थोडा है थोडे की जरुरत है @24.09.19

डक करता यावे!

त्याच्या कामामधे त्याला निराशा येऊ लागलेली असते आणि अश्या निराशेच्या स्थितीमधेच विचार करत तो रेल्वे स्टेशनवर बसलेला असतो. मनामधे नाही नाही ते विचार येऊ लागले असतात. आपल्याला करायचे काय आहे आणि आपण करतो काय आहे या संभ्रम निर्माण करणाऱ्या विचित्र अवस्थेत बसला असतानाच त्याचे बाॅस त्याला भेटायला येतात. बाॅस त्याला विचारतात, काय झाले? त्याच्या मुळातच भिडस्त स्वभावामुळे तो सुरुवातीला काही सांगत नाही. पण बाॅसच्या आग्रहास्तव तो त्याच्या मनातील निराशेचे कारण बाॅसला सांगतो. तो सांगतो, सर मला काय करावे सुचत नाही. ज्या खेळासाठी मी ही नोकरी स्विकारली ते मला काहीच करता येत नाहीये. मी सध्या रणजी पर्यंतच खेळू शकतोय. त्याच्यापुढे मला मार्ग दिसत नाहीये. शिवाय येथे ड्युटी करावी लागते. येथे एकूण विचार केला तर या प्लॅटफार्म वरुन त्या प्लॅटफाॅर्मवर धावण्यामुळे माझी केवळ धावण्याची प्रॅक्टीस होऊन जाते परंतू खेळाचे काय करु सर? कधी कधी असे वाटते की सारे सोडून निघून जावे. परंतू असा विचार असा की बाबांचा चेहेरा डोळ्यासमोर येतो आणि मग मी पुन्हा प्लॅटफाॅर्म ते प्लॅटफाॅर्म धावणे सुरु करतो. सर, खरे सांगतो मला आता नैराश्य येऊ लागलेय. हे काम आटोपून घरी जातो ना सर, तेव्हा प्रत्येकवेळी असे वाटते की मैदानावर आऊट होऊन पॅव्हेलीयन मधे परत येतोय. काही सुचत नाहीये सर. त्याचे बाॅस त्याचे सारे बोलणे शांतपणे ऐकून घेतात. त्या पोराच्या सुदैवाने त्याला एक संवेदनशील आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे बाॅस मिळालेले असतात. आपल्या कर्मचाऱ्यांना समजून घेऊन, त्यांच्यावर विश्वास दाखवून तसेच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे असे ते बाॅस असतात. उगाच नियमांचा बडगा दाखवित स्वतःचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न करणारे नसतात. आपल्या सोबत काम करणारा तो नवा मुलगा अडचणीत आहे असे पाहून त्याला ते अत्यंत शातपणे काही गोष्टी समजवतात

अनेकवेळा निराशेच्या क्षणी कुणीतरी सांभाळणारे हवे असते. अश्यावेळी आपल्या मनाची स्थिती आपल्याला कोणताही सकारात्मक विचार करु देत नाही. मनात येतात ते केवळ नकारात्मक विचार त्या विचारांमुळे मानसिक स्थिती ढासळू लागते. अश्यावेळी आपल्या स्वत:ला त्यामधून सहसा बाहेर पडता येत नाही. तेथे कुणाच्यातरी सकारात्मक विचारांची गरज असते. आपल्या कर्मचाऱ्यांना मनापासून बळ देणारे त्याची कामातील उपयोगीता त्याचा विकास या दोन्ही बाबींकडे लक्ष देऊन प्रसंगी वरीष्ठांसमोर त्याला उघडे पाडता, त्याला सांभाळून घेणारे ते बाॅस त्या पोराला लाभले असतात त्यामुळे त्याला त्याच्या या निराशेच्या स्थितीमधून ते अलगद त्याला पटेल अश्या उदाहरणासह अलगद बाहेर काढतात. या प्रसंगी मला त्या बाॅसच्या संवेदनशील मनाला सलाम करावा वाटतो कारण ते या प्रसंगी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणारा अधिकारी म्हणून नाही तर त्यांना सांभाळणाऱ्या पित्याच्या भुमिकेतून बोलत असतात.

