थोडा है थोडे की जरुरत है @ 12.01.21
योगदान
तो दिवस प्रचंड ताणाचा होता. खरे तर सकाळपासूनच ताण सुरु झाला. आधल्या दिवसापर्यंत सारे या दिवसाची तयारी करीत होते. काळ वेळाचे भान उरले नव्हते. टास्क अतिशय मोठा आणि नेहेमीपेक्षा सर्वस्वी वेगळा होता. परीस्थीती फारच अपेक्षितपणे वेगळी निर्माण झाल्यामुळे हा सारा बदल करावा लागला होता. शिवाय अनेकजण याच्या परीणामांशी संबंधित असल्याने काळजी होती. प्रत्येक गोष्ट सर्व पातळ्यांवर तपासणे सुरु होते. रात्री उशीरापर्यंत सर्व संबंधित लोक डोळ्यात तेल घालून सर्व गोष्टी बारकाईने बघत होते. त्यांच्यासोबत अधिकारी मंडळी देखील सर्वांकडून प्रत्येक गोष्ट नीट तपासलीय की नाही याची खात्री करुन घेत होते. आधल्या दिवशी रात्री १ वाजता त्या इमारतीसमोर उभे राहून तेथील प्रमुख म्हणाले उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आपल्या सर्वांचीच परीक्षा आहे. सारे ठीक झालेय, अनेक वेळा तपासून झालेय असे मनाला समजावीत प्रत्येकजण घरी गेला. त्याने पण आपल्या प्रमुखांचे हे वाक्य ऐकले. सारे घरी निघून गेले. तो मात्र तेथेच राहीला.
दुसरा दिवस महत्वाचा दिवस सुरु झाला. सकाळपासूनच सारे कामावर हजर होते. सर्वांचीच जेमतेम झोप झाली होती. तो तर जवळपास जागाच होता. इतरांप्रमाणे तो देखील कामावर हजर झाला. त्याला देखील त्या दिवसाचे महत्व कळले होते. परंतू दिवसभर त्याच्यापुढे काय वाढून ठेवलंय हे इतरांप्रमाणे त्याला तरी कुठे ठाऊक होते? जसा जसा दिवस पुढे सरकू लागला तसा तसा ताण वाढायला लागला. समस्या मोठी होऊ लागली. सारखे फोन खणखणू लागले. वेगवेगळे रींगटोन आणि त्यानंतर समस्यांबद्दल माहिती घेणे आणि त्याबद्दलचे समाधान देण्याचा प्रयत्न करणे सुरु झाले. प्रत्येकाकडे काही ना काही टास्क होता. हे होत नाहीये, ते होत नाहीये, इथे ही समस्या, तेथे ती समस्या असे मोठ्या प्रमाणात सुरु झाले. काल रात्रीपर्यंत सारे काही ठीक होणार हा विश्वास डळमळायला लागला. सर्वांच्याच जीवाची घालमेल सुरु होती. प्रमुख लोक सर्व गोष्टींवर नजर ठेऊन होते. गोष्टी त्यांच्याही प्रयत्नांच्या पलीकडे होत्या. तंत्रज्ञान कधी कधी माणसाला हतबल बनविते याचा अनुभव त्या ठिकाणी असलेल्या आणि दूरवर असलेल्या प्रत्येकालाच आला होता. गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हा सर्व प्रकार घडत असताना तो मात्र या बाबत अनभिज्ञ होता. कारण हा सारा प्रकार त्याच्या कार्यक्षेत्राचा भाग नव्हता. त्याला या सर्व प्रकाराची तीव्रता तेव्हाच जाणविली जेव्हा एका प्रमुखाने त्याला सांगितले, जरा तयार रहा. तयार रहा म्हणजे काहीतरी गडबड आहे हा अर्थ त्याला कळला. थोड्याच वेळात त्याला त्या समस्येचे प्रत्यंतर आले.
