थोडा है थोडे की जरूरत है @ 24.10.17

बॅक डेट

मैदानावर फिरताना कधीकधी काही लोकांची पु.. देशपांडेच्या भाषेत सांगायचे झाल्यास फर्लांगभर ऐकू जाणारी कुजबुज कानावर पडते. त्यांच्या बोलण्यात कधीकधी मजेदार विषय येतात तर कधी कधी ते आपल्याला विचारात पाडतात. त्या दिवशी अशीच एक कुजबुज माझ्या कानावर पडली. कोणत्यातरी कार्यालयात काम करणारे ते कर्मचारी असावेत कारण त्यांच्या बोलण्यातील विषयावरुन मला तो अंदाज सहज बांधता आला. एका माणसाचे काहीतरी काम अडले होते. त्या कामासाठी निर्धारित वेळ देण्यात आली होती परंतू नेहमीप्रमाणे जो करतो त्यालाच साहेब कामे जास्त सांगतात या उक्तीप्रमाणे तो ते काम ठराविक वेळेत इतर कामांमुळे करु शकला नाही. आता वेळ निघून गेल्याने काय करावे हे त्याला सुचत नव्हते त्यासाठी तो त्याच्या सहकाऱ्याचा सल्ला घेत होता. त्याचा सहकारी हा सराईत कर्मचारी असावा आणि म्हणून त्याने सर्वप्रथम त्याला शांत केले. असे होत असते आणि तू जास्त ताण घेऊ नको असे सांगून त्याने त्याचा ताण कमी करण्याचा प्रयास केला. अशी अनेक प्रकरणे मी सांभाळली आहेत आणि हे पण तसेच करु असे आश्वासक शब्दात त्याने त्याला सांगितले. आता हा काय उपाय सुचवितो याबद्दल माझ्याही मनात जरा कुतुहल निर्माण झाले होते

तो सराईत कर्मचारी त्याला सांगू लागला. अरे गड्या कार्यालयात असे होतच असते. आता मी सांगतो तसे कर. तु जे काम केलेस त्याची एक कॉपी तुझ्याजवळ आहे. त्या कागदपत्रातील मागच्या सगळ्या कागदांच्या झेरॉक्स काढायच्या आणि सर्वात वरचे पत्र पुन्हा प्रींट काढायचे आणि मग असा तो कागदांचा गठ्ठा पुन्हा नव्याने तयार करायचा. आता हे सारे तयार झाल्यावर सर्वात महत्वाचे काम उरते. कार्यालयीन कामकाजामधील एक सर्वात महत्वाची गोष्ट तू लक्षात ठेवायची. ती म्हणजे पत्रव्यवहाराची नोंद असलेल्या आवक-जावक नोंदवहीत प्रत्येक आठवडा संपताना काही जागा मोकळी सोडायचीया मोकळ्या सोडलेल्या जागेचा उपयोग मी तुला सांगतो. तुझे पत्र पूर्ण तयार झाल्यावर तुला सर्वात महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे तुला मागे काम पूर्ण करण्यासाठी नेमून दिलेल्या कामाच्या दिवसाच्या आधीची तारीख म्हणजेच बॅक डेट टाकायची. ही बॅक डेट टाकणे म्हणजे सगळ्यात महत्वाचे काम आहे. ही बॅक डेट पत्रावर टाकली की सारे काही नीट नॉर्मल होऊन जाते. एक बॅक डेट सारे काही नॉर्मल करुन टाकते हे वाक्य माझ्या मनात रेंगाळत राहीले आणि मग अचानक मला एक भन्नाट कल्पना सुचलीमाणसाच्या नात्यांना आणि वागण्यालाही बॅक डेट देता आली असती तर…. 

नात्यांना आणि वागण्यांना जर बॅक डेट असती तर एका भावासोबत झालेले भांडण मला थांबविता येईल. एका छोट्याश्या कारणावरुन जीवाभावाच्या नात्यांमधे निर्माण झालेला वाद मला तो होण्यापूर्वीच त्याचे कारणच मी संपवून टाकीन. एकमेकांना बोललेले तीव्र शब्द ज्यांनी तलवारीपेक्षाही जास्त खोल जखम केली होती ते शब्दच निर्माण होऊ देणार नाही. काही चुका तो करणार नाही काही मी पण करणार नाही. ज्या छोट्याश्या कारणावरुन मतभेद निर्माण झाले ते कारण नात्यांपेक्षा मोठे नाही हे त्यालाही कळेल मलाही कळेल. एकमेकांवर असलेले निरातिशय प्रेम बंधुभाव स्मरुन एकमेकाच्या विरोधात उठलेले आम्ही तो प्रसंगच उद्भवू देणार नाही आणि मग आमच्यात अकारण झालेल्या वादावर बॅक डेट टाकून मला सगळे काही नॉर्मल करता येईलअसे खरेच करता येईल

