थोडा है थोडे की जरूरत है @ 17.10.17

धनत्रयोदशी

काही वर्षांपूर्वी धनत्रयोदशी कशी साजरी करायची याबाबत एका घरात चर्चा सुरु होती. त्या वर्षी विशेष चर्चेचे कारण होते की आईच्या एका फिक्स डीपॉझीटची मॅच्युरीटी झाली होती. एकदम दहा लाख रुपये मिळणार होते. सर्वांनी आपापल्या मागण्या करणे सुरु केले. पोरगा म्हणाला, मला एक नविन गेयरची सायकल हवी आहे. मुलीने तर नवी स्कुटर घ्यायचे ठरविले आणि त्याचा रंग देखील ठरवून टाकला. बाबा म्हणाले की आपण बढीया कार घेऊ. खूप दिवसांची इच्छा आहे. मागण्या वाढत चालल्या होत्या. कुणाला एअर कंडीशनर हवा होता तर कुणाला घराचे रंगरुप पालटायचे होते. कुणाला फर्निचर हवे होते तर कुणाला मोठा एलईडी टीव्ही हवा होता तर कुणीतरी आईसाठी नव्या साड्या घेण्याचे सुचविले होते. सर्वांच्या चर्चा सुरु असताना त्या आनंदात जिचे ते फीक्स डीपॉझीट होते तिला मात्र कुणीच विचारत नव्हते. या सर्वांना त्या चर्चेच्या वातावरणात सोडून ती हळूच तेथून उठून आपल्या खोलीत गेली. तिच्या आवडत्या खिडकीजवळील जागेजवळ बसून ती शांतपणे बाहेर बघू लागली. एखाद्या चित्रपटागत या दहा लाख रुपयांच्या गुंतवणूकीचा काळ तिच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला. वीस वर्षे लागली होती तिला ही रक्कम गोळा करायला. एक मोठा प्रवासच होता तोइच्छांना संपुर्णपणे मनातून हद्दपार करण्याचा प्रवास

लग्न झाल्यावर संसाराची रंगीबेरंगी फुलपाखरागत स्वप्ने घेऊन ती त्या घरात आली होती. मोठ्या कुटुंबात तिचा प्रवेश झाला आणि तिच्या आईच्या शिकवणीनुसार तिने सारे काही आनंदाने स्विकारुन स्वतःला त्या घरासाठी समर्पित करण्याचे ठरविले. एका औषध विक्रीच्या कंपनीमधे तिच्या नवऱ्याची नोकरी होती त्यामुळे या संसाराच्या गाड्याला ओढण्यासाठी आपल्याला आर्थिकदृष्ट्या देखील मदत करावी लागणार आहे याची तिला सुरुवातीलाच कल्पना आली होती. अर्थात ते करणे आवश्यकच असते अशीच शिकवण तिच्या बाबांनी तिला दिली होती. पुर्णवेळ नोकरी करणे मात्र तिला शक्य नव्हते. घरच्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ करायचा या करीता तिला काही वेळाकरीताच अर्थार्जन करणे शक्य होते. म्हणूनच तिने तिच्याकडे असलेल्या गुणांचा वापर करुन ड्रेस डीझाईनिंगचा छोटासा व्यवसाय सुरु केला. जमेल त्यावेळी ती छान ड्रेसेस शिवायची अश्या पद्धतीने थोडा थोडा पैसा गोळा करणे सुरु झाले. सोबतच तिचा पदवीला गणित विषय असल्याने काही मुलांना घरबसल्या शिकवणे देखील तिने सुरु केले त्या द्वारे पैसा गोळा करु लागली. घरातील वेगवेगळे खर्च, दवाखाने, सणवार यासाठी देखील तिची थोडी थोडी मदत होऊ लागली. परंतू हे सारे करताना ठराविक बचत कायमस्वरुपी करत राहयची असे तिने पक्के मनाशी ठरविले होते. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुरु झाला तेव्हा देखील बरेच वेळा तिच्या अर्थार्जनातून मदत होतच होती. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सारे ती कोणतीही तक्रार करता अत्यंत आनंदाने करीत होती कारण तो तिचा परीवार होता आणि ती त्या घरची महत्वाचा आधार होती. ती जे त्या घरासाठी परीवारातील लोकांसाठी करीत होती त्याचे त्यांना कौतुक होतेच परंतू काही अश्या गोष्टी होत्या ज्या कदाचित कुणालाच ठाऊक नव्हत्यात्या साऱ्या आता वीस वर्षांनंतर तिला आठवायला लागल्या