समस्या मोठी झाल्याने व अस्वस्थता वाढल्याने अनेकांनी त्या मुख्यालयाच्या ठिकाणी धाव घेणे सुरु केले. आता मात्र संपुर्ण व्यवस्था सतर्क झाली. समस्येवर तोडगा काढणे गरजेचे होते. वेळ पुढे सरकत होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरु झाल्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या समस्येला समजून त्याचे विश्लेषण करु लागला. त्याचे पडसाद उमटू लागले. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात समस्या सर्वश्रूत व्हायला वेळ लागत नाही. माहिती अनेकांना मिळाल्यावर अनेक जण मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचू लागले. गर्दी वाढू लागली आणि आता खरे त्याचे काम सुरु झाले. लोकांना थोपवून ठेवणे आणि विशेषतः अस्वस्थ मानसाला शांत करणे हे सर्वात जिकरीचे काम होते. प्रमुखांपैकी एकाने ती बाजू सांभाळण्याचे ठरले. परंतू एकदम गर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे समुह बनविण्याचे महत्वाचे काम याने सुरु केले. अश्यावेळी रागावून आलेल्या लोकांच्या रागाला उद्रेकामधे परावर्तीत होऊ न देण्याचे कसब तो मोठ्या जिकरीने करीत होता. त्याच वेळी त्याला फार शिथीलता देखील येऊ द्यायची नव्हती. ज्यांना तो थांबवित होता ते त्याला रागाने अद्वातद्वा बोलत होते. परंतू त्यांचे बरोबर आहे कारण ते घाबरलेले आहेत हे समजून घेण्याचे काम तो करीत होता. अतिशय शांतपणे त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत तो गर्दीला आटोक्यात आणत होता. ताण फार जास्त वाढत असल्याने त्याला एकाच वेळी शिस्त राखणे आणि गर्दीला सांभाळणे ही दोन्ही कामे करुन खरे तर तारेवरची कसरतच करावी लागत होती. परंतू तो या कामामधे निपूण असल्यानेच रात्रभर जवळपास जागे रहावे लागले असले तरी देखील त्यालाच ही परीस्थिती सांभाळण्यासाठी सांगण्यात आले होते. अजिबात तक्रार न करता व परीस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन त्याने देखील काम करण्याचे स्विकारले होते. त्याच्यामुळे गर्दीचा व्यवस्थेवर येणारा ताण कमी होत होता. त्याच्या कर्तव्यदक्षतेमुळे व्यवस्थेतील प्रत्येकाला तोडगा काढण्याकरीता निवांत वेळ मिळत होता. त्या प्रसंगी ते काम फार महत्वाचे होते. दिवसभर त्याला या परिस्थीतीला सांभाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. रात्र झाल्यावर गर्दी पांगली. त्या गर्दीतील सर्व मंडळींकरीता आणि त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवस्थेद्वारे वेगाने निर्णय घेण्यात आले. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरु झाली. हे सारे करीत असताना निर्णय घेणाऱ्या लोकांना जो निवांत वेळ मिळू शकला आणि मुख्यालयी गोळा झालेल्या गर्दीचा त्यांच्या निर्णय प्रक्रीयेमधे अवरोध निर्माण झाला नाही याचे कारण हा माणूस होता. मजबुतीने त्याने गर्दीला सांभाळले होते. गर्दीचे स्वतःचे एक मानसशास्त्र असते. तेथे तर्क किंवा भावना उपयोगाची नसते. त्या दिवशी देखील गर्दीचा मुड स्वाभाविकपणे तीव्र होता. परंतू त्या गर्दीला सांभाळणे व त्यांना कुठेही नकारात्मक विचार न करु देता तोडगा काढण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न झाले त्यामधे याचा वाट फार मोठा होता कारण मैदानावर उतरुन त्याने गोष्टी नियंत्रणात ठेवल्या होत्या.
रात्री परत १ च्या सुमारास सर्व अधिकारी व इतर काम करणारे घरी जायला निघाले. खरे तर मनामधे खिन्नता होती कारण तो नवा प्रयोग फार यशस्वी झाला नव्हता. परंतू तरीदेखील त्यापासून कुणाचेही नुकसान होऊ नये याचा प्रयत्न सर्वांनी करुन सारे घरी निघाले. निघताना अचानक याच्याकडे सर्वांचीच नजर गेली. दिवसभर अक्षरशः जीवाचा कोट करुन त्याने परीश्रमपूर्वक एवढा मोठा बाका प्रसंग सांभाळला होता. त्या घाई गडबडीत कदाचित त्याला डबा खायलाही वेळ मिळाला नव्हता कारण डब्याची पिशवी तशीच दिसत होती. आधल्या दिवशीचे जागरण झाले होते म्हणून खूर्चीवर बसल्या बसल्या मान कलती होऊन त्याचा डोळा लागला होता. सर्व अधिकारी निघाले म्हणून कुणीतरी त्याला उठवायला गेले. परंतू प्रमुखांनी सांगितले, त्याला झोपू द्या. क्षणभरच सारे त्याच्या त्या गाढ झोपी गेलेल्या मुर्तीकडे बघत राहीले. अचानक प्रमुख म्हणाले, आपल्याला बरेच वेळा ठाऊकच नसते की एखादा निर्णय करताना त्याला किती जणांची मदत लाभत असते. आता याचेच बघा ना! प्रत्यक्ष सहभाग नसला तरी देखील याच्या अथक प्रयत्नांमुळेच आज निर्माण झालेल्या परीस्थितीवर तोडगा काढता आला. या असल्या कदाचित कुणीही दखल न घेणाऱ्या योगदानांमुळेच कोणतीही संस्था मोठी होत असते. या असल्या योगदानाची दखल सर्वात पहिल्यांदा घ्यायला हवी. प्रमुखांचे अगदी खरे होते.
