थोडा है थोडे की जरूरत है @10.10.17

हसरी व्यथा

अनेक वर्षांनी तो आपल्या मैत्रीणीला भेटत होता. शाळा संपल्यावर पहिल्यांदाच. परंतू गेल्या काही वर्षांपासून त्याचा तिच्यासोबत व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संवाद सुरु झाला होता. एकमेकांशी बोलता बोलता जुना मैत्रीचा बंध पुन्हा निर्माण झाला होता. अमेरीकेत राहणारा तो त्याच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी तिच्या गावाला आला. बालपणीची मैत्री असल्यामुळे त्यांच्यातील संवाद हा व्यक्तिगत स्वरुपावर लगेच आला. हिने आपल्या आयुष्याबद्दल त्याला सांगितले, परीवाराबद्दल सांगितले. त्यानंतर तो सांगू लागला. अमेरीकेत राहणारा, खूप छान नोकरी असलेला, एकुलती एक लेक, चांगली सांपत्तिक स्थिती असा सगळा त्याचा भाग तिच्या डोक्यात असल्याने त्याच्या आयुष्याबद्दलचे एक चित्र तिच्या डोक्यात तयार होते. त्यामुळे आता त्याचे कसे छान सुरु आहे असे ऐकायला मिळणार या अपेक्षेने ती ऐकू लागली. व्हॉट्स अॅपवरील बोलण्यावरुन किंवा मित्र मैत्रीणींच्या ग्रुपमधे तरी त्याच्या बोलण्यावरुन तिला तसेच जाणविले होते. परंतू तिच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळे असे त्याच्या आयुष्याचे स्वरुप त्याने सांगितले. त्याच्या जिवनातील ती एक हसरी व्यथा ऐकून तिला काय बोलावे सुचेना. आयुष्याचे खेळच निराळे, त्याचे रंग वेगळे निराळे असा काहीसा भाव त्याचे सारे ऐकल्यावर तिच्या मनात निर्माण झाला. बऱ्याच दिवसांनंतर त्याला कुणाजवळतरी व्यक्त होता आले होते त्यामुळे कोसळत्या धबधब्या प्रमाणे त्याने आपले मन आणि त्या मनाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवलेली ती हसरी व्यथा तिला सांगून अनेक वर्षांनतर कदाचित पहिल्यांदाच त्याचे मन मोकळे केले होते. कारण मन मोकळे करायला देखील योग्य व्यक्ती असायला हवी. ती व्यक्ती त्याच्या मैत्रीणीच्या रुपाने त्याला भेटली आणि त्याने विलक्षण असे काहीतरी सांगितले. त्याच्या एकुलत्या एक लेकीच्या जन्मदिवसापासून त्याने त्याच्या जीवनाचा प्रवास त्याने सांगणे सुरु केले

