थोडा है थोडे की जरुरत है @ 09.11.21
तिने काय करावे..?
त्या दिवशी ऑफीसमधून लवकर घरी जाण्यासाठी बॉसला सुटी मागताना तिला फारच कठीण जात होते. या महिन्यातली ही तिसरी सुटी होती. सुटी देताना बॉसचा चेहेरा तिला बघवायचा नाही. फार उपकार करतोय या भावनेतून सुटी दिली जायची. खरे तर तिला ते अजिबात आवडायचे नाही परंतू काय करणार? सणासुदीचे दिवस असल्याने व सासूबाईंचा आदेश असल्याने तिला ते करावेच लागायचे. जर ती सुटी काढून लवकर घरी गेली नाही तर घरातील बदललेले व तापलेले वातावरण सामान्य करणे तिला फार कठीण होऊन जायचे. त्यापेक्षा त्या बॉससमोर उभे राहून त्याचा तो उपकृत केल्याचा सूर ऐकणे तिला सोपे वाटायचे. आज तर सासूबाईंनी फारच कडक आदेश दिला होता. सकाळी आंघोळ करून गेल्यावरही आज परत आंघोळ करायची होती. सोवळ्यातले पातळ बाजूला काढून ठेवले होते. ते नेसून तिला कुळाचाराचा संपुर्ण स्वयंपाक करायचा होता. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ब्राह्मणभोज, त्यानंतर घरातील इतरांची भोजने व त्यानंतर तिला जेवायला मिळणार होते. शिवाय सोवळ्यातला स्वयंपाक करायचा असल्याने तिला सकाळपासून काहीही खाण्यास मनाई होती. घरून डब्यात घालून ही काही नेत तर नाही ना या बाबत सासूबाईंची बारीक नजर होती. खरे तर असे उशीरापर्यंत उपाशी राहणे तिला अजिबात मानवत नसे. प्रचंड ॲसीडीची वाढायची व मग त्यातून डोकेदुखी व्हायची. पुढचे तीन चार दिवस ती फारच अस्वस्थ असायची. परंतू तिच्या त्या ॲसीडीटी बाबत कुणालाच फार चिंता नव्हती. सारे कसे रीतीनुसार साग्रसंगीत झाले पाहीजे असा घरचा शिरस्ता. सारे नीट होणार की नाही या चिंतेत सासुबाईंना रात्रभर झोप लागली नाही असे तिला सासूबाई सांगत. त्यामुळे तिला पर्यायच नसायचा. कधी कधी ती नवऱ्याला तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगून बघायची परंतू तो देखील, मला नको सांगू तू हे सारे, मला काय कमी ताण आहे का माझ्या कामाचा… तुला नसेल करायचे तर सरळ नाही सांगून देत जा, असे म्हणून आपल्या कामाला लागायचा. परंतू नाही म्हणल्यावर घरात सासुबाईंकडून काय गहजब केला जाईल त्याला कसे निस्तरायचे याबाबत त्याच्याकडे उपाय नसायचा. त्यामुळे ही बिचारी हतबल होऊन जायची. काळ बदललाय, आता ती नोकरी करत असल्याने घराती आर्थिक बाजू तिने काही प्रमाणात चांगली सांभाळलीय व त्यामुळे या परंपरागत गोष्टींपासून तिला जरा सूट द्यावी असा विचार कुणीही करत नव्हते. घराचे बाकी स्वरुप पूर्ण बदलले होते. घर सुशोभित झाले होते, घरात स्मार्ट टीव्ही आला होता, संगणक आणि मोबाईल सरसकट सारेच वापरत होते. ऑनलाईन शॉपींग वगैरे देखील सुरु झाले होते. हिच्यासाठी सोवळ्यातले पातळ देखील ऑनलाईनच बोलावण्यात आले होते. परंतू सणवार साजरे करण्याची पद्धत आणि त्यातल्या त्यात हिच्या बाबतच्या गोष्टी मात्र बदललेल्या नव्हत्या. कशाला वाद घालायचा म्हणून ती देखील आपल्या तब्येतीची काळजी न करता ते सारे करत होती. जुन्या पिढीच्या लोकांना कशाला उगाच दुखवायचे म्हणून तिचे सहन करणे सुरु होते. खरे तर तिलाही ते बरे वाटायचे कारण त्यानिमीत्ताने घरात आनंद रहायचा. परंतू त्या पद्धतीत आधीच्या पिढीच्या सासूबाई मात्र काहीच बदलायला तयार नव्हत्या. हिला ते सारे आता फार जास्त सहनही होत नव्हते आणि हे मी आता काहीही करणार नाही असे स्पष्ट सांगणेही तिला जमत नव्हते. तिने काय करावे?
