थोडा है थोडे की जरुरत है @17.09.19

मैत्रीतील मदतीचे भांडण

गोष्ट तशी छोटी होती पण त्या दोघांचे भांडण मात्र झालेच ते देखील मदत करणे आणि ती नाकारणे यावरुन

मला तुझे हे अजिबात आवडत नाही. मी तुला मदत करायला बघतोय आणि तू ती मदत स्विकारतच नाही. माझ्याकडून मदत घ्यायला काय हरकत आहे. अश्या प्रकारे वागून तू मला दूर लोटते आहेस. मला तुला कोणत्याही स्वरुपाची मदत करण्यात किती आनंद होतो हे तुला कळणार नाही. आणि मदत देखील काय करतोय? काहीच तर नाही. छोटेसे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय. या माझ्या मदतीमागची भावना तू समजून घेत नाहीस याचे मला फार वाईट वाटते. एरवी तर असतेसच तू आपल्या नेहेमीच्या वर्तुळात तेथे मी कुठे लुडबुड करतो का? किंवा करण्याची इच्छा असली तरी ती करता येते का? नाही. मग या प्रकारे तरी मला तुला मदत करु देत जा. पण तुझा स्वभाव आड येतो. कुणाकडूनही मदत घ्यायची नाही. पण इतर कुणी आणि मी यात फरक आहे की नाही? मला देखील सर्वच लोकांप्रमाणे तू समजत असशील तर मग कठीण आहे. मग तर संपलेच. आणि माझ्या मदत करण्यामागचा खरा नि प्रामाणिक हेतू तुला सांगू? तो म्हणजे या असल्या मदतींची तुला गरज आहे  असे नाही, तू हे करु शकणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे असे देखील नाही. परंतू लक्षात घे, हेच ते क्षण असतात ज्यांच्या माध्यमातून मला तुझ्या आयुष्यात प्रवेश मिळतो आणि तुझ्याशी मी स्वतःला जोडू शकतो. हे असे जोडले जाणे सर्वात महत्वाचे आहे. अन्यथा आपण दोघेही आपापल्या कामांमधे एवढे गुंतलेलो असतो की एकत्रित क्षणांचा साधा आनंदही घेता येत नाही. परंतू या कामाच्या निमित्ताने मी तुझ्याशी बोलणार, मग तू मला काही सांगणार, आणि मग या विषयाच्या अनुषंगाने आपण सहवासाचे काही सुंदर क्षण सोबत घालवू आणि सरते शेवटी हे काम झाल्यानंतर ज्यांच्याकरीता तू हे करत आहेस त्यांना होणाऱ्या आनंदात देखील मला सहभागी होता येणार आहे. हा सहभाग महत्वाचा असतो. त्यासाठी ही सारी धडपड चाललेली आहे माझी. पण तू मात्र हट्टीपणा करत आहेस आणि माझे ऐकण्याचे ठरविले आहे. वाईट वाटले आज कारण तू या कामाच्या निमित्ताने मी करणारी मदत नाकारलीस आणि मला खूप दूर लोटले. आपले ठरले होते ना, सोबत रहायचे, आणि आनंदी क्षण मिळत असतील तर ते अजिबात गमवायचे नाही. मग, आता गेले ते क्षण. फार वाईट वाटते आहे.

अतिशय तावातावात त्याने आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीस संदेश पाठवला. फार वाईट वाटले होते त्याला. आपली मदत नाकारुन आपल्याला दूर लोटले असे वाटत होते. तिला आपल्या वडीलांच्या वाढदिवसाकरीता एक सुंदर टेबल लॅम्प बनवायचा होता, घरघुती वस्तुंचा वापर करुन, स्वतःच्या हाताने. काम सुरु केले आपल्या मित्राला ती दाखवत गेली. तो त्यातला एक्सपर्ट असल्याने त्याने काही बदल सुचविले परंतू ते फार चांगले होत नसल्याने मीच ते बनवून देतो असे त्याने म्हणले ज्यास तिने साफ नकार दिला. आपल्या अत्यंत जवळच्या मैत्रीणीने आपली मदत नाकारली म्हणून त्याला कमालीचा राग आला त्या रागापोटीच त्याने वरील संदेश तिला पाठविला. आपला मित्र कसा आहे याची पुरेपुर जाणीव तिला होती. त्याच्या मदत करण्याच्या इच्छेमागील तीव्र भावना तिला कळत होती. तो असाच आहे, धबधब्यासारखा कोसळणारा! हे तिला माहित होते. पण आज तिचेही काही म्हणणे होते. त्याच्या त्या रागाला तिने शांत होऊ दिले नंतर हळूच समुदारपणे त्याला संदेश पाठविला, तो असा!

