थोडा है थोडे की जरुरत है @ 30.11.21
धिरोदात्तपणामागील हळवेपण
तशी त्यांची ख्याती अतिशय शिस्तप्रिय आणि कडक व्यक्तिमत्व म्हणूनच. एका मोठ्या संस्थेचा एवढा मोठा डोलारा सांभाळायचा म्हणजे सोपे काम नव्हते. वेगवेगळे लोक, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या समस्या. या सर्व बाबींना सामोरे जात नकळत एक जरब बसविणारे व्यक्तिमत्व तयार होत गेले. वेगवेगळ्या प्रसंगांना धीराने तोंड देण्याची सवयच झाली असल्याने धीरोदत्तपणा हा स्वभावाचा मूळ भाग बनणे स्वाभाविक व क्रमप्राप्त होते. परंतू या धिरोदत्तपणामागे एक संवेदनशील मन होते जे कधीच कुणाला दिसले नाही. ते दिसू नये याची त्यांनी देखील फार काळजी घेतली होती. एक मोठी संस्था चालवायची म्हणजे ते आवश्यकच होते. पण एका प्रसंगी मात्र हा धिरोदत्तपणा गळून पडला व त्या दिवशी मानवी मनाची एक नवी ओळख झाली.
मानवी मन फारच अनाकलनीय असते. म्हणूनच मानवी मनाचा अभ्यास हा सर्वात जटील मानला जातो. कारण यामधे जेवढ्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत तेवढ्या इतर कोणत्याही अभ्यासामधे नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तित्व आणि त्या अनुषंगाने असलेली त्याच्या मनाची स्वतंत्र जडण घडण ही मनाच्या अभ्यासकांना आव्हानात्मक बाब असते. प्रत्येकाच्या मनाची वेगळी जडण घडण होण्याकरीता कारणीभूत असलेल्या विविध बाबी ही एक आणखी वेगळी बाजू आहे जी मनाचा अभ्यास जास्त जटील बनविते. सहवासातील व्यक्ती, वातावरण, शिक्षण यामुळे मनावर होणारा प्रभाव आणि त्यानुसार होत जाणारी मनाची जडण घडण अभ्यासणे ही एक फारच विलक्षण गोष्ट आहे. याचे कारण सामान्य अभ्यासातील तर्क व अनुमान या अभ्यासात फार उपयोगी पडत नाहीत. अगदी समान वातावरणात व समान व्यक्तींच्या सहवासात असलेले एकाच परीवारीतील दोन भाऊ अगदी टोकाच्या परस्पर भिन्न स्वभावाचे असतात. त्यामुळे मनाच्या जडण घडणीवर परीणाम करणाऱ्या बाबींच्या आधारे मनाच्या आकलनाचे काही आडाखे बांधता आले तरी ते परीपूर्ण असतीलच असे नाही. म्हणूनच मानसशात्रज्ञांकरीता प्रत्येक मन ही एक स्वतंत्र आणि अनोखी केस असते. त्याचे वेगळेपण शोधून त्याच्या मनाचा थांगपत्ता लावणे हे एक कसोशीचे काम आहे. या मनाच्या अभ्यासात आणखी एक गंमत होते ती म्हणजे आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या परीस्थितीनुसार आपल्या मनातील विचार दडवून ठेवण्याची प्रत्येक माणसाची स्थायी वृत्ती. फार कमी लोक असे असतात जे मनात जे आहे ते सारे काही स्पष्टपणे मांडू शकतात किंवा त्यांच्या चेहेऱ्यावर ते दिसून येते. जास्तीत जास्त वेळा मनाची मूळ अवस्था लपविणे व सामाजिक जीवनात आवश्यकतेनुसार एक वेगळा चेहेरा सादर करणे ही प्रत्येक माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. त्यामुळे मनात काय सुरु आहे किंवा मनाची नेमकी स्थिती काय आहे हे ओळखणे फार कठीण असते. गरजेनुसार मनाच्या मूळ स्थितीपेक्षा वेगळी भूमिका प्रदर्शित केली जाते जी त्या त्या परीस्थीतीची किंवा व्यवस्थेची गरज देखील असते. यामधे गैर असे काहीच नाही. ही देखील मनुष्याच्या बाबतीत घडणारी एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रीया आहे. पण आपल्या मनाच्या मूळ स्वरुपाला अनेक दिवस लोकांसमोर येऊच न दिल्याने प्रदर्शित होणारी मनोभूमिकाच त्या व्यक्तीचा स्थायीभाव आहे असे सारेच मानायला लागतात. परंतू कधी कधी एखादा प्रसंग असा घडून जातो की त्यावेळी ती लोकांसमोर येणारी मनोभूमिका गळून पडते व मनाचा खरा खुरा हळवेपणा ठळकपणे जाणवून जातो. त्या व्यक्तिमत्वाच्या धिरोदात्त मनोभूमिकेच्या मागचे हळवेपण एका वेगळ्याच प्रसंगात दिसून आले. अत्यंत जीवलग मित्राच्या आयुष्यात घडलेला दुःखद प्रसंग.
