थोडा है थोडे की जरुरत है @ 19.01.21
गुड़धानी
दिवस सुरु होतो. मोबाईलच्या संदेशांनी. वेगवेगळ्या समुहाचे संदेश. एक तर वेगवेगळ्या विषयांवरचे ज्ञान, विचार किंवा बोध. यासोबतच राजकीय दृष्टीने स्फोटक काहीतरी. कुण्यातरी राजकारणी माणसाचे विडंबन किंवा कुणाची तरी टिंगल टवाळी किंवा कुणावर तरी जहरी टिका. त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक गोष्टींचे विघातक अर्थ व्यक्त करणाऱ्या पोस्ट. सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मस् वर जमेल तेवढी गरळ ओकणे सुरु असते. त्यातूनच मग अगदी हक्काचा विषय म्हणजे जात आणि धर्म. कोणत्याही जातीबद्दल कोणतेही ऐतिहासिक दाखले देऊन कसेही करुन टिका करत राहणे हा एक आवडीचा छंद. यासाठी इतिहासकार, संशोधक, समाजवैज्ञानिक अश्या सर्व भूमिका वठवत कार्य केले जाते. प्रयत्नपूर्वक मराठी टायपींग करुन मनात विष कालविणारी पोस्ट लिहीली जाते व त्यानंतर मग ती पसरविली देखील जाते. आपण गुंतत जातो नकळत या सापळ्यात. आपल्यालाही तो मोबाईल असा आपल्यापासून संपूर्णपणे दूर करताच येत नाही. त्याला वारंवार बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. दिवस पुढे सरकतो.
मग सुरु होतात कर्कश वाहनांचे आणि त्याच्या उगाच वाजत असलेल्या हॉर्नस् चे जीवघेणे आवाज. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी थांबून केवळ हॉर्नस् ऐकण्याचा प्रयत्न केला तर काही मिनीटातच आपल्याला वेड लागेल की काय असे वाटू लागते. परंतू गंमत अशी आहे की त्याचीही आपल्याला एवढी सवय झालीय की आपल्याला ऐकायला परवानगी असलेल्या कितीतरी जास्त डेसीबलचा आवाज आपण सहजच पचवून जातो. या सगळ्या वाहनांच्या गोंगाटात एखादी मिरवणूक जात असते व त्यामधे वाजणारा तो आक्रस्ताळा डीजे देखील आपल्याला ताल धरायला लावतो. गोंगाटाचा त्रास नाही तर गोंगाट आपल्या जीवनाचा भाग झालेला असतो. हे सारे पार करत आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. तेथे टेबलांवर फाईलींचे गठ्ठे पडलेले असतात. कामांचा डोंगर नि त्या मानाने काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाणारी. आता जराश्या फाईली कमी झाल्या म्हणताच नवा गठ्ठा तयार असतो. सोबतच तुमच्या कामांमधे अनाहूतपणे होणाऱ्या चुका शोधून तुम्हाला खिंडीत पकडणारे अनेक मंडळी आजूबाजूने वावरत असतात. वाईट काय आहे हे शोधण्याची आणि ते जगाला कळविण्याची त्यांची स्पर्धा असते. अश्या साऱ्या गोष्टी सहन करीत आपण फाईलींचे गठ्ठे कमी करीत राहतो. त्या गठ्ठ्यांची चळत कमी करता करता दिवस उतरणीला लागतो. त्यानंतर थकलेला जीव घेऊन आपण घरी पोहोचतो.
घरी सुरु असलेल्या टीव्हीवर प्रचंड आवाजात लोक बोलत असतात. कर्कशपणे एकमेकांचे उणे दुणे काढत असतात. त्या कार्यक्रमांचे अँकर्स भांडण जास्तीत जास्त कसे रंगेल याचा विचार करुन लोकांना पेटवत राहतात. आपण कुणाबाबत बोलतोय, आपण कुणाशी बोलतोय याचा कसलाही विचार न करता एकमेकांना एकेरीवर येऊन या बहुतेक पाहुण्याची हमरी तुमरी सुरु असते. या पासून सुटका मिळविण्यासाठी आपण एक काम करतो. वेगळे चॅनल लावतो. याशिवाय जास्त चांगला आणि कलात्मक पर्याय आपल्याला सापडतच नाही. परीवारासोबत एकत्रित जेवण करणे, दिवसभराच्या गमती एकमेकांना सांगणे, मन मोकळे करणे, एकमेकांचे ऐकून घेणे वगैरे सारख्या गोष्टी केव्हाच कालबाह्य झालेल्या आहेत. त्यामुळे बातम्यांच्या चॅनलवरील कोलाहलापासून सुटका मिळविण्यासाठी आपण चॅनल बदलवितो. दिवस आता रात्रीकडे सरकलेला असतो.