अरे हो रे राजा, तू मला मदत करणार आहेसच परंतू यावेळच्या माझ्या कामाचे वेगळेपण लक्षात घेशील की नाही? तुझे सारे म्हणणे मला पटते. मला मदत करण्याची तुझी तळमळ, त्यामागे असलेली तुझी निखळ भावना, हे सारे मला पटतेय. पण माझी पण भुमिका जरा समजून घेतोस का? आज मी माझ्या वडीलांकरिता काहीतरी पहिल्यांदा बनवतेय. माझ्या वडीलांना आवडेल अशी गोष्ट बनवतेय. ती बनवताना मला किती आनंद मिळतोय हे समजून घे. माझ्या वडीलांनीच मला ही कला शिकविली. अश्या साऱ्या वस्तू बनविणे मी त्यांच्याकडूनच शिकले. आता त्यांच्या कडून मिळालेल्या विद्येचा वापर करुन हा टेबललॅम्प बनवून मला या निमित्ताने त्यांना एक प्रकारची गुरु दक्षिणा द्यायची आहे. मग ही गुरु दक्षिणा मीच द्यायला नको का? म्हणून माझी विनंती एवढीच आहे की मला प्रथम करुन तर बघू दे. मला माझा म्हणून प्रयत्न करु दे कारण ही भेट मला द्यायची आहे. मी तुझ्यापेक्षा वेगळी आहे ना? माझे वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व जपायला हवे असे तूच नेहेमी म्हणतोस ना? किंबहुना माझ्यात काहीतरी चांगले आहे आणि मी देखील माझे स्वतःचे स्वतंत्र असे काही करु शकते हा विश्वासच मुळी तू मला दिलाय. मग तूच जे मला शिकविले, जो मार्ग दाखविला त्याचाच अवलंब करुन मी आता हे काहीतरी माझे असे माझ्या बाबांकरीता बनवते आहे. मला हे करुन बघू दे. आणि जर मला ते करता आले नाही किंवा माझे समाधान झाले नाही तर मी कुणाला विचारणार? तुलाच ना. असे सारे सांगायला आणि या असल्या साऱ्या गोष्टींमधे आनंद शोधायला लावणारा तूच तर एकमेव आहेस, माझा सख्खा मित्र. परंतू यावेळी मला हे स्वतःला करुन बघायचेय कारण ती माझी भेटवस्तू आहे माझ्या बाबांना. मित्रा, गैरसमज करुन धेऊ नकोस ना! माझे काय म्हणणे आहे हे समजून घेणारा देखील तूच आहेस. पण मग एका बाजूने तूच मला सक्षम बनवितो, मी माझे असे स्वतंत्र काहीतरी करावे याचा नेहेमी आग्रह धरतो आणि आता मी तुझी मदत नाकारली तर चिडतो देखील. मला सारे कळते रे, तुझ्या चिडचिडीचा अर्थ देखील मला कळतो परंतू यावेळी तू मला समजून घे आणि ही गुरुदक्षिणा या टेबललॅम्पच्या रुपाने जशी होईल तशी बनवून बाबांना देऊ दे. रागावू नकोस. तुझा राग मला समजतोय परंतू नेहेमीप्रमाणे मला समजून घेशील ही अपेक्षा आहे. हा असा छान संदेश तिने त्याला पाठवला.

या मदतीच्या भांडणात कुणाचे बरोबर नि कुणाचे चूक हे सांगता येत नाही. एकच गोष्ट सांगता येते की एक अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जगणारी ही दोघे आहेत. दोघांचे या मैत्रीच्या रुपाने एकमेकांवर निरातीशय प्रेम आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे एका बाजूने सांभाळ आणि दुसऱ्या बाजूने समजुतदारपणा हा त्यांना समजला आहे. म्हणूनच असले सुंदर नाते जगणारी मंडळीच खऱ्या अर्थाने मैत्रीचे नाते जगतात. एक व्यक्ती मदत देण्यासाठी तत्पर असते तर दुसरी ती समजूतदारपणे नाकारते

हे दोन्हीही संदेश एकमेकांना पाठविल्यावर दोघांनीही एकमेकांना साॅरी म्हणले आणि पुन्हा तोच गोडवा निर्माण झाला. नेमके कुणाचे चूक नि कुणाचे बरोबर हे मात्र मला कळले नाही!!





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18