थोडा है थोडे की जरुरत है @ 05.01.21

एकच दाणा

तुम्ही एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलात. अशी कोणती एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून कायम स्मरणात आहे? एका मुलाखती दरम्यान एका सिनेपत्रकार भगिनीने हा प्रश्न सध्या फार चर्चेत असलेल्या एका अभिनेत्याला हा प्रश्न विचारला. चित्रपट आणि वेबसिरीज यामधून अत्यंत कृरकर्मा असे व्यक्तीचरीत्र रंगविणारा तो अभिनेता आपल्या गत आयुष्याबद्दल सांगत होता. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे मधून मधून सांगितल्यामुळे त्या पत्रकार भगिनीने त्याला हा प्रश्न विचारला होता. खरे तर मुख्यत्वे करुन अत्यंत थंड डोक्याचा खलनायक म्हणून वेगवेगळ्या भूमिका रंगविणारा हा अभिनेता या प्रश्नावर जरा विचारात पडला. परंतू त्यानंतर त्याने संवेदनशीलपणे जे उत्तर दिले त्यावरुन त्याच्या क्रूर भुमिकांच्या मागे एक अत्यंत संवेदनशील माणूस दडलेला आहे हे लक्षात आले. तो म्हणाला, तश्या तर अनेक गोष्टी आहेत परंतू एक गोष्ट मात्र अगदी ठसठशीतपणे माझ्या मनावर कोरल्या गेली आहे. तो प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी सांगू लागला...