खरे तर तसाच प्रसंग त्यांच्याही जीवनात काही काळापूर्वी घडून गेला होता. परंतू त्यावेळी देखील परीवारातील लोकांना धीर द्यायचा म्हणून त्या धिरोदत्त व्यक्तिमत्वाने डोळ्यातील अश्रू रोखले होते. आयुष्याची सोबती निघून गेल्यामुळे मन हेलावून गेले होतेच परंतू त्याही परीस्थितीत स्वतःच्या मनावर प्रचंड ताबा ठेवून सर्वांना सावरण्याचे नेहेमीचे काम त्यांनी केले होते. पण यावेळच्या प्रसंगी मात्र धिरोदत्तपणा बाजूला पडला. अनेक वर्षे एकमेकांच्या सहवासात असलेल्या एका जीवलग मित्राची सहधर्मचारीणी अचानक त्याला सोडून गेली. त्याच्या जीवनात या उतारवयात जी पोकळी निर्माण झाली ती फार मोठी होती. या वयात आलेले ते एकटेपण त्यांनीही अनुभवले होते पण त्यावेळी त्यांनी मनाला आवरले होते. परंतू आता मात्र आपल्या मित्राची परीस्थिती बघितल्यावर व त्याने घट्ट मिठी मारल्यावर मात्र काहीतरी वेगळेच घडले जे यापूर्वी कदाचित कधीच घडले नव्हते.
मित्राने घट्ट मिठी मारल्यावर व त्याच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुंना बघून मात्र एवढे दिवस महत्प्रयासाने यांनी रोखून धरलेला तो संवेदनांचा बांध फुटला व दोघेही मित्र एकमेकांना बिलगून रडू लागले नव्हे तर आक्रंद करु लागले. तेथे उपस्थित प्रत्येकाच्या जीवाची कालवाकालव झाली. कारण एरवी अत्यंत शिस्तीने वागून जरब बसविणाऱ्या त्या व्यक्तीत्वाचे हे संवेदनशील रुप अनेकांना नवे होते. परंतू त्या ठिकाणी सामाजिक स्थिती, त्याचे भान, त्या परीस्थितीमधे जपली जाणारी प्रतिमा हे सारे जीवनाच्या साचेबद्धतेचे पाश बाजूला पडले व एक सच्चा मित्र दुसऱ्या मित्राचे सांत्वन करु लागला. परंतू नेमके सांत्वन होते की ते बरेच दिवसाचा मनावरचा भार मोकळा करणे होते हे कळत नव्हते. मनामधे दडवून ठेवलेल्या वेदना अश्रुंवाटे बाहेर पडत होत्या व दोन्हीही मित्रांचे दुःख हलके होत होते. आपल्या आयुष्यात सहन करावी लागलेली वेदना मित्राला सहन करावी लागत आहे याचा तो परीणाम होता. त्या वेदनेची तीव्रता माहित असल्याने आपला मित्र काय सहन करतोय याची जाणीव होती व म्हणूनच मनाचा तो हळवा कोपरा त्या क्षणी प्रकाशित झाला व डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुंद्वारे मन मोकळे होत गेले.
मानवी मनाची हीच गंमत आहे. जीवन जगताना आपण ज्या वेगवेगळ्या भूमिका जगतो त्या भुमिकांमधे मनाची वेगवेगळी अवस्था आपोआप निर्माण होते. पण एकच जागा अशी असते जेथे त्या मनाची वेगवेगळी आवरणे गळून पडतात आणि तो मनाचा स्थायीभाव असलेला संवेदनशीलपणा समोर येतो, ती जागा म्हणजे मैत्र. निखळ मित्रता ज्याला लाभते तो व्यक्ती खरोखरीच भाग्यवान असतो. फक्त त्या मैत्रीमधे सच्चेपणा असावा म्हणजे तेथे या ह्रदयीचे त्या ह्रदयी होते. बरेचवेळा समुपदेशनाच्या सेशनमधे मला देखील हा असा अनुभव येतो की सर्व समस्यांचे मूळ असते मन मोकळे करायला कुणीही नसणे. साऱ्या भौतिक सुविधा असतात, लाक्षणिक अर्थाने सारे काही असते परंतू मन मोकळे करायला, किंवा निवांतपणे मान टेकायला मैत्रीचा खांदा मात्र नसतो. सध्याच्या या बदलत्या काळात व्हर्च्युअली आपण फार जोडलेलो असलो तरी मी वर वर्णन केल्याप्रमाणे मन कोसळत असताना त्याला सांभाळायला व्हॉट्स ॲपचा मेसेज पुरेसा नसतो. तेथे हवा असतो मित्राचा आपल्या खांद्यावर हात आणि त्या स्पर्शातून जाणविणारे त्याचे शब्द…. तू काळजी करु नको, मी कायम तुझ्या सोबत आहे. शब्दाविना स्पर्शातून हे जाणविले की त्याची पावती डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रुंद्वारे मिळाल्याशिवाय राहत नाही. असे सच्चे मैत्र ही आयुष्याची सर्वात मोठी उपलब्धी असते. होय ना?
छान
ReplyDeleteMast
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteज्यांना ती दोन्ही व्यक्तिमत्वे माहित आहेत, ओळखीची आहेत त्यांच्या ही दृष्टीने हा अनुभव अनोखाच होता...आणि त्या साम्राज्याची जडण घडण आणि वर्तमान ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्या दोघांचेही एकटेपण एक विलक्षण कालवाकालव मनात करून गेले...नव्हे आठवले की मन अनामिक विषण्णतेनी भरून येतं....
ReplyDeleteकोसळणार्या पहाडाला तेवढाच दुसरा समर्थ पहाड सावरू शकतो.
ReplyDeleteएक सुंदर अनुभूती या प्रसंगातून आणून दिली. खूप छान.
हार्दिक अभिनंदन
प्रा. संजय पाटील
प्राध्यापक
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम
दोन हळव्या मनाला इतक्या सहजतेने व्यक्त करणे सोपे नाही. आपल्या शब्दात उत्तमपणे मांडली यांचे कौतुक आहे.फार सुंदर लिहिले आहे.
ReplyDelete