थोडा है थोडे की जरुरत है @ 26.01.21

मी वाट बघतेय.. नव्या भगतची

मी वाट बघतेय भगतची. फार आतुरतेने. पण आजकाल माझे मित्र मैत्रीणी मला पार विसरून गेलेत असेच वाटते. त्याच्या इतर कामात ते एवढे गर्क आहेत की मला भेटायला येणे त्यांना जमतच नाही. खरे तर त्यांना अनेकवेळा माझे महत्व सांगितले जाते. त्यांचे आई वडील किंवा गुरुजन त्यांना माझ्या महत्वाबद्दल सांगत असतात. परंतू आता गंमत अशी झालीय की माझ्याबद्दल कुणी केवळ सांगायलाही लागले तरी माझ्या मित्र मैत्रीणींना बोअर होते. पण तरीही त्यांना माझ्याबद्दल कुणीतरी सांगतच राहते. याचे महत्वाचे कारण म्हणजे कुणी कितीही नाकराले तरी माझे महत्व कधीच कमी होत नाही किंबहुना ते कमी होऊच शकत नाही. कारण माझ्याकडे जी गोष्ट आहे ती कायमच सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेली आहे नव्हे, एखाद्या राष्ट्राचा खरा खुरा विकास घडवायचा असेल तर माझ्याजवळ असलेल्या या गोष्टीचा वापर केल्या जाणे क्रमप्राप्त आहे. ती गोष्ट म्हणजे मानव जातीला आवश्यक असलेले ज्ञान. परंतू त्या ज्ञानाकडे आजकाल फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. त्याचा काही उपयोग नाही असाही विचार प्रवाह सध्या अस्तित्वात येतोय. अश्या ज्ञानापेक्षा बाकी मार्ग जास्त परीणामकारक आहेत हे देखील सांगितले जाते. पण हे तितकेसे खरे नाही. याला कारण माझ्या जवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग किती मोठा परीणाम साधल्या जाऊ शकतो हे मलाच ठाऊक आहे. यासाठी मला साधारण शंभर वर्षांपूर्वीचे दिवस मला आठवतात

