थोडा है थोडे की जरुरत है @ 23.11.21

मोहक सहजता

आधुनिक काळात जे वेगवेगळे बदल होते आहेत ना त्यामधला एक चांगला बदल म्हणजे एकूणच व्यावहारिक जीवनामधे येणारी सहजता. ही सहजता कामांचे सारे स्वरुपच बदलून टाकते कामाचा ताण कमी करयाला देखील मदत करते. नव्या पिढीने तर ही सहजता फारच लवकर स्विकारली आहे किंबहुना त्यांचा तो ट्रेंडच झाला आहे. परंतू आधीच्या पिढीच्या ज्या लोकांनी ही सहजता स्विकारण्याचा प्रयत्न केला त्यांना अनेक गोष्टी सोयीच्या होत आहेत आणि नव्या पिढीसोबत काम करणे देखील त्यांना सोयीचे जाते आहे. व्यावहारिक जगतातील अनेक वर्षे जोपासल्या किचकट परंपरा आता कालबाह्य झालेल्या असून तंत्रज्ञानासोबत बागण्या बोलण्यामधेही आलेली अनौपचारिक सहजता फार मोहक वाटते. केवळ ती स्विकारण्यासाठी मानसिकता तयार होण्याची आवश्यकता आहे. अश्या मोहक सहजतेचा मला नुकताच अनुभव आला. ॲपल कंपनीचे एक घड्याळ मी नुकतेच विकत घेतले. त्याचा वापर सुरु केला असता मला त्यामधे एक छोटी समस्या आढळली. म्हणून मी त्यांच्या कस्टमर सर्वीस सेंटरला फोन केला. तेथून सुरु झाला त्या मोहक सहजतेचा प्रवास. तो सारा प्रवास एवढा छान आणि आपुलकीचा होता की मला त्या साऱ्याच प्रक्रीयेचे फार कौतुक वाटले परंतू सर्वात जास्त माझ्या मनाला भावली ती त्यामधील सहजता. किती सहजतेने अजिबात ताण येऊ देता त्यांनी माझी समस्या दूर केली

ओजस नावाच्या एका मुलाने माझ्याशी बोलणे सुरु केले. त्याच्या बोलण्यावरून मी त्याच्या वयाचा अंदाज बांधायला लागलो परंतू त्याच्या पहिल्याच काही वाक्यांमुळे मी तो नाद सोडून दिला. कारण त्या काही वाक्यांनीच त्याने मला समवयस्क करून टाकले. नाही म्हणले तरी महाग वस्तू मी घेतली असल्याने त्यामधे समस्या निर्माण झाली असल्याने माझा मूड जरा चिडलेला असण्याची शक्यता त्याला वाटत असणारच म्हणून सुरुवातीलाच तो मला म्हणाला की चिंता करण्याची अजिबात गरज नाही, मी संपुर्णपणे मदत करीन आणि तुमची समस्या सोडवीन. निश्चिंत रहावे. मला एकदम बरे वाटले की माझी समस्या निदान शांतपणे ऐकून घेतल्या गेली आहे. अन्यथा बरेच वेळा समस्या सांगणे सुरुवात केल्या क्षणी, ही काय समस्या आहे का? हा निव्वळ मूर्खपणा आहे. असे काही नसते. हे मनाचे फालतू केलेले लाड आहेत असे तीव्रपणे बोलल्या गेले तर संवादच संपून जातो. संवाद इंग्रजीतून सुरु होता त्याने मला पटकन विचारले की मी तुम्हाला अविनाश म्हणू शकतो का? त्याच्या त्या विचारण्यात आणि सुरुवातीच्या वाक्यांमधे एवढा स्नेह होता की मी त्याला पटकन, जरुरका नाही? असे म्हणालो. क्षणार्धात साधारण माझ्या मुलीच्या वयाच्या असलेल्या त्या मुलाने माझ्याशी मैत्री केली. हे केवळ त्या संवादातील सहजतेनेच शक्य झालेआता अविनाश म्हणून बोलणे सरु झाल्याने मस्त मनमोकळेपणाने संवाद सुरु झाला. त्याने त्याच्या पातळीवर काही गोष्टी केल्या. त्यानंतर त्याने मला ते घड्याळ रीसेट करायला लावले. ते मी करताना जरा वेळ होता तर त्याने माझा कॉल होल्डवर ठेवताना जो पाच मिनीटाचा वेळ जाणार होता त्यावेळी मी कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायचे हे विचारले. तेच त्याने ऑन करून दिले. किती बारकाईने विचार केला होता त्यांनी त्यांची व्यवस्था उभी करताना. पाच मिनीटे झाली पण रीसेटची प्रक्रीया सुरुच होती. पाच मिनीटाचे संगीत पण संपले होते त्यामुळे त्याने माझी चौकशी करणे सुरु केले. मी काय करतो, माझी नोकरी आहे की व्यवसाय? ते ॲपलचे घड्याळ घेतल्यावर त्यातले कोणकोणते फिचर्स मला आवडले. त्याचा मला काय काय फायदा होणार आहे. नवीन सीरीज असल्याने समस्या येऊ शकते पण मी निश्चिंत रहावे. जर समस्येचे निराकरण झाले नाही तर नवे घड्याळ मिळू शकेल हे पण त्याने आनंदाने सांगितले. त्यात फार अडचणी येतील असा सूर त्याचा अजिबात नव्हता. ग्राहक हा सर्वतोपरी आहे हे त्याच्या शब्दागणीक जाणवत होते. पण हे सारे खूप सहजतेतून त्याने साधले होते. समस्या सुटली नाही मला नवे घड्याळ पाठविले जाईल त्याकरीता त्याने प्रक्रीया केली नंतर बोलणे संपले. माझा प्रॉब्लेम त्याने सोडविला होताच परंतू त्या सर्व संवादात माझ्या लक्षात राहीली ती त्याची सहजता. अत्यंत मैत्रीपूर्ण पद्धतीने संवाद साधून त्याने माझ्या समस्येचे निराकरण केले. त्याने हे सारे करत असताना मला याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून अजून कुणाकडे असे पाठविले नाही. माझे घड्याळ परत करण्याची प्रक्रीया करण्यासाठी सेल्स विभागातील व्यक्तीशी बोलायचे होते ते देखील त्यानेच केले, त्यावेळी तो फोन लाईनवर सोबत होता. ती प्रक्रीया आटोपल्यावर त्याने मला एक मेल पाठवून थेट त्याच्याशी संपर्क करता येईल याची लिंक पण पाठविली. त्यामधे मी त्याला रेकॉर्डेड संदेश पाठवू शकण्याची सोय होती. माझ्या समस्येबाबतीत सेल्स विभागाने नीट कार्यवाही केली की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने मला पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन करुन जाणून घेतले आता नवे घड्याळ माझ्याकडे आल्यावर ज्या समस्येमुळे मी घड्याळ परत केले ती त्या नव्या घड्याळात नाही ना ही खात्री करण्यासाठी तो मला पुन्हा फोन करणार आहे हे देखील त्याने मला सांगितले. हे सारे त्याने अगदी सहजतेने केले कारण ग्राहक दुकानदार यांच्यामधे एरवी असलेले व्यावहारिक नाते त्याने सुरुवातीलाच बाजूला सारले मित्रत्व स्थापित करून समस्या सोडविली. याचा परीणाम असा झाला की समस्या तर सुटलीच परंतू त्याच्याबद्दल पर्यायाने त्याच्या कंपनीबद्दल माझ्या मनात एक छान भाव निर्माण झाला. फोन संपताना मी त्याला मनापासून थॅन्क्यू म्हणालो. जरा बारकाईने विचार केल्यावर मला असे जाणवले की आपल्या जीवनातल्या अनेक समस्या या अश्याच सुटू शकतात जर आपण ही सहजता अंगीकारली तर.