ज्या दिवशी माझ्या अपूर्वाला अमेरीकेतल्या डॉक्टरांनी माझ्या हातात दिले तेव्हा ते म्हणाले होते, you are blessed by a baby girl (एका मुलीच्या रुपाने तुम्हाला आशिर्वाद लाभला आहे). अपूर्वाच्या आगमनाने आमचे आयुष्यच बदलून गेले. सळसळते चैतन्य घरात यावे तसा प्रकार झाला. सारे काही अपूर्वासाठी, कायम तिचाच विचार, तिला काय हवं नको याची काळजी, तिच्यासाठी किती करु नि किती नाही असे आम्हा दोघांनाही वाटत रहायचे. लहानपणी अपूर्वा बराच वेळ झोपलेलीच असायची. मग भारतातून माझी आई सुनबाईला ती किती नशीबवान आहे कारण अपूर्वा तिला आराम मिळू देते आणि त्या पार्श्वभूमीवर मी लहानपणी माझ्या आईला किती त्रास द्यायचो असे सारे किस्से सांगायची. एकंदरीत सारे जीवन हर्षोल्लासाने भारुन गेले होते. अपूर्वाचा तो शांत प्रवास तसाच सुरु राहीला. हळू हळू ती मोठी होऊ लागली पण इतर मुलांप्रमाणे आई बाबांना धुमाकूळ घालून थकविणे तिने कधीच केले नाही. अपूर्वा साधारण चार वर्षांची असताना एकदा माझा एक डॉक्टर मित्र माझ्याकडे जेवायला आला होता. तो लहान मुलांचाच डॉक्टर होता. जेवढा वेळ तो आमच्यासोबत होता तेवढा वेळ तो अपूर्वाचे निरीक्षण करीत होता. तिच्याशी बोलत होता, खेळत होता. मला जरा त्याच्या वागण्याचे आश्चर्य वाटत राहीले कारण आमच्याशी तो जवळपास बोलतच नव्हता. इतकेच काय तर जेवायला देखील तो अपूर्वासोबत खालीच बसला. तो निघेपर्यंत अपूर्वा झोपली होती. त्यानंतर मात्र त्याने आम्हा दोघांनाही बसविले आणि तो म्हणाला की तो जे सांगणार आहे ते आम्ही ताण येऊ देता ऐकावे. आम्हाला कळेच ना त्याला काय म्हणायचे आहे ते. तो म्हणाला, your child is a blessed child. (तुमची मुलगी देवाचा विशेष आशिर्वाद असलेली मुलगी आहे) असे केव्हा म्हणतात ते मला आणि माझ्या पत्नीला माहीत असल्याने आमच्या पोटात गोळा उठला….हा आता काय सांगणार? शांतपणे आम्हा दोघांचेही हात हातात धरुन त्याने जे पुढचे वाक्य उच्चारले ते म्हणजे आम्हाला नखशिखांत हादरवून गेले…. तो म्हणाला, तुमची गोड अपूर्वा ऑटीझम नावाच्या आजाराने ग्रस्त आहेऑटीझमइंटरनेटवर कधीतरी या आजाराबद्दल वाचलेली माहिती मला झरझर आठवली.

Autism is a neurodevelopmental disorder characterised by impaired social interaction, impaired verbal and non-verbal communication, and restricted and repetitive behaviour. ऑटीझम हा एक असा मानसिक आजार आहे ज्यामधे विस्कळित सामाजिक संवाद, विस्कळीत बोलणे, बंदिस्त आणि पुनर्क्रीया अश्या बाबी आढळतात…. माझा मित्र म्हणाला, अपूर्वाचा हा आजार कधीही बरा होण्याच्या स्थितीवर आहे. तिला आयुष्यभर सांभाळायचे आहेमाझ्या मित्राच्या त्या दोन चार वाक्यांनी आम्ही दोघही खरे सांगायचे झाल्यास संपूर्णपणे कोलमडून गेलो. मित्र निघून गेल्यावर अपुर्वाजवळ बसून आम्ही दोघांनी संपूर्ण रात्र रडत रडत घालविली. माझ्या संपुर्ण आयुष्यात ती रात्र मी कधीही विसरू शकत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे मात्र आम्ही निग्रहाने काही गोष्टी ठरविल्या. ज्याप्रमाणे अपूर्वाच्या जन्माच्या वेळी आमचे आयुष्य बदलून गेले होते तसेच पुन्हा एकदा आमचे आयुष्य बदलले. सारे काही पुन्हा अपूर्वासाठी करायचे, तिला काय हवं नको ते बघायचे, केवळ तिचाच विचार करायचा फरक केवळ असा होता की आता ती कधीही स्वतंत्रपणे तिचे आयुष्य जगू शकणार नाही त्यामुळे यावेळच्या बदललेल्या आयुष्याला एक वेदनेची किनार होती. माझी पत्नी मला म्हणाली, आपण आहोत तो पर्यंत ठीक आहे आपल्यानंतर आपल्या पोरीचे कसे? आम्ही दोघांनी निर्णय घेतला, मी आणखी भरपूर मेहनत करायची आणि अपूर्वाकरीता भरपूर आर्थिक योजना करुन ठेवायची. माझ्या पत्नीने देखील घरुन काम करायचे पैसे मिळवायचे. आणखी मुल होऊ द्यायचे नाही जेणेकरुन अपूर्वाच्या व्यवस्थेमधे वाटा नको. खरे सांगू, त्या स्थितीमधे जे विचार येत होते तसे आम्हा वागत होतो. आमचे मित्र मैत्रीणी बदलले, आम्ही अपूर्वासोबत तिच्या कोषातच स्वतःला बंदिस्त करुन घेतले. आता गेली सात वर्षे आम्ही अपूर्वामय जीवन जगतोय. लोक खूप कौतूक करतात, आम्ही खूप चांगले आई बाबा आहोत असेही सांगतात….पण आम्हाला ते मोठेपण नकोय यारअपूर्वाच्या आजारामुळे आम्ही काय काय सहन करतोय हे कुणीतरी समजून घ्यावे असे वाटते. आम्हाला सहानुभूती नकोय, आम्हाला बोलायचे आहे आमच्या वेदनेबद्दल जी आम्ही बोललो तर लगेच नजरा बदलतात. आई बाबा म्हणून आम्ही फार उदात्त काम करतोय याबद्दलच्या कौतुकापेक्षा आमचा त्रास कुणी समजून घ्यावा. आज तुझ्याजवळ बोलता येतंय.

