थोडा है थोडे की जरुरत है@10.09.19
नव्यासाठी अटी
निलेशच्या नव्याने तयार झालेल्या घरात मी प्रवेश केला आणि समोर बघतो ते काय?...
निलेशचा संपुर्ण परीवार आई, पत्नी, भाऊ, वहिन्या, मुले बाळे सारे लोक निलेशच्या घरात हजर होते. सर्वजण माझीच वाट बघत होते. निलेशच्या मोठ्या भावाने मस्त डोक्याला एक लाल रंगाचे फडके बांधले होते. मोठ्या हाॅलमधे मधोमध एक पाणीपुरीचा स्टाॅल सारखी रचना करण्यात आली होती आणि निलेशचा मोठा भाऊ लो पाणीपुरी लो असे मोठ्याने म्हणत सर्वांना आपल्या हाताने पाणीपुरी देत होता. संपुर्ण परीवारातील लहान मुलांचा सुरुवातीला नंबर लागला होता. पाणीपुरीवाल्यापाशी उभे राहतात तशी ती पोरे उभी होती. कुणाला खटाई हवी, कुणाला नको, कुणाला कांदा अश्या साऱ्या मागण्या पूर्ण करीत त्याची धमाल सुरु होती. त्याच्या बाजुला त्याची बायको, आमची वहिनी देखील युपी स्टाईलची साडी नेसून ज्यांना हवी त्यांना दहीपुरी बनवून देत होती. हसणे, खिदळणे सुरु होते मस्त. मी आलो म्हणल्यावर त्या निलेशच्या दादाने मला हाक मारली, अविबाबू चलो पानीपुरी खाईलो, अपने अमरावती जैसी झणझणीत और तिखट तिखट मिलेंगी. त्याच्या त्या मराठी मिश्रीत हिंदीवर सर्वांनी हसून घेतले. मी पाहुणा म्हणून पोरांसोबत माझा नंबर लागला. मी देखील त्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला. चव खरोखरीच छान होती परंतू ज्या आनंदात तो मला पाणीपुरी देत होता त्यामुळे त्याची लज्जत वाढली होती. हा सारा प्रकार सुरु असताना सारे आनंदात होते, मजा करीत होते केवळ एका व्यक्तीच्या डोळ्यात मात्र मला या आनंदाचे स्वरुप आनंदाश्रूंच्या रुपाने दिसले व ती व्यक्ती म्हणजे निलेशची आई, आमच्या काकू. निलेशच्या दादाने मला बनवून दिलेल्या पाणीपुरीचा आस्वाद घेऊन मला लवकरात लवकर काकूंना भेटायचे होते कारण त्यांच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूचा अर्थ मला त्यांना विचारायचा होता. पाणीपुरीचा तो कार्यक्रम म्हणजे तिन्ही भावांना स्वतंत्र घरे बनविण्याची परवानगी देताना त्यांनी ठेवलेल्या अटींपैकी एक अट होती.
लहानपणापासून काकुंशी संपर्क असल्याने त्या माझ्याशी मोकळ्या बोलल्या. किंबहुना ही एका घराची तीन घरे झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना बोलण्याची संधी मिळाली होती. निलेशने बाकी वृत्तांत सांगितला होता. परंतू हा निर्णय करण्यामागची काकुंची नेमकी भूमिका काय होती ते जाणून घ्यायचे होते. काकुंनी मला जे काही सांगितले आणि विशेषतः त्या अटी सर्वांसमोर मांडण्याचा विचार जो काकुंच्या मनात आला तो कसा आला हे देखील मला काकुंनी सांगितले. केवळ दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेल्या काकू जीवनाच्या शाळेत मात्र अनुभवांचे टक्के टोणपे खाऊन चांगल्याच तयार झाल्या होत्या. म्हणूनच हा निर्णय घेताना त्यांनी त्यांच्या मनाला घातलेली मुरड व त्यामधूनही चांगला व प्रशस्त मार्ग काढण्याकरीता त्यांनी आखलेले धोरण हे अफलातून होते. अत्यंत सकारात्मकतेने काकुंनी मार्ग काढला. आधुनिक काळात बदलणाऱ्या संकल्पनांना आत्मसात करणाऱ्या नव्या पिढीसोबत आपल्या विचाराची मूळ चौकट जपत जुळवून घेण्याची त्यांची कला जीवन जगताना सर्वांच्याच उपयोगाची अशी होती. कारण ठराविक कालांतरानंतर प्रत्येकच पिढी जुनी होते व नव्या विचारांची पिढी त्यांच्याही समोर येतेच. त्यामुळे काकुंनी स्विकारलेली चौकट जपून जुळवून घेणे ही कला प्रत्येकालाच यावी अशीच होती. काकु मला सांगू लागल्या व मी शांतपणे सारे ऐकून घेतले.
अवि, जेव्हा हा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा सर्वात पहिल्यांदा तर मला धक्काच बसला. आपली तीन मुले व त्यांच्या बायका, मुले हा आपला परीवार आहे आणि त्याचे तीन तुकडे करण्याचा तो प्रस्ताव होता. मी माझा निर्णय सांगण्यासाठी वेळ घेतला आणि खरे सांगते, त्या रात्री जवळपास संपुर्ण रात्र मी तुझ्या काकांच्या फोटोसमोर रडत रडत संपुर्ण खचून जाणे कशाला म्हणतात याचा अनुभव घेतला. काकांशी बोलले, त्यांना रागावले, मला एकटीला सोडून गेल्याबद्दल बोल लावला. पहाटे त्यांचेच शब्द आठवले, ते म्हणायचे समस्येवर मात करायची तेव्हाच करता येते जेव्हा आपण स्वतः त्यागाचा विचार अनुसरुन आणि आग्रह सोडून देण्याचा जास्त भार उचलतो. ते वाक्य आठवल्याने मी भानावर आले आणि मनाचा निग्रह करुन काही ठाम निर्णय घेतले.
