Thoda hai thode ki jarurat hai @31.10.17

भय इथले

ग्रेसांच्या एका कवितेत त्यांनी एक ओळ लिहीलीयभय इथले संपत नाही. या एका ओळीचा कधीतरी गांभिर्याने विचार आपण केला तर जीवनाच्या किती वेगवेगळ्या पातळीवर ही ओळ लागू पडते याचा आपल्याला साक्षात्कार व्हायला लागतो. माणूस तसा कितीही ताकदवान असल्याचा आभास निर्माण करीत असला तरी देखील सामान्यपणे जगताना भय त्याचा पिच्छा सोडत नाही. काळ आधुनिक होत जातोय पण त्यानुसार भय कमी व्हायला हवे परंतू तसे होताना दिसत नाही. उलटपक्षी भयाच्या कक्षा वाढू लागल्यात आणि आपण जास्त अडकू लागलो. घरी चोर येऊन चोरी करुन जातील इथपासून तर माझ्या मोबाईलवरील माझा अकाऊंट कुणी हॅक करेल इथपर्यंत वेगवेगळे भय आपल्याला सतावत राहतात. परंतू सामान्यपणे जगण्याच्या कक्षा रुंदावणारी मंडळी मात्र या भयावर मात करतातग्रेसांच्या भय इथले संपत नाही ला ते लोक जगून आणि खंबीरपणे भय इथले संपविन मीअसे उत्तर देतात. तेच खरे सुपरस्टार असतातमी नाही माझी आई खरी सुपरस्टार आहे असे जेव्हा त्या नितांत सुंदर चित्रपटातील ती प्रथमच जगासमोर आलेली सिक्रेट सुपरस्टार म्हणते तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यात तरळणाऱ्या आनंदाश्रुंसोबत आपल्याही डोळ्यात ते तरळू लागतात आणि नकळत आपणही त्या सिक्रेट सुपरस्टारच्या माऊलीसाठी टाळ्या वाजवू लागतो.

गाण्याची प्रचंड आवड असलेल्या माय लेकी घरातील कर्मठ परंपरावादी बाबा घरात नसताना टीव्हीवर एक म्युझीकल अवार्डस् चा कार्यक्रम बघत असतात. सर्वश्रेष्ठ पार्श्वगायीकेच्या नावावरुन त्यांच्यात शर्यत लागते. मनात खूप सारी स्वप्ने असणारी मुलगी आईला म्हणते की माझ्या आवडीची गायिका जर जिंकली तर मला माझ्या मनाप्रमाणे हवे ते तू करु देशील. कामाच्या गडबडीमधे आई तिला वचन देते आणि दुर्दैवाने हरते. मग मुलगी मागणी करु लागते की मला माझे गाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला जायचे आहे. हे ऐकल्यावर आई तिला नकार देते. आता मुलगी हट्ट करु लागते की आई, तू वचन दिले होते, आणि आता तू आपला शब्द फिरवते आहेस. तेव्हा त्या मुलीची आई एक महत्वाचे वाक्य बोलते, बेटा मैने तुम्हे मुझसे माँगने के लिये बोला था, जिंदगीसे नही. तिच्या आईचे तिला स्पष्टपणे सांगणे असते की बेटा तुझ्या मनात लाख स्वप्ने असतील तुझ्या स्वतःच्या जिवनाबद्दलची परंतू हे जीवन जे तू जगते आहे त्यावर देखील तुझा अधिकार नाही हे तू समजून घे. हे ती आपल्या वयाने मोठ्या होणाऱ्या मनाने स्वतंत्र होणाऱ्या मुलीला तिच्या या बदलत्या नव्या जगातील परंतू अजूनही परंपरांच्या साखळदंडांनी बांधल्या गेलेल्या मर्यादित अस्तित्वाची ओळख करुन देत असते आणि हे ती करत असते तिच्या मनात असलेल्या एका पुरुषी अहंकाराच्या त्याच्याकडून घरात राबविल्या जाणाऱ्या एकछत्री अंमलाच्या दडपणामुळे. हे दडपण असते भयाचे. या मानसिक आणि शारिरीक दडपणाचा परीणाम त्या सबंध घरावर पसरलेला असतो. त्या पुरुषाच्या घरातील प्रवेशाच्या आधी घरात रमणीय आनंदी वातावरण असते. घरातील सर्वजण खूप भरभरुन गाणी गातात, नाचतात आणि मजा करतात परंतू जशी त्या पुरुषाच्या येण्याची हाक येते तसे वातावरण संपुर्णपणे बदलून जाते. तो ताणलेल्या स्थितीमधेच घरी येणार, त्याला हवी त्याची किंवा तिची तो झाडाझडती घेणार, त्याच्या मर्जीनुसारच सारे व्हायला हवे हा त्याचा आग्रह असणार, वरणात मीठ कमी पडले तर तो सर्वांसमोर बायकोच्या थोबाडीत मारणार, मुलीला गाणे अतिशय आवडत असूनही तिला गाण्याची आडकाठी करणार, टीव्हीसमोर बसून बकाबका गिळणार, त्याच्या पत्नीला तो सदैव घालून पाडून बोलणार, ती किती निर्बुद्ध, वेंधळी आणि अव्यावहारिक आहे याचे वर्णन करीत त्याचा विकृत आनंद उपभोगणार, मुलीला मार्क्स कमी पडले म्हणून तिला प्राणप्रीय असलेल्या गिटारचे तार निर्दयतेने तोडून ठेवणार, आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बायकोने त्याच्या नकळत मुलीला घेऊन दिलेला लॅपटॉप तो गच्चीवरुन फेकून द्यायला लावणार, हा अक्षम्य गुन्हा केल्याबद्दल तो अत्यंत हीन घाणेरड्या शिव्यांची लाखोळी तिला वाहणार, तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करीत तिला वाटेल तसे बोलणार मुलांसमोर तिला फोडून काढणार. या साऱ्या प्रकारांमधून त्याचा एकच हेतू त्याला साध्य करावयाचा असतो तो म्हणजे त्याच्या अस्तित्वाचे भय निर्माण व्हावे जे करण्यामधे तो पूर्णपणे यशस्वी झालेला असतो. चित्रपटात जरी हा सारा प्रकार एका मुस्लीम परीवारात घडताना दाखविला असला तरीदेखील अश्या प्रकारच्या भयाच्या वातावरणात जगणारी अनेक घरे आपल्याला दिसतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा आदर ही बाब आपण समजू शकतो परंतू त्याच्या अस्तित्वाचे जेव्हा भय निर्माण होऊ लागते तेव्हा मात्र मग ते भय संपविण्याचा प्रयास आपोआपच सुरु होतो. तो सुरु व्हायला हवा.