गेली सात वर्षे जेवू घालताना माझ्या पत्नीला अपूर्वा गालावर जोरात थापड मारते तिला बरे वाटावे म्हणून ती कितीतरी थापडा खाते. तिला थांबविले तर ती जेवणाचे ताट फेकून देते. माझ्या पत्नीला मी चूकून देखील स्पर्श केला तर अपूर्वा जोरात घाबरून ओरडायची. त्याचा परीणाम असा झालाय की माझी पत्नी देखील मी तिला स्पर्शही केला तरी अपूर्वाच्या प्रतिक्रीयेपोटी दचकायला लागली आहे. केवळ तिच्या डोळ्यात बघून मी तिला सांगत असतो, मी तुझ्या सोबत आहे. हे काहीही मला कुणाला सांगता येत नाही, कुणी समजूनही घेणार नाहीलोक केवळ आम्हाला मखरात बसवून कौतूक करतात. आम्हाला नकोय असे काहीआम्हाला आमची वेदना देखील व्यक्त करता येत नाही..आमची वेदनाही हसरीच आहेआणि आयुष्यभर राहणार आहेत्या दिवशी त्याच्या मैत्रीणीने मात्र त्याची वेदना समजून घेतली..मनापासूनमोकळा श्वास घेऊन तो उठला..म्हणाला.. चल मला अमेरीकेत घरी फोन करायचा आहे, अपूर्वा जेवत नाहीये दोन दिवस झाले..बघतो..असे म्हणून तो उठून गेला. त्याच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघून त्याच्या मैत्रीणीच्या डोळ्यात दोन अश्रू आलेते सहानुभूतीचे नव्हते तर, त्याची वेदना समजल्याचे होते

दिव्यांग मुलांच्या आई वडीलांना भेटल्यावर त्यांचे कौतूक करताना त्यासोबतच त्यांच्या जीवनात त्या बाळामुळे झालेली उलथापालथ, त्यांचे बदलून गेलेले जीवन आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातील ती वेदना आपल्याला समजून घेता आली आणि जमल्यास त्यांच्या वेदनेला त्यागाचे उदात्त वेष्टण देता, त्यांची वेदना वेदनेच्याच स्वरुपात ठेऊन आपण त्यांच्या सोबत आहोत असे त्या आई बाबांना सांगता आले तर किती छान होईल?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23