एक साधा सिक्युरीटी गार्ड देखील एखाद्या संस्थेच्या प्रगतीच्या आलेखामधे आपले सक्षम योगदान देऊ शकतो. गरज आहे ती त्याच्या योगदानाची संवेदनशीलपणे दखल घेण्याची. चांगल्या कृतींची दखल घेणारी अशी संवेदनशीलता जर आपण जोपासू शकलो ना, तर प्रत्येक संस्था मजबुतीने उभी राहू शकते, होय ना?
वास्तविकता आणि सूक्ष्म निरीक्षणाचे मोजक्या शब्दात प्रगटीकरण.
ReplyDeleteNice writing appreciating the devoted but neglected class of real workers
ReplyDeleteम्हणूनच तर रामसेतू बांधताना खारीचा वाटा किती महत्वाचा होता. खुप छान लिहिलंय. मस्तच
ReplyDeleteKhar ahe, kuthlyahi thikani sarwach ghatak tevhadech mahatwpurn astat he satya ahe
ReplyDeleteखूप सुंदर बाबा
ReplyDeleteअचूक, तंतोतंत किंवा नेमक्या शब्दांची निवड आणि त्यामुळे होणारी वातावरण निर्मिती ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा लेख आहे.
ReplyDeleteलेखाच्या पहिल्या ३-४ ओळी वाचल्यावरच, लेखकाने लिहिलेली परिस्थिती आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः उभी रहाते. तिथे सुरू असलेली गडबड, ताण, लगबग आणि अस्वस्थता जाणवायला लागते. इथेच लेखक वाचकांचा ताबा घेतो आणि वाचक म्हणुन आपणही भांबावलेल्या मनस्थितीत लेखकाचा हात घट्ट धरून रहातो.
घटनास्थळाचा नेमका उल्लेख केला गेला नाही आणि वाचक म्हणुन आपल्याला त्याची उणीवही भासत नाही. एकामागून एक घटना घडत जातात, आपण प्रत्येक व्यक्तिरेखेच स्वतंत्र अस्तित्व अनुभवत असतांना आपली उत्सुकता शिगेला पोहोचविण्यात लेखक १००% यशस्वी झाला असतो.
कुठलाही task म्हणजे एक मोठ्या jigsaw puzzle सारखाच असतो. प्रत्येक तुकड्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते.. ही बाब प्रकर्षाने लक्षात आली.
छोट्याश्या योगदानाचे मोलाचे महत्त्व आणि त्याची जाणीव ठेऊन केलेले कौतुक हा लेखकाने मांडलेला विचार..
'इवल्याश्या खारीला श्रीरामांनी दिलेली दाद' ह्याची आठवण करून देतो.
सर, अप्रतिम
ReplyDeleteअगदी खरंय सर,नेमकेपणे एक मोठी पण सत्य बाब शब्दांत व्यक्त केली.यामधील प्रमुखासारख्या प्रमुखांची वाट पाहण्यात कित्येकांचे आयुष्य निघून जाते.संवेदनशीलता संस्थांमधे दुर्मीळच झाल्याचा अनुभव एव्हाना रोज कुठेना कुठे येतोच.भंडारा जिल्ह्य़ातील अपघातात तरी काय दिसतं
ReplyDeleteअप्रतिम... अचूक व सूक्ष्म निरीक्षण,प्रभावी शब्दरचना, आणि खूप महत्त्वाचा विचार... खरच प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वपूर्ण असते... म्हणूनच खारीचा वाटाही रामायणात मोठा व महत्वपूर्ण झाला.
ReplyDeleteसंवेदनशील मन असल्याशिवाय का असे टिपणे शक्य आहे!
ReplyDelete