मुलांच्या बोलण्यावरुन माझ्या लक्षात आले होते की, त्यांच्या मनाने तसा निर्णय घेतलेला आहे व त्यामुळे मी विरोध केला असता तर त्यांच्यातील अंतर्गत विरोधाला मी जन्म देणार होते. माझ्या हे पण लक्षात आले की या निर्णयामुळे माझे एकसंध घर विलग होणार परंतू मी जर तसा निर्णय घेऊ दिला नाहीत तर काही दिवसाने माझ्या घराची तीन घरे नाही तर तीन शकले झाली असती. सर्वात जास्त एक विचार डोक्यात आला की माझे म्हणून आतापावेतो घराचे स्वयंपाकघर जे केवळ माझे होते ते कसे सांभाळले जाईल, सण कसे होतील, घराची परंपरा कशी सांभाळली जाईल. पण याही प्रश्नाचे उत्तर माझ्या मनाने दिले. मी स्वतः अठराव्या वर्षी लग्न होऊन या घरात आली व त्या वयात मी सारे सांभाळले मग माझ्या त्यावेळेच्या वयाच्या दुप्पट वय असणाऱ्या माझ्या सुना ते का नाही सांभाळू शकणार? मार्ग निघाला. त्यागाचा माझा हिस्सा मी जास्त ठेवला. मुळात मला त्यांच्या सांभाळण्याबाबत शंका नव्हती तर मला हव्या त्या प्रमाणे त्या सांभाळतील की नाही ही भिती होती. मी ती काढून टाकली. वयाची पंचाहत्तर वर्षे मी माझ्या पद्धतीनेच सारे केले. आता मला त्यापासून स्वतःला मुक्त करता आले पाहिजे. म्हणून सर्वांसमोर मला निर्णय मान्य आहे असे म्हणल्याबरोबरच मी बाजी सर्वांची मने राखली होती. आता त्यांची पाळी होती. प्रथम होकार दिला आणि मग माझ्या अटी समोर ठेवल्या. सर्वांनी महिन्यातून एकदा आपले घर सोडून इतर दोन घरांपैकी एका ठिकाणी सर्वांसाठी जेवणाचा बेत करायचा. त्यावेळी इतरांनी लुडबुड करायची नाही. ज्याचा नंबर आहे त्याने व त्याच्या बायकोने सर्व काही करायचे व इतर दोन घरी याकरीता की सर्वांचा एकमेकांकडील वावर वाढावा म्हणून. प्रत्येक घराकडे सण देण्यात आले परंतू ज्यावेळी सण आहे त्यावेळी आपापल्या घरांना कुलुपे लावून रहायलाच यायचे. घर जवळ आहे म्हणून आपल्या आपल्या बेडरुम मधे झोपायलाही जायचे नाही. हाॅलमधे गाद्या घालायच्या आणि सर्वांनी एकत्र रहायचे. सहा महिन्यातून एकदा सर्वांनी एकत्रित कुठेतरी सहलीला जाणे बंधनकारक. कुणालाही कोणत्याही कारणांनी सूट नाही. त्या सहलीच्या आयोजनाची योजना देखील बांधून दिलेली. बुकींग एकाने, प्रवासाची सोय एकाने व प्रवासादरम्यान एकाची निगराणी. खर्च समसमान वाटून घ्यायचा. या सहा महिन्यांपैकी एक ठिकाण हे कोणतीतरी सेवाभावी संस्था असेल हा दंडक. प्रत्येक घरामधे आईकरीता स्वतंत्र खोली असेल व कुणाकडे किती दिवस रहायचे हा निर्णय मी घेणार. अश्या सर्व अटी मी घातल्या ज्याचे किती छान पालन होते ते तूला आता पाणीपुरी बेतावरुन कळलेच असेल. सर्वात महत्वाची अट मी घातली ती म्हणजे, तिनही घरांची प्रवेशद्वारे समोरासमोर असतील व त्यांचे आंगण एकच राहील ज्यात मधोमध एक मोठे सुंदर तुळशी वृंदावन असेल आणि घरातील सर्वांनी सकाळी साधारण ९ च्या सुमारास या तुळशी वृंदावनाजवळ एकत्रित यायचे व सोबत प्रार्थना म्हणूनच मग कामाला जायचे.
बघतोयस अवि, माझ्या पोरांनी किती सुरेख तुळशी वृंदावन आणलेय! ते माझ्या या तीनही घरांचा आधार आहे नि यांना जोडून ठेवणारा दुवा. होय, त्या रात्री काकांचे आणखी एक वाक्य मला आठवून गेले होते. आपण गोष्टींकडे मनात सकारात्मकता ठेवून बघितले तर सारे चांगलेच होते. मी माझ्या एका घराचे तीन तुकडे होत आहेत असा विचार न करता, माझ्या एका घराची आता तीन घरे होणार आहेत असा विचार केला. बघ कसा छान परीणाम झालाय!
काकुंचा विचार खरोखरीच मनाला भावला. आपल्या सभोवतलच्या प्रत्येकाच्या विचारांचे आणि क्षमतांचे स्वातंत्र्य आपण एकदा मान्य केले की बंधने आपोआप गळून पडतात व नंतर त्याच स्वतंत्र झालेल्या व्यक्ती आपल्याच प्रेमाच्या बंधनात अडकतात, अगदी कायमच्या!! हे खरे सुंदर बंधन असते!
फारच छान! हृदयस्पर्शी!
ReplyDelete