थोडा है थोडे की जरूरत है 03.10.17

फाडलेली अभिमानी नोट

चंद्रकांत कुळकर्णी या दिग्दर्शकाचा आजचा दिवस माझा नावाचा एक नितांत सुंदर चित्रपट मी बघत होतो. त्यामधे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची टीम एका रात्रीतून एक अवघड वाटणारे कार्य करण्यासाठी धडपडत असतात. हे कार्य सुरु असताना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव रात्री घरी जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचा बाराव्या वर्गातील मुलगा त्यांच्यावर रागविला असतो. त्याला समजावताना ते स्वीय सचिव त्याला म्हणतात, बाळा कामे तर आपण सारेच करत असतो. व्यवस्थेचा भाग म्हणून ती कामे आपल्याला करावी लागतातच. परंतू आज जे काम मी करतोय ना बेटा ते काम असे आहे की ज्याची कदाचित जन्मभर आपण वाट बघत राहतो. एखाद्यावेळीच अशी संधी आपल्याला प्राप्त होते की त्यावेळी आपण एखाद्या व्यवस्थेमधे काम करीत असल्याचे खरे पारीतोषिक प्राप्त होते आणि ते आपण ज्याच्यासाठी काम करतो त्याच्या मनापासून मिळालेल्या प्रतिसादाचे असते. तो मोबदला आपण एखाद्या पदावर आहोत म्हणून केलेल्या कामाचा नसतो तर माणूस म्हणून केलेल्या कामाचा असतो. आजचे माझे काम त्याच पठडीतील आहे बेटा. मला समजून घे…. आपल्या वडीलांचे हे भाव त्या मुलाला अगदी बरोबर समजतात तो आनंदीत होऊन बाबांना काम करुनच या असे म्हणतो. हा संवाद माझ्या मनाला फार भावला. खरोखरीच प्रत्येकच क्षेत्रात कार्य करताना अश्या फार कमी संधी येतात जेथे आपल्या कामाबद्दल मनापासून अभिमान वाटू लागतो ज्याच्या करीता आपण कार्य केले त्याच्या प्रतिसादामुळे आपण खऱ्या अर्थाने सुखावून जातो कारण हे सुख आत्मिक सुख असते. बँकेत नेहेमीचे काम करणारा एखादा कर्मचारी काऊंटरपलीकडच्या एखाद्या वयस्कर माणसाच्या अंगावर ओरडण्याच्या ऐवजी प्रेमाने त्याची मदत करतो, त्याला त्याचे कार्य करण्यास मदत करतो तेव्हा त्या वयोवृद्ध व्यक्तिच्या चेहेऱ्यावर जे समाधान झळकते ते त्या कर्मचाऱ्याचे सर्वोत्तम पारीतोषिक असते. बसमधून खाली उतरताना एखाद्या आजीला बॅग उचलण्यास अडचण होताना गाडीतला कंडक्टर त्या आजीची बॅग उचलून देतो ऑटोरीक्शामधे ठेऊन तिला मदत करतो तेव्हा थरथरत्या हाताने ती त्याच्या डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवते तो त्या कंडक्टरचा सर्वोच्च पुरस्कार असतो. सर्वात मोठी गंमत म्हणजे आपल्याला असे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करुन देणारी ही सारी कामे बहुतांशपणे आपल्या सेवेच्या कर्तव्य यादीत नसतात. परंतू ती आपल्याला माणूस म्हणून सुचलेली असतात आणि म्हणूनच ही कामे लौकीकार्थाचे नाही तर आत्मिक पुरस्कार आपल्याला मिळवून देतात. असाच एक आत्मिक पुरस्कार देणारा मला अंतर्बाह्य थरारुन टाकणारा क्षण मला नुकताच अनुभवता आला. अर्थात तो संस्मरणीय क्षण मला अनुभवता आला तो केवळ माझ्या आई वडीलांच्या आणि माझ्या गुरुंच्या आशिर्वादाने. त्यांची पुण्याई कामात आली हेच खरे.

