थोडा है थोडे की जरुरत है @ 28.04.2020

मै समय हूँ

सध्या टीव्ही वर महाभारत बघत असताना परत एकदा तोच आवाज ऐकू येतो जो लहान असताना ऐकला होता. त्याच आवाजात महाभारताची पुढे जाणारी कहाणी परत एकदा ऐकण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या पिढीच्या तर जवळपास प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींमधे कुठेतरी दूरदर्शनवर दाखविल्या गेलेल्या या दोन महामालिका, महाभारत आणि रामायण याचे महत्वाचे स्थान आहे. आजही त्या आठवणी मनात आहेतच त्यामुळे त्या आठवणींसह आता आपल्या मुलांना सोबत घेऊन परत एकदा महाभारत बघण्याची संधी ही फार अप्रतिम आहे. या निमीत्ताने मुलांना हमारे जमाने मे म्हणून जुन्या गोष्टी ऐकविण्याची देखील मजा येते आहे. त्यावेळी रस्ते कसे ओस पडायचे, टीव्ही काही मोजक्याच घरी असल्याने इतरांच्या घरी जाऊन टीव्ही बघणे म्हणजे काय होते, त्यांच्याकडून टीव्ही सुरु करायला वेळ झाला तर आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे कसे बघितले जायचे, टीव्ही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून कश्या प्रकारच्या सूचना दिल्या जायच्या या साऱ्या गोष्टींची उजळणी केली जातेय. महाभारतातील पात्रांच्या संवादाविषयी, त्यांच्या भूमिकांविषयी नव्या पिढीच्या आपल्या मुलांना समजावून सांगणे कसे कठीण होतेय याचा देखील अनुभव घेता येतोय. विशेषतः धर्मराज युधिष्ठीराच्या आदर्शवादी भूमिका समजावून सांगताना पुरेवाट होते. एवढा अन्याय का सहन करायचा? एवढे चांगले राहून कसे काय जगता येईल? मोठ्या भावाचे चूकत असतानाही हे लहान भाऊ त्याचेच का ऐकतात? त्याला का सुनावून देत नाहीत? बायकोची अशी वाटणी कुणी कसे काय करु शकते? कुंतीने चुकून म्हणले तरी काहीही ऐकावे असे थोडीच असते? या असल्या नि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देता देता आपण थकू लागलोय. मला सहज वाटून गेले की हे सारे प्रश्न आपल्या मनात त्यावेळी आले नव्हते का? खरेच नव्हते आले. त्यामधे जे दाखविले ते प्रमाण मानण्याची सवय आपल्या बालमनाला होती. परंतू आता मुलांना प्रश्न पडत आहेत. आपल्या मुलांना आपणच चौकस, तर्कनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बनविले आहे. त्यामुळे या त्यांच्या मनात उठणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना पटतील त्याच भाषेत संदर्भासह द्यावी लागत आहेत. हे जरासे अवघड असले तरी असंभव नाही. मुलांना पटवून देता येऊ शकते. परंतू या सर्व गोष्टींपेक्षा एक महत्वाचा बदल जो मला जाणवतो, तो म्हणजे महाभारतामधे कथा पुढे नेणाऱ्या समय नावाच्या संकल्पनेकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघता येते. त्यावेळी समय म्हणून जे बोलले जायचे त्यावेळी मांडी बदलून बसणे आणि जरा रीलॅक्स होणे चालायचे. आता मात्र त्या समयच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष दिल्या जाते त्या बोलण्याचे फारच वेगळे संदर्भ लागायला सुरुवात होते. जसे लहान मुलगा म्हणून बघितलेली मालिका आता आपल्या मुलांसोबत पिता म्हणून बघत असताना संपुर्णपणे वेगळी भासते तसाच हा समय देखील फार वेगळा भासतो. त्या संवादाच्या मध्यमातून खरोखरीच काळाचे महत्व जाणवू लागते आणि कळत त्या बोलण्याचे संदर्भ आपल्या आयुष्यात तंतोतंत खरे ठरलेले जाणवतात

