थोडा है थोडे की जरुरत है @ 03.09.19
जुन्याचे नवे..
अव्या, प्रोजेक्ट फायनल झाला. आम्हा भावांच्या मनाप्रमाणेच सगळे ठरले. कालच सगळेजण मिळून आर्किटेक्ट कडे जाऊनही आलो. त्याला सारा प्लॅन समजावून सांगितला. तो आता पंधरा दिवसात नकाशा काढून आणणार आहे. एकदा ते झाले की आमची गुंतवणूक करुन कामाला सुरुवात होणार. असे समज ना की अंदाजे महिन्याभरात घर पाडणे सुरु होईल. अतिशय आनंदाने निलेश त्याच्या जुन्या घराच्या जागी त्याच्या तीन भावांचे स्वतंत्र फ्लॅट निर्माण होणार ही वार्ता मला देत होता. त्याचे जुने घर फारच मोडकळीला आले होते. परंतू त्याची आई त्या गोष्टीकरीता तयार नव्हती. ती माझ्याशी देखील या संदर्भात बोलली होती. म्हणूनच माझ्या मित्राचे ते सारे ऐकल्यावर मी त्याला विचारले, आई तयार झाली का? तो म्हणाला अरे ती तर गंमतच झाली. तयार झाली परंतू काही अटींवर आणि गंमत म्हणजे तिने त्या अटी कागदावर लिहून त्यावर सर्वांना सह्या करायला लावल्या. सह्या म्हणजे अगदी घरच्या पोरांना देखील. त्याचे एकत्रित वाचन केले व त्यानंतर त्यास आम्हा सर्वांची मंजुरी आहे हे बघितल्यावर तिने परवानगी दिली. तो सारा एक एपीसोडच आहे. साधारण काय झाले असेल याची मला सहजच कल्पना आली. परंतू त्या अटींबद्दल मात्र कुतुहल वाटले. निलेशच्या बाबांच्या निधनानंतर त्याच्या आईने त्या तीनही भावंडांना मोठाच आधार दिला होता व घर आईच्या नावाने असल्याने तिच्या परवानगीशिवाय काही करणे शक्य नव्हते. काकुंना मी फार चांगल्या प्रकारे ओळखत होतो त्यामुळे हा प्रस्ताव निलेशने समोर ठेवल्यावर त्या दिवशी निलेशकडे काय झाले असेल याचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहीले.
आपले हे जुने घर आता फारच मोडकळीला आलेय त्यामुळे आपण हे संपुर्ण पाडून या जागी तीन नवी घरे बांधू. घर मोडकळीला आलंय व त्यासाठी नवे घर बांधण्याची गरज हे काकुंना पटले परंतू एका घराच्या जागी तीन नवी घरे ही संकल्पना नवी होती. एक क्षण काकूंना कसेतरी वाटून गेले परंतू दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरुन त्या म्हणाल्या मला मान्य आहे परंतू माझ्या काही अटी आहेत. त्या अटी तुम्हा सर्वांना मान्य कराव्या लागतील. निदान मी जिवंत असेपर्यंत त्यात बदल करता येणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणेज या अटी घरातील सर्व सदस्यांना म्हणजेच मोठ्या सदस्यांसोबत मुला बाळांना देखील मंजूर कराव्या लागतील. एका कागदावर या साऱ्या अटी लिहून घ्या त्यावर स्वाक्षऱ्या करा व त्यानंतरच मी परवानगी देईन. मोठ्या भन्नाट अटी होत्या त्या. घरातल्या सर्वांनी तो अटींचा कागद वाचला. त्या अटी वाचत असताना प्रत्येकाच्या विशेषतः तीन घरांमधे विभागल्या जाणाऱ्या त्या तीन भावांच्या डोळ्यात तर चक्क आसवे गोळा झाली. अर्थात प्रत्येकच जण ते सारे वाचून गहिवरुन गेला होता. त्यानंतर त्या साऱ्यांनी त्यावर स्वाक्षरी केल्या व सारे जण आर्किटेक्ट कडे निघून गेले. आईने थकवा जाणवतो आहे असे सांगितल्यामुळे आईला त्यांनी घरीच ठेवले. खरे तर कारण वेगळे होते. आईला सर्वांना बाहेर पाठवून काही वेळ तिच्या घरात एकटे रहायचे होते. सारे गेल्यावर निलेशच्या आईने दार लावून घेतले व आशाळभूत नजरेने ती तिच्या घराकडे बघू लागली. