थोडा है थोडे की जरुरत है @01.10.19
खड्डा भरणे सुरु झालेय!
आज १ ऑक्टोबर. आजचा दिवस माझ्याकरीता अतिशय महत्वाचा आहे. आजच्याच दिवशी तेवीस वर्षांपूर्वी मी माझ्या आई वडीलांच्या आशिर्वादाने आणि माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनामुळे या उच्चशिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रवेशित झालो होतो. तेवीस वर्षांपूर्वी मी आमगावच्या भवभूती महाविद्यालयात माझ्या इंग्रजीचा पहिला तास घेतला होता. गेले तेवीस वर्षे या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करण्याचे जे वचन मी माझ्या याच क्षेत्रात मोठे योगदान दिलेल्या वडीलांना दिले होते त्या वचनाला जागण्याचा प्रयत्न करीत राहीलो. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे नेमून दिलेल्या कामाच्या पलीकडे बघण्याची सवय लागली व तेव्हापासूनच विद्यार्थ्यांच्या खाजगी मनोजगतात जसे जमेल तसे डोकावून, त्यांना बोलते करुन, त्यांचे मन जाणण्याचा प्रयत्न करीत राहीलो. परंतू एका वर्षाच्या आतच काही अनुभव असे आले होते की ज्या शिक्षण व्यवस्थेचा मी पुढील अनेक वर्षे भाग बनणार होतो त्यामधील केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार कमी केला जातोय ही बाब मला सतावू लागली. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्यांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार मनाला सतावू लागला. याबद्दल तिव्र भाव माझ्या मनात तेव्हा निर्माण झाले जेव्हा एका कला अंत्य वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्याचे पालक मला भेटले.
आमगावला इतर महाविद्यालयांप्रमाणे आम्ही पालक मेळावा आयोजित करीत होतो. एका पालक मेळाव्यामधे विचार मांडण्याची संधी प्राचार्यांनी मला दिली. मी तेथे उपस्थित पलकांना त्यांनी त्यांच्या पाल्यांना त्या महाविद्यालयात तसेच उच्च शिक्षण प्रक्रीयेत प्रवेश देऊन किती चांगले कार्य केले हे समजाविण्याचा प्रयत्न केला. सगळे चांगले चांगले बोलून मी थांबलो. कार्यक्रम खूप छान झाला. परंतू कार्यक्रम संपल्यावर त्या अंत्य वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्याचे पालक मला भेटायला आले. मी त्या वर्गाला देखील इंग्रजी शिकवायचो. मी या अपेक्षेत होतो की ते मला म्हणतील, सर तुम्ही छान बोललात, किंवा माझ्या मुलाकडे लक्ष ठेवा परंतू ते काहीतरी वेगळेच बोलले. ते मला म्हणाले, सर तुम्ही लोक काही बरोबर नाही करुन राहीले. मी अडाणी माणूस आहे, शाळेत गेलोच नाही पण माझ्या पोराच्या बाबतीत तुम्ही काही ठीक नाही करुन राहीले. मी आश्चर्यचकित झालो. इतर पालकांनी कार्यक्रमाचे भरभरुन कौतूक केले असताना अशी प्रतिक्रीया मला अगदीच अनपेक्षित होती. मी त्यांना शांतपणे बसायला लावले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे ऐकल्यावर मी विचारात पडलो. समस्या खरोखरीच गंभीर होती. खरे सांगतो त्या समस्येवर उपाय शोधण्यामधे २३ वर्षे निघून गेलीत. आता कुठे त्यावर उपाय निघण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता आता उच्च शिक्षण क्षेत्रात बदल येऊ घातले आहेत. पण त्याकरीता एवढा कालावधी जायला लागला. त्या आमगावच्या पालकाचे शब्द आजही माझ्या कानात रुंजी घालतात.