दिवसभराचे काम व परत सायंकाळची जेवणे आटोपून ती जरा संगणकावर काम करायला बसली तर तिच्या मुलीने लग्न जुळविणाऱ्या एका संस्थेच्या वेबसाईटवर टाकलेली स्वतःची माहिती वाचून तिला धक्काच बसला. तिला काय करावे सुचेना. मुलीला तिने आवाज दिला. परंतू मुलगी आपल्या खोलीत हेडफोन लावून गाणे ऐकत बसलेली असल्याने तिला हिचा आवाजच गेला नाही. हिने तिच्या खोलीत जाऊन तिच्याजवळ बसून बोलण्याचा प्रयत्न केला तर, येते ना आई, काय उगाच डीस्टर्ब करते म्हणून ती तिच्या अंगावर खेकसली. दहा मिनीटात येते असे जेव्हा तिने हिला सांगितले तेव्हा निमूटपणे ही आपल्या खोलीत येऊन बसली. मुलीने भरलेल्या फॉर्मची प्रींटआऊट समोर धरून ती तिची वाट बघू लागली. एखाद्या तासाने मुलगी आली. हिने जरा रागातच त्या माहितीबद्दल विचारले. हे काय लिहीलंय? मला स्वयंपाक येत नाही व तो करण्यात फार इंटरेस्ट नाही. असे लिहायचे का? मी एवढी कुळाचाराचा स्वयंपाक करते आणि माझ्या पोरीने असे लिहायचे. हे ऐकल्याबरोबर मुलगी चिडली. आई तो तुझा चॉईस आहे. मी माझी बाजू क्लिअर केलीय. उगाचच्या माझ्याकडून अश्या अपेक्षा करायला नको मुलाने. आय मस्ट बी व्हेरी क्लियर. नाहीतर तुझ्यासारखे होते. खरे तर हे वाक्य तिला आवडले नव्हते परंतू वाद नको म्हणून तिने पुढे विचारले. आणि हे काय लिहीलेस.. कधी कधी ड्रींक्स घेते म्हणून. अगं आई मी तुला सांगितले ना, की मी मित्र मैत्रीणींसोबत कधी कधी घेते बीयर. हो पण हे लिहायचे कशाला? तिने रागातच विचारले. का नाही लिहायचे? माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हे माहित हवे. उद्या लग्न झाल्यावर एखाद्यावेळी माझ्या मित्र मैत्रीणींसोबत मी घेतली आणि त्याला कळले तर राडा व्हायचा. आय मस्ट बी ऑनेस्ट. अगं पण लग्नानंतर कशाला होणार या तुझ्या पार्टीज? आई कम ऑन, मी लग्न करतेय. जेलमधे नाही जात आहे. हे माझे सारे जसेच्या तसे सुरु राहणार आहे. पुढे ते पण मी लिहीलेय. मला तुझ्यासारखे असे बांधून घ्यायचे नाही. मला माझ्या काही संकल्पना आहेत जगण्याच्या आणि मी त्यानुसार जगीन. मी आता जाऊ का? माझा एक ग्रुप कॉल आहे फ्रेन्डसचा. आईचने परवानगी देण्याआधी ती निघूनही गेली. ती गेली त्या दिशेला ही बघत राहीली. नकळत डोळ्यात पाणी तरळले तिच्या. त्या रात्रभर ती काळजीने जागी होती. तिने काय करावे?