या समयच्या संवादातील एक वाक्य तर मला अक्षरशः बेचैन करुन गेले कारण तिच खरी सत्यता आहे. समय म्हणतो, वर्तमान को हमेशा यथार्थ के आधार पर इतिहास की व्याख्या करना चाहीये तभी हम उससे कुछ सिख सकते है. किती खरे लिहीलेय आणि मला असे वाटते हीच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याची वास्तविकता आहे. आपण कुणीही असलो तरी आपल्यापैकी प्रत्येकाजवळ एक इतिहास आहे ज्याला आपण जगत असताना आपल्याला मिळालेला अनुभव असे म्हणत असतो. हा अनुभव प्रत्येकाजवळ असतो हा अनुभवच कदाचित आपल्या स्वाभीमानाचे प्रतिक देखील असतो. ज्या व्यक्तीजवळ जेवढा जास्त अनुभव तो तितका जास्त आदरणीय मानण्याची पद्धत आपल्या समाजात अजुनही प्रचलित आहे. परंतू कालपरत्वे आपल्याला आलेले अनुभव याची वर्तमानाशी जो सांगड घालण्यात यशस्वी होऊ शकेल त्याच्याकडेच हे आदराचे स्थान राहू शकते. अर्थात वर्तमानामधे जर आपल्या अनुभवी विचारांच्या आधारे नव्या पिढीला मार्गदर्शन करायचे असेल तर वर्तमान परीस्थितीमधे आपल्या अनुभवातील जुनाट कालबाह्य बाबी सर्वप्रथम बाजूला सारता यायला हव्यात. आज बदललेला समाज, समाजात अस्तित्वात असलेल्या नवनविन विचारधारा समजून घेऊन मूलभूत चिरंतन तेच केवळ पुढच्या पिढीला सोपविल्या जाऊ शकते. हे वाचायला सोपे असले तरीदेखील याप्रकारे वागणे कठीण होते. कारण आपल्या विचारांच्या आणि अनुभवांच्या चौकटी या अतिशय घट्ट मजबूत झालेल्या असतात. त्यांच्यामधील कोणताही सांधा बाजूला करणे म्हणजे आपली चौकटच कोसळेल की काय अशी अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात असणे स्वाभाविकच असते. त्यामुळे आपल्या वैचारिक चौकटींना जोपासण्यासाठी दुराग्रहाचे वेष्टण लावले जाते त्यामुळे वर्तमानाशी सोबत करताना आपल्या चौकटीतील काही सांधे काढण्याची किंवा बदलविण्याची वेळ आली तर त्याचा प्रचंड त्रास होतो. तो त्रास सहन झाल्यामुळे आक्रमकता निर्माण होते कारण आपली चौकट मोडली जाईल याची असुरक्षितता अकारण आक्रमकतेमधे परावर्तीत होऊ लागते. याचा परीणाम एकच होतो तो म्हणजे दोन पिढ्यांमधे संघर्ष होऊ लागतात. कारण ज्यांच्या अनुभवांच्या जुन्या विचारांच्या चौकटी आहेत त्यांना चौकट विस्कटण्याचे भय असते नव्या पिढीला या जुन्या चौकटींपायी आपली चौकट तयार होणारच नाही याची असुरक्षितता असते याच एका कारणामुळे संधर्ष निर्माण होतात. महाभारताच्या संदर्भात काल हेच सांगतो की इतिहास आणि वर्तमान याची सांगड घालूनच भविष्य निर्माण होत असते. परंतू वर्तमानाने इतिहासाची व्याख्या ही यथार्थपणे बदललेल्या वर्मानाला अनुसरुन केली तरच तो इतिहास आदरणीय आणि मार्गदर्शक ठरु शकतो अन्यथा त्याचे ओझे होते दुर्दैवाने जश्या पिढ्या पुढे जात आहेत तशी ओझे सहन करण्याची क्षमता सहनशक्ती कमी होताना दिसते. त्यामुळे इतिहासाच्या प्रतिकांनी त्या इतिहासाचे महत्व समजून तो पुढील पिढीला सोपविणाऱ्यांनी या यथार्थतेच्या आधारावर नव्या बदलत्या संदर्भांचा विचार करुनच कार्य करावे अन्यथा नव्या पिढीने जर हा सारा मार्गदर्शक इतिहास कचरा म्हणून फेकून दिला तर मग त्यांनाही मार्ग सापडणार नाही अंधःकाराचे युग प्रारंभ होईल. त्याकरीता हे सारे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ जे वर्तमानातील सध्याच्या नेतृत्व करणाऱ्या पिढीने मनापासून जपण्याचा, त्यांना नव्या पिढीला त्यांना समजतील अश्या पद्धतीने सोपविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही एक संधी या मालिकांच्या पुनःप्रक्षेपणाने प्राप्त झाली आहे. महाभारत किंवा रामायणासारख्या प्रभावी जिवनमुल्ये शिकविणाऱ्या कथांच्या सादरीकरणाच्या वेळी काही वर्षांपूर्वी आपण ज्या जागी बसायचो त्या जागी आपल्या मुलांना ठेवून त्यांच्या सोबत, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत हे वैचारिक धन जपण्याची मुलांच्या मनामधे प्रस्थापित करण्याची अमृततुल्य संधी आपणास प्राप्त झाली आहे. याचे सोने करणे क्रमप्राप्त आहे. होय ना?





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18