थोडा है थोडे की जरुरत है @ 21.04.20

लम्हे की दास्ताँ

माझ्या मैत्रीणीला, समय का ये पल थमसा गया है, असे वाटत असताना मला मात्र गुलजार आठवले. इक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्ताँ मिली लम्हा कही नही. याच ओळीच्या आधारे माझ्या मैत्रिणीला तिच्या मनातील संभ्रमांबाबत उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला. मी तिला सांगितले, हा जो काळ जणू थांबून गेलाय असे तुला वाटते हा आपल्या आयुष्याच्या वाटचालीतील एक विशेष भाग आहे या दृष्टीने सर्वप्रथम याकडे बघणे सुरु कर. गुलजार म्हणतात त्याप्रमाणे या क्षणांची दास्ताँ आपल्याला करता आली पाहिजे. तिचा स्वाभाविक प्रश्न, म्हणजे काय? मी सांगतो, ऐक.

आपले आयुष्य आपण जगत असतो आणि त्याची एक चौकट ठरलेली असते. साधारणपणे तश्याच चौकटीत आपण वारंवार जगून ती चौकट घट्ट होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडत असते. म्हणजे यात गरीब किंवा श्रीमंत असा भाग नसतो. उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या चाळीत राहणारी एखादी व्यक्ती गर्दीच्या, गजबज असलेल्या किंवा सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणी देखील वारंवार त्याच स्थितीमधे राहिल्यामुळे सहजच सामावून जाते. चौकट कोणतीही असो, त्याची सवय होते मग ती आपली वाटायला लागते हा सार्वत्रिक अनुभव आहे. अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा ती चौकट मोडून आपल्याला बाहेर पडावे लागते. म्हणजे रोज जगत असलेल्या चौकटीच्या बाहेरचे जर काही आपण करणार असू तर ती गोष्ट आपल्याला वेगळी भासत असते तेव्हा प्रत्येक माणसाची पहिली प्रतिक्रीया ही घाबरुन जाण्याचीच असते. अगदी ती गोष्ट खूप जास्त सुखावणारी असली तरी. कारण मुळात माणसाला ज्या चौकटीची सवय झालेली असते त्याच्या बाहेर पडायला सुरक्षित वाटत नसते. परंतू काही प्रसंग किंवा क्षण हे आपल्या मर्यादांच्या बाहेरचे असतात त्यामुळे ती आपली सुरक्षित चौकट विस्कळीत होते. सध्याचा हा काळ म्हणजे आपल्या क्षमतेच्या पलीकडे असलेल्या शक्तीमुळे विस्कटलेली आपली चौकट आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या सर्व प्रकाराला एक वाईट आणि धोकादायक काळ समजण्यापेक्षा जिवनात आलेलला एक वेगळा अनुभव असे समजायला हवे. हे समजून घेणे जरासे कठीण आहे, पण तुला सांगू का? ज्या काळात आपण सध्या आहेत त्यामधे आपल्या मनाचीच खरे तर परीक्षा आहे. बाकी या आजारापासून स्वतःला वाचविण्याकरीता आपण घेत असलेली काळजी वगैरे ती शारीरिक पातळीवर घेतलीच जातेय. परंतू प्रश्न आहे मनाचा. नेमके तुझ्या बाबत त्यालाच तू सांभाळण्याची गरज आहे.

या सर्व काळात नेमकी मानसिक स्थिती काय झालीय हे देखील तू समजून घेणे महत्वाचे आहे. घरामधेच राहणे ही काही तुझ्यासाठी नवी गोष्ट नाही. परंतू आता सक्तीने रहावे लागत अल्याने तुला त्याचा जास्त त्रास होतो आहे. कुठेतरी आपल्या स्वातंत्र्यावर गदा आलेली आहे हे तुझे मन तुला सांगते आहे. सोबतच आपण सर्वचजण मनातून घाबरलेलो आहोत. परंतू कसरत अशी आहे की घाबरलेलो असतानाही आपल्याला घाबरलेलो नाही असा चेहेरा बनवावा लागतोय. कारण परीवारात इतरांना बळ द्यायचे आहे, सांभाळायचे आहे त्यामुळे मला शूर वीराचा चेहेरा लावावा लागतोय. ही एक आणखी मानसिक दृष्ट्या त्रासदायक बाब आहे. या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे आपण आपल्या मनाची सहजता गमावून बसलोय. म्हणूनच सर्वप्रथम तू स्वतःच्या मनाला हे सांगावे की हा एक वेगळा अनुभव माझ्या आयुष्यात मला मिळाला आहे. त्यानंतर मनाला हे सांगावे की या परिस्थीतीमधे मी घाबरलेली आहे आणि माझे घाबरणे माझ्या जीवंत राहण्यासाठी उपयोगाचे आहे त्यामुळे माझ्या घाबरण्याचे मला वैषम्य वाटत नाही. या बाबतीत आम्हा पुरुष मंडळींना तर जास्त मानसिक दबाव आहे. कारण घाबरणारा पुरुष हा परंपरागत सामाजिक चौकटीमधे स्विकारल्याच जात नाही. त्यामुळे आम्हाला तर हा खोटा शूर वीराचा चेहेरा लावणे फारच जड जातेय. खरे तर जीवाचा धोका स्री किंवा पुरुष दोघांनाही समानच आहे परंतू त्यावरील प्रतिक्रीया मात्र वेगवेगळ्या अपेक्षित असतात. त्यामुळे तू सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या घाबरलेल्या मनाला स्विकार. त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नको. दुसरे ही सक्तीची बंदी जी करण्यात येत आहे त्याचा विचार जिवनातील एक नवा अनुभव असा कर. त्या सक्तीला तुझ्या उज्वल भवितव्यासाठी स्विकार आणि मग तुला काही छान छान मार्ग मी सुचवितो.