आता टिव्हीवर सीरीयल सुरु असतात ज्यात परीवारात एकमेकांविरुद्ध कुटील कारस्थाने करणारे लोक आपल्याला दिसतात. बहिणी बहिणीमधील टोकाचे वाद, एक बहिण दुसरीच्या नवऱ्याला मिळविण्यासाठी तिचा खून देखील करण्याची योजना बनविते, मुलगा आपल्या वडीलांना विष देऊन क्रूरपणे ठार मारतो कारण राजकारणात वडीलांनीच त्याला सांगितलेले असते की सर्वात महत्वाची आहे सत्ता. त्याने तेच लक्षात ठेवलेले असते. निरागस, निर्मळ मनाच्या लोकांना अनेक एपीसोड छळणारी क्रूर मंडळी आपल्याला दिसत राहतात. आपल्याही न कळत आपण ते सारे एन्जॉय करु लागतो व असल्या पाताळयंत्री लोकांच्या कारवाया बघून त्याच विचारांसह आपण झोपी जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे मोबाईवरील आणखी काही विषारी आणि विखारी किंवा निर्थक बोध देणारे संदेश वाचून दिवस सुरु करतो. सहज आठवून बघितल्यास असे जाणवेल की कमी अधिक फरकाने आपण सारेच गेले अनेक दिवस याच पद्धतीने आक्रस्ताळ्या कोलाहलासोबत आणि विखारी विचारांसोबत जगत आहोत. कदाचित आपण प्रत्यक्ष हे निर्माण करीत नसू देखील परंतू आपण याच कर्कशपणाने घेरल्या मात्र गेलेलो आहोत. या सर्व जिवन प्रक्रीयेमधे ती निरागसता कुठे आहे जी आपल्याला त्या गुडधानी मधे सापडते.
ज्येष्ठ शायर नीदा फ़ाज़ली लिहीतात,
गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला,
चिड़ियों को दाने बच्चों को गुडधानी दे मौला!!
वर वर्णन केलेल्या आपल्या आक्रस्ताळ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर या गुडधानीच्या निरागसतेचा विचार देखील किती प्रसन्न करतो बघा!! एक इवलेसे बाळ. जेमतेम दोन वर्षाचे. पिटूकले पण टप्पोरे डोळे, गोल गोबरे गोबरे गाल, बऱ्यापैकी चालू लागल्यामुळे घरभर गोंधळ घालणारे, घरातल्या आजी आजोबांना पार थकवणारे, घरातल्या सगळ्या वस्तुंची उलथा पालथ करुन ठेवणारे, तरीही जीव लावणारे, मधूनच येऊन मांडीवर बसणारे, गोडुल्या डोळ्यांनी हसणारे, मधेच जवळ येऊन गालावर पप्पी घेणारे, आजोबांच्या सोबत बसून बोबड्या आवाजात शुभं करोति म्हणणारे, आजीची नक्कल करुन हसवून सोडणारे, कितीही थकवा आला असला तरी लाड करायला भाग पाडणारे, क्षणात रुसणारे, क्षणात कळी खुलवून बरत बागडणारे आणि मोठ्यांचे ऐकून तिळ गूळ घ्या नि गोड गोड गोळा असे तोडके मोडके बोलून सर्वांना खदखदून हसवायला लावणारे असे बाळ आठवून बघा. त्याच्या अस्तित्वाच्या प्रत्येक रंध्रामंधे असलेली निरागसता आठवून बघा. ती केवळ आठवली तरी मनाला प्रसन्नता लाभायला लागते. आपल्या आजुबाजूचा कोलाहल नि षडयंत्रांची कुरुपता क्षूद्र वाटू लागते. त्यावेळी आपल्याला आपल्या व्यवहारी शहाणपणापेक्षा त्या गोजीरवाण्या बाळाचा तो वेडेपणाही फार देखणा वाटतो. निदा फ़ाज़ली लिहीतात,
दो और दो का जोड हमेशा चार कहाँ होता है
सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला!!