महाविद्यालयात नविन प्रवेशित विद्यार्थिनींना मी दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील संबोधन करण्यासाठी गेलो. आमच्या महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात साधारण १५० विद्यार्थिनी बसल्या होत्या. विद्यार्थिनींना महाविद्यालयातील सर्व सुविधांबद्दल माहिती देणे येणाऱ्या तीन वर्षात आपल्या करीयरच्या दृष्टीने विकसित होणे हा विषय माझ्या संबोधनाचा केंद्रबिंदू होता. त्या दिवशी मी त्या सर्व विद्यार्थिनींशी संवाद साधत असताना आज मी फार वेगळ्या पातळीवर त्यांच्याशी बोलतोय असे मला जाणवित होते. विद्यार्थ्यांशी संवाद करणे मला मनापासून आवडते परंतू तो दिवस वेगळच होता. अनेक वेगवेगळी उदाहरणे मला भराभर सुचत होती आणि मला जे सांगायचे होते ते विद्यार्थिनींना पटत होते हे मला जाणवत होते. शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असताना बदललेल्या परीस्थितीत मी केवळ २० टक्क्यांवर काम करीत असतो. म्हणजे मी सांगत असलेला विचार केवळ २० टक्केच विद्यार्थी नीट ऐकून त्याचे अनुसरण करतील असे मी मान्य केले असते. माझे अनेक सहकारी हे प्रमाण बरेच आहे असे देखील म्हणतात. बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर पडणारे विविध प्रभाव आपल्या सांगण्याचा प्रभाव आपोआप कमी करतात. त्यामुळे माझ्या बोलण्याचे प्रमाण मी केवळ २० टक्केच गृहित धरले आहे. परंतू त्या दिवशी त्या प्रमाणात चांगली वृद्धी होईल असे मला वाटत होते कारण फार चांगला प्रतिसाद मिळत होता. स्वाभीमानी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याच्या प्रक्रीया सांगत असताना मी माझ्या विद्यार्थिनी मैत्रीणींना एक फारच वेगळे स्वप्न बघण्यास सांगितले. त्यांना मी असे सांगीतले की येणाऱ्या काही वर्षात खूप मेहनत करुन आर्थिक स्वायत्तता मिळवावी आणि पहिला पगार झाल्यानंतर आई-वडीलांना काहीतरी छानसे देण्यासोबत एक अत्यंत विक्षिप्त वाटणारी गोष्ट जरुर करावी. ती म्हणजे आपण स्वतः कमावलेल्या पैश्यातून एक दोन हजार रुपयाची नोट वेगळी काढावी आणि मोठ्या अभिमानाने ती फाडून टाकावी. दोन तुकडे झालेली ती नोट कायम आयुष्यभर जपून ठेवावी कारण त्या फाटलेल्या नोटेचे महत्व असे आहे की ती नोट फाडल्यानंतर ती का फाडली हे कुणीही विचारणार नाही कारण ती तुमची स्वतःची असेल. ती नोट म्हणजे आपल्या सक्षमतेचे प्रतिक राहील ती आयुष्यभर जपावी आणि जमल्यास ती मला आणून दाखवावी. असे आवाहन करुन मी माझे संबोधन संपविले. जवळपास दीड तास सलग बोलल्यामुळे जरा थकलो होतो पण मनाला प्रसन्न वाटत होते. थंडगार पाणी पीत मी माझ्या कक्षात बसलो होते तेव्हाच ती आत आली….

मध्यम चणीची आणि गरीब घरातील वाटावी अशी परंतू चेहेऱ्यावर एक वेगळे तेज असलेली माझी एक विद्यार्थिनी माझ्यासमोर उभी होती. तिला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे असे मला जाणविले. ती मला म्हणाली, सर तुम्ही जे सांगितलंत ते सारं मला आज मनाला पटलं. खरं तर सर मी आज येणार नव्हती पण माझ्या मैत्रीणीने सांगितले की तुम्ही बोलणार आहात म्हणून मी आली. सर, तुम्ही सांगीतलेल्या या कॉलेजमधील कोणत्याच सुविधेचा मी फायदा घेऊ शकत नाही कारण मी कॉलेजमधे येऊच शकत नाही. सर, मला माझ्या घराला सांभाळण्यासाठी माझ्या आईसोबत नांदगावपेठच्या एका कंपनीमधे नोकरी करायला जावे लागते. सर, माझे वडील मागच्या वर्षी लकव्यामुळे गेले. आम्हाला कुणाचीही मदत नाही. मला दोन लहान भाऊ बहिण आहेत आणि ते शाळेत शिकून राहीले. त्यांचे शिक्षण करण्यासाठी आणि घर चालविण्यासाठी माझ्या आईने मला म्हणले की तुला नोकरी करुन शिक्षण घ्यावे लागेल. सर, मी गेल्या वर्षीपासूनच नोकरी करते. तुम्ही सांगितलेल्या मार्गावरच मी चालली आहे. मला तुमचे सगळे पटले. माझा मोठा भाऊ माझ्याशी बोलतोय असे मला वाटले सर….तुमचे मी सगळे ऐकले पण मला तुम्ही सांगितलेले नोट फाडण्याचे स्वप्न सर्वात जास्त आवडले..सर, मला माझ्या कंपनीत १८०० रुपये पगार मिळतो त्यामुळे मी २००० रुपयाची नोट फाडू शकणार नाही कारण ते मला परवडणार नाही पण तुम्हाला आश्वासन देण्यासाठी मी एक गोष्ट करु इच्छीतेअसे म्हणून त्या माझ्या छोट्याश्या विद्यार्थी मैत्रीणीने जे केले ते मी थक्क होऊन बघत राहीलो. दोन मिनीटे तर मला काय बोलावे सुचेना…. 

त्या पोरीने शंभर रुपयाची नोट तिच्या पर्समधून काढली आणि चक्क फाडून त्याचे दोन तुकडे माझ्या टेबलवर ठेवलेआणि हमसून हमसून रडू लागलीआनंदाश्रू होते तेकाहीतरी अभिमानाने केल्याचे सुख होते ते.. मी देखील दिःमुढ होऊन तिचे ते रुप बघत राहीलो. जरा वेळाने मी तिला म्हणालोबेटा तू मला भाऊ म्हणालीस ना? तुझ्याकरीता या शंभरच्या नोटेची किंमत फार आहेम्हणून माझ्याकडून शंभर रुपये घे आणि ही फाटलेली नोट मात्र माझा पुरस्कार म्हणून मी आयुष्यभर सांभाळीनती पोर मी दिलेली नोट घेऊन गेली…. एका छोट्याश्या पोरीने माझ्या आयुष्यात कृतार्थतेचा एक अप्रतिम आणि अविस्मरणीय क्षण आणला होताज्येष्ठांचे आशिर्वाद असले की असले काही मुल्यवान क्षण जीवनाला खरा अर्थ प्राप्त करुन देतात नाही? मी माझ्याकडे जपून ठेवलीय..ती फाडलेली अभिमानी नोट!!!



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23