दै. तरुण भारत नागपूर मधे प्रकाशित लेख

नवी () दिवाळी


परत दिवाळी आली. नव्याने दिवाळी साजरी करण्याचा उत्साह मनात निर्माण झाला. काका काकू तयारीला लागले. बंगलोरहून मुलगा, सुनबाई आणि नातू येणार. सोबतच यावर्षी मुलगी पण येणार त्यामुळे दिवाळी कशी आनंदात जाणार या वाचारानेच ते दोघेही फार उत्साही होते. काकांनी त्यांच्या ज्येष्ठ नागरीक मंडळात सर्वांना सांगितले होते. ‘माधवरावांची या वर्षीची दिवाळी फारच जोरदार आहे बुवाअसे म्हणत सर्वांनी त्यांना चिडवूनही झाले होते. काकुंच्याही भजनी मंडळात, ‘लताताईं तर या दिवाळीत सापडणारच नाहीत आपल्यालाघरी मुलाबाळांच्या गराड्यात आपली आठवण त्या कशाला काढतीलअशी थट्टा सुरु होती. काका आणि काकू दोघेही या थट्टा मस्करी आनंदाने स्विकारत होते कारण जवळपास चार वर्षांनंतर मुलाला आणि मुलीलाही घरी दिवाळीकरीता येण्याचे जमणार होते. मोठ्या कंपनीमधे भलेमोठे पॅकेज असलेला त्याचा मुलगा कायम दिवाळीच्या दिवसांमधे परदेशात रहायचा. त्याच्या कंपनीचा व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने त्याला तोच वेळ उपयोगी असायचा. तो येणार नसल्याने त्याची बायको मुले दिवाळीकरीता घरी येणे शक्य नव्हते कारण त्या बंगलोरच्या सुनबाईंनी तिच्या नवऱ्याला आधीच सांगितले होते की, ‘बेबी (तिचा नवरा : नवऱ्याला बेबी म्हणण्याची पद्धत अद्याप आपल्या भागात रुढ व्हायची असल्याने मुद्दाम स्पष्टीकरण दिले आहे.) तू नसताना मला तुझ्या आई वडीलांसोबत कंफरटेबल वाटत नाहीत्यामुळे केवळ मुलांना घेऊन दिवाळीकरीता तिच्या नवऱ्याच्या आई वजीलांकडे येणे तिला शक्य नव्हते. मुलीचा तर प्रश्नच नव्हता. दिवाळीला आपण आपल्याच घरी हवे असे तिच्या पतीराजांनी सुरुवातीपासूनच फर्मान काढल्याने पाडव्याच्या दिवशी देखील वडीलांना ओवाळण्याची कितीही इच्छा असून तिला कधीच जाता आले नव्हते. गेली बरीच वर्षे काका आणि काकू दोघे मिळूनच दिवाळी साजरी करत आले होते. परंतू या वर्षी मात्र त्यांना त्यांच्या मुलाबाळांनी सुखद धक्काच दिला होता. मुलगा, सुनबाई, मुलगी, जावाई आणि नातवंडे सारे लोक येणार होते. या सर्वांसोबत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची काका काकुंनी जय्यत तयारी सुरु केली होती. काकांनी त्यासाठी मुद्दाम जास्त रक्कम बँकेतून काढून आणली होती. सर्वांसाठी काहीना काही आणायचे काकुंनी ठरविले होते. त्यासाठी दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासूनच त्यांनी प्रत्येकाला आवडेल या पद्धतीने खरेदी करणे सुरु केले. मुलासाठी ड्रेस, नातीसाठी खास पंजाबी ड्रेस, मुलीच्या मुलासाठी धोती कुरता, मुलीसाठी आणि सुनबाईंसाठी साड्या अशी जंगी खरेदी काकुंनी केली. नातवंडांसाठी फटाके आणले. काकुंच्या हाताला मस्त चव असल्याने तिने स्वतःच्या हाताने सर्व पदार्थ करावे असा काकंनी हट्ट पुरविला होता. काकुंनी देखील खूप काम झेपत नसुनही ते करण्याचे आश्वासन दिले होते. विशेषतः लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पहाटे गरमागरम चकल्या आणि अनारसे करण्याचे काकुंनी ठरविले. सोबतच अभ्यंगस्नान आणि सुगंधी उटणे लावून आंघोळी, दुपारी घरासमोर रांगोळ्या, पणत्यांची आरास असा सगळा जंगी बेत ठरला. दिवाळीच्या पाचही दिवसांमधे कोणकोणते पदार्थ  करायचे याची देखील एक यादी काकुंनी बनवून ठेवली होती. एकंदरीत काका आणि काकू दिवाळी प्रत्यक्ष येण्यापूर्वीच त्याच्या आनंदात रममाण झाले होते. दिवाळी हा सणच असा सुंदर असतो ना? या सणाचे विविध रंग आणि रुपं असतात. आपल्या कुटुंबामधे असलेल्या प्रत्येक नात्याला जपण्याचे काम हा सण करतो. नवरा-बायको, भाऊ बहिण, वडील-मुलगी अश्या सर्व नात्यांचा आधार असणारे प्रसंग या सणामधे समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणूनच या सणाचे महत्व काका काकुंना ठाऊक होते आणि परीवारातील सर्वच जण एकत्रीत येणार म्हणल्यावर तर धमाल होती. पाहता पाहता तो दिवस उजाडला ज्या दिवसाची ती दोघे वाट बघत होती