बालकाच्या ठायी असलेली ही नादानी, हे वेड, हा आनंद, ही निरागसता, ही गुडधानी जपायला हवी. ही गुडधानी म्हणजे त्या निखळ निरागसतेचे प्रतिक आहे जी वयानुसार आपण सोडायला लागलोय. आपल्या व्यावहारिक जगात आपल्या अस्तित्वाच्या लढाया लढता लढता आपण ती हरवायला लागलोय. ही गुडधानी जपायला हवी कारण ती आपल्या माणूस असण्याचे सर्वात महत्वाचे प्रतिक आहे. अन्यथा संघर्ष, हेवा, मत्सर, द्वेष, वादविवाद, षडयंत्र, आक्रमकता, विद्रोह, अन्याय या साऱ्या भावना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे जगून किंवा त्याचा आपल्या फायद्याकरीता वापर करुन आपण प्राणी असणे सिद्ध करीतच असतो. आपले अस्सल मनुष्यत्व जर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला हवी ही गुडधानी, चिऊ चिऊ करणाऱ्या चिमण्यांना आनंद देणारे दाणे तशी निरागस बालकांना हर्षोल्लासित करणारी गुडधानी. आपल्याला ती जपता येईल?
अप्रतीम
ReplyDeleteसुंदर लिखाण सर
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteतुम्ही लिहिल्या प्रमाणे हिंसा ,जातियवाद इत्यादी बाबी मिडियाच्या माध्यमातून आपल्यावर लादल्या जात आहेत आणी आपण नकळत त्या विळख्यात अडकतोय परिणामी आपली निरागसता हरवत चालली हे सत्य आहे
ReplyDeleteसंवेदनशील माणसाची घुसमट हाच आजचा युगधर्म म्हणावा का?
ReplyDeleteबहुत बढ़िया, निदा फ़ाज़ली काय म्हणतात तेही कळले. हो आणि भांडणाची नकारात्मक ऊर्जा थांबवायला आपल्या रिमोटचा वापर हाच आनंदाचा भाग.
ReplyDeleteKhup mast...
ReplyDelete'आपण दिवसभरात कसे वागतो ' ह्याच recording करून आपणच ते शांतपणे पाहिल आणि ते जर लेखकाने वर्णन केले आहे तसे असेल तर..
ReplyDeleteआपल्याला मनाच्या कानाकोपर्याची साफसफाई करण आवश्यक आहे, असे समजायला हरकत नाही. कोणीतरी आरसा दाखवून, चेहर्यावरचा बुरखा टराटरा फडावा असे, ह्या लेखाचा पहिला भाग वाचतांना वाटले. मनाची अस्वस्थता वाढली.
दुसर्या भागात प्रवेश करताक्षणी, तगमग शांत होऊन..
'ठुमक चलत रामचंद्र.. ' हे दिदींच गाणं ऐकायला मिळतय असा भास झाला.
हि लेखकाच्या शब्दांची किमया!
अस्वस्थता ते निरागसता हा प्रवास अलगदपणे झाला.
काय जपायचं आणि काय दूर सारायचं..
ह्याच भान ठेवून समंजसपणे जगता आलं
तर ते जगण नक्कीच अर्थपूर्ण होईल .
Dr.
you are doing a great job!
Throwing light on different topics, awakening of consciousness, exploring the diversified paths and usage of explicit words...
you are covering it all..
Feeling very proud!
Khupch sunder baba!
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteवास्तव दर्शविणारा आणि परिणामकारक लेख. अप्रतिम !!
ReplyDeleteखूपच सुंदर मनाला भावले मस्त
ReplyDeleteखूपच सुंदर लेख मनाला स्पर्श करून गेला अवी ती निरागसता भवली मला मी प्रभा मावशी
ReplyDeleteJitani Sunder aapki Vaani
ReplyDeleteUtanihi sunder Good Dhaani
Congratulations
खूप सुंदर
ReplyDeleteखुप सुंदर sir Dr. Rohini Deshmukh
ReplyDeleteMost beautiful article written by you sir. Avibhau you are a genuine versatile writer
ReplyDelete