पहिला मार्ग म्हणजे या अनुभवाला अश्या पद्धतीने सजवायचे की हा कायम आयुष्यभराकरीता सुरेख आठवण बनून राहील. तूला फोटोग्राफीची आवड आहे. रोज स्वतःचाच एक फोटो काढायचा, सेल्फी. तो काढता येत नसेल तर तो शिकून घ्यायचा, अगदी सोप्पे आहे. सेल्फी काढायचा आणि त्या फोटोच्या अनुषंगाने छान ओळी लिहायच्या. तुझ्या फोटोसोबत आणखी कुणाचे फोटो घ्यायचे असतील तर ते पण घ्यायचे आणि त्यावर छान आपल्या मनाने काहीतरी लिहायचे. आणि असा एक लॉकडाऊन अल्बम तयार करायचा. यासाठी कुणाचीही मदत घेण्याची गरज नाही. तू एकटीच हो काम करु शकतेस. फोनवर हे कसे करायचे याची मदत हवी तर घे. तुला खात्रीपूर्वक सांगतो, आजपासून काही वर्षांनी जेव्हा हा अल्बम तू बघशील तेव्हा याच क्षणांबद्दल तू इतरांना भरभरुन सांगशील. हे किंवा यासारखे एक काहीतरी कर जे केवळ तुझे असेल आणि या काळातील म्हणून तुला कायम स्मरणात असेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी घरचे झाले तरी या लोकांसोबत सतत राहणे देखील चौकटीच्या बाहेरचाच भाग आहे. त्यामुळे अगदी ठरवून आणि घरच्यांना पटवून देऊन स्वतःची काही वेळाची स्पेस जपण्याचा प्रयत्न कर. मग ते गाणे असेल, किंवा पुस्तक वाचन किंवा तुला आवडत असलेले शिवणकाम. परंतू त्या वेळात केवळ तूच असशील असे काहीतरी कर. तिसरा आणखी महत्वाचा भाग म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणे समजून घे. अनेक गोष्टी ज्या ऑनलाईन करावयाच्या, ज्या इतर कुणीतरी तुला करुन देते या कारणामुळे राहून गेल्यात, त्या करुन बघ. यात तुझ्या शिकवणी वर्गाच्या मुलांच्या ऑनलाईन टेस्ट घेणे आहे, त्यांच्याकरीता लेक्चर तयार करुन त्यांना पाठविणे आहे, घरातील बीले भरणे आहे, निदान तुझा बँकेचा अकाऊंट तुला तुझ्या फोनवर हाताळता यावा हा प्रयत्न कर. सध्याच्या काळाने दिलेली ही अप्रतिम संधी आहे. फोनच्या माध्यमातून एखादा व्हिडीयो काॅल करुन चार मैत्रीणींना त्या काॅलमधे सहभागी करुन घेणे शिक, त्यांच्याशी गप्पा मार. हे सारे एरवी तू करण्याचा प्रयत्नच नाही केलाय. ज्या मैत्रीणीने तुला घरात येण्याचा आग्रह केला नाही तिच्याशी फोनवर अश्या पद्धतीने बोल, बघ ती किती भरभरुन बोलेल. हे सारे तुला तेव्हाच करता येईल जेव्हा तू उदास होत बसण्यापेक्षा या परिस्थीतीला हे सारे करण्याची संधी समजशील आणि संस्मरणीय बनवशील. मग तुला हा लाॅकडाऊन त्रासदायक वाटणार नाही. घरात बंद राहूनही आपल्या चौकटीच्या बाहेर जाणे तुला शिकता येईल आणि मग ते तुझे बावरलेले मन अश्या प्रकारे स्थिरावेल आनंदी होईल.

सर्वात शेवटची परंतू महत्वाची गोष्ट. ज्या अविश्वासाच्या वातावरणाचा तुला त्रास होतोय, त्याला पुन्हा विश्वासपात्र होण्यास जरा वेळ दे. सारे काही पुन्हा नेहेमीसारखे होईल. एखादा भुकंप झाल्यावर पडझड झालेले गाव पुन्हा वसायला वेळ लागतो. या काळात आपण सर्वजण हा जरासा अविश्वास निर्माण करणारा एक प्रकारचा मानसिक भुकंपच अनुभवत आहोत. तो अविश्वास नाही, ती भिती आहे जी अश्या वागण्यातून प्रदर्शित होते आहे. हे देखील स्थिरावेल. एक नवे विश्वासाचे जग आपण पुन्हा वसवू, सगळे मिळून. तू मात्र तोवर धीर सोडू नको. सगळी काळजी घेऊन हा काळ संस्मरणीय बनव. आणि हो, ते कॅकटसचे झाड व्हाॅट्स ॲपचा डीपी ठेवलाय, ते बदलव आणि तुझा छान हसरा फोटो डीपी म्हणून ठेव... त्याची वाट बघतो





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18