लहानपणी मी उत्तर प्रदेशातील एका छोट्याश्या खेड्यात राहत होतो. शेतीच्या भरवश्यावरच आमचे घर चालायचे. शेतकऱ्याचे जिवन कसे असते ते मी तुम्हाला सांगतो. ही कथा आहे धान्याच्या एका दाण्याची. उन्हाळ्यात शरीरावरची त्वचा रापून निघेल अश्या आगीसम उन्हात शेतकरी आपल्या बैलजोडीसह शेताची नांगरणी सुरु करतो. पावसाकरीता जमीन तयार करणे हे त्याचे काम असते. रापत्या उन्हाची चिंता करता, मृगाच्या पावसाची वाट बघत त्याचे दिवस पुढे जात असतात. तो एक धान्याचा दाणा पेरण्यासाठी त्याला मृगाच्या पावसाची चातक बनून वाट बघावी लागते. त्या दाण्यासाठी त्याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा तगादा सुरु झालेला असतो परंतू या शेतामधूनच मला सारे काही मिळणार आहे अशी टोलवाटोलवी त्याची सुरु झाली असते. मृगाचा पाऊस लांबतो तो धान्याचा दाणा पेरण्याची वाट बघणे त्या शेतकऱ्याला असह्य होऊन जाते. कसाबसा पाऊस येतो. लगबगीने पावसाची चिंता करता तो त्याच्या शेतात तो दाणा पेरता होतो. परंतू त्याची परीक्षा संपलेली नसते. पेरणी झाल्यावर पुन्हा पिकाकरीता त्याला पावसाची वाट असतेच. तो दाणा जवळपास मृतप्राय होण्याच्या स्थितीला कसाबसा पाऊस येतो. ज्या जिद्दीने शेतकरी जगण्याचा प्रयत्न करतो तसेच त्या दाण्याचेही सुरु असते. मुळातच सकसता नसल्याने त्या दाण्यातून उगविणारे रोप देखील कसेबसेच असते. परंतू तरी देखील शेतकऱ्याला आनंद होतो. जगण्याची उमेद निर्माण होते, आतातरी आपल्याला अवहेलना सहन करावी लागणार नाही असे त्याला वाटू लागते. दाण्यातून निघालेले रोप मोठे होताना आपल्या अपत्यांचा सांभाळ करावा तसे तो त्यास जपतो. त्याला खत पाणी देण्यासाठी पुन्हा त्याच सावकाराकडे जाऊन पिकाबद्दल खात्री देऊन पुन्हा पैसे आणतो. सारे पैसे परत करुनही आपल्याला वर्षभराचा संसाराचा गाडा ओढण्यासाठी पैसे मिळणार ही आशा त्याला जगवत असते. दाण्यातून निघालेल्या रोपाला आता कणसे लागली असतात. फार भरगच्च नाही तरीदेखील शेकडो दाण्यांनी भरलेली कणसे रोपावर डोलू लागतात. कापणी करण्याचे अवघ्या दोन दिवसावर आलेले असते आणि परत अघटीत घडते. शहरातील प्रदुषणाच्या भयानक वाढलेल्या पातळ्यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असतो. पिक कापणीला आल्यावर ऑक्टोबर महिन्यात धोधो पाऊस कोसळू लागतो. इतका कोसळतो की गेल्या पंचेवीस वर्षांचे रेकॉर्ड तोडणारा पाऊस अक्षरशः दाणादाण उडवून टाकतो. त्या दिवशी रात्री पाऊस सुरु झाल्यावर शेताच्या रस्त्यावर असलेल्या नाल्याला प्रचंड पूर आला असतानाही आपल्या शेतातील रोपाची अवस्था बघण्यासाठी तो शेतकरी पुरात उडी मारुन पोहत पैलतीरावर पोहोचतो. त्याच्या गळक्या घरामधे त्याच्या परतीच्या वाटेवर आस लावून बसलेली दोन मुले आणि ओल्या झालेल्या साडीच्या पदराने डोळ्यातील आसवे पुसत त्याची प्राण कंठाशी आणून वाट बघत असलेली बायको बेचैन झालेले असतात. रात्रीचा प्रहर उलटून जातो तरी तो परतत नाही. भयाण रात्रीमधे काळासारखा पाऊस कोसळत असतो. मधेच धरणीला कंप जाईल की काय अशी मनात धडकी भरविणारी विज कडाडते. पण तो येत नाही. रात्रीचा प्रहर उलटून जातो. मनात नाही नाही त्या शंकांनी घर केलेले असते. रात्रीच्या त्या भयावह वेळी साप, विंचू, काटे या कश्याचीही तमा बाळगता त्या घरचा बाबा शेतावर गेला असतो, कशासाठी? तर, या भयानक पावसानंतर काही धान्य हाती लागते का ते बघायला!! घरातल्या खांबाला टेकून त्याची पत्नी बसली असते. मुले बाबांची वाट बघून बघून आणि रडून झोपी गेली असतात. कंदीलातील वात शेवटची फडफड करीत असते. घरातील रॉकेलची शेवटची बाटली देखील संपली हे तिला माहित असते. कंदीलात टाकायलाही रॉकेल नाही. वेळ पुढे सरकत असतो. अचानक रात्रीच्या उत्तर प्रहरी अचानक तिला कुणीतरी घराकडे चालत येत आहे असे जाणविते. मोठ्या आशेने तिने बाहेरच्या घनदाट आळोखात जमेल तेवढ्या दूर बघण्याचा प्रयत्न करते. थोड्या वेळातच आपल्या पतीची आकृती तिच्या लक्षात येते. पावसाचा जोर अजूनही तसाच असतो. त्या कोसळणाऱ्या पावसातही आपल्या पतीचे हळू हळू चालत येणे तिला जरा खटकले असतेच. परंतू तो परत आलाय हाच तिच्या मनाला मोठा दिलासा असतो. तो घरात आला तेव्हा त्याच्या कपड्यांमधून पाणी निथळत असते. आपले वडील आले म्हणल्यावर मुले देखील जागी होतात. खोलीच्या मधोमध तो उभा असतो. संपुर्णपणे उध्वस्त झाल्यागत त्याचा चेहेरा दिसत असतो. त्याच्या पत्नीला नेमके काय झालेय हे विचारण्याचे धारीष्ट्य झाले होत नाही. साडीच्या पदराचे टोक दातात धरुन दोन्ही मुलांना जवळ घेऊन ती त्याच्याकडे बघत असते. आपल्या दोन्ही मुलांकडे त्याचे लक्ष जाते आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. साधारण पाच किलोमीटर रात्रीच्या अंधारात आणि वादळ वाऱ्यात वाट तुडवत आल्यावर आता मात्र त्याच्या पायातले त्राण अचानक संपते. तो गुडघ्यावर खाली बसतो आणि चक्क एखाद्या लहान मुलासारखा हंबरडा फोडू लागतो. रात्रीच्या त्या शांततेमधे त्याचा आवाज त्याच्या पत्नीचे काळीज चिरुन टाकतो. मुले तर बिचारी रडायलाच लागतात. पत्नी जरा हिंमत करुन त्याच्या खांद्यावर हात ठेवते नि विचारते, काय राहीले? गच्च दाबून धरलेली उजव्या हाताची मुठ तो महत्प्रयासाने उघडतो. त्यात धान्याचा एक दाणा असतो. कोलमडून गेलेल्या स्थितीत तो म्हणतो, बस एवढेच राहीले, बाकी सारे संपले...

