थोडा है थोडे की जरुरत है @ 10.01.23
रॉंग नंबर
दवाखान्यात त्या दिवशी डॉक्टरांच्या चेंबरमधून बाहेर पडताना ते आजोबा चिडतच बाहेर पडले. मागे आजी होती. जरा आजीला ऐकू जाईल एवढ्या आवाजात त्यांची चिडचिड सुरु होती. तुला किती वेळा सांगितलंय की डॉक्टरकडे येताना सगळी कागदे सोबत आणत जा. वेगवेगळी प्रिस्क्रीप्शन्स आहेत मग ती एका जागी का नाही ठेवत? आता ते दोन महिन्यापूर्वीचे रीपोर्ट मागत होते आणि तू दोन वर्षांपूर्वीचे दाखवत होतीस. आता पुन्हा उद्या यावे लागेल मला. एकाच भेटीत काम व्हायला हवे ना? सोपे आहे का आपल्याला या वयात आता दवाखान्यात येणे? तुला समजत कसे नाही? दिवसेंदिवस ना तू वेंधळी होत चालली आहे. या शेवटच्या वाक्याच्या आधीपर्यंत आजी शांत होती कारण तिची चूक झाली होती. परंतू शेवटच्या वाक्याने बहुदा आजोबांनी आजीच्या सहनशक्तीची मर्यादा पार केली होती. ते वाक्य ऐकल्याबरोबर आजोबांची चिड चिड ऐकत व त्यांचाच हात धरून पायऱ्या उतरणाऱ्या आजीने एकदम हात झटकला. रागाने आता आजीचे बोलणे सुरु झाले. मला काय वेंधळी म्हणता. तुम्हीच तर नेहेमी म्हणता की तू कोणत्याही गोष्टींना हात लावू नको. मी सारे फाईल मधे नीट लावून ठेवतो. सारे कागद, रीपोर्ट सारेच तर मी तुमच्याजवळ देते. मला तर औषधांची नावे देखील ठाऊक नसतात. तुम्हीच मला काढून देता. आणि आता स्वतः ते रीपोर्ट विसरलात तर मला बोल लावता? हे बरे आहे तुमचे. मी तुम्हाला सांगितले की माझी औषधे, माझे रीपोर्ट हे सारे माझ्या ताब्यात द्या तर माझ्यावर तुमचा विश्वास नाही. त्यावेळी मला काही करु देत नाही आणि आता मला लगेच वेंधळी वगैरे म्हणता? वेंधळी असते तर एवढी वर्षे संसार केला नसता व्यवस्थित. मी उतरते आता माझी, काही नको तुमचा आधार. तुमचे म्हणजे आधार तर द्यायचा पण त्या बदल्यात असे ऐकवून पण जायचे. बाजूला व्हा… वगैरे वगैरे वगैरे….
त्या दोघांना अश्या प्रकारे एकमेकांशी भांडत खाली उतरताना बधून माझ्या बाजूने बसलेला साधारण माझ्याच वयाचा एक माणूस हसतच म्हणाला, याला म्हणतात रॉंग नंबर!! मला त्या शब्दाची गंमत वाटली. मी सहजच विचारले म्हणजे? त्याने तो शब्द स्पष्ट केला. या दोघांच्या भांडणावरून असे वाटते की गेली अनेक वर्षे ही दोघे याच पद्धतीने मस्त भांडत भांडत आपला संसार करीत आहेत. एवढ्या वर्षांच्या संसारानंतरही कदाचित यांना हे कळले नाही की हा त्या दोघांसाठीही रॉंग नंबर होता. खरा विचार केला ना तर आपल्याकडे अश्या रॉंग नंबर्सची संख्या फार मोठी आहे. टोकाच्या वेगळ्या आवडी निवडी, एकाला गोड पदार्थ आवडतात तर एकाला तिखट पदार्थ. कुणाला गझल ऐकणे आवडतात तर दुसऱ्याला त्याच कार्यक्रमात झोप येते. रंग असो, पदार्थ असो, फिरायची ठिकाणे असो अश्या प्रत्येक ठिकाणी कमालीची वेगवेगळी आवड असते. तिला थंडी वाजते तर त्याला हिवाळ्यातही पंखा लावल्याशिवाय झोप येत नाही. असे अनेक रॉंग नंबर आपल्या भारतात पन्नास पन्नास वर्षे संसार करतात. भांडतात, अबोला धरतात पण सोबत मात्र राहतात. हे त्याचे ऐकल्यावर तेथे वेटींगमधे बसलेले बरेच जण हसायला लागले. मला तो माणूस हळूच म्हणाला, बघा सर, या सर्वांच्याही रॉंग नंबरच्या घंट्या वाजल्या म्हणून बघा कसे हसताहेत.
माझ्या मुलाला डॉक्टरांना दाखवून मी औषधे घ्यायला दुकानात थांबलो तर बाहेर बघितले, मघाचेच आजोबा आजीला ऑटोरीक्क्षामधे बसवत होते व यावेळी आजीने आधाराकरीता त्यांचा हात धरला होता. टोकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी एकमेकांसोबत ॲडजेस्ट करणे हे भारतीय समाजाचे चित्र आहे. नात्यामधे जो पेशन्स आधीच्या पिढ्यांनी टिकविला तो आता मात्र कमी झाल्यागत वाटतोय व ते कालानुरुपच आहे. स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव ही बरेच वेळा ॲडजेस्ट करण्याचा पेशन्स कमी देखील करते. आधुनिक समाजाचे कमी झालेला पेशन्स हे बाय प्रॉडक्ट आहे जे सांभाळणे क्रमप्राप्त आहे. म्हणूनच माझ्या आईच्या पिढीच्या व्यक्ती रॉंगनंबर लागला तरी त्या फोनवर पाच मिनीटे सहज बोलून जायच्या. आता तोच फोन व्हॉट रबीश म्हणून खाडकन कट केला जातो. आता हा एकमेकांना ॲडजेस्ट करण्याचा हा पेशन्स पुरुष व स्त्रीया या दोन्हीही गटांनी टिकविणे व जमल्यास वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा घटस्फोटाचे समाजातील वाढते प्रमाण मोठा रॉंग नंबर आहे.
Comments
Post a Comment