थोडा है थोडे की जरुरत है @ 02.11.21

मला आईकडे जायचेय..

८० वर्षांचा तो वृद्ध हमसून हमसून रडू लागतो, मला माझ्या आईकडे जायचेय, मला माझ्या आई कडे जायचेय, आई मला तुझी खूप आठवण येतेय, मला आईकडे जायचेय.. त्याची काळजी घेणारी ती नर्स त्याला जवळ घेते त्याच्या डोक्यावर एका लहान मुलाला सांभाळावे त्यासारखे थोपटून त्याला शांत करते. त्याची ही अवस्था होण्याची कहाणी फार वेदनादायी असते शेवटी आईच्या नावाने त्याने केलेली आर्त विनवणी आपल्याला हेलावून सोडते. ही कहाणी सुरु होते एका फ्लॅटमधे साधारण पुढील प्रमाणे

त्याची मुलगी त्याला येऊन विचारते, काय झाले बाबा, का बरे बोललात तिला? ती चांगली केअरटेकर आहे. तो म्हणतो, अजिबात नाही. ती चोर आहे. तिने माझे घड्याळ चोरलेय. मी तिला पकडण्यासाठी सापळा लावला होता परंतू ती त्यात सापडली नाही. बाबा, ती चांगली मुलगी आहे. तुम्हीच तुमचे घड्याळ कुठेतरी ठेवले असणार. मुलीचे ऐकता तो ८० वर्षांचा बाबा आतल्या खोलीत जातो मग हाताला घड्याळ लावून बाहेर येतो. मुलगी म्हणते बघा, सापडले ना घड्याळ? तुम्ही उगाच संशय घेतला तिच्यावर. बाबा म्हणतो, कुणावर? मी कुठे काय बोललो. बाबा, असे काय करता? त्या केअरटेकरबद्दलमी? कुठे काय म्हणालो, ती तर तुझ्या लहान बहिणासारखी दिसते. तुझी बहिण कुठे आहे? ती आली नाही? मुलगी काहीच बोलत नाही, कारण ल्युसीला अपघातात मृत्यू येऊन वर्षभर होऊन गेले होते. ती बाबांना म्हणते, बाबा, मी आता लंडन सोडून जाणार आहे. एका फ्रेंच माणसाच्या मी प्रेमात पडलीय. मी फ्रान्समधे रहायला जाणार आहे. तुम्हालाही एका नव्या ठिकाणी जायचे आहे. हे ऐकल्यावर बाबा जोरात ओरडतात, माझ्या फ्लॅटमधून मी कुठेही जाणार नाही आणि धाडकन दार लोटून आत निघून जातात. थोड्या वेळाने मुलगी तिचा नवरा घरी येतात. बाबा तिच्या नवऱ्याला विचारतात, तू कोण.. तू तो फ्रेंचमन का? तो तिचा नवरा म्हणतो, मी तुमच्या मुलीचा नवरा आहे. अरे पण तिचा तर घटस्फोट झाला ना? ती फ्रान्सला जाणार आहे. तेवढ्यात मुलगी येते विचारते, बाबा. मी फ्रान्सला कशाला जाईन? आणि हे घटस्फोट वगैरे काय? बाबाला कळतच नाही की हे काय सुरु आहे. मुलीचा नवरा त्याला सांगतो की हा फ्लॅट त्याचा नाही. तो येथे आलेला आहे रहायला. बाबाला ते पण लक्षात येत नाही. बाबाची ही बिघडत चाललेली अवस्था बघून एके दिवशी रात्री मुलगी त्याच्या तोंडावर उशी दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करते. एके दिवशी मुलीचा तो फ्रेंचमन घरी येऊन बाबाला धमकावतो तुझ्यामुळे तुझी मुलगी माझ्यासोबत फ्रान्सला येत नाही म्हणून त्याला रागावतो बाबाच्या थोबाडीत लगावतो. त्याच्या या आक्रमकपणामुळे ८० वर्षांचा बाब बावरून जातो. त्याच्या लहान मुलीसारखी दिसणारी ती केअरटेकर त्याला सांभाळते परंतू बाबाला कायम तिच्यावर ही आपले घड्याळ चोरणार म्हणून संशय येत राहतो. बाबाची मुलगी आणि तिचा नवरा परत एकदा बाबाला समजावतात की ते लंडन सोडून कुठेही जाणार नाही आणि विचारतात की तो कोणत्या फ्रेंचमन बद्दल बोलत आहे. रात्री बाबाची मुलगी तो फ्रेंचमन बाबाला समजावतात की त्यांना फ्रान्सला जायचे आहे बाबाने आता अनाथालयात गेले पाहीजे. बाबा जोरात ओरडून म्हणतात, नाही मी माझ्या फ्लॅटमधून कुठेही जाणार नाही, कारण ती केअर टेकर माझे घड्याळ चोरते पण ती माझ्या लहान मुलीसारखी दिसते. ती आज का आली नाही, तिचा ॲक्सीडेंट तर झाला नाही.

