थोडा है थोडे की जरुरत है @ 03.02.23

स्पर्श.. ()

सर, मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते फारच वाईट आणि त्रासदायक आहे. माझा काहीच इलाज नाही. म्हणूनच माझ्या मुलीला येथून घेऊन जाणे हाच एक पर्याय माझ्याकडे आहे. सर, माझ्या मुलीला माझ्याच सख्ख्या भावाकडून, तिच्या मामाकडून धोका आहे. ही गोष्ट माझी मुलगी येथे आल्यापासूनच सुरु झाली. माझा भाऊ गेल्या काही महिन्यापासून माझ्या मुलीला चुकीचा स्पर्श करतो आहे. सुरुवातीला माझ्या मुलीच्या लक्षात आले नाही. पण नंतर मात्र तिच्या लक्षात आले की हे काहीतरी वेगळे आहे. कॉलेजमधून परतल्यावर त्याची बायको घरी नसते. खरे तर हा पण नोकरी करतो पण दुपारी मुद्दाम घरी जेवायला येणे त्याने सुरु केले. माझ्या मुलीला त्याच्या बायकोने सूचना दिल्या होत्या की दुपारी मामा घरी आल्यावर अन्न गरम करून घ्यायचे नंतर त्याला वाढायचे स्वतः देखील जेवायचे. ही अन्न गरम करत असताना हिच्या खांद्यावर हात ठेवून तो हिची चौकशी करायचा. जवळ येऊन उभा रहायचा. सुरुवातीला हिला फार काही वाटले नाही पण नंतर तो हिला सोबत जेवायला बसायला सांगायचा. गप्पा करता करता हिच्या मांडीवर हात ठेवायचा, टाळी द्यायचा त्या निमित्ताने हात हातात ठेवायचा. जिच्या बाबत हे बोलणे सुरु होते ती अचानक शहारली. तिला कदाचित तो वाईट स्पर्श आठवला असावा. मी पुन्हा तिला बाहेर जायचे असेल तर जाऊ शकतेस असे सांगितले. माझ्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेने देखील तिला सांगितले परंतू तिला तेथेच बसायचे होते. आम्ही नंतर तिला बाहेर जाण्याचा फार आग्रह केला नाही. तिची आई पुढे सांगू लागली.

सर, हे सारे गेले चार महिने सुरु आहे. शेवटी हे सहन झाल्यामुळे हिने हिच्या चुलत बहिणीला हा सगळा प्रकार सांगितला. तिच्याकडून मला या साऱ्या गोष्टी कळल्या. सर, माझा एवढा संताप झाला की काय सांगू? पण सर, मी काही करु शकत नाही. तो माझा सख्खा भाऊ आहे. मला हे कळल्यावर, मी त्याला बोलायला गेली तर तो उलट माझ्यावरच ओरडायला लागला. त्याच्यापेक्षा जास्त त्याची बायको ओरडायला लागली. आपल्या नवऱ्याची बाजू सांभाळण्याकरीता या माझ्या मुलीबद्दलच नाही नाही ते बोलायला लागली. हिच्या कपड्यांबद्दल, हिच्या वागण्याबद्दल, चारित्र्याबद्दल अचानक खूप साऱ्या तक्रारी करायला लागली. मनात आले की सरळ पोलीस स्टेशन गाठावे सारा प्रकार त्यांच्या कानावर टाकून माझ्या भावाला चांगली अद्दल घडवावी परंतू नाही जमले सर. खरच नाही जमले. शेवटी तो भाऊ आहे. माझा सख्खा भाऊ. त्याला जेलमधे कसे पाठवू मी? हे सांगताना त्या माऊलीचा गळा भरून आला ती रडू लागली. माझ्या सहकारी प्राध्यापिकेने तिला धीर दिला. आपल्या आईची अगतिकता बघून ती पोर देखील रडायला लागली. जरा शांत झाल्यावर तिची आई मला म्हणाली. सर, यावर एकच पर्याय आहे. हिला येथून घेऊन जाणे. माझ्या पतीचा तर हिच्या शिक्षणाला विरोधच होता. ही गोष्ट जर त्यांना कळली तर ते माझ्या भावाचा खूनच करतील. ते अतिशय तापट डोक्याचे आहे. गोष्ट फार वाढू नये म्हणून मी आता हिचे नाव काढून हिला सोबत घेऊन जाते. सर, हिची टीसी द्या. त्यानंतर पुढील अर्धा तास मी तिला राहण्याची पर्यायी व्यवस्था देऊ वगैरे सांगून बघितले परंतू त्यांचा निर्णय झालेला होता. अत्यंत दुःखी मनाने मी त्या मुलीच्या टीसी वर सही केली. केविलवाणा चेहेरा करून ती मला नमस्कार करून निघून गेली.

अश्या किती मुली अश्या वाईट स्पर्शांना बळी पडत असतील अश्या किती जणींना ते स्पर्श करणारे लोक अत्यंत जवळचे नातेवाईक असल्याने तोंड बंद ठेवावे लागत असेल. काही जणी तर सांगूही शकत नसतील निमूटपणे असे किळसवाणे स्पर्श सहन करत असतील. अश्या स्पर्शांना काही मुले देखील बळी पडत असतील. हे करणाऱ्या जवळच्या नातेवाईकांविरुद्ध काही करता येत नाही म्हणून हा असला घाणेरडा त्रास अजुनही आपल्या समाजात सहन केला जातो. या संदर्भात प्रचंड काम करण्याची गरज आहे. सोशल मिडीयावर जातीपातीची किंवा राजकीय भांडणे करण्यापेक्षा या विषयासंदर्भात जनजागृती करण्याकरीता आपले प्रयत्न फार उपयोगी ठरणार आहेत. निदान अश्या त्रासांमुळे पिडित असलेल्यांना त्या त्रासाबद्दल व्यक्त होण्याचे बळ जरी आपण प्रदान करु शकलो तरी या असल्या प्रकारांस आळा घालता येऊ शकेल. प्रयत्न सुरु करायला हवे. होय ना?





Comments

  1. पुढील भागात काय असेल याचा अंदाज होता. वाचून अंगावर काटे उभे राहिले. खरंच भयंकर अवस्था आहे. काय बोलावे काही सुचत नाहीये... 😔

    ReplyDelete
  2. फारच भयन्कर आहे ,हे

    ReplyDelete
  3. फक्त स्पर्श च नाही, मुलींना समाजात खूप वाईट नजरानांसुद्धा face करावं लागत. सामाजिक स्थळी कार्यालयात बऱ्याच ठिकाणी... पण हा प्रकार आवश्वासनीय.. सख्खा मामा.

    ReplyDelete
  4. नुकतेच ज्ञानमाता शाळेत घडलेला प्रकार समोर आला. काय मनस्थिती राहत असेल त्या मुलींची? हा विचार करूनच अंगावर काटा येतो. पण यावर एक उपाय म्हणजे आई वडिलांनी आजच्या पिढीतील मुळणाबरोबर मित्रत्वाच्या नात्याने वागायला हवे तसेच त्यांच्या दिवसभरातील सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवावं. असे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. भयंकर परंतु वास्तव

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18