थोडा है थोडे की जरुरत है @05.12.23

डीफेन्स मेकॅनिझम

माझ्या मागच्या लेखात मी वर्णन केलेल्या घटनेबद्दल काही वाचकांनी आपली फारच छान मते नोंदविली. काही जणांनी हे असे एखादा गुंड किंवा मस्तवाल श्रीमंतच करु शकेल असे लिहीले. त्या माझ्या वाचकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की अश्या पद्धतीचा ताणाचा उद्रेक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतो. त्यासाठी गुंड प्रवृत्तीच असायला हवी असे नाही. अगदी सामान्य जीवन जगणाऱ्या कुणाच्याही जीवनात अश्या पद्धतीची रीएक्शन दिल्या जाऊ शकते. याचे कारण ज्यावेळी अशी रीएक्शन दिली जाते त्यावेळी मेंदुची सारसार विचार करण्याची क्षमता संपलेली असते साचत गेलेल्या ताणांनी त्या सारासार बुद्धीमत्तेची जागा अविचाराला दिलेली असते. अगदी काही दिवसांपूर्वी विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात भारताचा पराभव झाला त्यानंतर त्याचा राग म्हणून एका माणसाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली. बरे झाले आपली टीम हरली असे त्या लहान भावाने मोठ्या भावाला चिडविले होते त्यामुळे त्याने त्याचा जीव घेतला. आता हा प्रकार त्या मॅचमुळे निश्चितच घडला नाही. ते केवळ एक निमित्त ठरले. त्याआधीच त्या मोठ्या भावाचे मन ताणांनी ग्रासले होते त्याचा उद्रेक अश्या वाईट प्रकारे झाला. आपली कुणी गंमत केली किंवा आपल्यावर कुणी टिका केली तर ती सहन झाल्यामुळे आकांततांडव करणारे आपण रोजच टीव्हीवर बघतो. हा सगळा अजाणतेपणी साचत जाणाऱ्या ताणांचाच परीणाम आहे. अत्यंत गतीमान कॉम्प्लेक्स झालेल्या जीवनामधे हे ताण जमा होणे स्वाभाविक आहे ज्यांना टाळणे केवळ अशक्य आहे. परंतू या ताणांचा आपल्या वागणूकीवर परीणाम होऊ नये याकरीता डीफेन्स मेकॅनीझम तयार करणे हे आपल्या हातात आहे. ते करणे गरजेचे आहे.

यामधला पहीला भाग म्हणजे स्वतःहून स्वतःचे महत्व कमी करणे. माझ्याशिवाय पानही हलू शकत नाही, केवळ मीच ही कामे करु शकतो मी नसेन तर काहीही होऊ शकणार नाही हा वृथा अभिमान हळूहळू कमी करणे गरजेचे आहे. कारण या आत्मस्तुतीमग्नतेचा मोठा ताण असतो. यामुळे आपण कामाच्या ताणापासून दूरच होत नाही किंबहुना आपल्या सबकॉन्शीयस लेव्हलवर त्याच कामाचा विचार मनात असतो पर्यायाने तो ताण वाढवत राहतो. काही कार्यालयांचे मुख्याधिकारी सुटीवर असताना देखील सीसीटिव्ही च्या मोबाईल ॲपवरून कार्यालयावर लक्ष ठेऊन असतात. परीवारासोबत छान समुद्रकिनारी फिरायला गेल्यावरही त्यांचे लक्ष त्या सीसीटिव्ही ॲपकडे असते. नेहेमीच्या कामापासून मनाने दूर होणे हा डीफेन्स मेकॅनिझमचा दुसरा भाग आहे. अन्यथा कामांमधील ताण आपल्या मनाचा आनंदी भाग कुरतडत राहतात आपण ताणग्रस्त होत राहतो. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या नेहेमीच्या कामाव्यतिरीक्त काहीतरी असे जे आपल्याला आनंद देते तेथे आपण सर्वकाही विसरून रममाण होऊ शकतो अशी किमान एक गोष्ट आयुष्यात हवी. गाणे म्हणणे, एखादे वाद्य वाजवणे, ट्रेकींगला जाणे, सिनेमा बघणे, वाचन करणे असे काहीतरी हवे जे आपल्याला आपले रुटीन पूर्णपणे विसरायला बाध्य करेल आपले मन रीफ्रेश होईल. चौथा भाग म्हणजे किमान एक दोन अश्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असाव्यात ज्यांच्याजवळ आपल्याला आपले मन मोकळे करता येईल. त्यांच्याजवळ आपल्याला काहीही सांगता येईल ते आपले सारे काही कोणताही पूर्वग्रह ठेवता विश्वासाने ऐकून घेतील. अश्या व्यक्ती आपल्या आयुष्याची सर्वात मोठी मिळकत असतात. पाचवा भाग म्हणजे हळू हळू आपल्या मनाला असे ट्रेनींग द्यायचे की कोणाबद्दलही किंवा कश्याबद्दलही वाईट बोलायचेच नाही. कितीही राग आला, चीड आली किंवा पटले नाही तरी त्याबद्दल बोलायचे नाही. केवळ चांगलेच बघायचे चांगलेच बोलायचे. सहवासातील एखादी व्यक्ती चुकत असेल तरी त्याबद्दल कुणाजवळही उल्लेख करायचा नाही. त्या व्यक्तीमधील चांगल्याच गोष्टी बोलायच्या. हे जरा कठीण आहे कारण जो हजर नाही त्याच्याबद्दल बोलण्यात आपल्यापैकी अनेकांचा खूप वेळ जातो. परंतू त्या गोष्टीमुळे नकारात्मक गोष्टीच मन शोधायला लागते. हातात अक्षरशः चाबूक घेऊन आपल्याच मनाला समजवायचे त्याला केवळ सकारात्मकच बघायला बाध्य करायचे. शेवटचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आजचा दिवस भरभरून जगायला शिकणे. काल काय झाले होते याबद्दल रडत बसण्यापेक्षा किंवा उद्या काय भयंकर होईल याची अवास्तव काळजी करण्यापेक्षा, मस्त मौजेत, मुक्त जीवन जगता यावे. आजचा जो सुंदर दिवस मिळालाय तो सर्वार्थाने सुंदर बनवावा, लोकांना हसवावे, आपणही हसावे. असे केल्याने अपरीहार्यपणे येणारे ताण फार काळ रहात नाही आपण रीफ्रेश होतो. हे रीफ्रेश होणे जमणे म्हणजे ताणांच्या उद्रेकावरील सर्वात मोठे डीफेन्स मेकॅनीझम साधणे होय. जमेल ना?




Comments

  1. खरे आहे....रोजच्या वर्तमान पत्रातील मारहाण, हत्या ह्यांच्या शी संबंधित बातम्या हेच दर्शवतात बहुतांशी...भावनेचा क्षणिक उद्रेक च त्यांना कारणीभूत असतात...अन् आपला इगो आपल्याला डिवचत राहतो नकारात्मक गोष्टींसाठी आणि प्रवृत्त करतो सकारात्मकते साठी...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18