थोडा है थोडे की जरुरत है @ 25.06.19

रेंगाळणारा तो अन् व्याकूळ ती

आज पहाटेपासूनच तो प्रचंड उत्साहात होता. उत्सुकतेने घाई घाईने तो ठरलेल्या स्थळी पोहोचला. आजचा दिवस विशेषच होता त्याच्यासाठी. सबंध वर्षात एकदाच ही सुसंधी त्याला प्राप्त होणार होती. आज त्याला त्याच्या सखीसोबत सर्वात जास्त वेळ राहता येणार होते. तिच्यासोबत राहणे हा त्याच्याकरीता एक अत्यंत सुखद रमणीय अनुभव असतो. कारण दोघांचा सहवास हा कायम राहणार नाही हीच नियती असते. तिला ठराविक काळानंतर तिच्या वर्तुळात जावे लागते आणि त्याला त्याच्या वर्तुळात. म्हणूनच एकमेकांच्या भेटीचा योग साधताना तो कमालीचा उत्सुक असतो. वेगवेगळ्याप्रकारे त्याची धडपड सुरु असते तिच्या सहवासात राहण्याची. त्यात अडचणी आणि व्यवधाने देखील बरीच असतात. परंतू त्या सर्वांवर मात करुन भेट होतेच. आणि आज तर सर्वात जास्त वेळ तो तिला भेटणार होता. स्वत:च्या मनाची हुरहुर त्याला जाणवित होती. धडधडत्या ह्रदयाने तो पोहोचला आणि तिची वाट बघू लागला. तिच्याही मनाची अवस्था काही वेगळी नव्हती.

त्याचा सहवास तिलाही फार फार आवडायचा. ती त्याच्या एवढी मुक्त नव्हती. तिला अनेकांना सांभाळावे लागायचे. अनेकांची काळजी घ्यावी लागायची. परंतू तसे असले तरी तिच्या मनात त्याची एक विशेष जागा होती. ती जागा तिने केवळ त्याच्या प्रेमासाठी सुरक्षित ठेवली होती. कारण तिच्यासाठी तो तिचा सर्वात महत्वाचा आधार होता. तिला जेव्हा वेदना व्हायच्या तेव्हा तो असायचा, तिच्या खांद्यावर थोपटत, तिला आधार देताना. आणि जेव्हा तिला आनंद व्हायचा तेव्हा तिच्या डोळ्यातील आनंद लकाकी दूरुनच तो न्याहाळायचा, परंतू त्याच्या डोळ्यातील आनंद बघून तिला कृतार्थ वाटायचे. इतके गोड नाते होते दोघात की तिची कोणतीही भावना त्याच्या प्रतिक्रीयेशिवाय पूर्ण व्हायची नाही आणि तिच्या सहवासाशिवाय त्याच्या आयुष्याचा कोणताच प्रसंग पुर्णत्वाला जात नव्हता. या दोघांचे नातेच विलक्षण होते. त्याच्या अस्तित्वाशिवाय तिच्या भरभराटीला अर्थ नव्हता आणि तिच्या सहवासाशिवाय त्याच्या मोठेपणाला वाव नव्हता. असे असले तरी हा प्रेमसोहळा काही वेळापुरताच होता आणि म्हणूनच आजचा दिवस त्या दोघांकरीताही फारच महत्वाचा होता. कारण आजच्या दिवशी परस्पर सहवासाला सर्वात जास्त वेळ मिळणार होता.

