थोडा है थोडे की जरुरत है @07.04.20

लक्ष्मणरेषा

माऊली घाईघाईने घरी पोहोचली. तिची दोन्ही पोरे दरवाज्यात उभी राहून तिची वाट बघत होती. एका छोट्याश्या गावात राहणारे ते कुटुंब. त्यातही घरातला कर्ता पुरुष काही वर्षांपूर्वी देवाघरी गेलेला. आपल्या दोन पोरांना आपल्या चार एकर शेताच्या तुकड्याच्या आधारे जगविणारी ती माऊली रात्री दहा वाजताच्या सुमारास घरी परत आली. इतका उशीर झाला त्यामुळे सहाजिकच तिची लेकरे जरा काळजीतच पडली होती. तरी आठव्या वर्गात असणाऱ्या गोपाळने त्याच्या लहान बहिणीचा धीर खचू दिला नव्हता. अगं, पंचायतीमधे आज काहीतरी महत्वाच्या कामासाठी सगळ्या गावकऱ्यांची सभा बोलावली आहे. काहीतरी खूपच महत्वाचे काम आहे आणि तिथे सगळ्यांना टीव्ही पण दाखवणार आहे म्हणे. टीव्हीवर कोण्यातरी मोठ्या माणसाचे भाषण आहे ते ऐकण्यासाठी सगळ्यांना बोलावले आहे असे आई सांगत होती. ते भाषण झाल्यावर मग पंचायतीची सभा आहे. त्यामुळे आईला उशीर होणारच आहे, असे सांगत त्याने तिची समजूत काढली होती. परंतू आई परत आल्याबरोबर, ती दोघे, काय झाले आई म्हणून चौकशी करु लागलीत. माऊली म्हणाली, पहीले आपण जेवण करुन घेऊ आणि मग मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. आईचा चेहेरा गंभीर झालाय आणि काहीतरी गडबड आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. परंतू आईचे म्हणणे कधीही टाळणारी ती मुले त्यावेळी चूप बसली. जेवण झाल्यानंतर मुले त्या दिवशी झोपली नाही कारण त्यांना आई काहीतरी महत्वाचे सांगणार होती. त्यांना ते ऐकायचे होते. सारे काम आटोपल्यावर आई थकून येऊन बसली. तिने मुलांना जवळ बसविले. गोपाळ समोर बसला आणि त्याची बहिण मनू आईच्या लागून बसली. आपल्या मुलांना अत्यंत आश्वासक शब्दांमधे ती एका छोट्याश्या गावातील अशिक्षित माऊली काहीतरी महत्वाचे सांगत होती. ती त्यांना म्हणाली, पोरहो, एक खूप मोठे संकट आपल्या देशासमोर आलं आहे. सगळ्या जगातच ते आहे. पण इतके दिवस ते भारतात नव्हते पण आता मात्र ते भारतावरही आले आहे. आज टीव्हीवर एका मोठ्या माणसाचे भाषण ऐकले. त्यांनी आज जे सांगितले ते मला फार नाही कळले पण दोन गोष्टी मात्र मला समजल्या आणि त्या मनाशी घट्ट धरुन मी परत आली आहे. आता त्या तुम्ही देखील समजून घ्या. मी सगळे एकदाच सांगणार आहे. त्यानुसार तुम्हाला वागायचे आहे. ऐकाल ना शांतपणे आणि वागाल ना तसे? हो आई, तू म्हणशील तसेच आम्ही वागू. तू आमच्या भल्याचेच सांगणार, आम्हाला खात्री आहे. सबंध जगासमोर आणि पर्यायाने तिच्या छोट्याश्या कुटुंबासमोर उभे झालेले संकटरुपी आव्हान मुलांच्या मदतीने परतवून लावण्याकरीता ती सज्ज होती मुलांना सज्ज करीत होती. तिने बोलणे सुरु केले