मला मदत करणाऱ्या त्या दोघांना मला मनापासून धन्यवाद म्हणायचे होते. धोधो पाऊस सुरु असताना मी अमरावती जवळच्या एका छोट्या गावात माझी कार घेऊन गेलो होतो. पाऊस प्रचंड पडत होता त्यामुळे मुळातच छोट्या रस्त्यांवर गाडी चालविणे जरा कठीण होऊन बसले होते. एका ठिकाणी रस्त्यावरील नालीचे काम केलेले होते त्यामुळे रस्त्यावरच दगड ठेवले होते बाजुने जाण्यासाठी थोडासा रस्ता होता. त्या रस्त्याच्या बाजुने असलेल्या जागेतून कार काढण्याचे काम मला करायचे होते. समोरची दोन चाके तर व्यवस्थित निघाली परंतू माझा जरासा अंदाज चुकला आणि गाडीचे मागचे चाक सरळ नालीत गेले. चाक नालीत फसलेले, मुसळधार पाऊस येत होता आणि गाडी पुढे किंवा मागे जाण्याची सुतराम शक्यता नव्हती. काय करावे मला सुचेना. मी पावसात बाहेर पडून काय करता येईल याचा अंदाज घेत होतो परंतू काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात दोन माणसे तेथे कुठुनशी आली. त्यांनी झालेला प्रकार पाहिला मला सांगितले, साहब आप गाडीमे बैठीये और फर्स्ट गेअर डालके गाडीको स्पीड से आगे निकालनेका प्रयास करीये, तब तक हम दोनो गाडीका पहीया दोनो साईडसे ताकद लगाके उठाते हैकोण होते ते दोघे, पावसात ओलेचिंब होत ते माझी मदत का करीत होते. काही कळेना. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गाडी सुरु केली. आरश्यांमधून मला दिसत होते की त्या दोघांनी अक्षरशः हाताने गाडी जवळपास उचलली होती. त्याचवेळी मी जोरात गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केला आणि जमलेगाडी पुढे निघाली. जरा पुढे घेऊन मी गाडी बाजुला लावणार तोच मागून परत एक गाडी आली. मला खरे तर गाडीतून उतरुन त्या दोघांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानायचे होते पण मागे उभ्या असलेल्या गाडीला मार्ग सापडेना त्यामुळे मला गाडी बरीच पुढे नेऊन उभी करावी लागली. तेथून मी परत गाडीचे चाक फसले होते त्या ठिकाणी परत आलो परंतू मला मदत करणारे ते दोघे तेथून निघून गेले होते. आजतागायत मला ते दोघे सापडलेले नाही. मला मदत करणाऱ्या त्या दोन मित्रांना मला धन्यवाद द्यायचे राहीलेत. आजही मी त्या गावात गेलो तर मला त्यांची आठवण येते मी त्यांना शोधत राहतो परंतू ते मला दिसत नाहीत. या सर्व प्रसंगावर जर मला बॅक डेट टाकता आली तरतर मी गाडीत बसायच्या आधीच त्यांचे आभार मानून घेईन त्यांच्या सारखे लोक या जगात असणे गरजेचे आहे असेही मी त्यांना आवर्जून सांगीन..जर बॅक डेट टाकता आली तर नॉर्मल होईल सगळे.. असे खरंच करता येईल?

तिला त्याला सांगायचे होते ती तो तिला खूप आवडतो. त्याच्या सोबत घालविलेला प्रत्येक क्षण तिच्यासाठी अमृत क्षण असतो. त्याच्या सहवासाने तिच्या जीवनात सुरेल सुरांची बरसात होते, त्याच्या अस्तित्वाने तिच्या मनात सुरेल कविता निर्माण होते, त्याच्या चांगले म्हणण्याने तिला मनापासून प्रत्येक क्षणाला महोत्सवामधे परावर्तीत करत जगावे वाटते, त्याच्यामुळे तिच्या आसपासच्या लोकांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करण्याची क्षमता तिच्यात निर्माण झालीय, सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्यामुळे तिच्या ठायी एक प्रचंड सकारात्मकता निर्माण झालीयहे सारे तिला त्याला भेटताना प्रत्येकवेळी सांगायचे होते परंतू मनात असलेल्या एका अनामिक भितीमुळे तिला ते कधीच जमले नाही. त्याला तिने हातात हात धरुन भिता सारे सारे बोलावे असे वाटायचे. त्या दिवशी ते बोलायचे ठरले होते. ती त्या दोघांच्या ठरलेल्या जागी येऊन उभी होती, तो घाई घाईने तिला भेटण्यासाठी निघाला आणि…. एका ठिकाणी ओल्या असलेल्या रस्त्यावरुन त्याची गाडी स्कीड झाली तो धाडधूड जाऊन रस्त्याच्या कडेला आपटला…. दवाखान्यात ती त्याला भेटायला गेली तेव्हा तिला असे कळले की त्याच्या डोक्याला बसलेल्या जबर मारामुळे तो सारे काही विसरुन गेलाय. भकास डोळ्यांनी कुणालाही ओळखणाऱ्या त्याला ती बघत होतीतिच्या मनातल्या त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी तिच्या ओठावर होत्या पण..तो तिच्यापासून खूप दूर निघून गेला होताजर तिला बॅकडेट टाकता आली तर मागच्याच भेटीत ती त्याला भिता सारे काही सांगून टाकेल…. मग तिला उत्सुकतेने भेटायला येताना तो देखील जरा काळजी घेईल त्याचा असा अपघात होणार नाही. असे खरेच करता येईल?

असे काहीही करता येणार नाही. कार्यालयात पत्रावर बॅक डेट टाकून सारे नॉर्मल करता येईल पण माणसांच्या जगात तशी सोय नाही. म्हणूनच आपल्या हातात वेळ असतानाच मनातल्या साऱ्या कल्पना आणि विचार कसलीही साशंकता ठेवता किंवा भिता पूर्णत्वाला नेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. कारण कधी कधी हातातून निसटून गेलेले क्षण आपल्याला कदाचित आयुष्यभर प्रयत्न करुनही हाती लागत नाहीउरते ती केवळ खंत..मनाप्रमाणे वागल्याची त्यापोटी काही मुल्यवान क्षण कायमचे गमावल्याचीकारण इच्छा असली तरी बॅक डेट ची सोय आपल्यासाठी उपलब्ध नाही.





 

Comments

  1. Avinash... U re right. One should live life in the present without ill-will for anyone and anything! There no rewinding/ dating-back, for the Time-machine of our life...

    ReplyDelete
    Replies
    1. Yess Vivek, time machines can be there only in Hollywood films

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23