सरप्राईज देण्यासाठी पोहोचतात. परंतू काही कारणाने मुलगी जावाई अस्वस्थ असतात. अमिताभच्या ते लक्षात येते म्हणून तो सर्वांनी होटेल मधे रहावे असा प्रस्ताव ठेवतो. परंतू निना गुप्ता मुलीच्याच घरी राहण्याचा आग्रह करते. मुलीच्या जावायाच्या अस्वस्थतेचे कारण असे असते की त्या मुलीच्या वाढदिवसाकरीता तिच्या नवऱ्याने आपल्या मित्र मंडळींची मोठी पार्टी ठेवली असते त्या पार्टीमधे या ज्येष्ठांना उगाच अवघडल्यासारखे होईल म्हणून सर्व ज्येष्ठांची एका दिवसाकरीता होटेलमधे व्यवस्था करते असे ती मुलगी आई वडीलांना सांगते. हे ऐकल्यावर त्या सर्वांना विशेषतः निना गुप्ता बोमन इरानीला फारच वाईट वाटते. खरे तर ती मुलगी अगदी नम्रपणे हे सांगते पण निना गुप्ता बोमन इराणी प्रचंड रागावतात. हे दृष्य बघताना माझ्याही नकळत मी त्या बापाच्या भुमिकेत शिरलो त्याच वेळी माझी मुलगी म्हणाली की किती व्यवस्थित सांगितले त्या मुलीने तरी यांना राग आला. हे ऐकल्याबरोबर मी एकदम भडकलो रागाने माझ्या मुलीला म्हणालो की हे काय बोलणे आहे. ती जे करतेय ते म्हणजे आपल्या माय बापाला घरातून बाहेर फेकल्यासारखेच आहे. मी एकदम रागावल्यामुळे माझी मुलगी नाराज होऊन माझ्यापासून दूर जाऊन बसली. सिनेमा पुढे सुरु राहीला. अमिताभ त्या सर्वांना समजावतो, मुलांचे काय चुकले? आजकाल या पार्टीमधे काही लोक दारु वगैरे पितात. मग आपण असतो तर आपल्याला बोअर झाले असते त्यांना अवघडल्यासारखे. त्यापेक्षा आपली एका छान हॉटेलमधे त्यांनी व्यवस्था केलीय. एका दिवसाचा प्रश्न आहे. आपणही त्यांना कळवता एकदम आलो ही चूकच नाही का? आजकाल प्रत्येकाचे काही ना काही ठरलेले असते, आपल्या मुलांचे पण तसेच आहे. मला असे वाटले की अमिताभ मलाच समजावतोय. मला ते पटले ते ऐकून मी पेन्सील संकल्पनेतील अहंभाव बाजूला ठेवण्याच्या युक्तीचा वापर करायचा ठरवला

सिनेमा संपल्यावर झोपायला जाण्याआधी मुलीला एक मेसेज केला. पिल्लू, काल माझे खरोखरीच चुकले. माझा आवाज उगाच वाढला. तू म्हणत होतीस ते बरोबर होते. मला माफ कर. तुझे बाबा. सकाळी कमाल झाली. तो मेसेज वाचून आधल्या दिवशी माझ्या जवळून उठून दुसरीकडे बसायला गेलेली माझी मुलगी माझ्या गळ्यात पडली मला म्हणाली, बाबुडी, आय लव्ह यू. इतरांना जे आपण सांगतो तसेच आपल्याला वागता येणे हा एक छान अनुभव असतो. होय ना?




Comments

  1. Avi, you have depicted a very relevant instance, happens every now and then in each family. We the older generation should try and understand the mindset of the new generation. In these times many relationships can be saved if egos are not allowed to take over if people start seeing the other persons perspective as well and moreover by being the first initiator for normalising the situations, Being a ‘Pencil’ works always.👌🏻👍🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18