थोडा है थोडे की जरुरत है @ 31.01.23

दागिना

परवा ती पुन्हा एकदा मला भेटायला आली. साधारण अठरा वर्षांनी मी तिला भेटत होतो. महाविद्यालयात दरवर्षी नव्या विद्यार्थिनी प्रवेशित होतात दरवर्षी बऱ्याच महाविद्यालय सोडून जातात. त्यामुळे अनेक वर्षांनी भेट झाल्यावर ओळखणे जरा कठीण जाते. परंतू हिला मात्र मी ओळखले. कारण अठरा वर्षांपूर्वी आम्ही सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तिच्या व्यक्तिमत्वातील ज्या एका गोष्टीचे फार कौतुक करायचो ती गोष्ट अजूनही तशीच होती. तिच्या सोबत तिचा नवरा देखील होता. दोघेही माझ्या समोर बसले. तिला मूळ टीसी हरविल्यामुळे त्याची दुय्यम प्रत हवी होती म्हणून ती आली होती. तिच्याकडे पाहताना मला अठरा वर्षांपूर्वीचा तो क्षण आठवला जेव्हा तिने आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

अठरा वर्षांपूर्वी ती जेव्हा महाविद्यालयात आली तेव्हा मी प्राध्यापक म्हणून कार्य करायचो पहिल्यांदा एका कामाच्या निमित्ताने मला भेटली तेव्हा पहिल्या भेटीतच मला तिच्या व्यक्तिमत्वातील ती गोष्ट ठळकपणे जाणवली. तिला भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या लक्षात राहील अशी ती गोष्ट होती. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांनी देखील मला त्याबाबत सांगितले कारण त्यांना सर्वांनाही तिच्यातील ती गोष्ट जाणवली. खरे तर ती गोष्ट अतिशय साधी होती परंतू आधुनिक काळात जरा महाग झाल्यामुळे आम्हा सर्वांना ती जास्त ठळकपणे जाणवली. तशी तिची परीस्थिती बेताचीच होती. तिच्या कपड्यांवरून एकंदर तिने सांगितल्यावरून ते लक्षातही यायचे. तिला आई नव्हती ती आणि तिचा भाऊ असे तिच्या बाबांसोबत रहायचे. ही मोठी असल्याने फार लवकर जीवनाची जबाबदारी तिच्यावर आल्याने ती जरा बुजल्यासारखी वाटायची. एकंदरीत परमेश्वराने तिच्या बऱ्याच बाबतीत हात जरा आखडता घेतला होता. परंतू त्या एका गोष्टीमुळे तिच्या जीवनाचा प्रवास फार सुंदर प्रकारे होऊ शकला. ती बीएच्या अंतीम वर्षाला असताना आमच्या महाविद्यालयात अमरावतीमधील एका प्रतिथयश डॉक्टरांचे शिबीर झाले होते. डॉक्टर साहेबांनी विद्यार्थिनींना फार छान मार्गदर्शन केले. या मुलीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमानंतर प्राचार्य मॅडमसोबत चहा घेताना डॉक्टर साहेबांनी विचारले की माझे ज्या मुलीने स्वागत केले त्या मुलीला जर नोकरीची गरज असेल तर माझ्या दवाखान्यात रिसेप्शनीस्ट म्हणून मी तिला नेमू शकतो. तिला मी चांगला १५००० रुपये पगार देईन कारण तिच्या व्यक्तिमत्वामधे अशी एक गोष्ट आहे जी असलेली मुलगीच मला माझ्या दवाखान्यात नेमायची आहे. तिच्या व्यक्तित्वामधील ती खूबी डॉक्टर साहेबांच्या लक्षात आली होती.

मग काय तिची परिस्थीती बेताचीच असल्याने एवढ्या रकमेच्या पगाराची नोकरी म्हणजे तिच्याकरीता वरदानच होते. अत्यंत छान तिने नोकरी केली. तिच्या कामामुळे त्या खुबीमुळे डॉक्टरांना भेटायला जाणारे पेशंट्स अत्यंत खुश असायचे. सगळे पेशंट्स तिचे कौतुक करायचे. अश्यातच एका मेडीकल रीप्रेझेंटेटीव्ह ला ती आवडली त्याने तिला मागणी घातली. अत्यंत मोठ्या कंपनीत असलेल्या त्या मुलासोबत तिचे लग्न झाले आता ती फार सुखात आहे असे मला तिने सांगितले. टीसी बाबतच्या काही प्रक्रीया करण्यासाठी ती कार्यालयात गेली तेव्हा तिचा नवरा मला म्हणाला, सर मी तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो कारण मला तुमचे आभार मानायचे आहे. मला माझ्या जीवनात एवढी पूरक जोडीदार मिळाली याचा मला फार आनंद आहे. तिच्या व्यक्तिमत्वातली एक खुबी तुम्हाला माहितच असेल. त्याचमुळे मला ती आवडली आम्ही लग्न केले. परंतू सर, आजही मी माझ्या कामावरून घरी आल्यावर तिच्यातील ती गोष्ट बघितल्यावर मी माझ्या संपूर्ण दिवसाच्या कामाचा सारा ताण विसरून जातो. मीच काय परंतू तिच्यामुळे आमचे घर कायम उत्साही राहते. कारण तिचा कुणाला रागच येत नाही. तिच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटते. अशी ही तुमची विद्यार्थिनी असल्याने माझे जीवन फार सुखात जात आहे. त्यासाठी तुमचे आभार

संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला समाधान वाटावे ही जी खुबी माझ्या विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्वात होती ती म्हणजे तिचे अत्यंत सुंदर हास्य जे तिच्या चेहेऱ्यावर कायम विलसत रहायचे, एखाद्या मुल्यवान दागिन्यासारखे. तिच्या त्या हास्यातून तिचा सुस्वभाव कळायचा प्रत्येकाला ती आपलेसे करायची. त्यामुळेच आज अत्यंत आनंदी संसार ती करत आहे.

सुरेख हास्य हा दागिनाच अनमोल असतो. पण काही मंडळींना त्याचे मोल कळत नाही. ते कपाळावर सतत आठ्या ठेवून, त्रासदायक चेहेरा करून, चिडके रुप धारण करून, लोकांना दूर लोटत राहतात. सुरेख हास्य मात्र कायम लोकांना आपलेपण जाणवून देणारे असते. शिवाय हा दागिना सोनाराकडे मिळत नाही, तो आपल्याला घडवावा लागतो. फार मेहनतीने. पण एकदा घडला की त्याची लकाकी खऱ्या सोन्याच्या दागिन्यालाही फिकी करते.  





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18