आपल्या जीवनात रोज घडणाऱ्या अनेक गोष्टी अश्या आहेत की त्यांना आपण अकारणच किचकट बनविलेले आहे. सर्वसाधारणपणे समस्यांच्या परीणामांबद्दलच आपण जास्त विचार करत राहतो त्यामुळे समस्या सोडविण्याकरीता लागणारी सहजता गमावली जाते. समस्या साधी नेहेमीची असते परंतू त्यामधे संपुर्ण सामाजिक व्यवस्था, लोकांच्या प्रतिक्रीया, लोकांना काय वाटेल याचा विचार, माझ्या समस्येबद्दल मी सांगितल्यास माझ्या इमेजचे काय होणार, मग माझ्या समस्येचा इतरांना ताण आला तर मग मी कसे करायचे, लोक काय म्हणतील अश्या अनेक विविध जटील बाबींनी आपण समस्या गुंतागुंतीची करून टाकतो. त्यामुळे ती सोडवताही येत नाही त्या गुंतागुतीमधे जीव गुदमरु लागतो. हे सारे होण्यापेक्षा समस्या सोडविण्यासाठी आपले जिवलग मैत्र उपयोगी पडू शकते. कारण ती सहजता तेथेच राहू शकते. निदान मैत्रीद्वारे मन मोकळे करणे ही समस्या सोडविण्याची पहिली पायरी गाठता येऊ शकते. मानशास्त्रीय दृष्टीने विचार केला तरी मनात साचलेला ताण बोलून दाखविला तरी देखील समस्या सुटण्याचा मार्ग मिळू शकतो. त्यासाठी आवश्यकता आहे मनात असलेल्या इगोला, लोकाचा अति विचार करण्याच्या जटीलतेला तथाकथित इमेजला बाजूला ठेऊन सहजता अंगिकारण्याची. ती सहजता आली तर समस्या आनंदाने सुटू शकतात. निदान सुटण्याच्या दिशेने पाऊल पडून मनाची घुसमट कमी होऊ शकते, होय ना





Comments

  1. खरं आहे अवी.

    ReplyDelete
  2. सहजता फार मोठा अलंकार आहे आणि तो सहजतेने व्यक्त केल्या गेला.....सुंदर.

    ReplyDelete
  3. खरोखर आपल्या समस्या अशा सहजतेने सोडविल्या तर किती आनंद मिळेल.

    ReplyDelete
  4. "सहजता "तीही अतिशय सहजतेने आणि छान पद्धतीने मांडली.खूप खूप अभिनंदन .

    डॉ संजय पाटील
    प्राध्यापक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम

    ReplyDelete
  5. 'सहजता ' ती सुद्धा अतिशय सहजतेने आणि सुंदर पद्धतीने मांडली खूप खूप अभिनंदन .

    डॉ संजय पाटील
    प्राध्यापक,
    सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18