धनत्रयोदशीच्या दिवशी थोड्याफार फरकाने काका-काकुंची मुले त्यांच्या परीवारासोबत घरी दाखल झाली. काका-काकुंचे पाच खोल्यांचे आणि एरवी खायला उठणारे मोठ्ठे घर आता कमी पडते की काय असे वाटू लागले. नातवंडांची फारच गडबड होईल म्हणून त्यांना आपल्याच खोलीत झोपायला घेऊ असे त्यांनी ठरविले होते. घरात गप्पांचा ओघ राहील, ‘तुला तर नातवंडांपायी माझ्याशी बोलायला फुरसतच राहणार नाहीअसे काका सारखे काकुंना म्हणत होते. मुले आल्यानंतर मात्र काका काकुंनी ठरविलेले काहीच झाले नाही. झाले काहीतरी वेगळेच.असे काहीतरी वेगळे की काका काकुंनी अश्या प्रकारचा अनुभव निदान दिवाळीत तरी अनुभवला नव्हता

अभ्यंगस्नानाने सुरुवात झाली दिवाळीची परंतू केवळ काका काकुंची. आम्ही सारे एरवी खूप खूप कामे करतो त्यामुळे मस्त झोप काढायची आहे असे सर्वांनी सांगितल्यामुळे सर्वांची पहाट नऊ वाजल्यानंतरच झाली. काकुंच्या कपाळावर पडलेली आठी काकांना दिसली परंतू त्यांनी त्यांना शांत रहायला सांगितले. काकुंनी दिवाळीसाठी खास आणलेले उटणे, मोती साबण, डोक्याला लावायला सुवासिक तेल हे सारे सुनबाईंनी एका झटक्यात बाजूला सारले. आमच्या कुणाच्याही त्वचेला हे काहीच मानवत नाही. आम्ही सारे आमचे आणले आहे. त्यांचे शँपू, साबणे सारे काही स्वतंत्र आणि हायजेनिक असे काहीसे होते. गंमत म्हणून काकुंनी तिला सांगितले की आज नवऱ्याच्या पाठीला जरा साबण लावून दे तर या काकुंच्या सूचनेवर तिने व्हॉट रबीश म्हणून त्या सर्वच प्रकाराची टवाळी केली. काकुंच्या मुलीने जरा तिची बाजू घेण्याचा प्रयत्न केला परंतू तिच्या अकराव्या वर्गातील स्टाईलीश मुलीने देखील या सर्वच प्रकाराला ओल्ड अँड आऊटडेटेड म्हणून खारीज केले. नव्या आधुनिक वातावरणात वावरत असलेल्या या शहरी मंडळीचा हा बदललेला चेहेरा आणि वागणे काका काकुंना कळण्याच्या पलीकडचे होते. दिवाळीच्या निमीत्ताने केलेल्या फराळाचाही तोच प्रकार. आपल्या मुलाला आपल्या हातचे बेसनाचे लाडू मनापासून आवडतात म्हणून काकुंनी खास साजुक तुपातील लाडू केले होते. तो खायला देखील तयार झाला होता परंतू त्याच्या बायकोने पुन्हा  “बेबी, तुला आता हे असले काही चालत नाहीनाम्हणत त्याच्या हातून तो लाडू काढून परत डब्यात ठेवला. त्यानंतर व्हॉट्स ॲपवर सारख्या कुणाच्याही नावाने फिरत असलेल्या पोस्टच्या ज्ञानभंडाराच्या आधारे त्या नव्या काळच्या सुनेने हा सगळा दिवाळीचा फराळ आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे हे आपल्या सासुबाईला समजावून सांगितले. चकल्या, अनारसे, करंज्या, शेव, शंकरपाळे हे सर्व पदार्थ शरीरात काय काय वाढवतात आणि त्यामुळे हे खायलाच नको याबद्दल तिने भाषणच दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या तिच्या नवऱ्याने लग्नापूर्वी जवळपास सत्तावीस वर्षे आई कडे तगादा लावून हाच फराळ खाल्ला होता शिवाय होस्टेलमधील आपल्या मित्रांकरीता डबेच्या डबे भरुन नेले होते तो या विद्वत्ताप्रचूर भाषणावर मान डोलावित होता. काका आणि काकू या सर्व प्रकारामुळे फारच खिन्न झाले. जवळपास असाच प्रकार कपड्यांच्या बाबत झाला. काका काकुंनी सर्वांसाठी आणलेले कपडे ते लोक स्विकारायलाही तयार नव्हते कारण तश्या पद्धतीचे कपडे त्यांना घालायला आता आवडतच नाही. आईइतका खर्च करण्यापेक्षा आम्हाला पाकिटात पैसे घालून दिले असते तर आम्हाला आमच्या पसंतीचे कपडे आणता आले असते असे काकुंच्या पोरीने देखील त्यांना ऐकविले.नातवांशी गप्पा मारायच्या म्हणले तर ती सारी पोरे मोबाईल हातात घेऊन त्यात अडकली होती. त्यावरचे त्यांचे गेम्स, त्यांच्या चॅट्स या सर्व बाबींमधे त्यांना आजी आजोबांशी गप्पा मारायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. दिवाळीचे चार पाच दिवस असेच गेले. मुले आली तशी निघून गेली.

