थोडा है थोडे की जरुरत है @12.12.23

मरायचं काही करता येईल का?

गेले दोन आठवडे मला आजपर्यंत कधीच आले नाही एवढे फोन येत आहेत. हे सर्व फोन ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. माझ्याशी ही मंडळी भरभरून बोलत आहेत त्यांचा बोलण्याचा उत्साह बघून मी देखील त्यांना बऱ्यापैकी वेळ देतोय. यात आजोबांसोबत बऱ्याच आज्या पण आहेत. हे सारे फोन मला येण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात मी माझे सर डॉ. सत्यनारायण लोहिया यांनी केलेल्या लिव्हींग वील बद्दल एक लेख लिहीला होता. तो लेख मी माझ्या थोडा है थोडे की जरुरत है या ब्लॉगवरून शेअर केला होता. मला माहित नाही कसे परंतू हा लेख मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोकण या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स ॲप समुहामधे पोहोचला. त्या लेखासोबत माझा दूरध्वनी क्रमांक दिला असल्याने ज्यांना ज्यांना हा लिव्हींग वीलचा विषय पटला त्यांनी मला फोन करणे सुरु केले. मला देखील या सर्व ज्येष्ठ मंडळींना याबद्दल सांगणे, त्या वीलची कॉपी पाठविणे त्याच्या शंकांचे निरसन करणे हे मला आवडते आहे. या विषयाबद्दल बोलताना ही ज्येष्ठ मंडळी भरभरून बोलतात. यामधे बरेच वेळा ते आपली व्यक्तिगत दुःखे वेदना देखील मला सांगतात आणि शेवटी मी त्यांचे ऐकून घेतले म्हणून आभार मानतात. आम्हाला हे बोलताही येत नाही, निदान तुम्ही ऐकून घेतलंत याचा आनंद आहे असेही सांगतात. एकंदरीत लिव्हींग वील या विषयाशी अनेक लोक सहमत आहेत त्यांना ते करावे वाटते आहे. या सर्व लोकांना मी डॉ. लोहीया यांनी केलेल्या लिव्हींग वीलचा ड्राफ्ट पाठवला. त्यांना त्याबद्दल अडचण असल्यास लोहीया सरांशी संपर्क करायला सांगितला. मला फोन करणारे बरेच लोक केवळ नवरा बायको राहतात. मुले सोबत नाहीत. पैसे पाठवतात परंतू त्यांचा पैसा देखील नकोसा झाला आहे. कारण ज्या वयात ते आहेत तेथे प्रत्यक्ष सहवास हवा असतो तो मिळत नाही. अर्थात मुलांना त्यांचे आयुष्य परदेशात जाऊन समृद्ध करण्याचा अधिकार आहे हे ते मान्य करतात. पण मग सोबतच आजारपणासाठी पैसे पण नको अशी भुमिका त्यांनी आता घेतलीय. म्हणूनच त्यांना लिव्हींग वील फार आवडल्याचे त्यांनी मला सांगितले. एक आजी माझ्याशी बोलत होत्या ज्या गेली दोन वर्षे बेडवर आहेत. मुलाचा प्रचंड पैसा त्यांच्या आजारपणावर खर्च होतो आहे त्यामुळे त्यांना फारच अवघडल्यासारखे होतेय असे त्यांनी सांगितले. तीन वेळा आसीयूची ट्रीप करून मी आलेय असे त्या गमतीने म्हणाल्या. मला हे कुणाजवळ बोलता येत नाही पण मला माझ्या मुलाला होणारा त्रास कमी करायचा आहे. लिव्हींग वीलचा मला उपयोग होईल असे त्या आनंदाने म्हणाल्या. असे अनेक फोन मी गेले दोन आठवडे घेतो आहे ज्येष्ठांसोबत छान संवाद होतो आहे. हे सारे गेले दोन आठवडे सुरु असताना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी मी झाडांना पाणी घालत असताना जो एक फोन आला त्या फोनमुळे मात्र मी फार डीस्टर्ब झालो. साधारण पंचेचाळीस मिनीटे ती व्यक्ती माझ्याशी बोलत होती. त्या संवादामधे त्यांनी मला काही प्रश्न विचारले ज्याची उत्तरे मी दिली परंतू त्याबाबत मी समाधानी नाही किंवा ती मला सापडलेली नाही. खरे तर मी त्या फोनमुळे हादरून गेलो.  

सुरुवातीला लिव्हींग वील हे कसे योग्य आहे वगैरे बोलणे झाल्यावर त्यांनी मला अचानक विचारले, मोहरील सर, यासोबत एखादे डाईंग वील करता येईल का हो? मला त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात आला परंतू ते तसे का बोलत आहेत याची कारणे जेव्हा त्यांनी मला सांगितली तेव्हा मी जरा दचकलो. एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती जास्त वेदना असू शकते याचा मला प्रत्यय आला. आपले आयुष्य आनंदात जगत असताना बरेचवेळा आपण वेदनांचा विचार करत नाही. परंतू काही लोकांच्या आयुष्यातील वेदना ऐकल्यावर त्यांच्याबद्दल सहसंवेदना निर्माण होऊन आपण शहाणे होतो असे म्हणावे लागेल. अशीच तीव्र सहसंवेदना मला त्या आजोबांशी बोलताना जाणवली. पंचेचाळीस मिनीटांच्या त्या कॉलमधे ते दर पाच सात मिनीटांनी हुंदके देऊन रडत होते पुन्हा बोलत होते. ८० वर्षाच्या माणसाच्या आयुष्यात परमेश्वराने एवढी टोकाची वेदना द्यावी याचाच मी संपुर्णवेळ विचार करत होतो… (क्रमशः)




Comments

  1. काही करायचं असते त्या करिता तो आपणास मनुष्य जन्मी थांबवितो ... मरायच काहीच करता येत नाही...मी मरून जिवंत आहे .Dr नी सांगितले होते heart is failed परंतु मी लढून परत आलो मरायच काही करता येईल...नाही करावं लागत.

    ReplyDelete
  2. कधी इच्छा होते ती झाली तरी आपली जबाबदारी मागे ओढते आपल्याला... म्हणून मरायचे काहीही करता येत नाही..... फक्त लढत राहावं लागत नको असलेल्या वेदना विरुद्ध

    ReplyDelete
  3. Beautiful article sir!💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18