थोडा है थोडे की जरुरत है @ 03.01.23

सोप्पे.. नि सरळ!!

कधी कधी आपल्याला साध्या गोष्टी देखील क्लिष्ट करून ठेवण्याची सवय लागते. तसे बघता गोष्टी सोप्या असतात परंतू त्यांना तेवढ्याच सोप्या पद्धतीने समजून घेणे अनेकांना जमत नाही. साध्या सरळ गोष्टींचा गुंता करायचा नंतर तो गुंता सोडवत राहणे हे देखील अनेकांना आवडते. परंतू याचा परीणाम आपल्या मनावर ताण निर्माण करण्यामधे होतो हे आपण लक्षात घेत नाही. सोप्पे नि सरळ जगता येणे ही देखील एक कलाच आहे. जीवनाकडे बघण्याचा सोप्पा नि सरळ दृष्टीकोन असलेला एक व्यक्ती मला नुकताच भेटला.

एका कामानिमित्त नुकतेच भोपाळला जाण्याचा योग आला. तेथे मला अमेरीकेत राहणारा एक माणूस भेटला. मी त्याला ओळखत होतो परंतू भेट पहिल्यांदाच होत होती. तो, मी इतर काही जण गप्पा मारत बसलो होतो. इतर गोष्टींसोबत पुन्हा वाढू शकणाऱ्या कोरोनाबद्दल स्वाभाविकपणे गोष्टी सुरु झाल्या. आमच्यापैकी एका मित्राने त्याला विचारले की तू कधी परत जाणार आहेस? त्यावर तो उत्तरला की तो १५ जानेवारीनंतर जाणार आहे. १५ जानेवारी ऐकल्याबरोबर इतर सर्वजण चर्चेमधे सामील झाले. सरळ धाग्याचा गुंता करणे सुरु झाले. चर्चेचा सूर असा होता की आता केंद्र शासनाकडून कोव्हीड बाबत सूचना येणे सुरु झाले. त्यामधे आता येणाऱ्या काळात काही निर्बंध परत लावले जाण्याची शक्यता आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासांमधे तर ते फार लवकर लावले जातील. एकदा निर्बंध सुरु झाले की भारतात तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणेही कठीण होते. हा तर थेट अमेरीकेला जाणार आहे. शिवाय थेट फ्लाईट मिळाली तर ठीक होते परंतू याला तर जर्मनीमधे पाच तासाचा ले ओव्हर आहे. तेथे विमानतळावर काय स्थिती राहील हे सांगता येत नाही. यावेळी हा आपल्या आईला घेऊन जाणार आहे. ज्यांचे वय जास्त आहे त्यांना तर अजूनच जास्त त्रास आहे. कसे करशील तू? एवढा वेळ तो माझा अमेरीकेत राहणारा मित्र शांतपणे ही सारी चर्चा ऐकत होता. जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने त्याचे अत्यंत साधे सोप्पे उत्तर दिले. तो म्हणाला, त्यावेळी भारतीय अमेरीकन गव्हर्नमेंटकडून ज्या ॲडव्हायजरी उपलब्ध असतील त्याचे मी पालन करीन. दॅट्स इट. लेट्स एन्जॉय समोसा. विषय संपला. मला त्याच्या त्या उत्तराचे फारच कौतुक वाटले. एका वाक्यात त्याने तेथे सुरु असलेली ती भविष्यातील कदाचित घडणाऱ्या गोष्टींबद्दलची घनघोर चर्चा थांबविली

खरेच किती सोपे केले त्याने सारे. हा असा ॲटीट्यूड जीवन सुखकर सोपे बनवत असतो. बरेच वेळा ज्या गोष्टी भविष्यात होणार आहेत त्याबद्दल काथ्याकुट करण्यातच आपली एनर्जी खर्च होत असते. आता याच उदाहरणाचा विचार केला तर असे झाले तर कसे किंवा तसे झाले तर काय करावे या चर्चांना काहीच अर्थ नव्हता. म्हणून त्याने सरळ सोपा मार्ग निवडला की त्या वेळी जशी परीस्थिती असेल त्याला मी सामोरा जाईन. यामधून त्याच्या व्यक्तिमत्वाच्या तीन ठळक बाबी लक्षात आल्या. एक म्हणजे प्रशासन जे करणार आहे ते माझ्या भल्यासाठीच असेल हा संपुर्ण विश्वास. दुसरी बाब म्हणजे त्यावेळी जी काही परीस्थिती असेल त्याला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भविष्यातील समस्यांबद्दल उगाच विचार करून रक्त जाळण्यापेक्षा ताण निर्माण केल्यापेक्षा आजचा क्षण ताणविरहित जगण्याची वृत्ती

एका उत्तम जीवन पद्धतीला अत्यंत पोषक अश्याच या तीनही गोष्टी आहेत. मुळातच आधुनिक काळात जगण्याच्या बऱ्याच सुविधा जरी असल्या तरी अकारणच मन धास्तावलेले असते. आपल्या सभोवताली घडणाऱ्या अनेक अनपेक्षित गोष्टींमुळे आपण एक प्रकारचा ताण सहन करतोच आहे. त्यात भविष्यात काय होईल किंवा कोणत्या समस्या राहतील याबद्दल हायपोथेटीकल भिती निर्माण करून त्याचा ताण वाढविणे ही सवय आता आपण बंद करायला हवी. कारण यामुळे निर्माण होणारे ताण आपल्या आरोग्यावर परीणाम करु लागले आहेत. गोष्टी क्लिष्ट करण्यापेक्षा त्या सोप्या कश्या होतील याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. कारण वेगवेगळ्या परिस्थितीमधे निर्माण झालेली किंवा केलेली जटीलता आपल्या जगण्याचा आनंदच हिरावून घेते

भविष्यात जशी परिस्थिती निर्माण होईल त्या परीस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणारा आत्मविश्वास उराशी बाळगून सोप्पे नि सरळ आयुष्य जगण्याची तयारी ठेवणे हेच सुखी आयुष्याचे गमक आहे कारण असे म्हणतात.. क्लिष्टतेने जगणे सोपे आहे.. परंतू त्यामधे ताण फार आहेसोप्या पद्धतीने जगणे फार क्लिष्ट आहेपरंतू त्यात मोठा आनंद आहेहोय ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18