सकाळी आपल्या सासुबाईच्या परंपरागत संकल्पनांना सोवळ्याओवळ्यासकट पूर्ण करताना तिची उडालेली तारांबळ, त्यांचे मन राखण्यासाठी केलेली धडपड आणि तिच्या त्या कष्टाची छोटीशी पावतीही कुणाकडून न मिळून तिने आपल्या मनाला समजावणे हा एक भाग आणि सायंकाळी सगळ्या परंपरांना फाटा देत, मी जशी आहे तशीच जगणार, लग्न म्हणजे स्वातंत्र्य गमावणे नव्हे हे मुलीने ऐकविलेले विचार ऐकून आता हे असेच चालणार कारण काळ बदलला म्हणून पुन्हा स्वतःच्याच मनाला तिने समजावणे हा दुसरा भाग. दोन पिढ्यांच्या परस्परविरोधी टोकाच्या भुमिकांमधे तिची भूमिका कुणी समजूनच घेत नाहीये. आधीच्या पिढीला तिने सारे संस्कार जपलेच पाहीजे असा दुराग्रह करण्यात मजा वाटतेय आणि पुढच्या पिढीला हे संस्कार व्यक्तीस्वातंत्र्य हीरावून घेतात असे वाटत असल्याने ते ओझे फेकून दिले पाहीजे हे सांगण्यात मजा वाटतेय. मधल्यामधे मात्र हिची किती कुतरओढ होतेय हे कुणी समजूनच घेत नाही. तिच्या बाजूने उभे राहणारे कुणीच नाही व तिचे समजून घेणारे देखील कुणीच नाही. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबामधे अश्याच कमी अधिक प्रमाणात मधल्या पिढीची ती सध्या दुःखात आहे. दोन्हीही पिढ्यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकांनी तिला स्वतःची भूमिका व्यक्त करायला जागाच उरलेली नाही. मधल्या पिढीच्या तिला समजून घेऊयात आणि जमल्यास तिच्याशी बोलून तिचे काय म्हणणे आहे हे तरी ऐकूयात. केवळ मन मोकळे केल्याने देखील तिला बरे वाटू शकते. दोन्ही टोकांच्या पिढ्यांनी देखील आपापल्या मतांमधे जरा लवचिकता आणून तिचेही मत जाणून घ्यावे म्हणजे तिची ओढताण कमी होऊ शकेल. असे जर झाले नाही तर तिने काय करायचे? मनाप्रमाणे जगण्याचा हक्क तर तिलाही आहेच ना?
मधल्या पिढीचे अगदी वास्तववादी चित्रण खूप मस्त
ReplyDeleteप्रत्येक स्त्रीला ही आपलीच कहाणी आहे असे वाटावे..अस हुबेहूब चित्र उभ केल....खूप छान,त्यात मी पण आलीच......😊
ReplyDeleteअगदी खरं आहे...
Deleteवर वर्णन केलेली परिस्थिती आजकाल कमीअधिक प्रमाणात सगळीकडेच आहे. इथे समजूतदारपणा हाच एक चांगला उपाय आहे.
एकमेकांना समजून घेणं आणि स्वतः त्यांच्या जागेवर उभे राहून विचार करणं फार आवश्यक आहे
तेव्हाच परिस्थिती थोडीफार बदलू शकते!
कुटुंबातील मुलीची आई असणाऱ्या जवळपास प्रत्येक आईची ही कहाणी आहे . माझ्या सारख्या मुलाच्या आई तिला, अग आता असच आहे म्हणून समजवतात. पण तिने काय करावे हा प्रश्न उरतोच.