एकदा ड्रेस घ्यायला दुकानात गेल्यानंतर तिलाही दुकानासमोरील काचेवर लावलेला गुलाबी रंगाचा एक सुंदर ड्रेस आवडला होता. लहानपणापासूनच तिला तश्या पद्धतीचा ड्रेस घेण्याची इच्छा होती. आतमधे गेल्यावर तिने दुकानदाराला तोच ड्रेस दाखवायला सांगितला. तो सुंदर ड्रेस बघून तिचे डोळे लकाकले. हा ड्रेस घालून आपण गोष्टीतल्या एखाद्या परीसारखे दिसू अशी बालपणीची ती गोड कल्पना तिच्या मनात आलीआणि खुदकन हसूच आले. ड्रेस आवडला होतापण दुकानदाराने किंमत सांगितली..अडीच हजारबापरे त्यावेळी तर ड्रेससाठी केवळ पाचशे रुपये बजेट ठरविलेले होते. कारण त्या महिन्यात दोन हजार रुपये बचत करायचीच हा तिचा निर्धार होता. त्या सुंदर ड्रेसवर एकदा हलकेच हात फिरवून तिने तो स्वतःच्या अंगावर ठेऊन आरश्यात आपले प्रतिबिंब बघितले आणि मग तो ड्रेस ठेऊनच दिला. इससे कम रेट वाला दिखाना असे म्हणल्यावर दुकानदार म्हणाला, इस फ्लोअर पे आपके बजेट का कोई ड्रेस नही मॅडम, आपको निचे के फ्लोअर पे मील जायेगा.. डोळ्यात आलेला एक अश्रू कुणालाही दिसू देता ती पायऱ्या उतरुन खाली आलीपुन्हा कधीही तो मजला चढण्याचे मनात ठरवून. ड्रेस घेता आल्याचे दुःख ती पार विसरुन गेली बँकेची दोन हजार रुपये जमा करण्याची स्लीप भरताना.

लग्नाआधी अभ्यासू विद्यार्थिनी असल्याने तिचे अभ्यासात फार लक्ष असायचे तरी तिच्या आई ने तिला सारा स्वयंपाक नीट शिकविलेला होता. परंतू वेगवेगळे पदार्थ करणे मात्र तिला जमायचे नाही. पण लग्नानंतर हॉटेलमधे गेल्यानंतर होणारा खर्च तिने बघितला तिच्यातील व्यवहारीपण जागृत झाले. जे सारे पदार्थ घरच्या मंडळींना हॉटेलमधे जाऊन खावे वाटतात ते तिने एका पाठोपाठ एक शिकणे सुरु केले. त्यासाठी तिला खूप त्रास व्हायचा. परंतू आनंदाने ती ते काम करायची कारण त्या कष्टामुळे घरच्या सर्वांची चांगली राहणारी प्रकृती यासोबतच तिच्या बचतीच्या योजनेला मिळणारा हातभार सर्वात महत्वाचा होता. घरी पाहुणे आल्यानंतर सर्वांना हॉटेलमधे घेऊन जाण्याचा विचार तिचा नवरा करायचा. परंतू हॉटेलपेक्षाही चांगले दोसे मी तुम्हा सर्वांना खाऊ घालते असे म्हणत ती त्याच्या खर्चाला थांबवायची. सायंकाळपासून तो रात्री पर्यंत सर्वांना पोटभर दोसे खाऊ घालून तिची पाठ लागून यायची. पण त्या वेदना ती विसरुन जायची जेव्हा रात्री बँकेची तीन हजार रुपये भरण्याची स्लीप ती लिहायची.

