थोडा है थोडे की जरुरत है @ 16.11.21
विरोधाभास
कौटुंबिक सौहार्दतेबद्दलचे त्या ख्यातनाम वक्त्याचे विचार ऐकून सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. आधुनिक बदलत्या काळात कुटंबांमधे निर्माण होणाऱ्या समस्या व त्यामुळे निर्माण होणारा ताण याबद्दलचे त्यांचे विवेचन अप्रतिम होते. बदलत्या काळात घरातल्या घरातही जे इगो क्लॅशेस सुरु झालेत व त्यामुळे जे तणावाचे वातावरण तयार होते याबद्दलचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता हे त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होते. या सोबतच या संपुर्ण विचारांना त्यांनी मानसशास्त्रीय आधार देखील दिला होता. बदलत्या काळात नाती सांभाळताना आता जुन्या संकल्पनांना नव्या पद्धतीने मांडणे किती गरजेचे आहे व नात्यांबद्दलचा एकुणच दृष्टीकोन कसा बदलण्याची गरज आहे हे त्यांनी फारच फ्रभावीपणे सांगितले होते. साधारण दिड तासापर्यंत त्यांचे विचार ऐकल्यावर सभागृहातील प्रत्येकाला आपल्या जीवनात यामुळे निश्चितच बदल करता येईल अशी भावना निर्माण झाली. बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याला बळकटी आणण्याकरीता जी उदाहरणे दिली ती आपल्याच घरातील आहेत असे अनेकांना वाटले. याचे कारण त्यांचा अभ्यास व अनुभव फार दांडगा होता. सभोवतालच्या जीवनाचे बारकाईने निरीक्षण त्यांनी केलेले होते. त्यांचे निरीक्षण केवळ वरवरचे नव्हते तर त्याबद्दल त्यांचे स्वतःचे चिंतन देखील होते. त्यामुळेच कौटुंबिक पातळीवर निर्माण होणाऱ्या आधुनिक काळातील समस्यांवर त्यांचा स्वतःच्या चिंतनातून तयार झालेला जो दृष्टीकोन होता तो त्या सभागृहातील प्रत्येकाला मनापासून भावला. व्याख्यान संपल्यावर अनेकांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या व्याख्यानाबद्दल उत्स्फुर्त प्रतिक्रीया दिल्या. लोकांचा मोठा घोळका त्यांच्या भोवती गोळा झाला होता. मला देखील त्यांना भेटायचे होते परंतू त्यांच्या सभोवती फारच गर्दी असल्याने ती ओसरण्याची वाट बघत मी बसलो होतो. तेवढ्यात माझ्या बाजूने बसलेले एक सद्गृहस्थ माझ्याशी बोलू लागले. त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून मी चाटच पडलो. खरे तर माझा त्यांच्या बोलण्यावर सुरुवातीला विश्वासच बसला नाही परंतू ते या व्याख्यात्यांच्या घराजवळच राहतात असे म्हणल्यावर मला त्यावर विश्वास ठेवावा लागला. अर्थात सुरुवातीची आश्चर्याची भूमिका संपल्यावर त्याच गोष्टीला मी एका वेगळ्या दृष्टीकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला मानवी जीवनाचा एक नवा पैलू लक्षात आला. माझ्या बाजूने बसलेले सद्गृहस्थ जे बोलले ते अनेक वेळा अनेकांच्या बाबतीत घडत असते. म्हणूनच त्यासंबंधात आपल्या भूमिका पक्क्या असायला हव्यात ही एक महत्वाची बाब त्या विचारांमधून माझ्या समोर आली.
