थोडा है थोडे की जरुरत है @ 02.02.21
शब्दांची किमया
एक सुंदर सायंकाळ. मनाला उगाचच हुरहुर लावणारी कातरवेळ. अश्या शांत समयी आपण आपल्या निवांतपणे बसून काही सुखद क्षण अनुभवत असतो. अश्यावेळी दिवसभराचा कामाचा शीण आपण विसरण्याचा प्रयत्न करीत असतो. घरासमोरच्या बागेत, बाल्कनीमधे किंवा पाळण्यावर आपण बसलेले असतो. अश्यावेळी आपल्याला आवडते तशी मस्त स्ट्रॉंग कॉफी तयार होते व तो वाफाळलेला कप आपण हातात धरतो. वातावरणात जरासा गारठा असल्याने त्या गरमागरम कॉफीच्या कपाभोवती आपला तळहात गुंडाळून आपण त्याची उब अनुभवतो जी थेट मनापर्यंत पोहोचते. आपल्याला मनापासून छान वाटू लागते. अश्यावेळीच आपल्या आवडीच्या प्लेलिस्ट मधून एक मस्त गझल लागते. जगजीत सिंगची गझल तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसके छुपा रहे हो सुरु होते. त्या गझलच्या सुरेल तरंगांसोबत आपले मन एक वेगळी तरलता अनुभवायला लागते. त्या गझल सोबत आपण गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आपण मिळविलेले हे सुंदर क्षण किती मौलिक असतात. जगजीत सिंगचा धीरगंभीर आवाज वाफाळलेल्या कॉफीसोबत मनाला सुखद आनंद देऊन जाते. असे हे सुरेख क्षण किती महत्वाचे असतात ना?
हा वरचा उतारा वाचून आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाचे संवेदनशील मन या क्षणांचे मोल समजून चुकले असेल. योग्य शब्दांचा वापर करुन आपण काही क्षण मनासमोर निर्माण करु शकतो. या क्षणी प्रत्यक्ष जगत नसलो तरी या वर्णनाच्या आधारे त्या स्वप्नवत क्षणांपर्यंत आपण पोहोचू शकतो. शब्दांची जादू अशीच असते. परंतू यापेक्षाही मोठी किमया सिद्धहस्त आणि संवेदनशील लेखक करतात. गुलजार हे यापैकीच एक आहेत. नुकताच गुलजार यांचा Half a Rupee नावाचा एक कथासंग्रह वाचण्यात आला. वरच्या उताऱ्यात वर्णन केलेला अख्खा प्रसंग किंवा सारे क्षण केवळ पाच शब्दांच्या एका छोट्याश्या वाक्यात गुलजार यांनी मांडले आहेत. वरच्या उताऱ्यात वर्णन केलेल सारे भाव या एका छोट्याश्या वाक्यात मांडणे हे किती अवघड आहे. परंतू हे छोटेसे वाक्य वाचल्यावर आपल्यापैकी प्रत्येकाला यापुढे एवढ्या मोठ्या उताऱ्याची गरज पडणार नाही. केवळ एका छोट्या वाक्यात आपण हे सारे वर्णन अनुभवू शकू. ही किमया आहे सिद्धहस्त लेखकाच्या प्रतिभेची. वर वर्णन केलल्या सुंदर सायंकाळचे वर्णन करताना गुलझार यांनी लिहीले आहे, Gazaling Coffee in the evening. या एका छोट्याश्या वाक्यात वरच्या उताऱ्यातील सारे भाव गुलजार यांनी उमटवीले आहेत. या वाक्याचे व्याकरण कदाचित बरोबर नसेलही, परंतू त्यातील भाव मात्र अचूक आणि चपखल आहेत. व्याकरणाच्या रुक्ष गुंत्यात अडकण्यापेक्षा भाव मनापर्यंत पोहोचणे कधी कधी जास्त आवश्यक असते. असेच आणखी एक उदाहरण बघुयात.
पहाटेपासून पावसाची रीपरीप सुरु होती. सुटीचा दिवस असल्याने दिवस रेंगाळलेलाच होता. पावसाचा जोर फार नव्हता परंतू घराबाहेर पडता येत नव्हते. हॉलमधे असणारी ती भली मोठी काचेची खिडकी व त्याच्या जवळ बसता येण्यागत जागा खरोखरीच छान होती. त्या खिडकीच्या काचेवरुन ओघळणारे पावसाचे थेंब किती सुरेख दिसत होते. हातात गरमागरम चहाचा कप घेऊन त्या ओघळणाऱ्या थेंबांकडे बघताच काय सुंदर सुंदर कविता आठवू लागल्या. संदीप खरेची पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली. एखाद्या सखीची सुरेल आठवण करुन देणारी ही कविता आणि त्यातील शब्दांसोबत सखीच्या पैंजणांची किणकिण मनात डोकावली. त्या कवितेचा मूड ओसरत नाही तर लगेच बालपणीचा खास ठेवा असणारी छोटीशी कविता, येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा आठवली. कवितेसोबत बालपणीचे सुंदर दिवस देखील अलगद रांगत रांगत मनात गोळा झाले. त्या दिवसांच्या आनंदापलीकडे आणखी एक कविता वाट बघत होती. ती गेली तेव्हा रीमझीम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे, तो सूर्य सोडवित होता, ग्रेसांची कविता ज्यात आईच्या जाण्याचे वर्णन आहे. पृथ्वीवरील आपल्या सजीव अस्तित्वाचा सर्वात सक्षम धागा म्हणजे आई. तिच्या वियोगाचा पावसाशी संबंध जोडणारी ही कविता मन उदास करुन टाकते. पुढच्या कडव्यातील अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदिल एकटा होता या ओळी वाचल्यावर तर काचेच्या खिडकीवरुन ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबात आपल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू मिसळले नाही तरच नवल. पण अश्या कवितेतून मनाला आलेली खिन्नता परत धूवून काढण्यासाठी पावसाची आणखी एक कविता आठवते. ना. धो. महानोरांची कविता, नभ उतरु आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात. ही कविता तर मनाला केवळ उभारीच देत नाही तर त्या खिडकीच्या पलीकडे असलेल्या पावसात चिंबचिंब भिजण्याची तीव्र इच्छा निर्माण करते. रीमझीम बरसणारा असा पाऊस आणि त्यासोबत मनात रेंगाळणाऱ्या या कविता हे सारे किती छान आहे. आता हे सारे वर्णन जर आपल्याला एका छोट्याश्या वाक्यात समजून घ्यायचे असेल आणि हा सारा भाव त्यामधून आपल्याला व्यक्त करायचा असेल तर पुन्हा एकदा गुलजार मदतीला येतात.