त्याचवेळी, त्या खेडेगावापासून दूरवर असलेल्या एका मोठ्या शहरात लोक रात्री वाजता किराणा खरेदी करण्यासाठी दुकानंसमोर प्रचंड गर्दी करीत होते. त्यांना सामान घरात भरुन ठेवायचे होते. त्यासोबतच प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त सुरु झाला. लोकांना घरातून बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली होती. पोलीसांच्या गाड्या सारख्या फिरत होत्या. काही लोक त्यांच्याशी देखील हुज्जत घालत होते. आम्हाला बाहेर जायचे आहे. आमच्या जीवाची आम्ही काळजी करु, तुम्ही कोण आम्हाला सांगणार? एका महाभयंकर महामारीचा सारे जग सामना करीत असताना देशाने एक निर्णय घेतला होता, सर्वांनी घराच्या आत रहायचे. घराच्या समोर एक लक्ष्मणरेषा आहे असे समजायचे त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे पाय टाकायचा नाही. हे सारे कशासाठी तर आपला नि आपल्या परीवाराचा जीव वाचविण्यासाठी. जिवंत राहण्यासाठी. यासोबत काही पथ्ये पाळायची ज्यामधे हात वारंवार धुणे, चेहेऱ्याला सारखा हात लावणे, बाहेरचे काहीही शक्यतोवर खाणे या सर्व बाबींचा अंतर्भाव होता. परंतू सर्वात महत्वाची होती ती म्हणजे लक्ष्मणरेषा. कारण या लक्ष्मणरेषेच्या आत आपण जोवर आहोत तोवर सुरक्षित आहोत. परंतू या मोठ्या आणि शिकलेल्या लोकांच्या शहरात व्यवस्था राबवणाऱ्यांशी वाद घातला जात होता, या तर्कावर की तुम्ही कोण आम्हाला सांगणार?, आमचे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही वगैरे. आम्ही आमची सुरक्षा करु शकतो. आमच्या घरी आम्ही सॅनेटायझरचा पूर्ण पॅकच आणून ठेवलाय. आम्हाला ते वापरण्याची सवय आहेच. बंद कारमधून आम्ही बाहेर पडू. या सोबतच काही, बाहेर नाही निघायचे तर काय घरात बसून रहायचे? असे म्हणणारे हिरो देखील होते. सोबतच आम्हाला लागणाऱ्या रोजच्या पुज्या, खर्रे, आणि बाटल्या त्याचे काय करायचे? असे म्हणणारे महाभागही होते. यासोबतच सोशल मिडीयावर बुद्धीवाद्यांचे एकमेकांवर तुटून पडणे देखील सुरु झाले होते. हे असे नव्हते करायला, यामुळे असे होईल, यामधे हा हेतू आहे, यामधे तो हेतू आहे असे करता करता अगदी अभद्र शब्दांच्या वापरापर्यंत गोष्ट पोहोचली. यामधून मैत्री तुटण्यापर्यंत, किंवा काही आक्षेपार्ह गोष्टी पसरवल्याबद्दल पोलीस कारवाई होईपर्यंत बाबी पुढे गेल्या. कुणी कुठले व्हीडीयो तर कुणी कुठले ऑडीयो, मग त्याच्याबद्दल शंका, मग त्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुन्हा व्हीडीयो, त्यावरुन आरोप प्रत्यरोपाच्या नव्या फैरी, सारेच कसे कोलाहलाचे नि असमंजस निर्माण करणारे, विद्वेशाची बिजे रोवणारे, विस्कळित होत असलेल्या स्थितीचा देखील फायदा करु बघणारे, उद्वेग आणणारे असे सारेच विचित्र सुरु झाले. लोकांना त्यांचाच जीव वाचावा म्हणून घरात बसविण्यासाठी व्यवस्थांना जीवापाड मेहनत करावी लागणे सुरु झाले, वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना देखील जीव धोक्यात घालून काम करावे लागणे सुरु झाले, एकंदरीत या मोठ्या शहरामधे एक प्रकारची विचित्र अस्वस्थता निर्माण झाली आणि सोबत आजाराने ग्रस्त झालेल्या त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा दिवसागणीक आकडा वाढू लागला. नियोजनकर्त्यांनी आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेचा तर येथे विसरच पडला.

पण त्या गावात मात्र ती माऊली आपल्या दोन्ही पोरांना सांगू लागली. टीव्हीवर दाखवले आणि मग सरपंच साहेबांनी सगळ्यांना सांगितले. हे बघा पोरहो, आपल्या घरी सध्या एक महिना पुरेल एवढा शिधा आटा आहे. मधे लागला तर आणता येईल. माझ्याजवळ काही पैसे आहेत. जे आहे त्यात आपल्याला निभावायचे आहे. कधी तेल मीठ भाकरी जरी खावी लागली तरी काही हरकत नाही. पण पोरांनो आपल्याला सगळ्यांना जगायचे आहे आणि त्यासाठी सध्या काही दिवस आपल्याला घरातच राहयचे आहे. असं समजायचं की आपल्या फाटकावर लक्ष्मण रेषा आहे. माहीत आहे ना? रामायणातली! सितामाईने ती ओलांडली आणि काय झाले? तेव्हा सिता एकटी होती आणि तिला वाचवायला श्रीराम होते. आता आपण खूप जण आहोत आणि आपल्याला वाचवायला राम जरी असले तरी ते आता इतक्या जणांना वाचवू शकणार नाही. त्यामुळे लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बस. सरपंच साहेबांनी एकच सांगितलं, जगायचे असेल तर घरात रहा आणि आपला पर्याय जगायचं आहे हाच आहे. त्यामुळे बाहेर जाणे बंद. मुलांनी पटकन हो म्हणले झोपी गेली

त्या दिवसापासून ते कुटुंब घरातच आहे. अभ्यास, खेळ, देवाची प्रार्थना, आईला कामात मदत, साफसफाई, घराची आवरासावर, सायंकाळी आई कडून गोष्टी ऐकणे असा सारे वेळापत्रक त्यांचे ठरले लक्ष्मणरेषेचे पालन काटेकोरपणे सुरु झाले. त्या गावात जवळपास सर्वच घरांमधे हे पालन सुरु झाले. त्यामुळे घरात जा सांगायला, पोलीस नाही, अतिरीक्त डॉक्टरांची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या महाभयंकर आजाराचा शिरकाव देखील नाही

प्रश्न एकच आहे, छोटासा! एका छोट्याश्या गावात एका जवळपास अशिक्षित बाईला आपल्या नि आपल्या मुलांच्या जगण्यासाठी जे करणे सहजच शक्य होते ते शहरातल्या आम्हा शिक्षित आणि सुधारलेल्या समाजाला जिवंत राहण्यासाठी देखील का करता येऊ नये? हे उत्तर शोधण्यासाठी देखील आता वेळ नाही. त्वरीत या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याची गरज आहे, उत्तर एकच आहे, लक्ष्मणरेषेच्या आत राहणे आणि जीव वाचविणे.




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18