ते बाॅस त्या निराशेने ग्रासलेल्या त्या मुलाला त्याच्या ग्राऊंडवरचेच काही प्रश्न विचारतात. सुरुवातीला ते ऐकून तो बिचकतो. त्याच्या नेमके बाॅसला काय म्हणायचे आहे ते लक्षात येत नाही. तो केवळ उत्तरे देत जातो. बाॅस विचारतात, ते सारे जाऊ दे बेटा, मला एक सांग, जेव्हा तुला गोलंदाज फुलटाॅस बाॅल टाकतो तेव्हा तू काय करतो? तो उत्तरतो, मी हीट करतो. पुढे ते विचारतात, हाफ व्हाॅली बाॅल टाकला तर काय करतो? तो म्हणतो, ड्राईव्ह करतो. पुढचा प्रश्न, चांगला आऊट स्विंगर आला तर काय? तो सांगतो, सोडून देतो, चांगला इन स्विंगर आला तर? डीफेंड करतो. आणि शेवटचा प्रश्न ते विचारतात, जर खेळता येणारा बाऊंसर आला तर काय करतो, तो म्हणतो डक करतो, म्हणजेच खाली वाकून तो बाॅल विकेट कीपर कडे सरळ जाऊ देतो. यानंतर ते त्याला छोटासा पण कामाचा संदेश सांगतात. ते त्याला सांगतात की सध्याची तुझी स्थिती म्हणजे हा शेवटचा मी सांगितलेला खेळता येणारा बाऊंसर आहे असे समज. आणि त्या बाऊंसरचा सामना मैदानावर करण्याकरूता तू जी पाॅलीसी राबवतो तिच प्रत्यक्ष जिवनात वापर. त्याला डक कर. कारण हा बाॅल खेळ्याचा प्रयत्न केला तर कॅच आऊट होण्याची किंवा कपाळमोक्ष होण्याची भिती असते. काही वेळ हे डक करणे सुरु ठेवावे लागेल पण प्रत्येक बाॅल सारखा नसतो, तुला फुल टाॅस मिळेलच तेव्हा हीट कर. अर्थात सध्याची परीस्थिती कायम राहणार नाही. दिवस पालटतील, तुला हवी तशी संधी मिळेल त्यावेळी त्याचा सर्वोत्तम वापर करुन यशस्वी हो. एका छोट्याश्या संदेशाने संवादाच्या आधारे ते बाॅस त्याला आधार देतात. त्याला ते सांगतात, इकडच्या कामाची चिंता करु नको परंतू तू जो मोठ्या स्वप्नांकरीता संधर्ष करतोय त्याचा विचार कर, वरीष्ठांना काय सांगायचे ते मी सांगतो. मी तुझ्या सोबत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावरील चित्रपटामधे हा छोटासा परंतू महत्वाचा प्रसंग आहे.

खरोखरीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग येतात ज्यावेळी निराशेने मन ग्रासलेले असते. निराशेचा सामना सर्वच वयोगटातील लोकांना करावा लागतो. त्या निराशेच्या क्षणांमधे सर्वात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे आपल्या मनाची. कारण नैराश्याचा पहिला प्रहार होतो तो आपल्या मनावर. निराशा मनाला दुबळी करते, मनावर ताबा मिळवते आणि मग त्याचा परीणाम होतो तो शरीरावर. त्यामुळेच कधी कधी या निराशेने ग्रासलेले मन शरीराला आपल्या बाजूने एवढे जास्त खेचते की त्याचे अस्तित्व संपवून टाकणारी कृती देखील याच मानसिक अवस्थांमधे केली जाते. कधी आर्थिक अडचणींचा ताण सहन झाल्यामुळे मन निराश होते, तर कधी परीक्षेमधे गुण कमी मिळाले म्हणून जीवनातील यशस्वितेची ही एकमेव संधी होती असा भ्रम निर्माण होऊन मन खिन्न होते, कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळाली नाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तरी देखील मन विषण्णतेकडे झुकायला लागते किंवा साऱ्या योग्यता असून अपेक्षित यश पदरात पडल्यामुळे देखील बरेच वेळा मनावर निराशेचा कब्जा होतो अश्या नैराश्यक्षणांमधे प्रसंगी शरीराचे अस्तित्व संपविणारी आत्महत्येसारखी कृती देखील केली जाते. म्हणूनच असे काही टोकाचे भयानक होण्याआधी वर उल्लेखित संदेश महत्वाचा ठरतो

आयुष्य हे वेगवेगळ्याप्रकारे आपल्या समोर येत असते. काही सहजतेचे तर काही कठीण परीक्षा घेणारे क्षण येत राहतात. या प्रसंगांना क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास वेगवेगळ्या प्रकारचे बाॅल असे समजायला हरकत नाही. तांत्रिक दृष्टीने प्रत्येक वेगवेगळ्या बाॅलला सामोरे जाताना कृती ठरलेली आहे. एका चांगल्या फलंदाजाला तो बाॅल कळला पाहीजे त्याला सामोरे जातानाची योग्य कृती त्याच्याकडून घडली पाहीजे. या दोन गोष्टींच्या समन्वयामुळेच फलंदाज यशस्वी होतो. जीवनाचेही असेच आहे. कोणत्या प्रसंगी कसे वागायचे हे ठरलेले आहे. प्रसंग त्याला सामोरे जाण्याची कृती याचा ज्याने मेळ जुळविला तो यशस्वी होतो. मला व्यक्तिशः असे वाटते की या सर्व कृतींमधील सर्वात महत्वाची आहे डक करणे.

सहजता आहे तेव्हा जीवन ताकदीने प्रभावीपणे जगणे ही गोष्ट महत्वाची आहे परंतू तसे जगण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती असते. जगण्यासाठी क्लिष्ट प्रसंग समोर आल्यावर त्यास सामोरे जाण्याची इच्छा असतानाही त्याच्यामधील धोके ओळखून संयमाने त्या प्रसंगाला डक करणे ही सर्वात कठीण प्रक्रिया आहे. कारण अश्या प्रसंगी अकारण दाखविलेले धाडस अंगलट येण्याची शक्यता असते. पुढे अनेक चांगले प्रसंग येणार आहेत त्यावेळी संपुर्ण क्षमता वापरता येईल हा संयमित शहाणा सल्ला ज्या क्षणी मन देते तेव्हाच आपण डक करतो. लौकिकार्थाने कदाचित आपण डक केल्यावर प्राप्त काहीच होत नाही परंतू पुढच्या प्रसंगांना सामोरे जाऊन यश मिळविण्यासाठी आपला खेळ सुरु राहतो. खेळ सुरु राहणे महत्वाचे आहे त्याकरीता प्रसंगी डक करणे देखील महत्वाचे आहे. होय ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18