नव्या पिढीची मुलगी देखील बरेच वेळा चिडून आपल्या आईला तूम डरपोक हो, इडीयट हो असे म्हणून जाते. बापाच्या सतत आईच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा तिची सर्वांसमोर खिल्ली उडविण्याचा परीणाम.. परंतू त्या मुलीची आजी तिला जेव्हा तिच्या जन्माची कहाणी सांगते तेव्हा मात्र तिचा स्वतःच्या आईबद्दलचा आदर वाढतो. तिच्या जन्माच्या वेळी ती मुलगी असल्याने गर्भपात करावा असा आग्रह धरला गेला असताना तिची पोटूशी आई दहा महिने घरातून चक्क पळून गेली होती त्यामुळेच तिचा जन्म होऊ शकला हे सत्य जेव्हा इन्सीया ला कळते तेव्हा मात्र ती आपल्या आईच्या सोबत उभी राहण्याचा निर्णय करते. बुरखा घालून सिक्रेट सुपरस्टार बनण्याचा तिचा प्रयास सुरु होतो. या कामात तिला तिचा एक मित्र आणि एक संगीतकार मदत करतो. पण हे सारे होताना वडीलांच्या त्याच भयापोटी संपुर्ण परीवाराला सौदी अरेबीयामधे जाणे भाग पडते. केवळ भयापोटी..

भय हे असेच असते. भयाचा पगडा माणसाच्या स्वत्वावर सर्वप्रथम घाला घालतो. स्वतःचे सामर्थ्य, स्वतःची क्षमता याचा संपूर्णपणे विसर पडण्याइतपत भय मनावर बिंबविल्या जाते. हे भय सुरुवातीला अडचणीचे ठरते किंवा त्याला संस्कार वगैरे शब्दांचा मुलामा देऊन सहन करायला भाग पाडले जाते. परंतू नंतर पुढे त्या भयाचे इतके जास्त भय निर्माण होते की त्याचे बंधन तोडण्याची इच्छा असली तरी तोडता येत नाही. मग त्यामुळे आहुती पडते एका व्यक्तीच्या स्वत्वाची, आवडीनिवडींची, इच्छा आकांक्षांची, उडण्याच्या स्वप्नांचीपण जर या भयाचा पगडा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला तर मात्रतेच छोट्या इन्सीयाची आई करतेभय इथले संपविन मीअसे म्हणत आपल्या मुलीच्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहतेम्हणूनच कायम बुरखा घालून गाणे गाणारी इन्सीया त्या अवार्ड समारंभामधे रंगमंचावर जाताना जेव्हा तो बुरखा काढतेते यश आहे भयाशी सामना करण्याचे, स्वतःचे महत्व समजून घेण्याचे, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अभिमान बाळगण्याचे, मलाही माणसाचा जन्म केवळ एकदाच मिळाला आहे त्यामुळे माझ्या इच्छांना स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मलाही अधिकार आहे हे समजण्याचे, स्वतःच्या ठायी असलेल्या अंगभूत बाबींना समजून त्याचा विकास करण्याच्या स्वातंत्र्याचेगंमत म्हणजे पुरुषी भयाच्या दडपणाखाली आपल्या स्वप्नांना जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या इन्सीयाच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही पुरुषही मदत करताना दिसतात.

याचाच अर्थ भय हे व्यक्तीसापेक्ष किंवा लिंगसापेक्ष नाही तर ही एक आत्म अवरोधाची भावना आहे जी सुरुवातीला वेगवेगळ्या कारणांनी स्विकारली जाते नंतर ती व्यक्तीमत्वावर आरुढ होते. त्यानंतर ती मनाचा इतका जबरदस्त पगडा घेते की त्याच्यातून सुटताच येत नाही. अश्यावेळी त्या भयाच्या पगड्यातून हात धरुन बाहेर काढायला कुणीतरी आपलं लागतंइन्सीयाला तिची आई मिळते जी आपल्या पोरीचा हात धरुन तिला त्या भयाच्या कचाट्यातून बाहेर काढतेस्वतंत्र होण्यासाठी आणि मग तिच्या लक्षात येते की आपल्या पोरीच्या हाताला धरुन तिला स्वतंत्र करताना ती देखील स्वतंत्र झालीयविमानतळावरचा गार्ड तिला म्हणतो की एकदा तुम्ही बाहेर पडलात तर परत आत येता येणार नाहीती त्याला म्हणते, इससे अच्छी बात क्या हो सकती हैम्हणूनच बुरखा काढलेली इन्सीया रंगमंचावरुन सांगतेमेरी अम्मी डरपोक नही, हिम्मतवाली है.. मेरी अम्मी इडीयट नही, सुपरस्टार हैहा सारा परीणाम असतोआपले भय स्वतः संपविण्याचा..



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23