शंभर वर्षांपूर्वी माझ्या सहवासात आलेला तो उमदा तरुण मला आठवतो. नुकताच महाविद्यालयात प्रवेशित झालेला आणि माझ्या संपर्कात आलेला. पण माझ्या संपर्कामुळे त्याच्या मनात देशप्रेमाची जी मशाल पेटली त्यामुळे सारी इंग्रज राजवट हादरून गेली होती. पंजाबमधील बंगा गावी जन्मलेला तो तरुण त्याच्या सहकारी मित्रांसह जेव्हा माझ्या संपर्कात यायचा तेव्हा त्या साऱ्या तरुणांचे एकत्रीकरण मी मोठ्या कौतुकाने बघायची. काय तो बोलण्यातला आवेश, काय ती विचारांची झेप आणि या सर्वांकरीता लागणारे सारे वैचारिक संदर्भ मी त्यांना पुरवायची, माझ्या ज्ञान भंडारातून. वेगवेगळ्या राष्ट्रांमधील वेगवेगळ्या क्रांतीकारकांच्या जीवनाचा अभ्यास, त्यांनी उभारलेल्या चळवळी, त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशाला गुलामगीरीतून मुक्त करण्यासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींबद्दल साधारण अठरा किंवा एकोणवीस वर्षांचे हे तरुण जेव्हा बोलायचे तेव्हा मला माझ्या असण्याबद्दल अभिमान वाटायचा. त्यांचे प्राध्यापक देखील अनेक वेळा त्यांना सोबत घेऊन बसायचे त्यांच्यासोबत अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा घडायच्या. मग यामधे गांधींनी घेतलेली भूमिका, सावरकरांचे त्याबद्दल मत, किंवा इंग्रजांनी प्रस्तावित केलेला एखादा कायदा, त्याद्वारे भारतीयांवर होणारे परीणाम, याबद्दल इतर देशातील विचारवंतांची मते अश्या विविधांगी विषयांवर चर्चा घडायच्या. या चर्चांमधूनच या मुलांनी एक क्रांतीकारी संघटना देखील सुरु केली. त्या संघटनेच्या माध्यमातून संपुर्ण देशभर आंदोलने आणि स्वातंत्र्याबद्दलचा विचार पोहोचविण्याचे कार्य सुरु केले गेले. हळू हळू संघटना मोठी झाली. या मुलांनी वेगवेगळ्या पातळ्यावर कार्य करणे सुरु केले. इंग्रजांच्या मनात याच्या कार्याची दहशत निर्माण होईल इतपत मजल यांनी मारली. लाला लाजपतराय यांना जखमी करणाऱ्या सॉन्डर्सचा वध करायचे यांनी ठरविले. चुकीने स्कॉट हा अधिकारी मारला गेला परंतू इंग्रजी राजवट यामुळे हादरुन गेली. खरा धक्का तर या मुलांनी पब्लिक सेफ्टी बील आणि ट्रेड डीस्प्युट बिलाच्या विरोधात थेट संसदेत बॉम्ब फोडून दिला. परंतू त्या सर्व प्रकारात क्रांतिकारकांची भूमिका लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी या मुलांनी स्वतःला अटक करवून घेतली. अवघ्या तेविसाव्या वर्षी तो मुलगा आपल्या सहकाऱ्यांसह फासावर चढला. देशाकरीता टोकाचे समर्पण म्हणजे थेट जीव देखील देण्याची तयारी या मुलांनी दाखविली. या त्यांच्या भूमिका माझ्याच छत्रछायेखाली तयार झाल्या म्हणून मी आज बोलतेय. देशभक्तीचा त्याच्या मनात दृढ होणारा विचार माझ्याच ज्ञानसंपदेतून खऱ्या अर्थाने तयार झाला. एक तेजस्वी पिढी तयार होताना मी अनुभवले. त्यावेळी इंग्रजांची राजवट होती, आपला देश गुलामगीरीत होता त्यामुळे अशी पिढी तयार होणे गरजेचे होते. आज अनेक वर्षांनंतर मला तशीच गरज भासते आहे

आज स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनी मला जेव्हा मोठ्या प्रमाणात वैचारिक गोंधळ निर्माण झालेला दिसतो, देशाच्या भवितव्याबद्दल प्रामाणिकपणे विचार करता स्वार्थाने लिप्त विचार मोठ्या प्रमाणात पसरताना दिसतात, लोकांमधे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र दुर्दैवाने यशस्वी होताना दिसतात तेव्हा मला परत एकदा माझ्या ओस पडत चाललेल्या ज्ञानसंपदेची कीव वाटू लागते. या ज्ञानसंपदेचा चारित्र्यनिर्माणासाठी वैचारिक बैठक निर्माण करण्यासाठी ज्या युवकांनी वापर करावा त्यांची मी वाट बघतेय.. परंतू सध्या मी सर्वात जास्त दुर्लक्षित होतेय की काय याची भिती वाटते.