ते सद्गृहस्थ मला म्हणाले, किती छान बोलले ना हे साहेब? तुम्हाला आवडलेले दिसतेय. अर्थात! मी उत्स्फुर्तपणे उद्गारलो. आता हे सारे कौटुंबिक सौहार्दतेचे भाषण जे तुम्ही ऐकले ते खरोखरीच चांगले होते व त्यामुळे अनेकांना फायदा होईलही. परंतू या वक्त्यांचा त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक जीवनातला अनुभव कसा आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? मी म्हणालो, नाही. कारण मी त्यांना ओळखत नाही. त्यानंतर त्यांनी मला त्या वक्त्यांच्या जीवनातील ती बाजू सांगितली जी त्यांच्या दिड तासाच्या व्याख्यानातील विचारांपेक्षा संपुर्णपणे वेगळी होती. त्यांनी मला सांगितले की हे जे कौटुंबिक सौहार्दतेबद्दल सांगत आहेत व कुटुंबात आनंदी कसे रहायचे हे यांनी सर्वांना सांगितले त्यांच्या घरी रोज होणारी भांडणे आम्ही स्वतः बघत असतो. वादावादी झाली नाही असा एकही दिवस यांच्या घरी उजाडत नाही. नवरा आणि बायको हे दोघेही उच्चविद्याविभूषित आहेत व त्यामुळे दोघांचेही इगो आता एवढे मोठे झालेत की त्यांच्यातील वाद वैचारिक पातळीवरून रोजच्या जीवनातील गोष्टींवर पोहोचले आहेत. या नवरा बायकोच्या भांडणाचा विपरीत परीणाम त्यांच्या मुलांवरही झालेला आहे. ती देखील बाहेरच असतात. त्यांचे घराशी असलेले नाते विस्कळीतच आहे. एकंदरीत काय तर आता दिड तास यांनी जे काही सांगितले ते केवळ समोर बसणाऱ्यांकरीता होते. त्यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या व्यक्तिगत जीवनामधे ते पाळत नाहीत किंवा त्यांना ते जमलेले नाही. कौटुंबिक सौहार्दता कशी टिकवायची हे येथे बसलेल्या दीड हजार लोकांना पटवून देऊन त्यांच्या जीवनात बदल करणारा हा माणूस त्याच्या व्यक्तिगत जीवनात कौटुंबिक पातळीवर संपुर्णपणे अपयशी आहे. किती मोठा विरोधाभास आहे हा? त्यांचे ते ऐकल्यावर मी सुरुवातीला आश्चर्यचकित झालो व नंतर विचारात पडलो. त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील या गोष्टी कळल्याचा परीणाम असा झाला की मी त्यांना भेटण्याचे टाळून सरळ घरी जायला निघालो. काही मिनीटापूर्वी त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टी मला मनापासून पटल्या होत्या व या बाबी आपल्याही जीवनात उपयोगी ठरणाऱ्या आहेत याबद्दल माझी खात्री पटली होती. परंतू क्षणार्धात मला त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टी थोतांड वाटू लागल्या. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण सारखी म्हण देखील मला आठवून गेली. याचा परीणाम असा झाला की त्या व्याख्यानातून मिळालेल्या ज्या वैचारिक साठ्याचा मी विचार करून माझ्या जीवनामधे बदल करण्यास तयार झालो होतो ते काम बाजूला पडले व मी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडींमधे अडकून गेलो. त्यांचा प्रभाव मी जास्त परीणामकारक समजला व त्यामुळे दिड तास मला जे मनापासून पटले होते ते माझ्या मनातून पुसल्या गेले. एवढेच नव्हे तर आता या वक्त्याची अनेक वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने होतात परंतू मी आता ती ऐकायला जात नाही कारण त्या पाच मिनीटाच्या संवादामधे त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील कमजोर बाजू माझ्या समोर उलगडली गेल्यामुळे ती व्यक्ती माझ्या मनात ढोंगी व्यक्ती म्हणून पक्की झाली आहे. एका बाजूने हे बरोबर जरी वाटत असले तरी याला एक दुसरी बाजू देखील आहे. ती म्हणजे व्यावसायीक व व्यक्तिगत जीवनाची सरमिसळ न करता या दोन बाजूंना स्वतंत्रपणे बघणे.