मंडळी, काही कळतंय का? काही तर्क लागतोय का? कुठे काय सुरु आहे हे आपल्याला समजतंय का? वर मी लिहीलेला केवळ एक पॅराग्राफ आपल्याला एवढा गोंधळात टाकतो तर या असल्या गोंधळांनी सतत घेरलेले राहून डीमेन्शीया झालेले रुग्ण कसे राहत असतील? जरासा विचार करुया. हा असाच विचार आपल्याला करायला लावतो एक अप्रतिम चित्रपट, फादर. फ्लोरीयन झेलर नावाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटात डीमेन्शीया झालेल्या एका वृद्धाचे जे चित्रण सादर केलेय ना ते अक्षरशः अंगावर काटा आणते. वरच्या पॅराग्राफमधे मी लिहीला तसाच गोंधळ चित्रपटात सुरु राहतो आपणही कळत हे नेमके काय सुरु आहे या गोंधळात अडकून जातो. प्रेक्षकांना बराचवेळ सिनेमात काय होतंय हे कळल्यामुळे ते कंटाळतील ही जोखीम त्याने घेतलीय कारण त्याला साथ मिळालीय एका अत्यंत सशक्त अभिनेत्याची. ॲन्थनी हॉपकीन्स. ऑस्करविजेता अतिशय प्रसिद्ध अभिनेता. अत्यंत हळूवारपणे त्या वृद्धाच्या मनातील गोंधळात आपणही अडकतो आपल्याही नकळत आपण स्वतःला त्याचा जागी बघायला लागतो. पुढे सारा चित्रपट त्याच्याच नजरेतून साकारतो. पुढे पुढे तो गोंधळ आपल्याला आपला वाटतो शेवटी तो एका अनाथालयातील एका छोट्याश्या खोलीत गोंधळून जाऊन कधीतरी मधेच आपली मुलगी म्हणून दिसलेल्या नर्सला खूप सारे प्रश्न विचारतो. जसे मी येथे किती दिवसांपासून आहे? माझी मुलगी कुठे आहे? तिने मला येथे का ठेवले आहे? त्याला तपासायला येणाऱ्या डॉक्टर बद्दल की, माझ्या मुलीचा नवरा येथे काय करतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे ती नर्स त्याला शांतपणे देते. तुझी मुलगी गेल्या अनेक महिन्यापासून फ्रान्समधे गेलीय. एवढा वेळ होऊन गेला हे कळल्यावर मात्र तो खचतो. तो त्या नर्सला अत्यंत अवघडलेल्या स्थितीत विचारतो, मी कोण आहे? मला निदान तेवढे सांग. ती त्याला सारे काही सांगते. ते ऐकल्यावर मात्र त्याला काहीच सुचत नाही. तो सैरभैर होतो आणि एखाद्या लहान बाळासारखा रडू लागतो. त्याला तो विसरण्याचा ताण सहन होत नाही आणि मोठ्याने हंबरडा फोडतोमला माझ्या आईकडे जायचेय. मला आई हवीय.. मला माझ्या आईकडे जायचेय. ती त्याची नर्स त्याला जवळ  घेते त्याला एखाद्या लहान मुलागत थोपटून शांत करते. नकळत आपणही डोळे पुसायला लागतो. आयुष्याचे सारे क्षण विसरून किंवा त्याचा गोंधळ उडाल्यानंतर त्याला केवळ त्याच्या आईची गरज भासते कारण तिच त्याच्या या जगातील स्वतंत्र अस्तित्वाचा सर्वात महत्वाचा धागा असते

