थोडा है थोडे की जरुरत है @ 26.12.23

फील इन ब्लॅन्क्स

नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या महाविद्यालयातील एक माजी सहकारी प्राध्यापिका यांच्याशी सहजच बोलण्याचा योग आला. त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला हजर राहण्याचा योगही आला होता. त्यानिमित्तच त्यांचा फोन होता. जुन्या ज्येष्ठ सहकारी असल्याने, सोबतच मानाने अनुभवाने देखील खूप मोठ्या असल्यामुळे त्यांच्याशी बोलणे मला फार आवडते. काही ना काही मिळत राहतं त्यांच्या बोलण्यातून. सर्वात महत्वाचे म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी जपलेली सकारात्मकता जी त्यांच्या वागण्यात बोलण्यात मला भरभरून आढळते. त्या दिवशीही बोलता बोलता त्या असे काही बोलून गेल्या की मी त्वरित त्यांच्या बोलण्याला दाद दिली त्यांना सांगितले की मॅडम, मला एक छान विषय मिळालाय, थोडा है.. च्या वाचकांसोबत शेयर करायला. त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची चर्चा झाल्यानंतर मी त्यांना सहज विचारले, मॅडम, आणखी काय सुरु आहे तुमचे? त्या पटकन म्हणाल्या, मी सध्या फील इन ब्लॅन्क्स करते आहे आणि मला त्याच्यात समाधान आहे. मला तो शब्द फारच आवडला, फील इन ब्लॅन्क्स अर्थात रीकाम्या जागा भरणे. त्यांनी हा शब्द त्यांच्या सध्याच्या जीवन शैली बाबात वापरला जो फारच चपखल असा होता. वयाच्या पंचाहत्तरीमधे किंवा एरवीही कसे वागले पाहिजे किंवा समाधानाने जगण्यासाठी कसे वागायला हवे हे त्या छोट्याश्या शब्दांनी त्यांनी मला सांगितले. त्याचा संदर्भ एवढा छान होता की मला त्यांचे मनापासून अभिनंदन करावे वाटले.. मी ते केले

वाढत्या वयानुसार ज्येष्ठांच्याही जीवनामधे अनेक बदल होतात. वय जसे जसे वाढते तश्या प्रकृतीच्या तक्रारी, त्यामधून कधी कधी वाटणारी असहायता, मग त्याच्या मागोमाग डोकावणारी असुरक्षितता हे सारे मनाचे खेळ चाललेले असतात. मग या सर्व बाबींमुळे कधी कधी ज्येष्ठांचे वागणे आधीच्या पिढीला रुचत नाही त्यामधून अनेक गैरसमज निर्माण होतात अखेर पिढ्यांमधे दुरावा निर्माण होतो. या सर्व बाबी टाळण्याचा मॅडमनी काढलेला खूपच छान उपाय म्हणजे रिकाम्या जागा भरा. अर्थात ती गोष्ट साधणे काही सोपे नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने निस्पृहता साधावी लागते. एखाद्या घरात अनेक वर्षे राहील्यानंतर त्या घरात प्रमुख म्हणून सारे काही सांभाळल्यानंतर त्या सर्व बाबींपासून हळू हळू बाजूला होणे ही फारच कठीण बाब असते फार कमी लोकांना ती जमते. मॅडमनी मात्र ती फार छान जमविली म्हणूनच मोठ्या आनंदानी त्या मला म्हणाल्या की सध्या माझे फील इन ब्लॅन्क्स सुरु आहे

या शब्दाचा अर्थ असा की मॅडम कधी आपल्या मुलीकडे राहतात, कधी आपल्या मुख्य घरी, मुलासोबत राहतात ज्या घरी त्यांचे काम असेल तेथे त्या छान ॲडजस्ट होतात. मुलगी, सुना, नाती, मुलगा, पती यांना जशी जशी गरज पडेल तशी तशी मदत करतात मदत करणे आटोपले की हलकेच बाजूला होतात आणि आपल्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कामात पुन्हा गुंग होतात. या सर्व गोष्टीची सुंदरता अशी आहे की त्या हे सारे करताना कशाचाच दुराग्रह करत नाहीत. म्हणजे सांस्कृतिक वर्तुळामधे कार्य करणे आवडते ते योगदान त्या देतात परंतू जर त्या कामादरम्यान घरी कुठे गरज पडली तर, पटकन ते काम महत्वाचे असले तरी, सहजच बाजूला ठेवतात घरची रीकामी जागा भरून काढतात. ती जागा भरताना म्हणजे, तेथे मदत करतानाही तेथेच अडकून पडत नाहीत तर तेथले आटोपले की पटकन दुसरीकडे सामावून जातात. घर असो अथवा सांस्कृतिक क्षेत्र असो, माझ्याशिवाय कुणाचे पानच हलू शकत नाही असा दुराग्रह त्यांनी अजिबात ठेवलेला नाही परंतू मदत लागली तर मी आहेच हा विश्वास देखील त्यांनी निर्माण केला आहे. कुठेही फार अडकून राहता, परंतू सर्वांना मदत करत आणि आपली सांस्कृतिक कार्याची आवडही जोपासत त्या अत्यंत आनंदी जीवन जगत आहेत. माझ्या मते जीवन जगण्याची खरी पद्धत मॅडमना कळलेली आहे.

बरेच वेळा घरी असो अथवा सामाजिक क्षेत्रात असो, व्यक्ती व्यवस्थांना एवढ्या चिकटलेल्या असतात की ही व्यवस्था माझ्याशिवाय चालूच शकत नाही असा भाव अकारणच त्यांच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे ते करीत असलेल्या कामांबद्दल अहम निर्माण होतो इतरांच्या क्षमतांवर कायम प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. व्यवस्था या माणसांमुळेच चालतात हे जरी खरे असले तरी त्या एकाच विशिष्ट व्यक्तीमुळे चालतात हा भ्रम अनेकांनी मनात जोपासला असतो त्यामुळे त्या व्यक्ती दुःखी त्रासलेल्या असतात. त्यांना जीवनाचा आनंद घेता येत नाही. मॅडमचे फील इन ब्लॅन्क्स चे धोरण सर्वच ठिकाणी खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते कारण व्यवस्थांचे कुणावाचूनही अडत नसते हे खरे वास्तव आहे. हे वास्तव ज्या दिवशी लक्षात येते, तेथून आनंदी ताणरहित जीवनाचा प्रवास सुरु होतो.




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18