आजच्या भेटीमधे कसलीही बाधा येऊ नये असे त्याला नि तिला देखील मनापासून वाटत होते. पहाटेलाच तो आला आणि आपल्या सखीला बघण्यास आतूर झाला. पण हे काय? त्याला काहीच दिसेना! त्याच्या नजरेपुढे तर जणू एक पडदाच निर्माण झाला होता. एक दाट पडदा ज्यामधून काहीही दिसू शकत नव्हते. काही क्षणच त्याचा जीव कासाविस झाला. तिच्या शिवाय त्याचे असेच व्हायचे. एरवी कोणत्याही गोष्टीला डगमगणारा किंवा मनाने अतिशय खंबीर असणारा तो तिच्या बाबतीत मात्र कमालीचा हळवा होता. काही क्षण कावरे बावरे गेले. त्याच वेळी तिची पण स्थिती तशीच झाली होती. कारण ती देखील मोठ्या लगबगीने आपल्या जीवलगाला आजच्या महत्वाच्या दिवशी भेटण्यासाठी नटून थटून आली होती. स्वत: ला न्याहाळताना तिच्याही गालावर त्याच्या आगमनाच्या चाहुलीने लाली पसरली होती. परंतू हे काय? तिचा तो सखा तर दिसतच नव्हता. तिच्या आणि त्याच्यामधे एक दाट पडदा निर्माण झाला होता. ती बिचारी काही करु शकत नव्हती. हुरहुरत्या मनाने प्रार्थना करणे तिच्या हातात होते. परंतू एक विश्वास होता की तिचा सखा तिला बघण्यासाठी जीवाचे रान करेल, कारण तिचा सहवास हा त्याच्यासाठी अमृतमयी असतो हे तिला आणि केवळ तिलाच ठाऊक होते. आणि झालेही तसेच. सुरुवातीच्या कासावीस झाल्याच्या स्थितीनंतर तो सावरला. त्याच्या लक्षात आले की त्याच्या ठायीच तर प्रचंड क्षमता आहे ज्यामुळे तो त्या दोघातला तो अडसर दूर करेल. आपले बाहु सरसावून तो संपुर्ण ताकदीनिशी त्या आडकाठी करणाऱ्या पडद्यावर तुटून पडला. तिला भेटण्याची आस मनात इतक्या मोठ्या प्रमाणात दाटली होती की आजच्या विशेष दिवशी तिच्या सहवासातील एकही क्षण त्याला वाया घालवायचा नव्हता. काही क्षणातच आपल्या शक्तीच्या तेजाने त्याने तो पडदा दूर केला आणि समोर बघतो तर काय? त्याची सखी, त्याची मैत्रीण, त्याचा आनंद, त्याचा अमृतमयी आधार, त्याच्या हळव्या मनाला सांभाळणारा सक्षम स्रोत, त्याची जिवलग त्याच्या दर्शनाने अक्षरश: पुलकित होऊन समोर उभी होती. आनंदाश्रुंनी दोघांचेही डोळे भरुन आले होते. सर्वात जास्त सहवास घडविणाऱ्या आजच्या दिवसाची दोघांनीही कितीतरी दिवस वाट बघितली होती. अखेर तो दिवस आला आणि त्या प्रेममयी सहवासाचा आनंद दोघेही घेऊ लागले. किती बोलू नि किती नाही असे झाले होते तिला. तिच्या मनातल्या भावना त्याच्याजवळच ती व्यक्त करायची कारण त्या भावना त्याच तिव्रतेने समजून घेणारे मन त्याच्याकडे होते. तिचा त्रागा, तिचा राग, तिचा हताशपणा, तिचे नाराज होणे, तिचे खळखळून हसणे, तिचे प्रफुल्लीत होणे, तिचे सुंदर डोळ्यांनी बोलणे या साऱ्या भावना ती संपुर्णपणे केवळ त्याच्याकडेच व्यक्त करीत असायची, तेच तिने आजही केले. भरभरुन बोलली आणि तिला छान वाटले. ती भरभरुन बोलली आणि त्यालाही छान वाटले कारण तिने आपले समजून सांगितले याचाच त्या वेड्याला अभिमान. तिच्यासाठी हे करु दे, ते करु दे, तिला आवडते म्हणून गाणेच गाऊ दे, किंवा एखादी कविताच वाचू दे असे सारे त्याचही सुरु राहीले दिवसभर. वेळ कसा निघून गेला कळलेच नाही आणि दोघांच्याही नकळत आपापल्या वर्तुळात जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. हळूहळू तो धूसर होऊ लागला. वियोगाचा क्षण जवळ येतोय हे दोघांच्याही लक्षात आले. काहीच क्षण दोघेही शांत होते. केवळ सुखद सहवासाची अबोल भाषा दोघांमधे शब्दांविना बोलली जात होती. मनातील हुरहुर आता चेहेऱ्यांवर उमटू लागली. सकाळच्या आनंदी चेहेऱ्याचा रंगच पार बदलून गेला होता. आजच्या दिवशी जरासा जास्त वेळ असल्याने तो रेंगाळला आणि त्याचे रेंगाळणे बघून ती अजूनच जास्त व्याकुळ होऊ लागली. परंतू त्याला जास्त रेंगाळणे शक्य नव्हते. हळू हळू तो तिच्यापासून दूर, आणखी दूर जाऊ लागला आणि काही वेळात दिसेनासा झाला. जाताना वियोगाने व्याकूळ झालेल्या त्याच्या मनाचा हुंकार एका अश्रूच्या रुपाने तिला दिसला. त्याचवेळी ती देखील तिच्या डोळ्यातील त्याच भावनेने ओघळलेला अश्रू पूसत होती. शेवटी सर्वात जास्त सहवासाचा तो दिवस संपला आणि पुन्हा सुरु झाली त्या दोघांची प्रतिक्षा, अनेक दिवसांसाठी

कार्यालयीन कामानिमित्त परगावाहून परतताना गाडीतून मी बाहेर बघत होतो आणि अचानक मला हे त्याचे रेंगाळणे आणि तिचे व्याकुळ होणे प्रत्यक्ष दिसले. त्या दोघांचे ते हळवेपण, तो सहवासाचा आनंद, ती परस्परांबद्दलची ओढ, तो शब्देवीण संवाद, ते वियोगाचे दु:, त्यानंतर डोळ्यातून ओघळलेले ते अश्रू आणि सरतेशेवटी इच्छा नसूनही कर्तव्यपूर्तीसाठी दोघांनीही एकमेकांचा जड अंत:करणाने घेतलेला निरोप ते सारेच विलक्षण होते जे मी प्रत्यक्ष अनुभवले. ते सारे बघून नकळत माझ्याही डोळ्यातून एक अश्रू ओघळलाच. कारण त्या दोघांना एकमेकांचा सर्वात जास्त सहवास घडविणारा तो दिवस अखेर सरलाच. तिच्या ओढीने जीवाचे रान करुन पहाटे पूर्वेला उगवलेला तो तेजोनिधी आणि त्याच्या आगमनासाठी सहवासासाठी सारी बंधने तोडून मुक्त होऊन त्याला समर्पित झालेली ती अवनी या दोघांनाही सहवासाचा सर्वात जास्त काळ देणारा तो दिवस संपला. तो दिवस होता, २१ जून. वर्षातील सर्वात मोठा दिवस. सूर्य आणि पृथ्वी यांना सर्वात जास्त वेळ सहवासात ठेवणारा दिवस. या संदर्भांसह हा सारा आनंद सोहळा पुन्हा एकदा वाचून अनुभवूयात?




 


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18