गुलजारच्या त्याच पुस्तकातील एका कथेमधे अश्यास एका पावसाळी दिवसाचे वर्णन आहे ज्यावेळी खूप साऱ्या पावसाच्या कविता मनात येतात. त्याचे वर्णन गुलजार यांनी काय सुरेख व परत एका छोट्याश्या वाक्यात केलेले आहे. Enjoying Poeming Rain. केवळ तीन शब्द परंतू वरच्या उताऱ्यातला सारा भाव त्यात येतो व आता आपल्यापैकी कुणालाही यापुढे एवढ्या मोठ्या उताऱ्याची गरज भासणार नाही तर केवळ या तीन शब्दांनी आपण सारा आनंद अनुभवू शकू.
ही किमया आहे शब्दांची. परंतू हे असले शब्द कुणाला सुचतात हा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यासाठी गुलजार सारखे लेखन करुन चालत नाही तर त्यांच्याकडे असणारी संवेदशीलता आपल्याकडेही असावी लागते. अन्यथा शब्दसंग्रह तर प्रत्येकाकडेच असतो. परंतू आपल्या शब्दसंग्रहातील शब्दाची संवेदनशीलतेने निवड करणे प्रत्येकाला जमत नाही. म्हणूनच अनेकवेळा असे सांगितले जाते की शब्दांनीच माणसे जोडली जातात अन् शब्दांनीच ती तोडली पण जातात. याबाबत तर असेही बोलले जाते की शस्त्राचा घाव भरुन निघतो परंतू शब्दांचे घाव कधीच भरुन निघत नाहीत. गुलजार सारख्या कवीकडून मोजक्या शब्दात मोठा व संवेदनशील भाव निर्माण करणारी वाक्ये वापरणे आपल्याला शिकायला हवे. कारण मने दुखविणारी वाक्ये बोलायला शिकवावी लागत नाही, ती सहजच बोलली जातात. परंतू मने जोडणारी वाक्ये बोलणे शिकावे लागते आणि यासाठी गुलजार सारखा संवेदनशील स्रोत किती महत्वाचा ठरतो. होय ना?
Nice
ReplyDeletePicturesque
Touching
And above all making me nostalgic .
Khupach mast
ReplyDeleteसुंदर ...
ReplyDeleteBeautiful
ReplyDeleteवाचन करतांना फार कमी वेळा अस होत की .. ते समोर लिहिलेले शब्द आपण अक्षरशः अनुभवत असतो, हाच प्रत्यय हा लेख वाचतांना येतो.
ReplyDeleteपहिल्या भागातील शब्द वाचतांना संध्याकाळची हुरहुर, वातावरणातील गारठा, वाफळलेल्या कॉफीच्या ऊबेला सोबतीला.. ती गझल,
हे सार काही अनुभवत असतानाच लेखक ही सारी अनुभुती आपल्याला दुसर्या पद्धतीने जगायला सांगतो आणि तीही आपण अलगदपणे स्विकारतो..ही त्याच्या शब्दांची किमया!
लेखाच्या दुसर्या भागात लेखक वाचकांना रिमझिमत्या पावसात घेऊन जातो. तिथे किती तरी भावभावना उचंबळून येतात.. कारण लेखकाने केलेल्या गाण्यांची निवड!
'शब्दांतील संवेदनशीलता आणि मनं जोडण्यासाठी त्याच्या वापर..'
हे व्यक्त करण्यासाठी लेखकानी शब्द आणि संगीत ह्याचा मिलाफ अत्यंत कुशलतेने केलाय आणि त्यामुळेच हा लेख अत्यंत वाचनीय झालाय.
एनढे मार्मिक विष्लेषण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
DeleteKhup sunder
ReplyDeleteखूप अप्रतिम शब्दलालित्य सर
ReplyDeleteMusical and free flowing writing. Congratulations.
ReplyDeleteEnjoyed reading this!
ReplyDeleteसर खूप छान मांडणी करून शब्दाच्या संवेदना माडल्यात आणि वाचता वाचता प्रत्यक्ष क्षण स्वतः अनुभवतो आहे असे वाटते, अभिनंदन सर 💐
ReplyDelete