संगीत क्षेत्रात काम करणारा माझा एक मित्र म्हणाला होता की एखादे गाणे ऐकल्यावर त्या गाण्यामधून मिळणारा ईश्वरीय आनंद घ्यावा व गाणे संपताक्षणी त्या कलावंतापासून दूर जावे. याचे कारण अनेक वेळा अत्यंत प्रभावी सादरीकरणामुळे कलावंताची आपल्या मनात निर्माण झालेली प्रतिमा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावल्यावर पुसून जाण्याची शक्यता असते. हीच बाब त्या व्याख्यात्याच्या बाबतीत देखील लागू होते. हा विचार पटणे जरा कठीण आहे परंतू तो पटल्यास आपण अनेक गोष्टींचा निखळपणे आनंद घेऊ शकतो अन्यथा व्यक्तिंच्या व्यक्तिगत जीवनाची छाया त्यांच्या व्यावसायीक जीवनावर पाडून आपण त्यांच्या ठायी असलेल्या प्रतिभेचा आनंद घेऊ शकणार नाही. मुळात एखादे गाणे किंवा एखादे व्याख्यान आपण आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी ऐकत असतो व त्यामुळे त्या क्षणांमधून संबंधित व्यक्ती आपल्याला किती समृद्ध करतोय हाच विचार मनात ठेवल्यास आपण खरोखरीच समृद्ध किंवा आनंदित होऊ शकतो. त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाचा विचार मनात आणल्यास व तो जर त्याच्या सादरीकरणाच्या विरोधातला असेल तर आपण त्याच्या विचारांचा किंवा सादरीकरणाचा आनंद घेऊ शकणार नाही. आणि सध्याच्या आधुनिक काळाचा विचार करता संपुर्णपणे आदर्श असे आयुष्य फारच क्वचित राहू शकते. म्हणूनच व्यावसायीक व व्यक्तिगत आयुष्यांना स्वतंत्रपणे बघता येणे ही देखील एक आवश्यक बाब राहू शकते. अर्थात याचा अर्थ असाही नाही की हातात दारुचा ग्लास घेऊन दारु पिणे वाईट आहे हे सांगितलेले आपण ऐकावे. परंतू व्यक्तीच्या सामाजिक आयुष्यासोबत वेगळे असे खाजगी आयुष्य राहू शकते व या दोन्ही आयुष्यांना आपल्याला स्वतंत्रपणे बघता आले तर अनेक चांगले विचार आपल्याला प्राप्त होऊ शकतात ज्यांच्यामुळे आपले जीवन समृद्ध होऊ शकते. हा विरोधाभास पचविणे कठीण असले तरी तो स्वतंत्रपणे स्विकारल्यास आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो.
नदीचे मूळ आणि ऋषीचे कुल बघू नये असे म्हणूनच म्हटले जात असावे का ?
ReplyDeleteखूप छान लेख .
हार्दिक अभिनंदन .
डॉ संजय पाटील,
प्राध्यापक,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम
लेखकाने दोन भागात लेखाची मांडणी केली आहे.
ReplyDeleteपाहिल्या भागात, भाषण ऐकुन लेखकाने त्या वक्त्याबद्दल स्वतःच.. छानच मत तयार केल होत. परंतु दुसर्या व्यक्तीने, ह्या व्यक्त्याबद्दल विपरीत माहिती दिल्याने हे छानस मत गढूळ झाल. त्यानंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया योग्य वाटते. जर आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल आदर असेल आणि तो जर 'बोले तैसा चाले' ह्या उक्तीनुसार जगत असेल तर त्याच्या शब्दांमधला सच्चेपणा आपल्याला भावेल..अन्यथा नाही.
दुसर्या भागात संगीतकार मित्र जे समजावून सांगतो ते मनाला अधिकच स्पर्शून जातं. आणि पहिल्या भागातील आपल गढूळलेल मत स्वच्छ होत.
मनात असही येत की ह्या वक्त्याच्या घरी अयोग्य वातावरण असल्याने तो हे कौटुंबिक सौहार्दतेबद्दलचे समुपदेशन फार योग्य प्रकारे करू शकेल..
कारण 'अयोग्य काय आहे?' ह्याचा daily dose त्याला त्याच्या घरीच मिळतोय.
शेवटी लेखकानी दिलेला सल्ला 100% पटतो. जो तो आपापल्या पद्धतीने जगत असतो. त्यांच्या personal life मुळे जर समाजावर दुष्परिणाम होत नसतील तर त्यावर आपला वेळ किंवा मत वाया न घालवता आपल्या परिघातील.. आपल्याला समृद्ध करणार्या गोष्टी टिपता आल्या तर जगण्याला अर्थ प्राप्त होईल.
लेखातील तीनही प्रतिक्रिया अगदी योग्य आहेत. पण शेवटची प्रतिक्रिया मला अधिक भवली
ReplyDeleteडॉ.कल्पना देशमुख