थोडा है थोडे की जरुरत है @ 18.06.19

विराट मन

सध्या क्रिकेटच्या विश्वचषकाचे वारे जोरात सुरु आहेत. भारतीय चमुचा विजयरथ जोरात धावतोय. अतिशय बलाढ्य मनल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलीया आणि पाकीस्तान या चमुंना पराभूत करुन भारतीय चमू विश्वचषकाची प्रबळ दावेदार बनलेली आहे. जगातील अनेक लोक या विश्वचषकाला फॉलो करीत आहेत यामधील वेगवेगळ्या मॅचेस सोबत मैदानावर घडणाऱ्या काही विशेष बाबी देखील चर्चेत आहेत. सोशल मिडीयामुळे त्या भराभर सर्वत्र व्हायरल होत आहेत. एक घटना अशीच सर्वत्र पसरली आणि त्याबाबत मोठी चर्चा झाली. त्या घटनेबद्दल वाचल्यानंतर मनाला खरोखरीच आनंद झाला परंतू त्याचे ज्या प्रमाणात कौतुक झाले त्यावरुन ती बाब किती विरळ झालीय आणि सध्याच्या जगात ती बघायला मिळत नाही याची मात्र जाणीव झाली.

या वर्षीच्या विश्वचषकाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे हा इंग्लंडमधे खेळला जातोय जेथे या खेळाची सुरुवात झाली. इंग्रजांनी हा खेळ सुरु केला जगभर जेथे जेथे इंग्रजांचे राज्य होते तेथे तेथे त्यांनी हा खेळ आपल्या सोबत नेला. आपल्या देशात देखील असेच झाले सध्या हा आपल्या देशातला सर्वात लोकप्रीय खेळ बनला आहे. या खेळाला एक विशेष नाव देण्यात आले होते. सज्जन लोकांचा खेळ. या नावामागील मूळ संदर्भ वेगळा असला तरी नंतरच्या काळात चांगल्या खिलाडूवृत्तीने खेळला जाणारा खेळ असा त्याचा अर्थ सार्वत्रिक झाला. परंतू जगातील सर्वच क्षेत्रात स्पर्धेने धारण केलेले विखारी स्वरुप या खेळात देखील आले त्यामधून एका विचित्र प्रथेचा उगम झाला त्याला स्लेजींग म्हणतात. मैदानावर फलंदाज फलंदाजी करीत असेल तर त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी क्षेत्ररक्षण करणारे चमू त्याला अपशब्द उच्चारुन डिवचतात. विकेट किपरच्या बाजूने स्लीपमधे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू हे काम करतात. फलंदाज त्या शब्दांमुळे विचलित होतो विकेट गमावून बसतो. असा प्रकार इतक्यात बरेचवेळा बघायला मिळतो. हा  स्लेजींग प्रकार करुन प्रतिस्पर्धी चमुला हैराण करण्यामधे ऑस्ट्रेलीयाची चमू अग्रणी आहे. या चमुतील गोलंदाज इतर खेळाडू फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना हैराण करतात. चांगला फटका मारला की गोलंदाज मुद्दाम शिवीगाळी करुन फलंदाजाला डिवचतात कसेही करुन त्याला बाद करतात. थंड डोक्याने या सर्व स्लेजींगकडे दुर्लक्ष करुन खेळणे सर्वांना जमत नाही त्यामुळे अनेकवेळा फलंदाज ऑस्ट्रेलीया विरुद्ध खेळताना या प्रकाराला बळी पडतात. अश्या क्रिकेट जगतात बदनाम असलेल्या चमुतील विरोधक खेळाडूबद्दल भारतीय चमुच्या एका खेळाडूने दाखविलेल्या मनाच्या मोठेपणाची घटना सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

ऑस्ट्रेलीया विरुद्ध झालेल्या भारताच्या सामन्यादरम्यान घडलेली ही घटना आहे. इंग्लंडमधे प्रत्येकच सामन्याला भारतीय प्रेक्षकांची संख्या फार मोठी असते त्यामुळे त्या दिवशीच्या सामन्याला देखील भारतीय चमुला प्रोत्साहन देण्याकरीता मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षक हजर होते. ऑस्ट्रेलीया हा क्रिकेटच्या जगतात इंग्लंडचा परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने इंग्लंडचे प्रेक्षक देखील भारतीय चमुलाच पाठबळ देत होते. भारताची फलंदाजी सुरु होती त्याचवेळी हा प्रकार घडला. ऑस्ट्रेलीयाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा सिमेवर क्षेत्ररक्षण करीत होता आणि अचानक प्रेक्षकांनी त्याला मोठमोठ्याने चिडविणे सुरु केले. सर्वांनी मोठ्या आवाजात त्यालाचीटर चीटरम्हणून संबोधणे सुरु केले. कोणत्याही खेळाडूसाठी हा एक बोचणारा प्रकार असतो. या चिडविण्याचा आवाज इतका जास्त वाढला की खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या कानावर देखील तो पडला. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ख्याती असल्याने कोणताही खेळ हा चांगल्या खिलाडूवृत्तीने खेळायचा असतो ही बाब चांगलीच ठाऊक असल्याने विराट कोहलीने त्यनंतर केलेल्या कृतीचे जगभरात कौतूक होते आहे. सोशल मिडीयावर त्याच्या मोठ्या मनाबद्दल रकाने च्या रकाने लिहीले जात आहेत. इतकेच काय पण आयसीसीच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन या गोष्टीची दखल घेण्यत आली विराट कोहलीने केलेल्या कृतीबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले. विराटने नेमके असे काय केले की ज्यामुळे त्याला इतकी प्रशंसा मिळत आहे. त्याने स्टीव स्मीथ हा त्याचा प्रतिस्पर्धी असून देखील त्याच्याबद्दल सहानुभूती दाखविली. जेव्हा त्याच्या कानावर प्रेक्षकांचे ओरडणे आले तेव्हा त्याने प्रेक्षकांकडे इशारा करुन त्यांना तसे करता स्टीव स्मीथ साठी टाळ्या वाजवायला लावल्या. स्मीथबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या प्रेक्षकांना त्याने त्याला प्रोत्साहित करायला सांगितले. खरोखरीच कट्टर स्पर्धा स्लेजींग वगैरे सारखे प्रकार ज्या खेळात वापरले जातात त्यामधे विराट कोहलीने केलेली कृती ठळकपणे सर्वांना जाणवली त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे. आजच्या काळात असा दिलदारपणा दाखविणे ही खरोखरीच आनंदाची कौतुकाचीच बाब आहे. विराट कोहलीच्या या कृतीबद्दल मनापासून चांगले वाटत असताना मनात एक प्रश्न मात्र उभा राहतो. तो म्हणजे आपल्या विरोधकाबद्दल दाखविलेला हा समंजसपणा बहुदा इतक विरळ झालाय की त्याचे आपल्याला फारच जास्त कौतुक वाटतेय. विरोधकांनी एकमेकांबद्दल मनात विखार ठेवून जमेल तेव्हा आक्रमण करण्याच्या या क्रूर स्पर्धेच्या काळात विराट कोहलीचा हा मनाचा मोठेपणा ठसठशीतपणे जाणवतो. त्याला कारण म्हणजे आपण आपल्या आजुबाजूने अनुभवत असलेली अत्यंत क्रूर निष्ठूर स्पर्धा.