मी त्या काळापासून तर आजतागायत अजूनही तशीच आहे. मी आहे महाविद्यालयामधील लायब्ररी. लाहोरच्या डीएव्ही कॉलेजमधील ते दिवस मी सांगितले. आज मात्र माझे मित्र मैत्रिणी महाविद्यालयात येतात, ग्राऊंडवर बसतात, कॅंटीनवर गप्पांचा फड रंगवतात परंतू माझ्याकडे येताना मात्र त्यांना जरा अडचणीचे होतेय. खरे तर माझ्यात काहीच बदल झालेला नाही. अजुनही मॅझीनीचे चरीत्र, सावरकरांचे काळे पाणी, अमेरीकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, मार्क्सवाद या सर्व विषयांवरची सारी पुस्तके माझ्याकडे माझ्या ज्ञानसंपदेचा भाग म्हणून आहेत. त्यामधे नव्या काही पुस्कांची जसे चार्ली चॅप्लीनच्या जीवनावरचे हसरे दुःख, ना. . इनामदारांचे राऊ, ओबामाचे प्रॉमीस्ड लँड, रायन निकोडेमस आणि जोशुआ मिलबर्न यांचे मीनीमॅलीझम, रॉनी स्क्रूवालाचे ड्रीम वीथ ओपन आईज, मीशा ग्लेनीचे पुतीन: प्रीझनर ऑफ पॉवर, जे शेट्टीचे थींक लाईक मॉंक, गौर गोपाल दास यांचे लाईफस् अमेझींग सिक्रेट्स, पाऊलो कोहेलोचे अल्केमीस्ट, अशी काही पुस्तके समाविष्ट झाली आहेत ज्या द्वारे चांगल्या विचारांचे अधिष्ठान प्राप्त होऊ शकते. पण दुर्दैवाने काही बोटावर मोजण्याइतपत मित्रमंडळी सोडले तर बाकीच्यांना माझ्यासोबत रहावे वाटत नाही. म्हणूनच मी वाट बघतेय परत एका भगतची. तो परत येईल, आपल्या मित्रांना सोबत बसवेल, देशासमोरच्या वेगवेगळ्या गोष्टींवर या मुला मुलींच्या चर्चा रंगतील, वेगवेगळी पुस्तके ही मुले वाचतील, त्यामधून मिळणाऱ्या विचारांवर चर्चा, किंवा प्रसंगी वादविवाद देखील होतील. पण याचा महत्वाचा परीणाम म्हणजे देशासंबंधी देशात घडणाऱ्या विविध घटनांवर या देशातला आणि माझ्या,संपर्कात तयार झालेला तरुण अत्यंत विचारशील प्रतिक्रीया देईल. फॉरवर्ड केलेल्या संदेशांपेक्षा त्याचे मूळ तर्कशुद्ध लिखाण जास्त असेल. त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरचे त्याचे म्हणणे सर्वजण विचारपूर्वक वाचतील कारण त्याने तो विचार माझ्या कडे असलेल्या पुस्करुपी ज्ञानसंपदेचा भरपूर वापर करुन मिळविलेला असेल. त्याच्या विचारांना गांभिर्याने घेतले जाईल त्याच्या अश्या संयत आणि विचारपूर्वक दिलेल्या मतामुळे व्यवस्था बदलेल किंवा व्यवस्थेला बदलावे लागेल कारण त्या विचारांचा आशय भगत प्रमाणे सक्षम, ध्येयवादी आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला असेल. या तरुणांचे गुरुजन त्यांना माझ्या संपर्कात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील, मुले ऐकत नाही म्हणून त्यांना सोडून देता वेगवेगळ्या प्रकारे त्यांना माझ्या ज्ञानसंपदेच्या सान्निध्यात आणतील. देशाला मोठे करायचे असेल तर तरुणांना माझ्या, होय माझ्याच संपर्कात आणल्याशिवाय पर्याय नाही हे मी अतिआत्मविश्वासाने नव्हे तर स्वानुभावातून बोलतेय. कारण माझ्याच छत्रछायेखाली मोठा झालेला तो भगत होता ना? मला हवेय तसे वातावरण निर्माण होईल? प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या दिवशी मला सर्वांकडून निदान प्रयत्न करु असे आश्वासन मिळेल? वाट बघतेय...मनापासून एका नव्या भगत सिंहाची!!





Comments

  1. मोबाईल, टिव्ही, इंटरनेट या मुळे मुलांचे वाचन कमी झालय पण वाचनाचे महत्व पटवून द्यायला आपण कमी पडतोय हे सत्य स्वीकारले पाहिजे
    छान लेख लिहिला आहे.

    ReplyDelete
  2. आजच्या युवा वर्गाला आरसा दाखवणारा लेख आहे. आज कॉलेज म्हणजे फक्त एन्जॉय करणे येवढच सीमित झालंय.

    ReplyDelete
  3. महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य!

    ReplyDelete
  4. Very motivating and inspiring

    ReplyDelete
  5. खूप प्रेरक लेख सर. अप्रतिम

    ReplyDelete
  6. तरुणाईसह सर्वांसाठी प्रेरक आणि अंजन ठरणारे असे स्फूट.हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18