आपल्या आयुष्यातील असले क्षण विसरणाऱ्या मंडळींना आपण सर्वांनी मिळून सांभाळायला हवे. बरेच वेळा त्यांना काही आठवत नाही म्हणून त्याची गंमत केली जाते. त्यांना सारखे मला ओळखले का? मी कोण आहे? असले प्रश्न विचारून भंडावले जाते. त्या व्यक्तीला उगाच जबरदस्तीने तिच्या आयुष्यातील प्रसंग आठवायला लावले जातात. कधीकधी हे सहजही केले जाते परंतू असे करताना हे लक्षात ठेवायला हवे की त्यांचा मुळातच फार गोंधळ उडालेला असतो असल्या प्रश्नांचा त्यांना प्रचंड त्रास वेदना होत असतात. आपल्याला काही आठवत नाहीये ही एक अपराधीपणाची भावना त्यासोबतच काय करावे हे अजिबात सुचत नसल्याने ही मंडळी कासावीस होत असतात. म्हणून ते जे काही तोडके मोडके बोलतात ते ऐकून घ्यावे जमेल तर त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवावी किंवा मनात बाळगावी. अश्या जग विसरणाऱ्यांचा कसा गोंधळ उडतो, ते कसे खचून जातात, कसे असहाय होतात शेवटी कसे एखाद्या काहीही कळणाऱ्या लहान मुलागत संपुर्णपणे निरागस होऊन जातात हे अनुभवण्याकरीता ॲन्थनी हॉपकिन्सचा फादर चित्रपट जरुर बघावा आणि स्वतःच्या जगाला विसरणाऱ्या या निरागस मंडळींना जमेल तसे सांभाळण्याचा प्रयत्न करावा.. होय ना?





Comments

  1. खूप अप्रतिम लिहलय sir..
    मी पण असा एक मराठी सिनेमा बघितला आहे..त्यामुळे तुम्ही उभा केलेला प्रसंग हुबेहूब माझ्या डोळ्यासमोर आला .....
    👍🙏🙏🌷

    ReplyDelete
  2. खूप छान ! .... 👌👍

    ReplyDelete
  3. त्या फादर च्या दृष्टीने सिनेमा पाहतांना कळते की आपण किती छोट्या छोट्या गोष्टी गृहीत धरतो. Salute to Anthony Hopkins. आणि इतक्या सुंदर movie ला इतक्या सुंदर शब्दात मंडण्यासाठी Thank you बाबा. Welcome Back!

    ReplyDelete
  4. 2020 चा English 'The father' आणि 2013 चा मराठी 'अस्तु'.. दोघांमध्ये कमालीचे साधर्म्य!
    तिकडे Anthony Hopkins ईकडे
    Dr. आगाशे,
    तिथे Olivia Colman
    आणि इथे इरावती हर्षे,
    आईच्या रूपातील nurse
    Olivia Williams
    तर अस्तु मध्ये अमृता सुभाष..
    कसली तगडी star cast.. आणि त्यावर director म्हणुन तिथे Florian Zeller आणि इथे सुमित्रा भावे आणि सुकथनकर.. हे सगळ अनुभवण म्हणजे केवळ Overwhelming experience.

    प्रेक्षक म्हणून दोनही चित्रपट आपल्यासाठी पर्वणीच ठरतात . एका जागी खिळवून ठेवण्याची किमया हे चित्रपट अगदी सहजतेनं करतात.

    Dr. मोहरील यांनी, अत्यंत कल्पकतेने ह्या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ज्यामुळे आपली चित्रपट संपूर्ण बघण्याची इच्छा निर्माण होते. त्यातील बारकावे समजावून सांगितल्याने चित्रपट नव्या दृष्टीने बघण्याची संधी मिळते.
    Welcome back Dr. Moharil.
    So good to see you on this platform!

    ReplyDelete
  5. Dr. Bhagyashree Deshpande2 November 2021 at 23:06

    Very nice

    ReplyDelete
  6. नेहमीप्रमाणेच एक वैचारिक आणि भावनिक खाद्य आपण आमच्यासाठी घेऊन आलात .दिवाळीच्या या फराळामध्ये आणखीच वेगळी टेस्ट आली .खूप छान लिहिले आहे सर.कृपया आता थांबणे नको ,सातत्य असावे ,ही विनंती.खूप छान .हार्दिक अभिनंदन प्राध्यापक मोहरील सर.

    डॉ. संजय पाटील
    प्राध्यापक ,
    सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय ,वाशिम.

    ReplyDelete
  7. खुप छान अवि👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18