इतिहासची पाने उलटली तर आपल्याला विराट कोहलीसारखी मनाचा दिलदारपणा दाखविणारी अनेक माणसे दिसतील. समाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात एकमेकांचे विरोधक असलेले लोक सुद्धा परस्परांच्या विचारांना विरोध करीत असले तरी देखील विरोधाची पातळी कधीच सोडत नव्हते. किंबहुना त्यांच्य वेगळ्य विचारांचा सन्मान देखील करीत होते. मतभेद असताना देखील एकमेकांच्या कर्तृत्वाचा आदर राखण्याची एक अत्यंत सकस परंपरा सर्वांनीच पाळलेली होती. इतिहासातील लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मतभेद परंतू त्या दोघांचा एकमेकांबद्दलचा आदर सर्वश्रुत आहे. परंतू आधुनिक काळात स्पर्धेने अक्राळविक्राळ रुप धारण केल्यामुळे विरोधाचे स्वरुप देखील बदलले. आता विरोधकाला संपविण्याचा जमाना आला. विरोधकाचे विचार पटत नसतील तर त्याच्या विचारांसह त्यालाही संपविणे येथपर्यंत मजल गेली. विरोध करताना देखील अत्यंत आक्रमकतेने अश्लाघ्य भाषेचा वापर करुन आरोप केले जातात. विरोधक आहे तर जमेल त्या प्रकारे त्याची निंदा नालस्ती करणे, त्याला समाजापुढे उघडे पाडणे त्यांस पुरता नामोहराम करुन त्याचा विखारी आनंद प्राप्त करणे ही प्रवृत्ती वाढते आहे. अश्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने केलेली कृती सर्वांनाच भावली कारण तिच खरी माणसाचे माणूसपण सिद्ध करणारी कृती आहे

उत्क्रांती होताना प्राण्याचा माणूस झाला यामधे शरीररचनेसोबत मानसिक बदल हा फार महत्वाचा ठरला. इतरांकडे सहनुभूतीने प्रेमाने बघण्याची त्यानुसार कृती करण्याची जबरदस्त क्षमता माणसाला प्राप्त झाली त्यातूनच त्याला माणूसपण मिळाले. म्हणूनच या माणूसपणाचा खरा परीचय देताना आपल्या आवडीच्या लोकासोबतच आपल्या विचारांपेक्षा वेगळा विचार ठेवणाऱ्या लोकांचाही सन्मान करता येणे ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. माणसाचे जगण्याचे अधिष्ठानच विचारांच्या आधारे असल्याने प्रत्येकाचा विचार वेगळा असणे ही एक स्वाभाविक प्रक्रीया आहे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या जडण घडणीनुसार त्याचे विचार तयार होत असतात ते वेगळे राहू शकतात ही बाब लक्षात घेतली की मग केवळ माझेच विचार योग्या आहेत सर्वात चांगला विचार मीच करु शकतो हा अहंभाव जागृत होत नाही. त्यामधूनच आपल्याला इतरांचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या विरोधकाचा अपमान करणे, त्याला घालून पाडून बोलणे, त्याच्यावर आपली मते जबरदस्तीने थोपविणे या माध्यमातून आपले विघातक मूल्य वाढवून आपला दरारा निर्माण करणे ही फार सोपी गोष्ट आहे. परंतू प्रत्येकाच्या विचारांचा सन्मान करुन, योग्य तो मान देऊन, विरोधक असला तरी त्याची अवहेलना करता आपले मत व्यक्त करुन अनेक मने जिंकता येतात. परंतू कदाचित ही बाब फारच कठीण असल्यानेच विराटचे मोठे कौतुक जगभर केले जात आहे. विराटसारखेविराटमन आपलेही असायला हरकत नाही. होय ना?





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19