थोडा है थोडे की जरुरत है @ 19.12.23

वेदना

८१ वर्षांचे आजोबा माझ्याशी बोलत होते. मी त्या दिवशी सायंकाळी फिरायला निघालो होतो. त्यामुळे चालता चालता मी त्यांचे ऐकत होतो. माझ्या लिव्हींग वील बद्दलच्या लेखासंबंधी प्रतिक्रीया दिल्यानंतर ते मला म्हणाले की आपण मांडलेल्या संकल्पनेमुळे बऱ्यापैकी मदत होणार आहे परंतू त्याच्याही पुढे खरे तर जाण्याची गरज आहे. वैद्यकीय उपचारच नाही तर जीवनही नाकारण्याचा अधिकार असायला हवा. जीवनाची स्थिती कधी कधी अशी होऊन जाते की त्याचे ओझे होऊ लागते त्यामुळे त्याचा देखील त्याग करण्याचा अधिकार मिळायला हवा. मी त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणालो, काका असे का बोलताय? असे जीवन संपविण्याचे बोलू नये. ते आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे अडचणी असल्या तरी सकारात्मकतेनेच जीवनाकडे बघावे. आपले खरे आहे की कधी कधी परीस्थिती फार वाईट होऊन जाते अश्यावेळी असे नकारात्मक विचार मनात येणे अपरीहार्य असतात. परंतू असे नका बोलू. माझे बोलणे ऐकून ते मला म्हणाले, बेटा तू माझ्या मुलाच्याच वयाचा आहेस असे तू सांगितले. तू मला जे समजावतो आहेस ना ते मला कळतेच. गंमत सांगू? मी तुला माझे आयुष्य संपविण्याकरीता अधिकार द्यावा असे सांगत नाहीये. मला तो हवाय माझ्या पत्नीचे माझ्या २१ वर्षाच्या नातवाचे आयुष्य संपविण्याकरीता हवाय. मला त्यांचे वाक्य ऐकून धक्काच बसला. त्यातही मी त्यांच्या पत्नीबद्दलचे समजू शकलो परंतू २१ वर्षाच्या नातवाचे आयुष्य संपवायचे? मी एकदम त्यांना विचारले, काका? हा काय प्रकार? त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर आपले मन मोकळे केले. पंधरा ते वीस मिनीटे त्यांचे मी ऐकत होतो. हुंदके देत देत, डोळे पुसत पुसत ते बोलत होते. ज्यावेळी सारे काही सांगून झाले तेव्हा त्यांना मानसिक का होईना परंतू त्यासाठीही माझ्याकडे शब्द नव्हते. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या मंदीराच्या पारावर बसलो. मन सून्न झाले. एखाद्या व्यक्तीच्या जिवनात एवढ्या टोकाची वेदना असू शकते? आपण तर अतिशय सामान्य छोट्या छोट्या गोष्टींबद्दल खिन्न होतो किंवा आपल्याला ताण येतो. त्या काकांनी काय करावे?

निवृत्तीच्या तिसऱ्या दिवशी ते काका आजोबा झाले होते. जरा उशीरा त्यांच्या मुलाला अपत्य झाले. परंतू आजोबा होण्याच्या आनंद वेदनेने झाकोळून गेला. कारण नातू जन्माला आला त्याची आई म्हणजे काकांची सून मुलाला जन्म देताच जग सोडून गेली. काकांच्या मुलाची खाजगी नोकरी असल्याने साठाव्या वर्षी काकांना काकूंना आपल्या नातवाचे पालकत्व स्विकारावे लागले. त्याहून दुर्दैव म्हणजे तो नातू मानसिक शारीरिकदृष्ट्या सुदृढ नव्हता. मुलाची नोकरी साधारणच होती त्यामुळे त्याला फार वेळ त्यासाठी द्यायला लागायचा. त्यात पुढे त्याला व्यसन लागले दुर्दैवाने त्याचाही मृत्यू झाला. एक संपुर्णपणे अपंग असलेल्या नातवाची जबाबदारी या काका काकूंवर आली. गेली २१ वर्षे ते नातवाला सांभाळत आहेत. त्यात भर म्हणजे गेल्या वर्षांपासून काकू देखील बिछान्यावर आहेत. ८१ वर्षाचा तो वृद्ध गेली पाच वर्षे या दोघांना सांभाळतो. ७६ वर्षांची अंथरुणाला खिळलेली बायको मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग २१ वर्षांचा नातू. भरुन आलेल्या आवाजात ते मला म्हणाले की, सर मी तुम्हाला या दोघांच्या जीवन संपविण्याच्या अधिकारांबद्दल बोललो. खरे तर गेली पाच वर्षे मी जीवन कसे जगतोय ते मला सांगताच येणार नाही. परंतू तरी देखील मी माझ्याकरीता जीवन संपविण्याचा अधिकार मागत नाही कारण मी जर गेलो तर या दोघांचे कसे होणार? मला वयाच्या ८१ व्या वर्षी देखील ते मागता येत नाही. परंतू माझ्या पत्नीच्या माझ्या भान हरपलेल्या नातवाच्या वेदना आता मला बघवत नाही. सर, तुम्हाला खरे वाटणार नाही परंतू या दोघांचे मला जमेल तेवढे करून मी जेव्हा जरावेळ बाहेर पायऱ्यांवर बसतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू कसे वाहतात ते कळत नाही. रडायला येतं, भिती वाटते, चिंता वाटते, खिन्न होतो, जोरात किंचाळावे वाटतेपण परत काही वेळाने मलाही समजणाऱ्या भाषेत नातू हाक मारतो डोळे पुसून मी त्याच्याकडे त्याला बघायला जातो. घरी कामकाजाला माझ्या तुटपुंज्या पेन्शनमधून मिळणाऱ्या पैश्यामधून एक घरकाम करणारी ताई येते. परंतू ती काय काय करणार? बेडवर कायम पडून राहीलेल्या या दोन्हीही पेशंट्सचे डायपर तर मलाच बदलावे लागतात. म्हणून मी तो जीवन संपविण्याच्या अधिकाराकरीता काही आहे का असे विचारले. सर, मी क्रूर नाही होमला समजून घ्या

मंदीराच्या पारावर बसून ८१ वर्षाच्या त्या ज्येष्ठ नागरीकाची व्यथा त्याची कल्पना करून माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू कसे ओघळले ते मला कळले नाही. खरे सांगू? त्यावर काय बोलावे किंवा लिहावे हे अजूनही मला सूचत नाहीये.. 




Comments

  1. मन सुन्न झाले... अंगावर शहारा आला... खरंच एखाद्याच्या पुढ्यात काय काय वाढून ठेवलंय त्याने हे त्यालाच माहीत...

    आजोबांच्या प्रश्नाला तुमचे काय उत्तर असेल याची वाट बघतेय...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18