लग्नानंतर मैत्रीणी भेटायच्या आणि परीवारासकट कुठे कुठे फिरायला गेलो याच्या कहाण्या सांगायच्या. कुणी शिमल्याच्या थंडीचा आनंद घेतलेला, कुणी मनालीच्या बर्फावर जाऊन आलेले तर कुणी सिंगापूर किंवा मलेशीया देखील. हिला सांगायला फार काही नव्हते कारण कुटुंबाच्या जबाबादारी पार पाडता पाडता या कोणत्याही गोष्टीसाठी वेळ आणि पैसा दोन्हीही उरत नव्हते. पण त्याचे तिला वाईट वाटत नव्हते कारण तिच्या परीवाराला सांभाळण्यासाठी तिने केलेला तो त्याग होता ज्याचा तिला सार्थ अभिमान होता. आयुष्याच्या प्रवासामधे अश्या सोडून दिलेल्या अनेक इच्छा तिला आज आठवत होत्या. सुरुवातीच्या काळात मनाला मोडता घालून केलेला त्याग हा काही दिवसांनी तिचा स्थायी भाव बनला. फुलपाखरागत असलेल्या आकांक्षांना पूर्ण करण्याचा जिवनातील काळ तर फुलपाखरागतच बघता बघता उडून गेला होता. ते वय, ती उमेद आणि ती उर्मी कदाचित तिला आता पुन्हा मिळणार नव्हती पण या काळाच्या बदल्यात तिला मिळणारे समाधान मात्र अमुल्य होते. राहून गेलेल्या अनेक गोष्टींची आज आठवण येऊन तिचे डोळे भरुन आले. तो परीसारखा ड्रेस, ते महाग मेकअप चे सामान, स्वयंपाकघराला सुट्टी देऊन केलेले महागड्या हॉटेलमधील जेवण, खूप आवडलेली तीन हजार रुपयांची पर्स, मोठ्या जवाहिऱ्याकडील खऱ्या मोत्यांचा एक सुंदर हार, रोजच्या त्याच त्या पणाला कंटाळून मनापासून फ्रेश होण्यासाठी आठवड्याभराची काश्मीर सहल अश्या अनेक राहून गेलेल्या सर्व बाबी तिला आठवून गेल्यापण हळू हळू त्या साऱ्या धूसर झाल्या आणि उरली ती दहा लक्ष रुपयांची तिने केलेली गुंतवणूक.. डोळ्यातील अश्रू पुसून काही काळच जुन्या आठवणींमुळे हळवी झालेली ती पुन्हा आपल्या खंबीर निर्धारासह पैश्याच्या विनियोगाची चर्चा सुरु असलेल्या खोलीत आली ठामपणे सर्वांना शांत करुन ती एकच वाक्य बोललीकाहीही खरेदी करायची नाही. आपण या पैश्यातून मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने उद्या धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर एक प्लॉट खरेदी करुयात आणि त्यातून त्यांचे भविष्य सुरक्षित करुयात… 

आपल्या आयुष्याच्या अनेक स्वप्नांना बाजूला सारुन केवळ आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जगणाऱ्या अनेक माऊलींचे प्रतिनिधीत्व करणारी ही आई.. तिला कितीही समजावले तरी ती अशीच वागत राहील कारण तिच्याकरीता तिची पिल्ले ही सर्वोच्च बाब असते कारण ते तिचेच अस्तित्व असते. अश्या मुलांसाठी आपल्या आयुष्यातील अनेक स्वप्ने बाजूला सारुन साजरी होणारी धनत्रयोदशी मुलांना खऱ्या अर्थाने आयुष्यभर लक्षात रहायला हवी अशीच आहे ना?



Comments

  1. तुम्ही हळूच रडावता पंत.आज बायकोवरचे प्रेम अधिकच वाढले .

    ReplyDelete
  2. सरांशी मी सहमत आहे अंतर्मुख करणारा लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23