पंकज त्रिपाठी म्हणाला, आमच्या प्रत्येकाच्याच घरी अशी स्थिती कमी अधिक प्रमाणात येतच रहायची. हे सारे सांगितल्यावर तो म्हणाला, शेतकऱ्याच्या घरात जन्म झाल्यामुळे मला त्या धान्याच्या एका दाण्याची किंमत ठावूक आहे म्हणूनच आज एवढी प्रसिद्धी मिळाली असली, बरीच सधनता आली असली तरी देखील एक गोष्ट मी कायम पाळतो, ती म्हणजे मी पानात अन्नाचा एक कणही कधी उष्टा सोडत नाही. कारण त्या धान्याच्या एका एका दाण्यासाठी शेतकऱ्याला किती संघर्ष करावा लागतो हे मला चांगलेच माहित आहे.

परमेश्वराच्या आणि शेतकऱ्याच्या कृपेमुळे जे अन्न आपल्याला मिळते ते खाताना त्यातील एक कणही पानात उष्टा टाकल्या जाऊ नये एवढी छोटीशी गोष्ट देखील आपल्याला संवेदनशील बनण्यास पुरेशी ठरु शकते. पानात उष्टे अन्न टाकण्याचा छोटासा निग्रह आपल्याला आपल्या कुटुंबासह करता येईल?







Comments

  1. प्रेरणादायी लेख आहे. परंतु संवेदनशील मनच समजू शकते. एकाचे एकेवीस फक्त शेतकरीच करू शकतो.🙏

    ReplyDelete
  2. अप्रतिम हृदयस्पर्शी लेखन

    ReplyDelete
  3. Inspiring. Indeed..a life lesson!

    ReplyDelete
  4. एवढी एक गोष्ट आयुष्यभर पालन केली तरी मला वाटते की देशाचे दैन्य दूर होईल. बुफे मधील दृश्य डोळ्यासमोर आणा. उत्तम लेख.

    ReplyDelete
  5. एकच दाणा....शेतक-याचे भावविश्व अलगदपणे टिपले

    ReplyDelete
  6. Inspiring lekh , its real life of farmers , thank u sir, Dr. Rohini Deshmukh

    ReplyDelete
  7. जाणिव जागविणारे लेखन . Excellent

    ReplyDelete
  8. खूप छान विष्लेषण

    ReplyDelete
  9. अप्रतिम लेख....वाचकांना जागृत करणारे.. शेवटी एक सुंदर विचार देऊन जाणारे... भाषेमध्ये असणारा ओलावा.. तसेच जगाच्या पोशिंदा प्रति असणारा आदर द्विगुणीत करणारे लेखन...

    ReplyDelete
  10. सर अप्रतिम लेख!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18