त्य विद्यार्थ्याचे पालक मला म्हणाले होते, तुम्ही माझ्या पोराचे नुकसान करुन राहीले. त्याला तीन वर्षे काॅलेजमधे तुम्ही व्यस्त करुन टाकले. या बी. ए. च्या तीन वर्षानंतर त्याला नोकरीची खात्री अजीबात नाही. मिळाली तरी अशीच मिळते जी बारावी झाल्यावरही मिळाली असती. आणि महाविद्यालयात येत असल्यामुळे त्याच्यात झालेला एक बदल आम्हाला त्रासदायक आहे. आमच्या परीवाराकडे रस्त्याचे काम आहे. त्यात खणलेले खड्डे भरण्याचे काम आहे. मी व माझा परीवार ते काम करतो. आम्ही दिवसभरात प्रत्येकी तीन खड्डे भरतो. त्यामुळे आम्हाला साधारण सर्वांना मिळून हजार ते बाराशे रुपये रोज मिळतो. या माझ्या काॅलेजमधल्या पोराला कामावर चल म्हणतो, काॅलेज संपल्यावर ये म्हणतो तर त्याने मला म्हणले की मला ते काम करायची लाज वाटते. माझ्या वर्गातील मुले व मुली मला रस्त्याच्या कडेला काम करताना बघून हसतात. त्यामुळे तो येतच नाही. आमचे नुकसान होऊन राहीले. बरे झाले माझ्या दुसऱ्या मुलाची मी दहावी नंतरच शाळा बंद करुन टाकली. तो जातो खड्डे भरायला पण हा काही येत नाही. सर, ना याला नोकरी लागत ना हा खड्डे भरायला जात. सांगा काय करावे? या शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही लोकांनीच एक मोठ्ठा खड्डा करुन ठेवला सर. त्याला बुजवा. हे शेवटचे शब्द माझ्या मनाला लागून गेले. खरोखरीच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी किंवा व्यवसाय करण्याची क्षमता आपण निर्माण करतोय? बहुदा नाही. कारण हा प्रसंग झाल्यावर अगदी आता आता पर्यंत हाच अनुभव येत होता. एका मुलींच्या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून कार्य करताना अगदी प्रवेशाच्या दिवशी २५ टक्क्यांहून जास्त विद्यार्थीनी संपुर्ण वर्षभर महाविद्यालयात अनुपस्थित राहण्याची परवानगी मागायच्या. त्यामागचे कारण होते की त्यांना त्या वेळात नोकरी करायची होती. त्यांची सत्यता तपासल्यावर त्या खरे बोलत आहेत हे देखील लक्षात आले. ज्या उच्च शिक्षणाच्या प्रक्रीयेमधे या विद्यार्थिनी प्रवेशित होत आहेत तेथे अजिबात हजर न राहता त्यांना नोकरी करायची आहे याचा अर्थ जो मी काढला तो म्हणजे त्यांना या व्यवस्थेमधे तीन वर्षे घालविल्यानंतर नोकरी मिळेल अशी शाश्वती नाही. त्यांच्या मनात असलेला हा भाव मला फारच वेदनादायी होता. मला अचानक त्या आमगावच्या पालकाने सांगितलेला खड्डाच आठवला जो अद्यापही भरला नव्हता. विशेषतः कला व वाणिज्य पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी नंतर काय करावे हा मोठा प्रश्न अगदी आतापर्यंत होता. परंतू कालचक्र हे मार्ग काढतेच. काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या शिक्षणतज्ञाची मुलाखत घेत असताना मला याचे उत्तर सापडले.
साधारण सात महिन्यांपूर्वी मी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डाॅ. फाटक यांची मुलाखत घेताना ते एक वाक्य म्हणाले की यापुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमधे कला आणि वाणिज्य पदवीधारकांना मोठ्या प्रमाणात नोकरींच्या संधी उपलब्ध होतील. मग त्यासाठी काय करावे लागेल असा विचार करीत असतानाच विद्यापीठामधे एका कार्यशाळेदरम्यान नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुदा समितीचे एक सन्माननीय सदस्य कुलगुरु डाॅ. टी. व्ही. कट्टीमणी असे म्हणाले की, साधारण पंचेवीस वर्षांपूर्वी शिक्षणाच हेतू ज्ञान व माहिती पुरविणे होते परंतू तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे हे आता सहज उपलब्ध झाले व म्हणूनच आता शिक्षणाचा हेतू रोजगार हा बनलेला आहे. काही वर्षांनी हा हेतू देखील बदलेल परंतू आता मात्र जो हेतू आहे त्या अनुषंगाने आपल्याला आपले अभ्यासक्रम बदलावे लागतील.
सुदैवाने आता उच्च शैक्षणिक क्षेत्रात कधी नव्हे तेवढे बदल होऊ घातले आहेत. प्रत्येक विषयांना कौशल्याधिष्टीत बनवून त्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरते आहे. मूलभूत विषयाच्या अभ्यासासोबत प्रत्येकच विषयाला रोजगाराभिमुख बनविणे आता सुरु झाले आहे. येत्या पाच वर्षांमधे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या किमान ५० टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळायला हवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य सुरु झाले आहे. सामाजिक घटकातूनही या प्रयत्नांना बळ मिळण्याची गरज आहे. या सर्व बदलांना स्विकारण्याची सकारात्मकता निर्माण होणे गरजेचे आहे. ती आपण तयार करुयात. आपण शिकत आलेले विषय आता नव्या व प्रात्यक्षिकाच्या आधारे शिकविण्याकरीता हे उच्च शिक्षण क्षेत्र सज्ज होते आहे.
आता मला त्या आमगावच्या विद्यार्थ्याच्या पालकाला सांगता येणार आहे. पदवीधारक असलेल्या तुमच्या मुलाला आता रस्त्याच्या कडेचा खड्डा भरायला पाठवू नका. ते देखील काम सन्मानाचेच आहे परंतू ते काम करण्यासाठी शिक्षण न घेतलेली इतर मंडळी आहेत. परंतू तुमचा मुलगा पदवीधारक आहे, सोबत त्याच्याजवळ आता काही कौशल्ये आहेत, सोबत तो संगणक प्रशिक्षित आहे, त्याने काही ऑनलाइन कोर्सेस देखील केलेले आहेत व या द्वारे तो रोजगार मिळविण्यास समर्थ आहे. आपण काळजी करु नका, बराच वेळ झाला आहे हे मान्य आहे परंतू खड्डा भरला जातोय. जरासा धीर धरा!!
खरोखरच विचार करण्यासारखी विदारक स्थिती आहे. आपण एका चांगल्या समाजोपयोगी प्रश्नाला वाचा फोडली. वाचनीय आणि मननीय लेख!
ReplyDelete