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी वडीलांचे घर सोडून ज्या दिवशी या घराच्या उंबरठ्यावर तिने माप ओलांडले तो क्षण तिला आठवला. खरे तर हे घर तिचे नव्हते. परंतू या घरातील एक व्यक्ती तिच्या आयुष्याचा जोडीदार बनला आणि त्या जोडीदारासोबत आयुष्य जगताना हे घर तिचे कधी होऊन गेले ते तिलाही कळलेच नाही. तेथून पुढे त्या घरातील सुखाच्या क्षणांमधे रममाण होताना, दुःखाच्या क्षणांमधे घरच्यांचा आधार बनताना, अडचणींच्या वेळी स्वतः कष्ट करुन त्या वेळा निभावून नेताना, घराच्या व्यवस्था नीट सुरु रहाव्यात म्हणून अनेक वेळा आपल्या मनाचे न ऐकता त्याला गप्प करताना, घरच्या सर्वांची आजारपणे ताकदीने निभावून नेताना, आधीच्या पिढीकडून सारी जबाबदारी त्यांच्या कलाने घेऊन आपल्या खांद्यावर घेताना, आपल्या सासरच्या मंडळींची विचारपद्धती जरा वेगळी असल्याने आपल्या माहेरच्या लोकांना काही वेळेला मनावर दगड ठेऊन टाळताना, घरातील प्रत्येकाची काळजी मनापासून करताना, मुलांची याच घरात पडणारी पहिली पाऊले कौतुकाने बघताना, इतरांकरीता आपल्या मनतील इच्छा कायम बाजूला ठेवतान, कामाचे कुणी दोन शह्दांनीही कौतुक केले नाही तरीही घरामधे आनंद नांदेल याकरीता सतत प्रयत्न करताना, कधी कुणाकडून काही मनाला लागेल असे बोलल्या गेले तरी देखील त्याकडे घरातील आनंदाकरीता दुर्लक्ष करताना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कधीही कुणाच्या मनाला लागेल असे काहीही न बोलता घरातील सर्वांना त्या घराशी बांधून ठेवताना घालविलेले सारे क्षण एखाद्या चलचित्राप्रमाणे आईच्या डोळ्यासमोर उभे राहीले. ज्या घराशी सर्वांना बांधून ठेवले ते घरच आता पाडले जाणार म्हणून तिचे मन जरा खट्टू झाले व नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते तिच्यासाठी केवळ घर नव्हते तर तेथे अनेक आठवणी होत्या. त्या सर्व आठवणींना त्या घरातील जागोजागी आधार मिळाला होता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या घरात सारे जण सोबत होते व त्याचा सर्वांनाच आधार होता. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणी घरातच आपसुकच होऊन जायच्या. आपल्या हातातील फळ हे संपुर्ण न खाता तीन तुकडे करुनच खायचे आहे हे घरातल्या मुलांना शिकवावे लागत नव्हते तर ती त्यांची सवयच बनली होती. हे सारे मनात आल्याने आईला जरा खिन्न वाटू लागले. परंतू आता तिच्या समोर फार पर्याय नव्हता कारण मुले मोठी झाली होती व काळही बदलला होता व त्यामुळे तिला नव्या घरांचा प्रस्ताव स्विकारणे क्रमप्राप्त होते. परंतू तीन घरे झाली तरी या जुन्या घरातील आनंद नव्या घरांमधे ठिकविणे व त्या आनंदाची सर्वांना सवय लावणे हे महत्वाचे कार्य तिला करायचे होते म्हणून तिने त्या अटी घातल्या होत्या. वाईट फार वाटत होते परंतू लवकरच तिने स्वतःला सावरले कारण नव्या काळातील ते प्रसिद्ध वचन तिला आठवले की सोबत राहून भांडत जगण्यापेक्षा दूर राहून प्रेमाने जास्त चांगले राहता येते. म्हणूनच तिने प्रस्ताव मान्य केला व घरातील सर्वांनीदेखील तिच्या अटी मान्य केल्या आहेत याचा तिला आनंद झाला. ज्या अटी तिने घातल्या होत्या त्यामुळे तिच्या घरातील आनंद तसाच राहील अशी तिला खात्री वाटत होती. हे सारे दृष्य माझ्या डोळ्यापुढे तरळून गेले व मला त्या अटींबद्दल फारच कुतुहल वाटू लागले. परंतू मला निलेशने त्याबाबत काहीच सांगितले नाही. तो म्हणाला मी तुला सांगणार नाही. आमची घरे झाली की तू माझ्याकडे रहायला ये आणि त्या अटींचा अनुभव घे.
साधारण एका वर्षात तीनही घरे तयार झाली परंतू पुढे तीन चार वर्षे माझे निलेशकडे जाणेच झाले नाही. आणि अचानक एके दिवशी आई गेल्याचा निलेशचा संदेश आला. नेमके त्यावेळी देखील मी स्वतःच आजारी असल्याने मला जाता आले नाही. साधारण सहा महिन्यांनी मला एका व्याख्यानाच्या निमित्ताने निलेशच्या घरी जाण्याची संधी लाभली. व्याख्यान आटोपून निलेशच्या घरी पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर मला जे दिसले, जे मी ऐकले व ज्या गोष्टींचा अनुभव घेतला त्यावरुन मला निलेशच्या आईने ही तीन घरे होताना घातलेल्या अटी किती यथार्थ होत्या याची जाणीव झाली.
निलेशच्या नव्याने तयार झालेल्या घरात मी प्रवेश केला आणि समोर बघतो ते काय?...
...क्रमशः
Comments
Post a Comment