थोडा है थोडे की जरुरत है @ 24.01.23

फुलस्टॉप

एका पुस्तकात पती पत्नीच्या नातेसंबंधाबाबत एक कथा वाचली. दोघांचे नाते. लग्न झाल्यानंतर पहिली तीन वर्षे नाते सुंदर होते. एकमेकांसोबत छान जीवन सुरु होते. पण नंतर का कोण जाणे काहीतरी गडबड होत गेली. वादविवाद सुरु झाले. शेवटी काही दिवस वेगळे राहुयात असे ठरले. वेगळे राहताना मात्र प्रेमाची तीव्र जाणीव दोघांनाही झाली. सोबत घालविलेले सारे आनंदी क्षण तिलाही आठवायचे त्यालाही. अश्यातच तिचा वाढदिवस आला. त्या दिवशी तो आपल्याला भेटायला येईल अशी तिला मनापासून खात्री वाटत होती. त्याच्या आवडीचे सारे पदार्थ तिने बनविले छान तयार होऊन सायंकाळी त्याची वाट बघत बसली. रात्री च्या सुमारास दारावरची बेल वाजली तिने धावत जाऊन दार उघडले. तिच्या अपेक्षेची पूर्तता करीत तो हातात तिला आवडणाऱ्या निशीगंधाच्या फुलांचा बुके केक हातात घेऊन हसत समोर उभा होता. राहवून तिने त्याला घट्ट मिठी मारली. वाढदिवसाचा केक कापल्यावर तिने त्याला छान जेवण वाढले. तेवढ्यात बेडरूम मधला फोन वाजला. ती फोन उचलायला गेली. पलीकडून एक पोलीस इन्सपेक्टर  बोलत होते. त्यांनी तिला तिच्या नवऱ्याचे नाव विचारले तिला सांगितले की तिला एका मृतदेहाला ओळखण्याकरीता लगेच यावे लागेल कारण पोलीसांना संशय आहे की तो मृतदेह तिच्या नवऱ्याचा आहे. तिचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसेना. ती जवळपास ओरडूनच म्हणाली, हे कसे शक्य आहे? माझा नवरा आता या क्षणी माझ्या घरी माझ्यासोबत आहे. पोलीस इन्सपेक्टर मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होते. ते म्हणाले, मॅडम आम्हाला त्यांच्या खिश्यात पाकीट सापडले जे त्यांचेच आहे, त्यात तुमचा फोटो फोन नंबर होता. म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन केला. तुम्ही लवकर निघा. फोन ठेवून ती अक्षरशः थरथरत डायनींग हॉलमधे आली. बघते तर काय, तिचा नवरा तेथे नव्हता. तिने दरवाजा उघडून बघितला, तो बाहेरही नव्हता. जेवणाचे पान तसेच वाढलेले होते. आता मात्र तिच्या पायातले बळ जाऊन ती मटकन खालीच बसली. कुठल्याश्या एका कार्यक्रमात तिने ऐकले होते की शरीर सोडताना आत्मा परत एकदा जिवनातील सुखाच्या सर्वोत्तम क्षणाच्या रुपात परत येतो मग जातो जेणे करून ते क्षण कायम स्मरणात रहावे. कदाचित माझ्या नवऱ्याचा आत्मा तर येथे येऊन गेला नाही. तिला तो विचार सोसवेना. ती प्रचंड कासाविस झाली. जो आनंद तिने काही क्षणांपूर्वी आपल्या नवऱ्यासोबत अनुभवला तो बहुदा भ्रम होता असे तिला वाटले फार फार वेदना तिला झाल्या. डायनींग टेबलवर डोके ठेवून ती रडू लागली. तेवढ्यात बाजूच्या बाथरूमचा दरवाजा उघडला गेला. तिने दचकून बघितले तर तिचा नवरा बाहेर येत होता. तो म्हणाला, अगं काय माहित हाताला काय लागले होतेहात धुवायला गेलो होतो. तिला त्याला बघून रडू कोसळले. तिने धावत जाऊन परत त्याला घट्ट मिठी मारली. ती हाताने त्याचा चेहेरा, हात तपासू लागली. त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिला शांत होऊ दिले मग काय झाले ते विचारले. तिने पोलीसांच्या फोन पासून सारे सांगितले. तो म्हणाला, अगं मी तुला सांगायला विसरलो. मी येथे येताना मेट्रो मधे कुणीतरी माझे पाकीट मारले. कदाचित त्या माणसाचा अपघात झाला असावा

मनातल्या मनात परमेश्वराचे लक्ष लक्ष आभार मानताना तिने अनुभवलेला फुलस्टॉप किती भयंकर होता हे तिचे तिलाच ठाऊक होते. त्याच क्षणी तिने ठरविले. आता वाद विवाद नाही, इगो क्लॅश नाही, अपेक्षांचे ओझे नाही, केलेल्या गोष्टींची जाणीव करून देणे नाही, उद्धटपणे बोलणे नाही, इतरांच्या म्हणण्यावर आपले वागणे ठरविणे नाहीआता मी फक्त माझ्या नवऱ्यासोबत आनंदी जीवन घालविण्याचा विचार करणार. कारण तो फुलस्टॉप जो मी काही क्षणांकरीता अनुभवला तो तर सारेच संपवणार.

हा तिचा विचार प्रत्येकच नात्याला लागू पडतो परंतू बरेचवेळा नात्यांच्या महत्वाचा विचार करता त्यामधील आनंद टिकविता इतर अनेक कमी महत्वाच्या गोष्टींचाच विचार केल्यामुळे नाती तुटतात. माणसे एकमेकांपासून तुटण्याचे समाजातील हे प्रमाण काही प्रमाणात नक्की कमी होऊ शकते.. जर त्या फुलस्टॉपची नात्यात आठवण ठेवली किंवा सहजच कल्पना करून बघितली तरकारण त्या फुलस्टॉपच्या पुढे काही नाहीकाहीच नाही!!





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19