ReplyDeleteखुपच छान
ReplyDeleteYour need for acceptance will make you invisible - Jim Carrey.
ReplyDeleteहा लेख वाचला आणि हे quote आठवल.
सगळ्यांनी माझा स्विकार करावा म्हणुन मी मोडे पर्यंत झुकेल.. ही भावना ह्या लेखातील गृहिणीला तिच्याच संसारात कवडीमोल करून ठेवते.
सासूची rigidity, हुकुमशाही,
नवर्याची मी तुला tension देत नाही.. तू मला देऊ नको असा दृष्टीकोन,
सगळ्यांना आनंद मिळतोय म्हणून स्वतःच्या कळत-नकळत आपल्याला नक्की काय वाटतय हे विसरलेली गृहिणी
आणि ह्या परिस्थितीचा परीणाम होऊन मुलीने स्विकारलेली जिवन पद्धती..
ह्यात दोष कोणाचा किंवा गरीब बिचारं कोण ह्यापेक्षा ह्या गृहिणीला..
'मला ह्या गोष्टींचा त्रास होतोय' ह्याची जाणिव होण महत्वाच ठरेल. 'आत्तापर्यंत त्यांच्या सुखात माझा आनंद'
हे तत्त्व घेऊन जगल्यामुळे, घरातील शांतता राखण्यासाठी हि गृहिणी स्वतःच शारीरिक व मानसिक आरोग्य गमावून बसण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे.
ह्या गृहिणीने स्वतःला विचारावे की हे सर्व करून माझी मिळकत ती काय? हे करून मला कितपत समाधान लाभलाय? ना तिला सासूची शाबासकी मिळाली आहे, ना नवऱ्याला विश्वासात घेऊन काही बदल घडवून आणतायेत, ना मुलगी तिच्या कडे आदर्श म्हणून बघतेय.
दुसऱ्या व्यक्तीची मदत घेण्यात मर्यादा असतात. त्यामुळे ह्या गृहिणीनी स्वतःला नक्की काय हवे ते ठरवावे, सहनशक्तीच्या मर्यादा आखून घ्याव्यात, विचारामध्ये Clarity आणावी, संभ्रमावस्था संपवावी, घरातील मंडळीना politely but firmly आपले विचार सांगावेत. परिस्थिती लगेच बदलणार नाही, ह्याची खुणगाठ मनाशी बांधावी. पण काहीतरी पाऊल उचलल्या शिवाय बदल देखील घडणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यावे.
लेखकाने अगदी नेटकेपणाने 3 पिढ्यांचा गुंता मांडला आहे. काही वाक्ये मन पिळवटून टाकतात. गृहिणीच्या जीवनातील विरोधाभास highlight करण्यासाठीचे हे वाक्य बघा -
'.. तिच्या साठी सोवळ्याचे पातळ देखील online बोलविण्यात आले.. '
लेखकाने लेखाच्या शेवटी वाचकांना प्रश्न विचारला आहे त्यामुळे आपण वाचक म्हणुन विचार करण्यासाठी प्रेरित होतो.. ह्यातच लेखकाचे उत्तर दडलेले आहे अस मला वाटत.
Sir aamchya pidhiche giwant chitran
ReplyDeleteतीन पिढ्यांच्या तीन वेगवेगळ्या विचारांचे अगदी यथार्थ चित्रण झाले आहे. लेख वाचताना सासूच्या हट्टीपणाचा राग तर येतोच पण त्याबरोबरच अगदीच स्वतंत्र विचार असणाऱ्या त्या मुलीचाही राग येतो. असे केवळ स्वतःचा विचार करून कुटुबव्यवस्था सुरळीत चालू शकत नाही.रीतिरिवाज पाळणे जितके महत्त्वाचे तितकेच व्यक्तीस्वातंत्र्यही .सुवर्णमध्य काढून दोन्हीही गोष्टी सांभाळता येतील.त्यासाठी केवळ सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे.
ReplyDelete