दोन दिवसांनी शेजारचे जोशी काका यांच्याकडे डोकावले. “मुलांबाळांनी काही फाराळाचे शिल्लक ठेवलेय का?” असे म्हणत त्यांनी काकुंची गंमत केली. काकुंच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि गेल्या दोन दिवसांपासून रोखलेला बांध फुटला. त्यांना रडताना बघून जोशी काककांनी या काकांकडे चौकशी केली तेव्हा काकांनी त्यांना जे सांगितले ते आजच्या दिवाळी सणाचे वास्तव आहे. काका म्हणाले, “जोशी, आपण आता जुने झालो जगण्याच्या लायकीचे नाही राहीलो रे. आपल्याला साधा दिवाळीचा सण देखील साजरा करता येत नाही.आधुनिक काळात आपण या सणा दरम्यान अनुभवलेली कोणतीच गोष्ट या नव्या जमान्याला नकोय. प्रेमाने अंगाला लावलेले उटणे नकोय, जीवाभावाने केलेला फराळ नकोय किंवा आपल्या आवडीनुसार घेतलेले कपडे पण नकोय. आपले काहीच जर आधुनिक पिढीला आवडत नसेल तर मग आपल्या असन्याचा तरी काय संदर्भ उरतो? या साऱ्या गोष्टी ज्या दिवाळीच्या निमीत्तानेच आपल्याला मिळायच्या जसे नवे कपडे, नवे पक्वान्न, फटाके, फराळाचे पदार्थ त्या कोणत्याही गोष्टीचे आता कौतुक उरलेले नाही. या साऱ्या गोष्टी सहजच आणि केव्हाही उपलब्ध होत असल्याने दिवाळीच्या वेळी होणाऱ्या या कोणत्याही बाबीला त्यांनी का महत्व द्यावे? हरकत नाही. आपण जुने झालोत. परंतू एक मात्र नाही पटत जोशी.. या साऱ्या गोष्टी जुन्या झाल्या तरी आपल्या आपल्या मुलांबाबतच्या भावना मात्र अजुनही टवटवीत आणि  तितक्याच तीव्र आहेत. त्या भावनांचा चुराडा करण्याचा अधिकार या नव्या पिढीला कुणी दिलाय? आईने आवडीने केलेला लाडू हेल्थ कॉन्शीअसनेसच्या नावाखाली आणि फिगर मेंटेन करण्याच्या सबबीखाली खाताच टाकून दिला जातो. खरे म्हणजे तो लाडू बाजूला केला नसतो तर तो लाडू बनविणाऱ्या त्यामागील भावनांना पायदळी तुडविले जात असते. परंतू आपल्या सो कॉल्ड आधुनिक वागण्याने आपण आधिच्या पिढीचे मन दुखावतोय याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही ही माझी मोठी खंत आहे. जाऊ द्या.. अनेक सणांसारखा दिवाळी हा सण देखील आता संपला असे म्हणायला हरकत नाही. अशी झाली जोशीबुवा आमची अजिबात नविन नसलेली दिवाळी..” कसेनुसे हसत काकांनी आपल्या मनातल्या विचारांचा निचरा केला. वातावरण निवळण्यासाठी जोशी काका म्हणाले..चला तर मग याचा अर्थ फराळाचे पदार्थ शिल्लक आहेत..आणा मग थाळी भरुन जेवढे दातांनी जमतील तेवढे दातांनी खाऊ बाकी खलबत्त्यातकाका काकू खळखळून हसले. काकू उठून फराळ आणायला गेल्या..लाडवाचा डबा उघडल्यावर त्यानी काकांना ऐकविलेले वाक्य आठवले. त्या म्हणाल्या होत्या, “अहो, हे सारे लाडू मी माझ्या लेकरांसाठी कलेले आहेत. तुम्ही दुपारच्यावेळी मी झोपली असताना खायचे नाहीत..पोरांचे खाणे झाल्यावर उरले तर मी तुम्हाला देईन..” पूर्णपणे भरलेल्या त्या डब्यातील दोन लाडू हातात घेतल्यावर काकुंना भरुन आलेडोळ्यातून अश्रू ओघळला.. तो अश्रू त्यांच्या त्या आधुनिकतेने वावरणाऱ्या मुलाला, मुलीला, सुनेला, नातवंडांना कधी दिसेल?

-डॉ. अविनाश मोहरील /९४२३१२३९०६



Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23