थोडा है थोडे की जरुरत है @ 14.04.20

समय का ये पल..

खूप अस्वस्थता निर्माण झालीय रे मनात. काही सुचत नाहीये. अशी विचित्र अवस्था यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती मी. अनेक कठीण प्रसंग देखील आले परंतू त्या प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारे निभावून नेले. उलट अनेक वेळा मीच सोबतीच्या लोकांकरीता मानसिक आधार बनले. परंतू यावेळी मात्र काहीतरी विचित्र झालेय. असेही काही नाही की घरात असल्याने असे होते. मलाच आठवते की महिन्यातून बरेच वेळा दहा दहा दिवस देखील बाहेर निघणे होत नाही. घरची कामे सुरु राहतात, बाहेरची कामे कुणीतरी करुन टाकते आणि मला बाहेर जाण्याचे कामच पडत नाही. पण आता सध्या मात्र काहीतरी वेगळे होतंय रे. नेमके काय झालेय ते मला सांग म्हणजे मला त्याच्यावर इलाज करता येईल. एका मैत्रिणीचा अत्यंत निराश झालेल्या आवाजात फोन आला. नेमके काय वाटतेय ते आणखी विस्तृतपणे सांग, मी म्हणालो. त्याच टोनमधे ती पुढे सांगू लागली. असे वाटतेय जीवन एक तर थांबलेय किंवा अतिशय संथ गतीने कंटाळवाणे सुरु आहे. सारख्या त्या बातम्या, तोच वाढता आकडा, मनाला विषण्ण करणाऱ्या काही गोष्टी, नविन नविन काहीतरी सांगून काळजी घ्या या नावाखाली कधी कधी खूप घाबरवून टाकणारे चॅनल्स, त्यात हा सोशल मिडीया, त्यावर राजकारणाच्या नावाने एकमेकांना ओरबाडत राहणारे लोक, कुणी काही लिहीतंय, कुणी काही, एकमेकांवर टिका करण्यामधे देखील छान वेळ जातोय लोकांचा. परंतू कंटाळा आला रे या सर्वच गोष्टींचा. घरात कामाला कुणीच नाही, घरच्या लोकांनी काही कामांची जबाबदारी घेतलेली आहे. परंतू त्यांना सवय नाही रे ही कामे करण्याची. त्यामुळे त्यांनी केलेली कामे परत परत करावी लागतात. परवा पोरीने भांडी पुसून ठेवायचा उत्साह दाखवला तर साऱ्या भांड्याच्या जागा बदलून गेल्या, मला ते इतके अस्वस्थ करणारे होते की काय सांगू? मुळात सांगू का, या सर्व अगदी घरच्या लोकांना देखील असे इतका वेळ घरी बघण्याची सवय नाही रे. कृपया मी काय म्हणते ते समजून घे. लोकं माझीच आहेत परंतू यांच्या घरी नसतानाची माझी एक स्वतंत्रपणे जगण्याची वेळ होती जेव्हा मी माझी स्वतःची होती, मला हवा तसा मी वेळ घालवायची, तो वेळच निघून गेलाय. शिवाय उगाच भिती वाटू लागलीय रे. खरे तर कशाची भिती वाटतेय ते देखील कळत नाहीये. मरणाची वाटतेय का? असा देखील प्रश्न स्वतःला विचारुन झालाय माझा. माझ्या मनाने त्याचेही उत्तर नीट दिले नाही. मन रमावे म्हणून फेसबुक, व्हाॅट्स ॲपवर वेळ घालविणे सुरु आहे. परंतू त्यामधेही काळजी घ्या, सावधानी बाळगा, किंवा सकारात्मक रहा या असल्या संदेशांनी डोके फिरायची वेळ आलीय. नकोय आता हा सकारात्मकतेचाही भडीमार. सकारात्मक रहा असे वारंवार ऐकून निराशा येऊ लागलीय. असे वाटू लागलेय की फारच भयानक झालंय सगळीकडे आणि आता काहीच पर्याय नाही म्हणून हे सारे एवढ्याने ओरडताहेत. असेलही रे, पण मला त्याचा विचारच करायचा नाही. कामांमधे गुंतवून घ्यायचे म्हणशील तर त्याचाही कंटाळा येतो. खरे तर कायम लिखाण करत राहणारी मी, आता ते पण करावे वाटत नाही. कोण वाचेल? जीवाशी गाठ असताना कसले मनोरंजन? मला माहिती आहे की मी दोन्ही बाजूने बोलतेय परंतू नेमकी हीच अवस्था झालीय बघ मनाची. जी गोष्ट मला आता पटते आहे त्याच गोष्टीच्या अगदी विरोधातला विचार माझ्या मनात काही वेळानंतर येतो आणि तो देखील मला पटतो, तेवढ्याच तिव्रतेने ज्या तीव्रतेने पहिला विचार पटला होता. हे काय झालंय तेच कळत नाही. खरे तर इतर सर्वकाही व्यवस्थित आहे. घरात साऱ्या वस्तू भरलेल्या आहेत. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. काही लागले तर बोलावले जाते, त्या बद्दल देखील तक्रार नाही, पण वाहते जीवन अचानक थांबून बंदिस्त झाल्यासारखे होऊन गेलेय रे. आता तुझ्या मनात असेही येत असेल की ही सारी भरल्या पोटाची विचित्र लक्षणे आहेत. ज्यांना अजिबात काही मिळत नाही त्यांचा विचार करायला हवा, ज्यांना रोज काम करावे लागते आणि ज्यांचे तळहातावर पोट आहे अश्या लोकांचे कसे होत असेल, त्यापेक्षा आपण कितीतरी चांगल्या अवस्थेत आहोत. त्यामुळे आपण खुश रहायलाच हवे. पटतंय रे. आणि त्यांचा विचार पण करते. माझ्या व्यवहारी नवरा विरोध करत होता तरी देखील घरच्या सर्व कामवाल्या बायकांना या महिन्याचा संपुर्ण पगार मी अग्रीम दिलाय आणि महिनाभर कामावर येऊ नका असे सांगितलेय. प्रत्येकीला सॅनीटायझरच्या दोन दोन बाटल्या आणि एक एक हॅन्डवाॅश देखील दिलाय माझ्याकडून. त्याचा वापर त्यांना शिकविला. यासोबत माझ्या स्वतःच्या गायनशाळेच्या पैश्यातून शासनाला मदत देखील पाठवलीय. ज्यांना मिळत नाही त्यांचा विचार करत नाही असेही नाहीये रे. पण तरीही मला कंटाळा आलाय. ते गाणे नाही का? त्याचा संदर्भ वेगळा असला तरी देखील मला तसेच वाटतेय, समय का ये पल थमसा गया है. असे वाटतेय, की हे सारेच थांबून गेलेय आणि असे थांबलेल्या स्थितीमधेच अदृष्य होऊन जाणार. सर्वांशी फोनवर बोलतेय, आई बाबांशी, इतर नातेवाईकांशी पण का कोण जाणे फार एकटे वाटू लागलेय. कुणी कुणाकडे जात नाही, साधा खोकला जरी आला तरी लोक दूर पळतात. परवा कणकण वाटत होते म्हणून दवाखान्यात गेली, तिथे जरासा खोकला आला तर बाजूची बाई उठून दूर जाऊन बसली. बरोबर आहे पण अशी सवय नाही ना रे. दवाखान्यातून परत येताना अत्यंत जीवलग मैत्रीणीचे घर रस्त्यात लागले. ती दिसली. आम्ही थांबलो. घराच्या फाटकाच्या आतून ती आमच्याशी बोलली. परंतू घरात बोलावले नाही. दवाखान्यातून जाऊन आली असे म्हणल्यावर तर बोलणे आटोपते घेतले नि घरात काम आहे म्हणाली. काय झालंय रे हे. माझ्या नवऱ्याने मला समजावले की तिचे बरोबर आहे, तिच्या परीवाराच्या दृष्टीने ती विचार करतेय आणि सध्याच्या काळात आपण देखील घरात जाणे बरोबरच नाही. पटले रे मला त्याचे म्हणणे पण, मनात घर केले त्या गोष्टीने. मागे तिच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी ती मला म्हणाली होती, तू मला एवढी जास्त मदत केलीय की माझ्या इतकाच हा परीवार तुझा देखील आहे असेच मी समजते. तेव्हा तिचे बोलणे खरेच होते ना रे? मग आता तिचा परीवार माझ्यापासून वेगळा झाला का? आता यावर तू मला सध्याचा काळ वगैरे नको सांगू. ते भाषण माझ्या नवऱ्याकडून माझे ऐकून झालेय. माझ्या मैत्रीणीचे वागणे सद्य परिस्थीतीत बरोबर आहे परंतू मला वाईट वाटले. असे देखील काहीतरी झालेय रे. सारे एकमेकांकडे अविश्वासानेच बघताहेत. भाजी घ्यायला घराबाहेर गेली तरी अमूक भाजीवाला असेल तर घेऊ नको अशी सासूबाईंनी केलेली सूचना आठवते. काय आहे रे हे? कसे व्हायचे अश्याने? अजून तर काही दिवस हे असेच सुरु राहणार. टीव्ही वरच्या बातम्या बघितल्या की एखाद्या गावात किती जास्त रुग्ण वाढले म्हणून हळहळ व्यक्त करायची आणि दुसऱ्याच क्षणी आपल्या गावात फारच कमी आहेत म्हणून हायसे वाटून घ्यायचे. हा कसला स्वार्थीपणा मनात निर्माण झालाय. असे झालेय का? सध्याच्या या सर्व परिस्थीतीने आपल्याला आणि त्यातल्या त्यात माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला पार बदलवून टाकले का रे? काही सहन होत नाहीये. कंटाळा, अस्वस्थता, भिती, अविश्वास या सर्व भावनांचे संमिश्र स्वरुप मनात निर्माण होतेय. यावर काय करावे, तू सांग! मला जे वाटते ते मी नेमके सांगू शकलेय का याची देखील मला खात्री नाही. पण तुझा मानसशास्त्राचा अभ्यास असल्याने तुझ्याशी बोलले. आता तूच सांग काय ते?

माझ्या मैत्रिणीची समस्या मला कळली होती. अशी मनोवस्था होणार याचाही अंदाज होताच. तिला मी उत्तर दिले! (क्रमशः)




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18